फक्त मुंबईच नाही तर राज्य आणि देशभरातून रुग्णांचा सतत मोठा ओघ असूनही मुंबईतली पालिका रुग्णालये अत्यंत उत्तम दर्जाची सेवा देतात. त्यांच्या सेवेला आणि तेथील डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीला सलाम..

ऑपरेशन थिएटरबाहेर उभे असलेल्या नातेवाइकांचे चेहरे गंभीर होते. साऱ्यांनाच काळजी होती.. थोडय़ाच वेळात डॉक्टरांनी बाहेर येऊन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही..नव्वदीच्या रामजीभाई यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली होती. विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय महाजन हेही खुशीत होते. कारणही तसेच होते, नव्वदीच्या रामजीभाई यांच्यावर त्यांनी यशस्वीपणे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. हे चित्र होते महापालिकेच्या शीव रुग्णालयातील.. परीक्षेचा ताण सहन न झालेल्या सतरा वर्षांच्या राजूला हृदयविकाराचा झटका आला. तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर डॉ. महाजन यांनी यशस्वी अँजिओप्लास्टी केली. महापालिकेची शीव, नायर, केईएमसह सर्वच रुग्णालये ही गोरगरीब रुग्णांसाठी वरदान आहेत.
मुंबईतील दंगली असो, उपनगरीय रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट असो, नैसर्गिक आपत्ती अथवा साथीचे आजार, कोणत्याही आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्याची क्षमता प्रत्येक वेळी महापालिकेच्या रुग्णालयांनी व तेथील डॉक्टरांनी दाखवली आहे. उपनगरीय रेल्वे बॉम्बस्फोटाच्या वेळी स्फोटातील जखमींना घेऊन रुग्णवाहिकांचा ओघ केईएम आणि शीव रुग्णालयात लागला होता. डॉक्टर, परिचारिका अखंडपणे उपचार करत होते. एकीकडे नातेवाईक व रुग्णांचा आक्रोश तर दुसरीकडे व्हीआयपी नेतेमंडळी आणि मंत्र्यांचा राबता..या साऱ्यातही आपली शांतता जराही ढळू न देता वेगेवगळे विभाग समन्वयातून रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करतानाचे चित्र अनेकांनी पाहिले आहे. येणारे मंत्री तोंड भरून डॉक्टरांचे कौतुक करत आपली छबी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात कशा येतील याची काळजी घेत होते. रुग्णालयाच्या प्रमुखांना म्हणजे अधिष्ठात्यांना काहीही लागले तर आम्हाला कळवा असे आवर्जून सांगत होते. प्रत्यक्षात या नेत्यांनी व मंत्र्यांनी कधी नंतर रुग्णालयातील प्रश्नांची चौकशी केली नाही ही बाब अलाहिदा..
उपनगरीय रेल्वे ही जशी लाखो प्रवाशांसाठी ‘जीवनवाहिनी’ आहे तशीच महापालिकेची रुग्णालये ही ‘जीवनदायिनी’ आहेत. महापालिका रुग्णालयांचा इतिहास, त्यांची कामगिरी आणि विकास हा साराच प्रवास थक्क करणारा आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य असा समन्वय असलेली यंत्रणा देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोणत्याही देशाकडे नाही.. महापालिका रुग्णालयात गोरगरिबांना सर्वोत्तम तसेच जवळपास मोफत आरोग्यसेवा मिळत असल्यामुळे केवळ राज्यातून नव्हे तर आणि देशभरातून येथे उपचारांसाठी रुग्णांचा ओघ लागलेला असतो. दुर्दैवाने एवढी सेवा देऊनही अनेकदा किरकोळ कारणांसाठी प्रसारमाध्यमांच्या टीकेच्या हल्ल्यांना येथील डॉक्टरांना सामोरे जावे लागते. बाहेरच्या जगात म्हणजे खासगी रुग्णालयात काम केले तर पालिका रुग्णालयात महिन्याकाठी मिळणाऱ्या वेतनाच्या कितीतरी पट पैसे मिळण्याची संधी असतानाही अनेक डॉक्टर निरपेक्ष वृत्तीने केईएम, शीव तसेच नायर रुग्णालयात अध्यापन व रुग्णसेवेचे काम करत असतात. या तिन्ही वैद्यकीय महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना जगात आज मान मिळतो यामागे आहे, येथे उपलब्ध होणारे ज्ञान. मुंबई महापालिकेच्या या रुग्णालयांतून उत्तीर्ण होऊन असंख्य डॉक्टर जगातील विविध देशांत स्थिरावले आहेत. हा सारा प्रवास एका रात्रीत झालेला नाही तर येथील डॉक्टरांची अनेक वर्षांची तपश्चर्या यामागे आहे.
महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये मिळून आजघडीला ८० लाख रुग्ण वर्षांकाठी बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेतात तर सुमारे साडेसात ते आठ लाख शस्त्रक्रिया वर्षांकाठी होतात. हृदयविकार, मूत्रपिंड, मेंदू, बालशल्य आदी विविध विभागांबरोबर प्लास्टिक सर्जरीतही पालिकेच्या रुग्णालयांची ‘दादागिरी’ चालते. डॉ. रविन थत्ते यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या प्लास्टिक सर्जनने शीव रुग्णालयातील विभाग विकसित केला तर माजी अधिष्ठात्री अर्मिडा फर्नाडिस यांनी केलेल्या नवजात शिशू (निओनेटॉलॉजी) विभागाला आज जगात मान्यता आहे. डॉ. जी. बी. परुळकर, डॉ. प्रज्ञा पै, डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ. रवी बापट, डॉ. आचार्य, डॉ. अॅलन अल्मेडा, डॉ. संजय ओक यांच्यापासून ते डॉ. अविनाश सुपे यांच्यापर्यंत असंख्य lp57डॉक्टरांमुळे पालिका रुग्णालये सर्वोत्तम ठरली आहेत. शीव रुग्णालयात अपघातातील सुमारे ३५ हजार रुग्णांवर दरवर्षी उपचार केले जातात. खरे तर या रुग्णालयांचा नव्याने विकास होण्याची गरज आहे. एकटय़ा शीव रुग्णालयात वर्षांकाठी १४ हजार महिला मुलांना जन्म देतात. महापालिका रुग्णालयांच्या विकासाला एके काळी दानशूर लोकांनी हातभार लावला होता. शासनाचे जे.जे. रुग्णालय हेही असेच दानशूर लोकांच्या देणगीमधून उभे राहिलेले रुग्णालय आजही मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची शान आहे. शीव रुग्णालयात वर्षांकाठी सुमारे सतरा लाख रुग्णांवर बाह्य़रुग्ण विभागात उपचार केले जातात तर केईएममध्ये सुमारे तीस लाख लोकांवर बाह्य़रुग्ण विभागात उपचार केले जातात. नायर रुग्णालयातही जवळपास सोळा लाख रुग्ण उपचारांसाठी येतात. आरोग्यसेवेचा हा सारा पसारा सांभाळणाऱ्या यंत्रणेला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे लोंढे आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे कमालीचे व्यस्त आहे. हे कमी ठरावे म्हणून की काय पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून उत्तीर्ण होणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षांची सक्तीची सेवा ग्रामीण भागात करावी लागते. हेच डॉक्टर महापालिकेच्या रुग्णालयांसाठी उपलब्ध झाले तर त्याचा खरा फायदा रुग्णसेवेला मिळू शकेल, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. केवळ मुंबईचा विचार करावयाचा झाल्यास साठ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. याशिवाय राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या विचारात घेतल्यास पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून उत्तीर्ण होणारे डॉक्टर तसेच पदव्युत्तर डॉक्टरांना एक वर्षांसाठी ग्रामीण भागात न पाठवता पालिकेच्याच सेवेत देणे गरजेचे आहे. मात्र राज्य शासनाकडे वारंवार वस्तुस्थिती दाखवूनही अजूनही याबाबत निर्णय घेतला जाताना दिसत नाही. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून खरे तर पालिकेच्या रुग्णालयांसाठी भरीव मदत मिळणे गरजेचे आहे. किमान वैद्यकीय महाविद्यालयांमधील अध्यापकांच्या वेतनाचा भार जरी राज्य शासनाने उचलला तरीही अधिक प्रभावी आरोग्यसेवा पालिकेला देता येईल.
महापालिकेचे आरोग्याचे बजेट हे सुमारे २७०० कोटी रुपयांचे आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे बारा हजार खाटा असून मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये सुमारे पंचावन्न हजार खाटा आहेत. खाजगी, नर्सिग होम तसेच पंचतारांकित रुग्णालयांमधील उपचारांचे दर हे आज सर्वसामान्यांच्याही आवाक्याबाहेरचे आहेत. अशा वेळी गोरगरीब रुग्णांसाठीची पालिका तसेच राज्य शासनाची सार्वजनिक आरोग्यसेवा टिकली पाहिजे. एवढेच नव्हे तर बळकट झाली पाहिजे. दुर्दैवाने मुंबईतील पंचताराकित आरोग्य सेवा वाढत असताना दुसरीकडे पालिकेची आरोग्यसेवा खिळखिळी करण्याचे काम काही लोक करत आहेत. दुर्दैवाने प्रसारमाध्यमांकडून याला हातभार लावला जात आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एकापेक्षा एक चांगल्या तसेच अवघड शस्त्रक्रिया होत असताना त्याचे चित्रण न करता एखादी कमजोरी एथवा त्रुटीचेच चित्रण माध्यमांकडून दाखवले जाते. हे सांगायचे कारण म्हणजे डॉ. संजय ओक नायर रुग्णालयात असताना त्यांनी देशातील सार्वजनिक रुग्णालयांमधील पहिली रोबोटेक शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच माध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले होते. केईएममधील ख्यातनाम न्युरोसर्जन डॉ. अतुल गोयल यांनी विकसित केलेल्या अनेक प्रोसिजर या ‘गोयल प्रोसिजर’ म्हणून अनेक देशांतील न्युरोजर्सन वापरतात. शीव रुग्णालयाचे डॉ. अविनाश सुपे हे संपूर्ण एशियासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्याची जबाबदरी सांभाळत आहेत. देशाचा वैद्यकीय अभ्यासक्रम ठरविण्याच्या कामात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. १९२६ साली केईएमची स्थापना झाली तर १९२१ साली टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सन १९४६ मध्ये महापालिकेने शीव येथील लष्करी रुग्णालय ताब्यात घेतले होते येथेच पुढे १९६४ साली तिसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले.
केईएम रुग्णालय व जीएस मोडिकल कॉलेजची कथा सुरस म्हणावी लागेल. शेठ गोवर्धनदास सुंदरदास यांच्या देणगीमधून हे जीएस मेडिकल कॉलेज १९२५ साली सुरू करण्यात आले. ही संस्था स्थापन होईपर्यंत मुंबईची आरोग्यसेवा प्रामुख्याने युरोपीय व इंग्लिश डॉक्टरांच्या हाती होती. पाश्चात्त्य वैद्यकाचे शिवधनुष्य भारतीयांना पेलेल का, असा सवाल यातील काहींनी उपस्थित केला. हा अपमान सहन न झाल्याने डॉ. जीवराज मेहता यांनी या महाविद्यालयाची कल्पना साकारली एवढेच नव्हे तर ‘माझ्या रुग्णालयातील वॉर्डबॉय ते अधिष्ठाता हे सर्वजण भारतीय असतील’ अशी घोषणा त्यांनी केली. आज केईएम व जीएस मेडिकल कॉलेजचे नाव साऱ्या जगात आदराने घेतले जाते. याच केईएम रुग्णालयात पहिली हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात आली तर परीक्षा नलिका बालिकेला (टेस्टटय़ुब बेबी) जन्म देणारे केईएम हे भारतातील पहिले रुग्णालय ठरले. अशा अनेक शस्त्रक्रिया तसेच विभाग सुरू करणारे केईएम हे पहिलेच रुग्णालय असून येथे उपचारासाठी आज एवढी गर्दी होते की रुग्णालयातील विभागात खाटांवर व खाटेखालीही रुग्ण झोपलेले दिसून येतात. रक्तगटातील ‘बॉम्बे गट’ शोधून काढला तो डॉ. भेंडे यांनी तर अतिरक्तदाबावरील जगन्मान्य सर्पेन्टिना हे औषध केईएममधील डॉ. रुस्तुम जाल वकील यांनी शोधून काढले. हृदयशस्त्रक्रियेसाठी वापरली जाणाऱ्या ‘खास सुरी’चा शोध हा केईएमच्या डॉ. प्रफुल्लकुमार सेन यांच्या नावावर आहे. कुत्र्यामध्ये हृदयरोपण करण्याचा अभूतपूर्व प्रयोगही डॉ. सेन यांनी केला होता. डॉ. ए. व्ही. बालिगा यांनी त्या काळी रशियाकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळवली होती. डॉ. जी. व्ही. देशमुख आणि डॉ. बी. एस. मिराजकर यांच्या शल्यक्रियेला तोड नव्हती. अशीच परिस्थिती शीव व नायर रुग्णालयाची असून डॉ. आनंदराव नायर यांनी सुरू केलेले यमुनाबाई नायर रुग्णालय हे काळाच्या ओघात पालिकेने चालवायला घेतले. नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात मिळणारे दंतोपचार वैशिष्टय़पूर्ण म्हणावे लागतील. लाखो शालेय मुलांचे दंत आरोग्य जपण्याचे मोठे काम नायर दंतमहाविद्यालय करत असते. लष्कराच्या बराकीत सुरू झालेल्या शीव रुग्णालयाचा विकास डॉ. एस. व्ही. जोगळेकरांच्या काळात झाला. पुढे तेथेही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. पुढे विलेपार्ले येथे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय सुरू झाले. कोणत्याही पंचतारांकित रुग्णालयामध्ये असलेल्या जवळपास सर्व सुविधा व तंत्रज्ञान आज पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. जागतिक दर्जाचे खंडीभर डॉक्टर रुग्णांचे अहोरात्र सेवा करत आहेत. सर्वप्रकारचे गंभीर आजार अगदी कॅन्सरसह सर्व आजारांवर पालिका रुग्णालयात उपचार केले जातात. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपनगरीय रुग्णालये व दवाखाने हा पालिकेच्या आरोग्यसेवेचा कणा आहे. तथापि राजकारण्यांना उपनगरीय रुग्णालयांमध्ये स्पेशलाइज (अतिविशेष उपचार)सेवा मिळावी असे वाटते. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे व तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही. महापालिकेत व राज्यात आज शिवसेना-भाजपचे सरकार असल्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांच्या विस्तारासाठी तीस मीटर उंचीची अट सरकार काढेल, असा विश्वास पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्याच्या व्यवस्थेवर येणारा ताण सहन करण्याची रुग्णालयांची क्षमता संपल्यामुळे उपनगरातील भगवती, कूपर, व्ही. एन. देसाई, राजावाडी, शीव तसेच केईएमच्या विस्ताराची गरज आहे. त्यासाठी सध्या असलेल्या तीस मीटर उंचीचा र्निबध काढणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांच्या बांधणीसाठी राज्य व केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पालिकेचे क्षयरोग रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त संजय देशमुख सांगतात. उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपनगरातील रुग्णालयांच्या विस्तारीकरणाचे तसेच अत्याधुनिकीकरणाचे काम सुरू असून सुमारे तीन हजार अतिरिक्त खाटा या रुग्णालयात निर्माण केल्या जाणार असल्याचे ते सांगतात. अनेक पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्याच्या विकासात लक्ष घालून अनेक चांगले निर्णय घेतले. तत्कालीन पालिका आयुक्त जॉनी जोसेफ यांनी रुग्णालयांच्या मजबुतीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. व्ही. रंगनाथन यांच्यापासून ते विद्यमान आयुक्त सीताराम कुंटे या प्रत्येक आयुक्ताने आरोग्य सेवेच्या विकासावर भर दिला. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या प्रयत्नातून पालिका रुग्णालयात स्वतंत्रपणे डायलिसीससाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच मधुमेह व रक्तदाबासारख्या नॉन कम्युनिकेबल आजारांसाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. मधुमेहासाठी मुंबईत ५४ दवाखाने मनीषा म्हैसकरांच्या पुढाकाराने निर्माण झाल्या ही विशेष बाब आहे. केईएम, शीव, नायर या प्रमुख रुग्णालयांचे उपनगरीय रुग्णालयांशी लिंकेज प्रोग्राम यासह पालिकेच्या दवाखान्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम मनीषा म्हैसकर यांच्या कार्यकाळात झाले. महापालिकेचा एकुलताएक कॅन्सरसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा विकास तत्कालीन पालिका आयुक्त शरद काळे यांनी केला होता. दुर्दैवाने राजकारण्यांनी हा अंधेरी येथील कोटय़वधी रुपयांचा भूखंड सेव्हन हिल्स रुग्णालयाला देऊन टाकला. या बदल्यात २० टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार करण्याची अट होती. मात्र याचे खऱ्या अर्थाने आजही पालन केले जात नाही. याच रुग्णालयात गरीब रुग्णांवर पालिकेच्या दराने दहा टक्केकॅन्सर रुग्णांवर उपचार झाले पाहिजेत या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीला रुग्णालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्यानंतरही शिवसेनेचा ‘वाघ’ गप्प बसून आहे. पालिका रुग्णालयांवर आदळणारे रुग्णांचे लोंढे लक्षात घेता सर्वार्थाने रुग्णालयांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांसाठी या रुग्णालयात निर्धारित आकार घेऊन खाटांची स्वतंत्र व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे. एकटी महापालिका या साऱ्याचा भार उचलू शकत नाही हे वास्तव लक्षात घेऊन राज्य शासनाने तसेच केंद्राकडून मदत मिळवून मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा विकास करण्याची गरज आहे.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये बोन बँक, स्किन बँक, मिल्क बँकसह अनेक उपक्रम राबविले जातात. थॅलेसेमियापासून रक्ताच्या विविध आजारांवर उपचार केले जातात. कॅन्सरसह वेगवेगळ्या आजारांवरील उपचारासाठी मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांना राहण्यासाठी धर्मशाळा उभारण्यालाही पालिकेने प्राधान्य देणे गरजेचे आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था ही काळाची गरज आहे. दुर्दैवाने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींकडून आरोग्यदायी उपक्रमासाठी मदत मिळविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. अर्थात आज प्रतिकूल परिस्थितीतही महापालिकेची रुग्णालये ही सर्वोत्तम आहेत ते येथील डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच..