22 September 2020

News Flash

भविष्य : १९ ते २५ सप्टेंबर २०१४

मेष अडथळे जेव्हा येतात तेव्हा ते समुद्रातील लाटांप्रमाणे एकामागून एक येतात. अशा वेळेला घाई गडबडीत चुकीचा निर्णय होण्याची शक्यता असते.

| September 19, 2014 01:03 am

मेष अडथळे जेव्हा येतात तेव्हा ते समुद्रातील लाटांप्रमाणे एकामागून एक येतात. अशा वेळेला घाई गडबडीत चुकीचा निर्णय होण्याची शक्यता असते. तेवढे टाळा. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवून धाडसाने पुढे पाऊल टाका. नोकरीमध्ये तुमचे अधिकार आणि सत्ता याचा गैरउपयोग करण्याचा मोह होईल. तो कटाक्षाने टाळा. घरामध्ये एखादा प्रश्न सोडविण्यासाठी सगळ्यांबरोबर गोडीगुलाबीने वागणे अपरिहार्य ठरेल. तरुणांनी अयोग्य संगत आणि व्यसन यापासून दूर राहावे.

वृष भज्या प्रश्नांविषयी तुमच्या मनात बऱ्याच शंका होत्या त्याचे निराकरण होईल. त्यामुळे मन शांत होईल. व्यापार-उद्योगातील जी कामे लांबलेली होती त्याला योग्य व्यक्तींची आणि योग्य संधीची साथ मिळाल्याने चांगली गती येईल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना त्यातून महत्त्वाचे मेल मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ केलेल्या कामाचे कौतुक करतील. एखाद्या नवीन कामाकरता तुमची निवड करतील. घरामध्ये आवडत्या व्यक्तींसंबंधी चांगली बातमी कळेल. तरुणांना जीवनसाथी निवडता येईल.

मिथुन नेहमीच्या कामाव्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळे करावे ही तुमच्यामधील तमन्ना जागृत करणारे हे ग्रहमान आहे. व्यवसाय-उद्योगामध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांत जे काम तुम्ही केलेले आहे ते आता त्याचा आढावा घेतल्यानंतर काही नवीन कल्पना तुमच्या मनात तरळायला लागतील. नोकरीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून कामात शॉर्टकट घ्याल. घरामध्ये प्रत्येक जण आपल्या मनामधल्या भव्यदिव्य कल्पना बोलून दाखवील. नवीन जागेचे किंवा वाहनाच्या खरेदीसंबंधीचे प्रस्ताव मनात येतील.

कर्क मळलेली वाट सोडून नवीन पद्धतीचे काम करायला तुमची कधीही तयारी असते. कारण तुमची चर रास आहे. या आठवडय़ात तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काही तरी नवीन आणि वेगळे करावेसे वाटेल. व्यापार-उद्योगामध्ये केवळ महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित कराल. प्रतिस्पर्धी काय करीत आहेत हे लक्षात घेऊन नवीन कल्पनांचा विचार करा. जाहिरात, प्रसिद्धी माध्यमांचे नियोजन कराल. नोकरीमध्ये तुमच्या कामातून तुमचे वेगळेपण दाखवून द्याल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे कार्यक्रम ठरलेले असतील.

सिंह तुम्हाला तुमचे करिअर आणि घर या दोन्हीही आघाडय़ांवर सतर्क राहून काम करायचे आहे. व्यवसाय-उद्योगामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला भविष्यात करायच्या आहेत त्यासंबंधी नियोजन करा. जादा भांडवलाची गरज बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून ती भागू शकेल. ज्यांचा जोडधंदा असणाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये अथक मेहनत करून आणि युक्ती लढवून तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या नियंत्रणात आणाल. घरामध्ये मोठय़ा वस्तूंच्या खरेदीचे बेत ठरतील.

कन्या या सप्ताहात तुमचा मूड आनंदी आणि गुलहौशी बनेल. व्यवसाय-उद्योगात काही तरी नवीन करावे या उद्देशाने मोठे बेत आखाल. थोडीशी अडचण असेल ती पैशाची, पण हितचिंतकांच्या आणि आर्थिक संस्थांच्या मदतीमुळे त्यावर मार्ग निघेल. जाहिरात, प्रसिद्धीचे नवीन तंत्र तुम्ही आत्मसात कराल. नोकरीमध्ये अर्धवट राहिलेली कामे पूर्ण झाल्यामुळे सुस्कारा टाकू शकाल. घरामध्ये नवीन वाहन किंवा जागा खरेदीचे बेत ठरण्याची शक्यता आहे. तरुणांना दोनाचे चार हात करावेसे वाटतील.

तूळ प्रत्येक गोष्ट नीटनेटकी आणि वेळेत तसेच तुमच्या पद्धतीने घडायला हवी असते. पण या आठवडय़ात तुमचेच हे सगळे नियम मोडून यशाकरता चाकोरीबाहेरचा मार्ग निवडायला तयार व्हाल. व्यवसाय-उद्योगात आधुनिक पद्धतींचा उपयोग करून घ्याल. नोकरीमध्ये संस्थेतर्फे मिळालेल्या अधिकारांचा आणि सवलतींचा गरजेपेक्षा जास्त वापर करण्याचा मोह होईल. घरामध्ये जुन्या पद्धतींना रामराम ठोकून आधुनिक विचारसरणी तुम्हाला प्रभावित करेल. दुरुस्त्या, डागडुजी याकरता पैसे खर्च होतील.

वृश्चिक जशी परिस्थिती असते त्यानुसार तुम्ही तुमचा पवित्रा बदलून काम करता. पण अखेर तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करता. व्यवसाय-उद्योगात जरी एखादा मार्ग धोकादायक असला तरी त्यातून तुमचा फायदा असल्याने तुम्ही तो पत्करायला तयार व्हाल. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका. नोकरीमध्ये संस्थेने दिलेल्या सवलतींचा तुम्ही पुरेपूर फायदा उठवाल. घरामध्ये तुमचे परखड विचार इतरांना आवडणार नाहीत. पण ते योग्य होते असे त्यांना नंतर मान्य करावे लागेल.

धनू ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ याची आठवण तुमच्याकडे पाहून येईल. ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत त्यामध्ये तुमचे समाधान असेल. याउलट जी गोष्ट तुमच्याकडे नाही त्याचा पिच्छा पुरवून तुम्ही स्वत:ची दमणूक करून घ्याल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांची कॉपी करण्याकरता भलतेच धाडस न करता स्वत:च्या मर्यादेत राहा. मोठे कर्ज जरी काढले तरी त्याचा उपयोग ठरलेल्या कारणाकरताच करा. नोकरीमध्ये तुमची स्वातंत्र्यप्रियता विशेषरूपाने दिसेल. घरामध्ये इतरांच्या कलाने वागणे तुम्हाला जड जाईल.

मकर सकृद्दर्शनी तुम्ही अत्यंत शांत आणि आळशी दिसाल. परंतु तुमच्या मनामध्ये मात्र अनेक गोष्टींची खळबळ चालू असेल. व्यापार-उद्योगात नजीकच्या भविष्यात काही तरी भव्यदिव्य झाले पाहिजे, असे तुम्हाला वाटत राहिल्यामुळे त्यासंबंधी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची तुम्ही पूर्तता कराल. नोकरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमच्या बुद्धिकौशल्याची चुणूक दाखवू शकाल. घरामध्ये वडिलोपार्जित इस्टेट किंवा जागा याच्या विक्रीसंबंधी आणि गुंतवणुकीसंबंधी विचार विनिमय होईल.

कुंभ सहसा तुमच्या ठरविलेल्या कार्यक्रमात तुम्ही बदल करत नाही. पण या आठवडय़ामध्ये काही चांगल्या कारणाकरताच चाकोरीबाहेर जाण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगामध्ये एखादा नवीन प्रयोग करून बघण्याचा तुमचा मानस असेल. त्याकरता आवश्यक असणाऱ्या पैशाच्या आणि इतर सामग्रीची तुम्हाला तरतूद करावी लागेल. नोकरीमध्ये बदल करण्याचे विचार असतील तर गुप्तपणे प्रयत्न सुरू करा. घरामध्ये प्रत्येक जण वेगवेगळे कार्यक्रम ठरवेल. परंतु त्यात तुम्ही काटछाट करण्याचा प्रयत्न कराल.

मीन तुमच्या रसिक आणि हौशी स्वभावाला दाद देणारे ग्रहमान आहेत. त्यामुळे तुमच्यातली आशावादी प्रवृत्ती जागृत होईल. जे काम तुम्ही हातामध्ये घ्याल त्यामध्ये स्वत:चा ठसा उमटला पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. त्याला सभोवतालच्या वातावरणामुळे किंवा आर्थिक चणचणीमुळे अडचण होईल. व्यवसाय-उद्योगात एखादी आगळीवेगळी योजना जाहीर करून गिऱ्हाईकांचे लक्ष आकर्षित कराल. घरामध्ये प्रतिष्ठा वाढवणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याचे बेत ठरतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2014 1:03 am

Web Title: horoscope 27
Next Stories
1 ट्रेकर ब्लॉगर्स : भटकंती साल्हेरची!
2 वाचक प्रतिसाद : पर्यटन विशेषांक अप्रतिम
3 न्यायालयांवरही अन्याय!
Just Now!
X