News Flash

तंत्रज्ञान : पावसाळा आणि लॅपटॉपचे आरोग्य

लॅपटॉप वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टिप्स...

सगळ्या लॅपटॉपच्या खालच्या बाजूला व्हेंटिलेटर्स असतात

स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
चार्जिग सुरू असताना मोबाइलवर बोलू नये याबद्दलचे भान आता अनेकांना आलं आहे. मोबाइलबद्दल अनेक जण पाळत असणारी ही गोष्ट इतर गोष्टी हाताळतानाही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. साधारण पाचेक वर्षांंपूर्वी दिल्लीतील एका युवकाचा चार्जिगला लावलेल्या लॅपटॉपवर काम करताना विजेचा झटका लागून मृत्यू झाला होता. अर्थात तेव्हा घरून काम करणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने या बातमीचा फारसा गाजावाजा झाला नाही. पण लॅपटॉपवर काम करताना ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आज अनेक जण घरून काम करताना आठ ते बारा तास लॅपटॉपवर असतात. त्यामुळेच लॅपटॉप वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टिप्स…

गादी, उशीवर ठेवून वापर नको

सगळ्या लॅपटॉपच्या खालच्या बाजूला व्हेंटिलेटर्स असतात. लॅपटॉप गादी किंवा उशीसारख्या पृष्ठभागावर ठेवून काम केल्यास त्यामधील हवा खेळती राहात नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर लॅपटॉपला श्वास घेता येत नाही. यामुळेच लॅपटॉप तापतो. यामुळे कधीकधी आग लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉप गादी किंवा उशीवर ठेवणं टाळावं.

चार्जिग संदर्भातील काळजी

कोणतीही डिजिटल वस्तू चार्ज करत असताना तिचा वापर करणं टाळावं. लॅपटॉपचं चार्जिग सुरू असताना काम करणं अनेक अर्थाने धोकादायक ठरू शकतं. अगदी शॉक लागण्यापासून ते छोटा स्फोट होण्यापर्यंत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच चार्जिगची पिन काढल्यानंतरच लॅपटॉपचा वापर करावा. आता वर्क फ्रॉम होम करताना अनेक जण चार्जिग सुरू ठेवून काम करतात. मात्र बॅटरी किती शिल्लक आहे, खरोखर लॅपटॉपला चार्जिगची गरज आहे का याचा विचार करून चार्जिग सुरू ठेवायचं की नाही याचं नियोजन करता येईल. तसेच लॅपटॉपच्या बॅटरीच्या क्षमतेनुसार चार्जिग सायकल्स ठरवून ठरावीक वेळ चार्जिग सुरू ठेवून बाकी वेळ ते बंद करणं, गरज लागल्यास पुन्हा सुरू करणं असे प्रयोग करून पाहता येतील. ओव्हर चार्ज लॅपटॉपमधून शॉक लागण्याचा धोकाही नाकारता येत नाही.

लॅपटॉप मांडीवर घेऊन काम नको

घरून काम करताना लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करण्याची सवय अनेकांना असल्याचं दिसून येतं. त्यातही घरच्या कपडय़ांमध्ये म्हणजेच शॉर्ट्स किंवा कॉटनचे कपडे घालून लॅपटॉप मांडीवर ठेवून अनेक जण काम करताना दिसतात. लॅपटॉपवर काम करायला घेतल्यानंतर थोडय़ावेळाने तो तापतो. अशावेळी त्याच्या खालील बाजूस असणाऱ्या व्हेंटमधून (जाळीसारखा दिसणारा भाग) गरम हवा बाहेर फेकली जाते. सिस्टीम कूलिंगसाठी ताजी हवा आत घेऊन गरम हवा बाहेर फेकली जाते. अशावेळी या गरम हवेमुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉप थेट मांडीवर घेण्याऐवजी खाली पाट किंवा लाकडी फळी किंवा अगदी रायटिंग पॅड ठेवणे फायद्याचे ठरते. हल्ली तर घरून काम करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे अनेक लॅपटॉप टेबल्स वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर अगदी स्वस्तात उपलब्ध आहेत.

जास्त वाकू नका

घरून लॅपटॉपवर काम करताना सतत मान खाली घालून काम केल्याने मान किंवा पाठीचा कणा दुखण्याचा त्रास होतो. यासाठी उपाय म्हणून लॅपटॉपची स्क्रीन थोडी अ‍ॅडजेस्ट करणं, वेळेवेळी ब्रेक घेणं असे उपाय करू शकता. तसंच लॅपटॉप टेबलवर ठेवून काम करणाऱ्यांनी लॅपटॉप आणि बसण्याच्या खुर्चीमध्ये योग्य अंतर ठेवावं. खुर्चीवर बसताना पाठीला आराम मिळावा म्हणून उशी घेणं, खुर्ची टेबलाजवळ ठेवून ९० अंशात हात येतील अशा पद्धतीने ताठ बसून काम करणं, थोडय़ा थोडय़ा वेळाने जागेवरून उठून पाय मोकळे करणं यासारख्या गोष्टी फायद्याच्या ठरतात.

अंधारात वापर नको

सर्व दिवे बंद करून अंधार करून केवळ लॅपटॉप स्क्रीनच्या उजेडात काम करणं टाळावं. लॅपटॉपमधून निघणारा प्रकाश जास्त वेळ थेट डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. मंद उजेडात किंवा पूर्ण उजेडातच लॅपटॉप वापरणं योग्य ठरतं.

याशिवाय लॅपटॉपच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचे पदार्थ न ठेवणं, लॅपटॉपला अ‍ॅडिशनल की बोर्ड किंवा माऊस लावून तो डेस्कटॉप पीसीसारखा वापरणं, चार्जिगवरून काढताना वायर थेट न खेचता योग्य पद्धतीने ती काढणं, जास्त वेळ काम करत असल्यास लॅपटॉप स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं यासारख्या गोष्टीं करून लॅपटॉपचा वापर शरीरासाठी घातक ठरणार नाही याबद्दल काळजी घेता येईल. या झाल्या लॅपटॉपचा वापर करणाऱ्या व्यक्तीसाठी सूचना.  पावसाळ्यात लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी यासंदर्भातही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

प्लग पिन काढून ठेवा

अनेकदा बाहेर जोरदार पाऊस पडून विजा चमकत असताना घरातील वीजप्रवाह खंडित होण्याची किंवा त्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. घरांमध्ये होणारा वीजपुरवठय़ाचा व्होल्टेज हा पावसाच्या कालावधीमध्ये कमी जास्त होण्याची शक्यता असते. अशावेळेस व्होल्टेज कमी जास्त झाल्यास चार्जिगला लावलेल्या गॅजेट्सना (मोबाइल, लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा अगदी वायरलेस हेडफोन्सही) हानी पोहोचू शकते. त्यामुळेच जोरदार पाऊस सुरू असताना गॅजेट्सचं चार्जिग बंद ठेवावं. अशा वेळी प्लग पिन काढून ठेवणं अधिक योग्य ठरतं. अनेकदा अशा पद्धतीने व्होल्टेज कमी जास्त झाल्याने लॅपटॉपमध्ये बिघाड झाल्यास तो दुरुस्तदेखील होऊ शकत नाही. खास करून झोपण्याआधी लॅपटॉपच्या चार्जिगची प्लग पिन सॉकेटमधून काढून ठेवावी. प्रत्येक वेळेस लॅपटॉप सुरू असतानाच व्होल्टेजचा फटका बसतो असं नाही.  पिन चार्जिगला लावून बटण बंद केलेलं असलं आणि वीजप्रवाहामध्ये काही गडबड झाली तरी लॅपटॉप बिघडू शकतो.

लॅपटॉप बॅगमध्येच ठेवणं फायद्याचं

किमान पावसाळ्यामध्ये तरी रोज काम झाल्यानंतर लॅपटॉप बॅगमध्ये ठेवणं अधिक फायद्याचं ठरतं. पावसाळ्यामध्ये हवेत बाष्पाचं प्रमाण अधिक असल्याने लॅपटॉपमधील नाजूक भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. लॅपटॉपच्या अंतर्गत भागामध्ये बाष्प जमा झालं की तो सुरू करण्यापासून सर्वच गोष्टींसाठी धावपळ करावी लागू शकते. म्हणूनच पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लॅपटॉप बॅगमध्येच ठेवावा.

वायर इंटरनेट काढून ठेवा

वायर इंटरनेट वापरणाऱ्यांनी काम झाल्यानंतर इंटरनेट कनेक्शनची वायर लॅपटॉपला लावून न ठेवता काढून ठेवणं फायद्याचं ठरतं. विजेप्रमाणेच इंटरनेट कनेक्शनमधील कमी जास्त दाबही लॅपटॉपवर परिणाम करू शकतो. अर्थात वायफायवर काम करत असल्यास वायफाय कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची गरज नसते कारण ते प्रत्यक्षात (फिजिकली) लॅपटॉपच्या संपर्कात नसतं.

कामाची जागा कोरडी असावी

काम करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी बसतो ती जागा, तसंच ज्या टेबलवर किंवा पृष्ठभागावर लॅपटॉप ठेवला जातो तो कोरडा असल्याची खात्री करून घेऊन कामाला सुरुवात करावी. लॅपटॉपमध्ये पाण्याचा अंश गेल्यास किंवा बाष्प पकडल्यास एका पार्टमुळे इतर अनेक पार्ट खराब होण्याची शक्यता असते.

प्लास्टिक पिशवीत गुंडाळणे फायद्याचे

शक्य झाल्यास लॅपटॉप प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून तो लॅपटॉप बॅगमध्ये ठेवावा. काम झाल्या झाल्या लगेच लॅपटॉप प्लास्टिक पिशवीत न ठेवता तासाभराने तो थोडासा थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून लॅपटॉप बॅगमध्ये ठेवावा.

सिलिका पाकीट वापरा

सिलिका जेलच्या एक ते दोन छोटय़ा छोटय़ा पुडय़ा लॅपटॉप बॅगमध्ये ठेवाव्यात. या सिलिका बॅग बाष्प जमू देत नाहीत.

तरीही लॅपटॉप ओला झाल्यास

इतकी काळजी घेऊनही काही गडबड होऊन लॅपटॉप ओला झाला तर सर्वात आधी त्याची बॅटरी काढा. त्यानंतर बॅटरी, बॅटरी स्लॉट आणि ओला झालेला भाग टिश्यू पेपरने पुसून कोरडा करा. तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल तर तात्पुरता उपाय म्हणून त्याचा वापर करून लॅपटॉपचा ओला झालेला भाग कोरडा करता येईल. मात्र हेअर ड्रायरमधील गरम हवेचा झोत फार वेळ लॅपटॉपवर मारू नये नाहीतर त्याचेही लॅपटॉपमधील कम्पोनंटवर दुष्परिणाम होऊ शकतात.

वरील गोष्टींची काळजी घेतल्यास पावसाळ्यात लॅपटॉपची फार चिंता करण्याची गरज राहणार नाही. या लहानसहान गोष्टींची योग्य काळजी घेतली तर लॅपटॉप तुम्हाला कोणताही त्रास न देता साथ देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 10:07 pm

Web Title: how to to take care of laptop in monsoon tantradnyan dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १६ ते २२ जुलै २०२१
2 श्रद्धांजली : नायकांचा नायक
3 कानटोचणी!
Just Now!
X