मेजर जनरल जी. जी. द्विवेदी – response.lokprabha@expressindia.com

भारताला कठोर धडा शिकवायचा या हेतूने चीनचे अध्यक्ष माओ त्से तुंग यांनी १९६२ च्या ऑक्टोबर महिन्यात भारतावर मोठय़ा प्रमाणावर आक्रमण करायचा विचार केला. त्यांची मुख्य आक्रमणे पूर्व विभागात होतीच, पण त्याचबरोबर पश्चिम विभागात १९६० मध्ये निश्चित केलेल्या पूर्व लडाखमधल्या ताबारेषेभोवतीचा परिसर त्यांना ताब्यात घ्यायचा होता. या परिसरात ४३ भारतीय ठाणी होती. अक्साई चीनवर पूर्ण नियंत्रण मिळवणे त्यांच्यासाठी आवश्यक होते, कारण त्यामुळे त्यांना काशगढ, शिजिसंग आणि ल्हासाला जोडणाऱ्या पूर्ण पश्चिम महामार्गावर नियंत्रण मिळवता आलं असतं.

२० ऑक्टोबर १९६२ रोजी पीपल्स लिबरेशन आर्मीचे हे हल्ले एकाच वेळी पूर्व आणि पश्चिम विभागात सुरू झाले. अक्साई चीनमधल्या कारवाया दोन टप्प्यांमध्ये केल्या गेल्या. पहिल्या टप्प्यामध्ये (ऑक्टोबर २० ते २८, १९६२) पीपल्स लिबरेशन आर्मीने दौलत बाग ओल्डी, गलवान पँगाँग लेकचे दोन्ही काठ आणि दुंगती-देम्चोक परिसर या ठिकाणांवर असलेली भारतीय लष्कराची ठाणी उडवली. त्यानंतर तीन आठवडय़ांनंतर म्हणजे १८ नोव्हेंबर १९६२ रोजी दुसऱ्या टप्प्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कैलास पर्वतरांगांवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

काराकोरम पर्वतरांग पँगाँग तलावाच्या उत्तरेच्या बाजूला संपते. कैलास पर्वतरांग दक्षिण काठाच्या बाजूने सुरू होऊन उत्तरपश्चिमेकडून ६० किलोमीटरवर दक्षिणपूर्वेला जाते. हा सर्व प्रदेश खडकाळ असून त्याची उंची चार हजार ते साडेपाच हजार मीटरच्या दरम्यान आहे. हेल्मेट टॉप, गुरुंग हिल, स्पांगुर गॅप, मुग्गर हिल, मुखपारी, रेझांग खिंड आणि रेचीन खिंड या परिसराचा त्यात समावेश होतो. चुशुल बोल हे संपर्काचे महत्त्वाचे ठाणेदेखील याच परिसरात आहे.

चिनी आक्रमणाच्या पहिल्या टप्प्यानंतर जी उसंत मिळाली त्याचा उपयोग भारतीय लष्कराने आपल्या ताकदीची पुनर्रचना करण्यासाठी करून घेतला. २६ ऑक्टोबर १९६२ रोजी मेजर जनरल बुध सिंग यांच्या नेतृत्वाखाली लेह भागात तोफदळाच्या तीन तुकडय़ा वाढवण्यात आल्या. ११४ इन्फॅन्ट्री ब्रिगेडचे मुख्यालय चुशुलला हलवण्यात आलं. ७० इन्फॅन्ट्री ब्रिगेडने इंड्स व्हॅली उपविभागाची जबाबदारी घेतली, तर १६३ इन्फॅन्ट्री ब्रिगेडवर लेहच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली.

चुशुलवरील आघाडी वाढवली

११४ इन्फॅन्ट्री ब्रिगेडवर चुशुलच्या ४० किलोमीटरच्या पट्टय़ाच्या संरक्षणाची जबाबदारी होती. गोरखा रायफल्सच्या एका तुकडीने स्पांगुर गॅपची उत्तरेकडची बाजू सांभाळली. त्यांच्या दोन तुकडय़ा गुरुंग हिलवर पाठवल्या गेल्या. तिसरी तुकडी उत्तरेच्या बाजूला नेमण्यात आली, तर चौथी तुकडी स्पांगुर गॅपमध्येच बटालियनच्या मुख्यालयात ठेवण्यात आली.

कुमाऊँ हे स्पांगुर गॅपच्या दक्षिणेच्या बाजूला आहे. तिथे मुग्गर हिलवर दोन तुकडय़ा ठेवण्यात आल्या, तर एक तुकडी रेझांग खिंडीत ठेवण्यात आली, तर चौथी कंपनी बटालियनच्या दक्षिण मुख्यालयात ठेवण्यात आली. चुशुलमध्ये ब्रिगेडचे मुख्यालय होते. तिथेही सैनिकांच्या तुकडय़ा शस्त्रास्त्रांनी सज्ज ठेवण्यात आल्या.

रेझांग खिंडीतील चढाई

सेंट्रल मिलिटरी कमिशनने (सीएमसी) मंजूर केलेल्या आराखडय़ानुसार रेझांग खिंड आणि गुरुंग हिल हे दोन्ही प्रदेश एकाच वेळी ताब्यात घ्यायचे होते. सीमेपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रेतुझाँग परिसरात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तोफदळाच्या चार तुकडय़ा होत्या. त्यांना रसद पुरवणारी आणखी काही ठाणी याच परिसरात होती. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात या सगळ्याच ठाण्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या सूचनांनुसार या परिसरातच कारवाई करायची होती.

१३ कुमाऊँच्या सी कंपनीवर रेझांग खिंडीची जबाबदारी होती. त्यांच्याकडे दोन पलटणी होत्या, तर केंद्रस्थानी तिसरी पलटण आणि कंपनी मुख्यालय होते. त्याबरोबरच तीन इंची तोफा, जास्त ताकदीच्या मशीनगन आणि रॉकेट लाँचर्स होते.

चीनने रेझांग खिंडीची तपशीलवार माहिती मिळवली होती. तिथून रात्रीच्या वेळी पुढे सरकायचं आणि पहिल्याच रात्री उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही दिशांनी एकाच वेळी हल्ले करायचे असं त्यांचं नियोजन होतं. त्यांच्या तुकडय़ांचं त्यानुसार दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आलं होतं. एका गट दक्षिणेकडून हल्ला करणार होता, तर दुसरा गट उत्तरेकडून  हल्ला करणार होता. एक गट राखीव म्हणून ठेवण्यात आला होता.

टास्क फोर्स दलाच्या दोन तुकडय़ांनी रेतुझोंग हून १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता सुरुवात केली. आणि १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता अपेक्षित ठिकाणी पोहोचले. सुरुवातीला थोडा बॉम्बहल्ला झाल्यानंतर

९.१५ च्या सुमारास दोन्ही बाजूंकडून हल्ले सुरू झाले. दोन्ही बाजूंकडून एकामागोमाग घनघोर संघर्ष सुरू झाला. चिनी हल्ल्याला आपल्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. चिनी सैनिक घेरले गेले होते, त्यांचा त्यांच्या वरिष्ठांशी संवाद पूर्ण तुटला होता. त्यांना कुठूनही कुमक मिळणे शक्य नव्हते. ‘करा आणि मरा’ अशीच ती परिस्थिती होती. कंपनी कमांडर मेजर शैतान सिंग यांनी जोरदार प्रतिहल्ला केला; पण चिनी सैनिकांना त्यांच्या राखीव दलाची मदत मिळाली आणि त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता रेझांग खिंड ताब्यात घेतली.

शेवटच्या हल्ल्यापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत लढली गेलेली ती एक महत्त्वाची लढाई होती. रेझांग खिंडीत असलेल्या १४१ सैनिकांपैकी १३५ जण शेवटपर्यंत लढले आणि पाच जणांना युद्धकैदी म्हणून पकडून नेण्यात आलं आणि एक जण वाचला. मेजर शैतान सिंग यांना परमवीर चक्र देण्यात आलं. चीनचे २१ सैनिक मारले गेले आणि ९८ जखमी झाले.

गुरुंग हिलची लढाई

स्पंगुर गॅपच्या उत्तरपूर्वेला दोन तुकडय़ांनी गुरांग हिल राखलं. हे ठाणं समुद्रसपाटीपासून ५१०० मीटर उंचीवर होतं. या परिसरात सुरुंग पेरलेले होते. एक पलटण आणि एका तुकडीने रणगाडय़ांचा वापर करून ते राखलं. गुरुंग हिल ताब्यात घेण्याची जबाबदारी एका सैनिकांच्या गटाकडे होती. त्यांच्याकडे इंजिनीयर्स, रात्री दिसणारे फ्लेम थ्रोअर्स, मशीनगन्स इत्यादी सामग्री होती.

नोव्हेंबर १८ रोजी सकाळी ९ वाजून

२२ मिनिटांनी गुरुंग हिल ताब्यात घेण्यासाठीची कारवाई सुरू झाली. त्याच वेळी रेझांग खिंडीतही कारवाई सुरू केली गेली. आधी तोफांमधून बॉम्बहल्ले केले गेले. गोरखांनी आपल्या तोफांनी जोरदार प्रतिकार केल्यानंतर चीनचे सैनिक मोठय़ा संख्येने मारले गेले आणि हल्ला थांबला; पण आणखी जमवाजमव करून आणि आणखी रसद मिळाल्यानंतर ११ वाजता चीनने पुन्हा आक्रमण करायला सुरुवात केली. पुन:पुन्हा आक्रमणं करून आणि कुमक न मिळाल्यामुळे नोव्हेंबर १८ च्या रात्री पीपल्स लिबरेशन आर्मीने ताबा घेतला. त्यातील मृतांच्या आणि जखमींच्या संख्येवरून या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता येते. ५० जवान मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले, तर चीनचे ८० हून अधिक सैनिक मारले गेले आणि जखमी झाले. पीपल्स लिबरेशन आर्मीला गुरुंग हिलचा उर्वरित भाग ताब्यात घेता आला नाही.

फक्त रेझांग खिंड आणि गुरुंग हिलचा काही भागच ताब्यात घेतलेला असल्यामुळे कैलास पर्वतरांगांमधून मागे ढकलायचं आणि चुशुलच्या पश्चिमेला आणखी कुमक पाठवायची, असा डिसेंबर महिन्याच्या १९ तारखेच्या रात्री उच्च स्तरावर निर्णय घेण्यात आला. मागे घेतल्या गेलेल्या सैन्याचा पाठलाग चीनने केला नाही किंवा ते चुशुलच्या एअरफिल्डवरही गेले नाहीत. अक्साई चीनमधून जिथून कारवायांसाठी तुकडय़ा पाठवल्या जातात तिथे पीपल्स लिबरेशन आर्मीकडे कमी मनुष्यबळ होतं. त्यामुळे पुढच्या कारवाया करण्यासाठी त्यांच्यावर मर्यादा होत्या. दुसरीकडे भारताच्या तीन तुकडय़ांकडे मर्यादित क्षमतेत का होईना प्रतिहल्ला करण्याची क्षमता होती. नोव्हेंबर २१ रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर वाहतुकीच्या साधनांच्या अभावी चिनी सैनिकांना त्यांच्या मूळ जागी परत जाणंही कठीण होऊन बसलं.

ऑगस्ट २०२० ते आजपर्यंत

५८ वर्षांनी इतिहासाचा हा क्रम उलटा घडणार होता. ३० ऑगस्ट २०२० रोजी स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या (एसएफएफ) जवानांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला आश्चर्याचा धक्का देत आधीच कारवाई करून कैलास पर्वतरांग ताब्यात घेतली. चीनने ताब्यात घेतलेला पँगाँग लेकच्या उत्तरेच्या काठाचा भाग आपण परत घेतला. तसंच पूर्व स्पँगुर गॅप, माल्डो गॅरिसन हा पीपल्स लिबरेशन आर्मीने घेतलेला परिसर परत आपल्या ताब्यात आल्यामुळे या परिसरात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित झाले. मे २०२० मध्ये झालेल्या चिनी आक्रमणामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी कैलास पर्वतरांगांपर्यंत का पोहोचू शकली नाही याच्या दोन शक्यता संभवतात. पहिली म्हणजे त्यांचं अपुरं तोफदळ. त्यांच्याकडे तोफदळाच्या चार तुकडय़ा असल्या तरी त्या स्वयंचलित वाहन (मोटार) वापरणाऱ्या होत्या. त्या जमिनीवरच्या चढाईसाठी उपयुक्त नव्हत्या आणि दुसरं म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मीची अशी समजूत होती की, भारतीय सैन्यदल प्रतिहल्ला करण्याची, प्रत्युत्तर देण्याची जोखीम घेणार नाही.

१९६२ मध्ये कैलास पर्वतरांगांमध्येच भारतीय जवानांनी पुरेशी तयारी आणि फारशी लष्करी साधनसामग्री नसतानाही आपली ताकद दाखवून दिली आणि पीपल्स लिबरेशन आर्मीला या घुसखोरीची मोठी किंमत मोजावी लागली. आज परिस्थिती वेगळी आहे. अशा पद्धतीच्या समुद्रसपाटीपासून उंचावरच्या, बर्फाळ, अतिशीत वातावरणातल्या युद्धांचा, चढायांचा आपल्याला अनुभव आहे. लष्करीदृष्टय़ा आपण मोठय़ा प्रमाणावर सुसज्ज आहोत. आपल्याकडे भरपूर लष्करी साधनसामग्री आहे. कैलास पर्वतरांगा ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. दुसरीकडे प्रत्यक्ष ताबारेषेवरची हिवाळ्यामधली कठीण परिस्थिती चीनला आत्ता कुठे समजायला सुरुवात झाली आहे.

आता आहे त्या सैन्यबळाच्या जोरावर तसेच इथल्या कडाक्याच्या थंडीत होणाऱ्या प्रचंड बर्फवृष्टीमध्ये मोठय़ा कारवाया करता येणार नाहीत याची जाणीव झाल्यामुळे चीन कदाचित पँगाँग लेकच्या दक्षिणेकडील भारतीय लष्कर मागे घेण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडीच्या खेळी खेळू शकतो; पण मागच्या चुका लक्षात ठेवून भारताने सावध राहिलं पाहिजे आणि चीनच्या जाळ्यात अडकता कामा नये. चीनने ही घुसखोरी करून गेली तीन दशकं दोन्ही देशांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या करारांचा भंग केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर कैलास पर्वतरांगा ताब्यात घेण्याच्या घटनेकडे बघणं आवश्यक आहे.

कैलास पर्वतरांगा ताब्यात घेणं हा आपल्या दृष्टीने एक मैलाचा दगड आहे. चीनने बेकायदेशीररीत्या ताबा मिळवलेल्या प्रदेशांपैकी आपण परत मिळवलेला तो पहिला प्रदेश आहे. १८६५ ची जॉन्सन लाइन ही आपली सीमा असल्याचा भारताचा दावा असल्यामुळे आपण परत ताबा मिळवलेल्या प्रदेशांपैकी तो कैलास पर्वतरांगा हा शेवटचा प्रदेश निश्चितच असणार नाही. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच म्हटलं त्यानुसार पूर्व लडाखमध्ये भारताने चीनला तब्बल सात महिने तोडीस तोड टक्कर दिली आहे. त्यामुळे भारत आपल्या स्वायत्ततेशी तडजोड करणार नाही, हा संदेश आता चिनी नेतृत्वाला कठोरपणे देण्याची वेळ आली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसमधून साभार

(अनुवाद : वैशाली चिटणीस)