केवळ चार सहा महिन्यांपूर्वी ‘आप’ला डोक्यावर घेणाऱ्या मतदारांनी स्थिर सरकारची गरज लक्षात घेऊन भाजपच्या पारडय़ात भरभरून मतं टाकली असली तरी या मताधिक्यात तरुणाईचा वाटा मोठा आहे. तरुणांनीच सगळ्या दिग्गजांना घरी पाठवलं आहे.

पहाटेची वेळ होती. मी तलावाजवळ बसलो होतो. त्या तलावात एका निळ्याशार धबधब्यातून पाणी धो-धो खाली कोसळत होतं. आजूबाजूला गर्द झाडी आणि हिरवळ होती. मी बसलेल्या दगडाच्या शेवाळ्यावरून सारखा घसरत होतो. थोडा वेळ ते दृश्य डोळे भरून पाहून घेतल्यावर तिथून उठून जाणार एवढय़ात त्या दृश्याचा कायापालटच व्हायला लागला. सूर्योदय होत होता तसा तो सगळा परिसर उजळून निघाला. सगळ्या हिरवळीला सूर्यप्रकाशाची सोनेरी किनार लाभून एक वेगळीच लकाकी आली होती. तलावात कमळं उमलायला लागली. धबधब्याचा आवाज वाढला. त्याच्या प्रवाहाचा वेगही वाढला. मी एका खालच्या दगडावर बसून माझा हात त्या पाण्यात बुडवला. ते पाणी एवढं थंड होतं, की मला हात बाहेर काढावासाच वाटेना, तो जितका बुडवत होतो तितकं आल्हाददायक वाटत होतं. मग माझ्या लक्षात आलं की माझा हात कोणीतरी अलगदपणे खाली पाण्यात खेचतंय. माझ्या अंगावर शहारा आला. मला पाण्याच्या आत एक आकृती दिसली. ती हळूहळू वर येत होती. तिने हाताला धरून, खाली ओढून स्वत:ला वर खेचून घेतलं. ती एक तेजस्वी जलपरी होती. अतिशय आकर्षक, अतिशय सुंदर. तिने माझा हात सोडला. पण मला तो पाण्याबाहेर काढावासाच वाटेना. तिच्या एका हातात तिने एक झाडू पकडला होता. तो झाडू घेऊन ती माझ्या खूप जवळ आली. तो झाडू तिने मला देऊ केला. तो मी घेणार एवढय़ात तिनेच तो लांब फेकून दिला आणि शेजारी नुकतंच उमललेलं कमळ तिने हलकेच खुडलं आणि मला देऊ केलं. मी ते हातात घ्यायला आणि तिने माझ्या कानाजवळ यायला एकच अवकाश होता. ती नेमकं काय करणार होती कोणास ठाऊक!! ती बराच वेळ त्याच स्थितीत होती. मी उत्कंठा ताणून दोन्ही हातांच्या मुठी आवळून आणि डोळे घट्ट मिटून बसलो होतो. काय म्हणेल ती? आणि.. आणि कानठळ्या बसवणाऱ्या पुरुषी आवाजात ती केकाटली – ‘अबकी बार…..!!’
मी दचकून जागा झालो. घरात मोठय़ा आवाजात टीव्ही लागला होता. १६ मेचा दिवस उजाडून कित्येक तास उलटून गेले होते. एरवी दहा-बारा वाजेपर्यंत सहज ताणून देणाऱ्या मला साडेआठ वाजता उठूनसुद्धा खूपच उशिरा उठल्यासारखं वाटत होतं. सगळेच न्यूज चॅनेल्स आळीपाळीने आपआपला टीआरपी आमच्याकडून वाढवून घेत होते. दिवसभर आमच्या घरातली सगळी मंडळी टीव्हीला चिकटून बसली होती. बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी एकाही टीव्ही मालिकेला आणि त्यातल्या अतिआदर्श सासू-सुनांना अजिबात थारा मिळत नव्हता. माझा मोबाइल दिवसभर विविध राजकीय जोक्स, फॉरवर्ड्स, फोटोज आणि व्हिडीओजमुळे थरथरत बसला होता. टीव्हीवर येणाऱ्या प्रत्येक न्यूज बाइटमुळे मनात कधी उकळ्या फुटत होत्या तर कधी चेहऱ्यावर नाराजी उमटत होती. पाहता पाहता दिवस मावळला आणि भारतीय लोकशाहीमध्ये एक नवा दिवस उजाडलेला लोकांनी पाहिला. मोदींच्या बळावर भाजपने बाजी मारली. काँग्रेसचा देशभरात दारुण पराभव झाला. मनसे, बसपाला जागाच मिळाल्या नाहीत, ‘आप’ला त्यांनी लढवलेल्या सुमारे चारशे जागांपैकी फक्त चार जागांवर समाधान मानावं लागलं. पाठोपाठ विविध राज्यांतल्या मंत्र्यांचे राजीनामे यायला लागले. फेसबुक, ट्विटरवर बीजेपीचं अभिनंदन करणारे आणि इतर पक्षांची खिल्ली उडवणारे संदेश उमटू लागले. यासंबंधीच्या लोकांच्याही कल्पनाशक्तीला ऊत आला होता. जागोजागी ढोलताशे, फटाके वाजायला लागले. ठिकठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला फुकटात मिठाई वाटण्यात येऊ लागली. घसे बसेपर्यंत घोषणेबाजी होत राहिली. निवडणुकांपूर्वी, टीव्हीवर विविध प्रकारचे तर्कवितर्क करणारी विश्लेषक मंडळी आता अगदी चतुराईने स्वत:च्या भूमिका बदलताना दिसत होती आणि सरतेशेवटी ‘निवडणुका संपल्या. मोदीजी देश चालवणार आहेत, आपलं घर नाही. तेव्हा आता लागा आपापल्या कामाला!’ अशा प्रकारचा, निवडणुकीच्या या एका वेगळ्याच अर्थाने, अभूतपूर्व अशा महोत्सवाची मिश्कीलपणे सांगता करणारा संदेशही सगळीकडे फिरू लागला आणि सगळ्यांप्रमाणेच मीसुद्धा ‘जर-तर’ आणि ‘आता पुढे काय?’ या विचारांत गर्क होऊन निद्रावश केव्हा झालो कळलंच नाही.
माझ्या मतानुसार या महोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती विविध प्रकारचे घोटाळे उघडकीला यायला लागले तेव्हापासूनच. ‘भ्रष्टाचार’ या शब्दाची कानाला अ‍ॅलर्जी व्हावी
इतक्यांदा तो ऐकायला यायला लागला. विविध प्रकारचे घोटाळे, नेत्यांची मुजोरी, सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या त्यांच्या विशिष्ट ‘एरिया’तली पुंडगिरी, वादग्रस्त नेत्यांची वक्तव्ये, शिवाय विविध नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये, पक्षांतर, अशांसारख्या बऱ्याच अलंकारांनी या महोत्सवाला नेहमीप्रमाणे शोभा आणली. पण हे अलंकार एव्हाना जुने झाले होते. या महोत्सवाचं वेगळेपण दिसून येत होतं ते काही नव्या अलंकारात आणि हे नवे अलंकार घडवायला सुरुवात झाली ती २०११ मधील अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलनाने. अख्खा देश जनलोकपालासाठी रस्त्यावर उतरला होता. पण मुजोर सत्ताधीशांनी त्यांच्या प्रवृत्तीला जागून विशेष दाद दिली नाही.
आपल्या देशातल्या लोकांना नको तिथे धीर दाखवायची आणि हवं तिथे घाई करायची वाईट सवय आहे. देशाचा विकास कधी ना कधीतरी होईल, कोणीतरी शेजारच्या घरातला शिवाजी येईल आणि मग विकास घडवेल अशी आशा मनात बाळगताना आपण कमालीचा धीर दाखवतो, पण तोच धीर, अख्खं आयुष्य जगून घेऊनही देशाच्या भवितव्याची (स्वत:ला गरज नसतानाही) चिंता करणाऱ्या एका वृद्ध माणसाच्या आंदोलनाचा न्यूज बाइट शिळापाका वाटायला लागल्यावर कुठल्या रानात चरायला जातो कुणास ठाऊक! ‘कुछ नही होने वाला, ये लोकपाल नही जोकपाल है’ असं म्हणून, आधी मोठय़ा जोषात रस्त्यावर उतरलेल्या जनतेने आणि विशेषत: तरुण, सळसळतं रक्त धमन्यांत खेळवणाऱ्या युवकांनी या आंदोलनाकडे काहीच दिवसांत पाठ फिरवली. कारण स्पष्ट होतं, ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’, ‘मी अण्णा हजारे’ वगैरे घोषवाक्यं छापलेल्या टोप्या, पिशव्या वगैरे अंगावर मिरवून, त्याचे फोटो काढून आणि फेसबुकवर काही-शे ‘लाइक्स’ मिळवून झाले होते. आता त्या आंदोलनात राहून त्यांना फारसं काही मिळेलसं वाटत नव्हतं. त्यातली नवलाई हरवली होती. ते आंदोलन ‘जुनं’ झालं होतं. सरकार दाद देत नाही आणि जनता ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ म्हणता म्हणता कंटाळून मागल्या मागे पळून गेली म्हटल्यावर काही आंदोलनकर्त्यांच्या मनात दुसऱ्या कल्पना उगवू लागल्या. त्यातूनच आम आदमी पक्षाचा जन्म झाला. सुरुवातीला कोणालाही या पक्षाकडून विशेष आशा नव्हती. त्यात अण्णांनी राजकारणात शिरण्याला स्वत:चा नकार दर्शवल्याने आंदोलनाला सुरुवातीला जेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, तेवढा पक्षस्थापनेच्या वेळेला मिळाला नाही. तरीही, उघड उघड त्यांना पाठिंबा देण्याचं धैर्य न दाखवणाऱ्या अनेकांना केजरीवालांकडून छुपी आशा होती.
२०१३ साल उजाडलं आणि एकीकडे मोदींच्या रथाने मार्गक्रमण करायला सुरुवात केली. भाजपकडून मोदींना विकासपुरुष म्हणून संबोधलं जाऊ लागलं. इथे काँग्रेसनेसुद्धा राहुल गांधींना युवकांचे, तरुणांचे नेते म्हणून लोकांसमोर आणून ठेवायचे प्रयत्न सुरू केले. दिल्ली विधानसभा जवळ येत गेली तसा ‘आप’चा बोलबालासुद्धा वाढीस लागला आणि ४ डिसेंबरला निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला पहिला दणका मिळाला. आपला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. लोकांच्या आशा उंचावल्या. आपकडून मनातल्या मनात गुपचूप आशा बाळगणारे आता उघडपणे त्यांच्या बाजूने राजकीय चर्चामध्ये, गप्पांमध्ये भाग घेऊन भांडायला लागले. डिसेंबर महिन्यापुरता मीडियाला ‘आप’शिवाय दुसरं काही सुचेनासं झालं होतं. मोदींच्या रथाला तात्पुरती का होईना, खीळ बसली होती. निवडणुकांपूर्वी जनमानसात ‘आप’कडे ‘भाजपचं पिल्लू’ म्हणून बघितलं जात होतं. निवडणुकांनंतर मात्र ‘आप’ने सरकार स्थापनेकरता काँग्रेसचं समर्थन घेतल्याने काँग्रेसने जणू ‘आप’ला दत्तक घेतल्यागत लोकांची मतं या टोकापासून पार त्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली. डिसेंबरमध्ये सरकार स्थापनेनंतर अवघ्या ४९ दिवसांत काही वादग्रस्त अशा करामती करून केजरीवालांनी राजीनामा दिला. या ४९ दिवसांत देशातले तरुण कधी या बाजूने, तर कधी त्या बाजूने विचार करण्यास प्रवृत्त होत होते. कोणाला केजरीवालांचं म्हणणं पटायचं, मुद्दे पटायचे, पण वर्तन पटायचं नाही. कोणाला सगळंच पटायचं, तर कोणाला काहीच पटायचं नाही.
त्या सुमारास ‘आप’च्या उपस्थितीमुळे विधानसभेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीचा निकालही त्रिशंकू अवस्था निर्माण करणार, भाजपचं अस्थिर सरकार येणार आणि वर्षभरात ते पडून पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार असं भाकीत बरेच जण करत होते, त्यांत स्वत: केजरीवाल यांचाही समावेश होता. अशा परिस्थितीत प्रथमच मत देणाऱ्यांचा पुरता गोंधळ उडालेला होता. ‘आप’ पक्ष चांगला दिसतो, त्याच्याकडून खूप आशा आहेत. पण सत्ताधारी पक्षाला भाजपऐवजी दुसरा पर्याय म्हणून आपण ‘आप’ला मत द्यायचो आणि त्यामुळे भाजपची मतं फुटून काँग्रेसला फायदाच व्हायचा, अशी भीती बहुतेकांना वाटायला लागली.
केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर मात्र ‘आप’ची लोकप्रियता झपाटय़ाने खाली येऊ लागली. आपण कसे सत्तालोलुप नाही, हे दाखवून लोकांचा विश्वास जिंकण्याचा केजरीवालांचा बेत फसला. उलट त्यांना मोठय़ा प्रमाणावर पळपुटे म्हटलं जाऊ लागलं. पुढे ‘राजीनामा द्यायला नको होता’ असं त्यांनी स्वत:ही मान्य केलं. त्यासुमारास त्यांनी ‘मी स्वत: लोकसभा निवडणूक लढवणार नाही’ असं जाहीर करून टाकलं. पण कदाचित हा त्यांच्या पक्षातील इतर सदस्यांशी सल्लामसलत करून घेतलेला निर्णय नसावा. कारण तसा सल्लामसलत केल्यानंतर केजरीवालांशिवाय ‘आप’कडे लोकांना दाखवण्यासाठी दुसरा चेहराच नाही, हे लक्षात आल्याने कदाचित नाइलाजाने केजरीवालांनी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. पण केवळ केजरीवालांचा चेहरा दाखवून लोकसभेत वर्चस्व मिळवण्याची अपेक्षा ठेवणं आणि त्या अपेक्षेला धरून चारशे जागा लढवणं कितपत योग्य होतं, हे निकालानंतर ‘आप’च्या लक्षात आलंच असेल. ज्या देशात एका देवाला पुजून लोकांचं समाधान होत नाही, तिथे एक नवा कोरा करकरीत नेता, भले कितीका प्रामाणिक असेना, एवढय़ा कमी वेळात करून करून किती करू शकणार होता!

दिल्ली निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधी आलेली लाट ‘आप’च्या लक्षात आली आणि आता काँग्रेसला अजून बदनाम करण्यात काहीही अर्थ नाही, कारण ते पुरतं बदनाम झालेलंच आहे, हे ‘आप’च्या लक्षात आलं. त्याच वेळी त्यांच्या हेसुद्धा लक्षात आलं, की काँग्रेसला पर्याय म्हणून ‘आप’ या नव्या दमाच्या आणि प्रामाणिक लोकांनी भरलेल्या पक्षाकडे न येता लोक भाजपकडे चालले आहेत. हे स्थलांतर फक्त जनतेतच नाही, तर नेत्यांमध्येसुद्धा होताना दिसत होतं. आदिलशाहीचा प्रभाव कमी झाला म्हणून निजामशाहीकडे वळून स्वत:ची जहांगीर जपणाऱ्या सरदारांसारखीच आजच्या नेत्यांची ही भूमिका होती. सत्ताधारी पक्ष म्हणून जेवढा काँग्रेस अपात्र होता तेवढाच भाजप हा विरोधी पक्ष म्हणून निष्प्रभ पक्ष होता, तेव्हा लोकांनी ‘आप’कडे वळणं स्वाभाविक वाटण्यासारखं होतं. पण एव्हाना रणांगणात मोदींचं आगमन झालेलं होतं. त्यांच्याच प्रभावामुळे लोक ‘आप’ आणि केजरीवालांकडे पाठ फिरवत होते. तेव्हा ‘आप’चा प्रभाव पुनश्च वाढवण्यासाठी काँग्रेसप्रमाणेच भाजप आणि मोदींचं ‘खरं रूप’ बाहेर आणण्यासाठी केजरीवाल त्यांच्या विरोधात लोकसभेत उभे ठाकले. मात्र इथे ते तोंडघशी पडले.
देशाचा तरुणवर्ग केजरीवाल आणि ‘आप’च्या या सर्व हालचाली आपआपल्या परीने बारकाईने पाहात होता, विचार करत होता आणि निर्णय घेत होता. तरीही सुरुवातीला मोठय़ा प्रमाणावर तरुण वर्ग गोंधळात पडलेला होता. त्यांचा गोंधळ बाजूला सारला तो मोदींच्या जबरदस्त मार्केटिंगमुळे. त्यांच्या रथाने या सगळ्या दिल्ली विधानसभा प्रकरणात स्वत:च्या, तात्पुरत्या खड्डय़ात अडकलेल्या चाकाची सुटका करून घेतली होती आणि ते आता भरधाव सुटले होते. मुंबईत बीकेसी मैदानावर त्यांनी घेतलेल्या महासभेला लाभलेल्या प्रचंड गर्दीमुळे टीव्हीवर ते भव्य आणि विराट दृश्य पाहणारे तरुण युवक भारावून गेले होते, भांबावून गेले होते. पुढे देशभरात त्यांनी घेतलेल्या सगळ्याच सभा गाजत गेल्या आणि साहजिकच विरोधक धास्तावून गेले.
मग काँग्रेसनेही आपल्या परीने मेहनत घेऊन राहुल गांधींच्या देशभरात जागोजागी सभा भरवल्या. प्रचंड पैसा खर्च करून टीव्हीवर जाहिराती झळकवल्या- दहा वर्षांत झालेल्या तुटपुंज्या नामधारी विकासाचे भरभरून गोडवे गाणाऱ्या. अजिबात यमक न जुळणारी अशी काही दोन ओळींची घोषवाक्यं मोठमोठय़ा होर्डिग्जवर ठिकठिकाणी दिसू लागली. मात्र जो नेता एका राजकीय घराण्याचा वारस असून, राजकारणात शिरून दहा र्वष झालेली असूनही, एकही टीव्ही मुलाखत देत नाही आणि सरतेशेवटी जी मुलाखत देतो, त्यातल्या विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाला ‘महिला संरक्षण, लोकशाही व्यवस्थेचा पुरस्कार, माहिती अधिकार, एकूण शासनपद्धतीत बदल आणि आपल्या घराण्याने देशासाठी केलेले त्याग’ याच मुद्यांचं भांडवल करून उत्तरं देतो, बोलताना बऱ्याचदा गडबडतो, उडवाउडवीची उत्तरं देतो, त्याला देशाचा युवक, ‘आपला तरुण आणि धडाडीचा नेता’ कसा काय मानेल? तसंच गेल्या दोन-तीन वर्षांतच ‘शहरी’(हा शब्द महत्त्वाचा आहे) स्त्रियांवरच्या अत्याचाराची एवढी प्रकरणं उघडकीला येत असताना त्यांच्या सुरक्षेबद्दल सत्तेत दहा वर्षे राहूनही काही न करू शकलेल्या माणसांनी स्त्रियांना सुरक्षा देऊ म्हणणं म्हणजे केवढा मोठा विनोद म्हणावा लागेल.
तरुणांना आपल्या वक्तृत्वाने एकेकाळी मोहिनी घालणाऱ्या राज ठाकऱ्यांनी या निवडणुकीत ‘पाहुणे कलाकाराची’ भूमिका बजावली. थोडय़ाशा सभा घेतल्या, काही मुलाखती घेतल्या, आपण सर्वाच्या आधीपासूनच मोदींचे समर्थक होतो आणि अजूनही आहोत असे दावे केले. पण त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा, मनसेच्या जन्माच्या वेळच्या मानाने या वेळी काहीच प्रभाव होताना दिसत नव्हता. त्यांच्या भाषणांना गर्दी तर होत होती, पण उत्स्फूर्त हशा आणि टाळ्यांनी त्यांना जी दाद मिळत असे, ती आता तितकीशी मिळताना दिसत नव्हती. मधूनच एखादी जबरदस्तीने वाजलेली टाळी किंवा शिट्टी ऐकू यायची तेवढीच. त्यांच्या सभांना प्रकर्षांने जाणवणारा गर्दीचा जिवंतपणा या वेळी राहुल गांधींच्या सभांपेक्षा जरा बरा होता एवढंच. त्यांनी टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीसुद्धा अगतिक होऊन दिल्यागत वाटत होत्या. मुलाखतकारांनासुद्धा यांना आता काय अजून विचारावं, असा प्रश्न पडला असावा. कारण त्यांच्या मुलाखतीत नवीन असं काहीच त्यांना विचारलं गेलं नाही आणि राज ठाकरेंनीही नवीन काही सांगितलं नाही. महाराष्ट्राच्या सगळ्या तरुणांना काही वर्षांपूर्वी भुरळ घालणारा हा नेता या निवडणुकीच्या काळात उशिरा जाग आल्याने निष्प्रभ ठरला. त्यात निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरायच्या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांशी घातल्या गेलेल्या विनाकारण राडय़ामुळे झालंच तर त्यांचं नुकसानच झालं.
आता मोदींकडे वळू या. मला वाटतं त्यांच्याविषयी असं काही विशेष वेगळं लिहायची गरज नाही. न्यूज चॅनेल्सनी मोदींचा एवढा जप चालवला होता आणि आहे की त्यातून इथे वेगळं मांडण्यासारखं असं काही सुटलं असेल तरच नवल. इथे मला त्यांच्या तरुणांवरच्या प्रभावाबद्दलचं माझं निरीक्षण मांडायचं आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सचा निवडणूक प्रचारासाठी वापर करायला सुरुवात जरी आपने केली असली तरी त्याचा सर्वाधिक फायदा करून घेतला तो भाजपने आणि मोदींच्या टीमने. त्यांनी मोदींच्या दौऱ्यांची इत्थंभूत माहिती, त्यांच्या मुलाखती, छायाचित्रे, गाजलेली वक्तव्ये इ. यांचा फेसबुक आणि ट्विटरवरून एवढा वर्षांव केला की त्यांच्या निर्माण झालेल्या लाटेकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. त्यांचे सगळे विरोधकही ‘देशात कुठलीही मोदी लाट वगैरे नाहीये’ असं आपल्या भाषणांतून म्हणताना त्यांच्या आधीपासूनच प्रकर्षांने जाणवणाऱ्या प्रभावाची प्रचीती देत होते आणि मोदींचं महत्त्व जनमानसांत अधिकच वाढवत होते. तरुण युवक मोदींमुळे भारावलेले होते, भारावलेले आहेत. मोदींना २००२च्या हिंसाचाराबाबत न्यायालयाने निर्दोष घोषित केल्याने त्यांच्या विरोधात बोलण्यासारखं विरोधकांकडे नवीन असं काहीच उरलं नाहीये. तरी काँग्रेस आणि ‘आप’ आपआपल्या परीने मोदींनी गुजरातचा विकास केलाच नसल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. पण देशातला एक मोठा वर्ग हा आता मोदींच्या लाटेवर डोळे मिटून स्वार झाला होता. लोक त्यांचे भक्त झाले होते, आहेत. मोदींविरुद्ध ब्रसुद्धा काढणाऱ्याला ‘देशद्रोही, पाकिस्तानी, अतिरेकी’ वगैरे नावं ठेवली जाऊ लागली. मोदींची लोकप्रियता एवढी वाढली की फेसबुकवर भाजपच्या पेजपेक्षा कितीतरी पटींनी जास्त लाइक्स मोदींच्या पेजला मिळालेले आहेत. एवढंच नाही, तर भाजप हा आत्तापर्यंत शहरी लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, तो मोदींच्या प्रभावामुळे गावागावांत जाऊन मतं मिळवून आला.
निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा होता तो म्हणजे प्रथमच मतदान करणारा तरुण वर्ग. या वर्गाची संख्या या निवडणुकीत आधीच्या निवडणुकांच्या मानाने प्रचंड होती. या वर्गाला भुरळ घालण्यासाठी प्रत्येक पक्षाने त्यांच्या त्यांच्या ‘तरुण’ नेत्यांना आपल्या पक्षाचा ‘चेहरा’ करून ठेवलं होतं. काँग्रेसने राहुल गांधींना, सपाने अखिलेश यादवना, शिवसेनेने आदित्य ठाकरेंना, मनसेचे राज ठाकरे नेहमीप्रमाणे स्वत:च पक्षाचा चेहरा होते, आपचे केजरीवाल आणि काही प्रमाणात कुमार विश्वास, अबू आझमींनी, नारायण राणेंनी आपआपल्या मुलांना उभं केलं. राखीताई सावंतसुद्धा निवडणूक लढल्या आणि त्यांनीसुद्धा आपल्या खात्यात काही मोजकी मतं जमा केली. पण सगळ्यांना पुरून उरले ते ६३ वर्षीय नरेंद्र मोदी. मोदी हे देशाचा खरंच विकास करतील की नाही, हे येणारा काळच सांगेल. पण या निवडणुकीने हे दाखवून दिलं, की जर देशाच्या तरुण वर्गाने ठरवलं, तर ते मोठमोठय़ा दिग्गजांना मान झुकवायला लावू शकतात. योग्य असो किंवा अयोग्य, पण हा तरुण वर्ग नुसता मत देण्यासाठी मत देत नसून आता विचार करून मत देणारा झाला आहे. देशातील सद्य:परिस्थितीने त्याला हा विचार करण्यास प्रवृत्त केलं आहे. प्रस्थापित सत्ताधीशांविरोधातली लाट आणि मोदींची आशादायी लाट या एकमेकींना खरं तर समांतर अशा लाटा होत्या आणि त्यांच्यामध्ये ‘आप’चं जहाज मार्गक्रमण करत होतं. तरुणांनी ठरवलं असतं, तर हे जहाज त्यांनी पुढे नेऊन देशात दिल्ली विधानसभांप्रमाणेच त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण केली असती. पण त्यांनी काळाची गरज ओळखून, देशात स्थिर सरकारची गरज जाणून ‘आप’च्या जहाजाला बुडवलं आणि या दोन्ही लाटांना एकरूप होऊ देऊन एक स्थिर सरकार आणण्यास आपला कौल दिला. इथेच या तरुण वर्गाची ताकद दिसून येते.
याच तरुण वर्गाला लक्षात घेऊन या वेळच्या निवडणुकीचा मूळ मुद्दा हा विकासाचा ठरला. काही पक्षांनी जात आणि धर्माच्या आधारावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो बऱ्याच प्रमाणात असफल ठरला. एक्झिट पोल्सच्या अनुमानानुसार भाजप हा सर्वाधिक मतं मिळवणारा पक्ष ठरणार होता, पण जेवढी मतं त्याला प्रत्यक्षात मिळाली, तेवढी मिळतील असं कोणालाही वाटलं नसेल. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आणि मोदींकडे विकासपुरुष म्हणून बघणारा एक मोठा वर्ग आज देशात उपस्थित असल्याने आता त्यांच्याकडून लोकांच्या आणि विशेषकरून तरुणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. देशात महागाई हा सध्या ऐरणीचा मुद्दा आहे. पण त्याचबरोबर बेरोजगार हासुद्धा एक अतिमहत्त्वाचा मुद्दा आज होऊन बसलाय हे या निवडणुकीच्या काळात आपसूकच सिद्ध झालंय. नाहीतर कुठल्याही पक्षाला निवडणुकींच्या काळात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तरुण कार्यकर्ते लाभले तरी कसे असते, नाही का!