डॉ. मनोज अणावकर – response.lokprabha@expressindia.com
आपल्याला रंगांची ओळख केवळ शाळेतल्या चित्रकला या विषयापुरतीच असते. त्यामुळे घराला रंग काढण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आपण गोंधळून जातो. एखाद्याच्या घरी एखाद्या खोलीत बघितलेली रंगछटा आपल्या मनाला भुरळ घालते आणि मग आपण ठरवतो की, आपण जेव्हा आपल्या घरी रंग काढू, तेव्हा आपणही आपल्या घराच्या त्या विशिष्ट खोलीतल्या िभती त्याच रंगछटेनं रंगवायच्या. पण सावधान! कारण दुसऱ्याच्या घरात उठून दिसलेली ती रंगछटा आपल्याही घरात तितकीच उठावदार दिसेल, असं मात्र सांगता येत नाही. रंगांचंही शास्त्र आहे. रंग आणि प्रकाश ही दोन भावंडं आहेत. त्यामुळे घरासाठी रंगसंगती ठरवताना हे शास्त्र आणि रंग-प्रकाशाचा परस्परसंबंध जाणून घेणं आवश्यक ठरतं.

प्रत्यक्षात रंगछटा या आजूबाजूला पसरलेल्या नसíगक किंवा कृत्रिम प्रकाशामुळे उठावदार किंवा निरस वाटत असतात. काही रंगछटा या सावलीत किंवा कमी प्रकाशात बघायला बऱ्या वाटतात, तर काही रंगछटा या तीव्र प्रकाशात अधिक खुलून दिसतात. त्यामुळे आपण ज्याच्या घरी ती रंगछटा बघितली, तिथे आपण पाहिलं, त्यावेळी प्रकाश किती होता? ती दिवसाची वेळ होती की रात्रीची? दिवसाची वेळ असेल, तर एकंदर खोलीतली दरवाजे-खिडक्यांची स्थानं आणि संख्या किती होती? त्यानुसार खोली उजळणारा तो प्रकाश खोलीच्या कुठल्या भागातून येत होता? एखाद्या कोपऱ्यातून की, मध्यभागी असलेल्या एखाद्या खिडकी किंवा दरवाजातून? अशा अनेक प्रश्नांबाबत विचार करावा लागेल. आपण बघितलं तेव्हा रात्र असेल, तर खोलीत टय़ुबलाईट, किंवा तशाच प्रकारचा सफेद प्रकाश देणारी प्रकाशव्यवस्था होती की, बल्बच्या पिवळसर प्रकाशाप्रमाणे प्रकाश देणारे दिवे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला ती विशिष्ट रंगछटा का आवडली याचं उत्तर मिळू शकतं आणि मग त्या घरी आवडलेली ती रंगछटा खरोखरच आपल्याही घरी तितकीच प्रभावी वाटेल का, हे आपण त्या प्रश्नांसदर्भातली त्या घरची परिस्थिती आणि आपल्या घरची परिस्थिती याची तुलना करून ठरवू शकतो. हे सगळं केवळ िभतींच्या रंगांनाच लागू नाही, तर फíनचरच्या लाकडाच्या पॉलिशचा रंग, सोफा आणि खुच्र्याची कव्हर्स, पडदे, बेडशीट्स अशा सर्वच गोष्टींच्या रंगसंगतीला लागू आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

माणसांचे जसे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात, तसे रंगांचेही असतात. काही माणसं तापट असतात, तर काही माणसांवर कितीही संकटं कोसळली किंवा अपमान सोसावा लागला, तरी त्यांच्यात फारशी चलबिचल होत नाही किंवा तशी झालेली दिसत नाही. कारण ती शांत स्वभावाची असतात. काहींना आयुष्य म्हणजे एखादा उत्सव वाटतो. अशी माणसं कायमच सगळ्याचा आनंद घेत असतात. काही माणसं मनाने खूप प्रेमळ असतात. अशांच्या सहवासात आपल्याला त्यांच्या मायेची ऊब जाणवते. मनुष्य स्वभावाचे हे कंगोरे आपल्याला रंगांच्या जगातही पाहायला मिळतात. काही रंग भडक असतात, तर काही रंग पाहिल्यावर मनाला आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. काही रंगांची अशी मत्री असते की, ते एकत्रितपणे पाहिले, तर मजेदार परिणाम साधतात. काही रंग एखाद्या खोलीत लावले जातात, तेव्हा त्या खोलीत आपल्याला ऊबदार वाटतं. कुठल्या खोलीचं प्रयोजन काय त्यानुसार आपल्याला त्या खोलीसाठी कुठली रंगसंगती निवडायची ते ठरवावं लागतं. त्यासाठी मुळात रंगांचे हे स्वभाव माहीत असणं आवश्यक आहे.

पेस्टल रंग

या रंगांमध्ये पांढऱ्या रंगाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते फिके आणि शांत वाटतात. (छायाचित्र-१) परंतु घरातल्या सर्वच खोल्यांमध्ये किंवा एखाद्या खोलीत िभती, फíनचर, गाद्या-उशांची कव्हर्स अशा सगळ्यासाठी जर या पेस्टल कलर्सचा वापर केला, तर मात्र घर अगदी निस्तेज असल्यासारखं दिसेल.

ऊबदार आणि शीत रंग

रंगांच्या शेकडो छटा असल्या तरी मुख्यत: रंगचक्रावरचे रंग हे त्यांचे स्वभाव आणि त्यानुसार साधले जाणारे त्यांचे परिणाम यासाठी लक्षात घेतले जातात. सोबतच्या आकृतीत (छायाचित्र-२) दाखवल्याप्रमाणे तांबडा, नािरगी आणि पिवळा या रंगांच्या शेजारीच असणारे रंग हे ऊबदार रंग आहेत, तर निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या बाजूला असणारे रंग हे शीत रंग आहेत. हिरव्या रंगाची निळ्या रंगात मिसळून होणारी छटा शीत आहे तर पिवळ्या रंगात मिसळून होणारी छटा ही उबदार आहे.

सर्वसाधारणपणे ज्या भिंतींना उबदार रंग लावले जातात अशा िभती पुढे किंवा कधीकधी अंगावर आल्याचा आभास होतो. त्यामुळे खोली आहे, त्यापेक्षा लहान झाल्यासारखी वाटते. फार प्रशस्त खोल्या असतील आणि त्या खोल्यांमध्ये फारसे फíनचर नसेल, तर त्या फार मोठय़ा वाटू नयेत यासाठी अशा रंगांचा वापर करता येईल. शीत रंगांमुळे याच्या विरुद्ध परिणाम साधला जातो. तिथे िभती लांब गेल्यासारख्या वाटतात. त्यामुळे जागा लहान असेल, तर शीत रंगांचा वापर करायला हरकत नाही. त्यातून जागा मोठी असल्याचा आभास निर्माण करता येतो. खोलीत येणारा नसíगक प्रकाश किती आहे, यावरही शीत रंग निवडायचे की उबदार, किंवा त्यांची कुठली छटा निवडायची हे ठरतं. बऱ्याचदा या दोन्हींचा वापर कल्पकतेने करून घेऊन जागेचा आभास आणि खोलीतला प्रकाश यात संतुलन साधावं लागतं.

पांढरा-काळा

पांढरा आणि काळा यांना आपण रंग म्हणत असलो, तरी ते तांत्रिकदृष्टय़ा रंग नाहीत. त्यांचा वापर इतर रंगांची तीव्रता म्हणजेच टोन कमी अधिक करून टिंट किंवा शेड तयार करण्यासाठी केला जातो. एखाद्या रंगात काळा किंवा पांढरा विविध प्रमाणात मिसळून त्या रंगाच्या ज्या वेगवेगळ्या छटा तयार होतात, त्या एकाच रंगाच्या छटांचा वापर करूनही खोली सजवता येते. त्याला ‘मोनोक्रोम कलर स्कीम’ असं म्हणतात.

न्यूट्रल रंग

माती किंवा दगडाच्या रंगांच्या छटा असलेल्या या रंगांमध्ये (छायाचित्र-३) उबदार किंवा शीत असा फरक करणं कठीण असतं. खोलीतल्या िभती, फíनचर, सोफा कव्हर्स या सगळ्यांच्या रंगासाठी जे उबदार किंवा शीत रंग वापरले असतील, त्यांचं संतुलन या न्यूट्रल रंगांच्या वापराने साधता येतं.

आता रंगांचे स्वभाव बघितल्यानंतर आपण इंद्रधनुष्यातले सात रंग अथवा त्यांच्या छटा या घरातल्या विविध खोल्यांसाठी त्या-त्या खोल्यांच्या वापरानुसार कशा योग्य असू शकतात, ते पाहू या.

तांबडा

सप्तरंगांमध्ये सर्वात आधी येणारा आणि सर्वात जास्त वेव्हलेंग्थ म्हणजे दीर्घ तरंग लांबी असलेला हा रंग! मेंदूला उत्तेजना देणारा, बुद्धीला तजेला देणारा असा हा रंग आहे. ज्या गणपतीला आपण बुद्धीची देवता मानतो, त्यालाही आपण रक्तवर्णी फुलंच अर्पण करतो. माणसाला राग अनावर झाला की, रक्तप्रवाह वाढल्यामुळे चेहरा लालसर होतो, डोळे लालसर होतात. तांबडा हा उबदार रंग आहे. त्यामुळे बैठकीच्या खोलीत (लिव्हिंग रूम) या रंगाचा वापर प्रमुख रंग म्हणून न करता, माफक प्रमाणातच करावा. या खोलीत प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या पेस्टल कलर्समुळे येणारा निस्तेजपणा कमी करून संतुलन साधण्यापुरताच या रंगाचा उपयोग करावा. आसन व्यवस्थेसमोरच्या िभतीवर डिस्प्ले एरिया करून त्यामागे असा उबदार रंग लावला तर पेस्टल रंगांमुळे काहीशा म्लान झालेल्या खोली चतन्य निर्माण होते.

पिवळा

रंगचक्रावर प्राथमिक रंगाच्या श्रेणीत तांबडय़ा रंगानंतर येणारा दुसरा प्राथमिक रंग म्हणजे पिवळा! एप्रिल-मे महिना म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतं ते सोन्यासारखं पिवळं ऊन! तशा रणरणत्या उन्हात निसर्गावर एक नजर टाकली, तर निसर्गानेही लग्नात सकाळी नेसतात तशी हळदीसारखी पिवळी साडी नेसल्याचा भास होतो. पिवळ्या जर्द फुलांनी बहरलेले बहाव्याचे वृक्ष, आणि याच काळात येणारा फळांचा राजा पिवळा आंबा.. वसंताच्या आगमनामुळे हिरव्या झालेल्या निसर्गावर हा पिवळा रंग अधिकच खुलून दिसतो. सप्तरंगांमध्ये सर्वात उठावदार रंग म्हणजे पिवळा रंग! पिवळा धमक िलबू किंवा पिवळीजर्द हळद असे शब्द उच्चारले, तरी त्यांच्या रूपाने निसर्गात ओसंडून वाहणारं चतन्य, आनंद किंवा प्रसन्नताच प्रथम आपल्या नजरेसमोर येते. तर, असा हा पिवळा रंग, मनाला चतन्य आणि आनंद देत असल्यामुळे प्रसन्नतेचं प्रतीक मानला गेला आहे. अर्थातच बठकीची खोली, स्टडीरूम, स्वयंपाकघर अशा खोल्यांसाठी हा रंग अधिक उपयुक्त आहे. कारण तो विचारांना चालना देतो. मन अधिक सजग करतो. त्यामुळे एकाग्रता वाढायला मदत होते आणि स्मरणशक्तीही अधिक तल्लखपणे काम करते. त्यामुळे अभ्यासाच्या किंवा घरातल्या कार्यालयीन कामाच्या खोलीसाठी हा रंग अतिशय उपयोगी आहे. पिवळा रंग एकात्मता साधायलाही मदत करतो. त्यामुळेच बठकीच्या खोलीत जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र बसतं किंवा पाहुण्यांची ऊठबस असते, गप्पा रंगतात, अशा ठिकाणीही हा रंग असेल, तर सर्वाची चित्तं प्रफुल्लित राहिल्यामुळे त्या खोलीतलं वातावरण खेळीमेळीचं राहायला मदत होते.

नारंगी

नारंगी रंग हा तजेलदार तांबडय़ा आणि प्रसन्न पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून तयार झालेला असतो. मन तजेलदार आणि प्रसन्न असेल, तर अर्थातच ते आनंदीही असतं आणि म्हणूनच नािरगी रंग हा सुद्धा आनंदीपणाचं प्रतीक आहे. तो उत्साह, चेतना आणि सामाजिकतेचंही द्योतक आहे. घरात होणाऱ्या वाढदिवसासारख्या छोटेखानी समारंभांना किंवा इतर वेळी जिथे लोक एकत्र जमतात, पाहुणे येतात, अशा बठकीच्या खोलीतली फिचर वॉल म्हणजे, उठून दिसेल, अशी एखादी िभत नािरगी रंगात रंगावावी. मात्र, हा एकदम डोळ्यांत भरणारा, डोळे प्रदीप्त करणारा फ्लुरोसण्ट रंग असल्याने त्यामुळे येणारा भडकपणा कमी करण्यासाठी बाकीच्या िभती लाइट क्रीम किंवा बफ यासारख्या पेस्टल रंगांमध्ये रंगवाव्यात, अथवा किमान सोफ्याची आणि खुच्र्याची कव्हर्स तरी अशा संतुलन साधणाऱ्या रंगांची असावीत. बेडरूमचा रीिडग रूम म्हणून वापर करायचा असेल, तेव्हाही बेड मागची िभत नािरगी रंगात रंगवली, तर दोन्ही बाजूच्या टेबल लॅम्पसचा प्रकाश मागच्या नािरगी िभतीवर पडून खोली उजळून निघालेली दिसते. त्यामुळे वाचनाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल, मात्र झोपताना डोक्यामागे असणाऱ्या भिंतीलाच हा रंग द्यावा. त्यावरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशाचा ताण डोळ्यांवर येणार नाही, याची काळजी घ्यावी, नाहीतर झोप शांत लागणार नाही.

हिरवा

जिवंतपणा, ताजेपणा आणि टवटवीतपणा यांचा मिलाफ म्हणजे हिरवा रंग! निसर्गाने भूसृष्टीवर वसंतात चढवलेला हिरवा साज अधिकच खुलवून ताजा, टवटवीत आणि जिवंत करण्याचं काम ज्येष्ठ महिन्यातल्या आणि ग्रीष्माची चाहूल देणाऱ्या पावसाच्या पहिल्या सरी करतात. सप्तरंगांच्या रंगचक्रावर मध्यभागी येणारा हिरवा रंग हा भडक रंग आणि शीत रंगांमध्ये संतुलन साधण्याचं काम करतो. डोळ्यांना आणि मनाला शांत करतो. अचेतनाला चेतना देणाऱ्या या हिरव्या रंगाचा वापर आपण घरात केला, तर मन शांत, प्रफुल्लित, ताजं आणि टवटवीत राहायला मदत होते. लििव्हगरूममध्ये आपण अनेक वेळा सहकुटुंब बसून गप्पा मारत असतो. त्यामुळे अशा खोलीत हिरव्या रंगाचा उपयोग कुठल्या ना कुठल्या प्रकारे केला तर, आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असलेला निवांतपणा मिळू शकतो. बेडरूमसारख्या खोलीत जिथे आपल्याला मन:शांतीची आणि विसाव्याची गरज असते, अशा खोलीसाठीही या रंगाचा वापर अधिक प्रभावी ठरू शकतो. स्वयंपाकघरामध्ये गॅसच्या शेगडीमुळे आधीच खूप उष्ण वातावरण असतं. अशा खोलीतही हिरव्या रंगाचा वापर हा डोळ्यांना थंडावा आणि आराम देणारा ठरू शकतो.

निळा

आपल्याला कधीतरी एकटं राहावंसं वाटतं किंवा कोणाशीही बोलू नये असं वाटतं, तेव्हा आपण समुद्र किनाऱ्यावर किंवा चौपाटीवर जाऊन बसलो आणि समोर पसरलेल्या अथांग निळसर सागराकडे आणि क्षितिजाने विभागून विलग केलेल्या निळसर आकाशाकडे पाहिलं, तर त्याचं ते शांत रूप आपल्यालाही शांत करतं. त्या अथांग-अमर्याद पसाऱ्याकडे पाहून आपण आणि आपल्या समस्या किती किरकोळ आहेत, याची जाणीव होते आणि मग मन शांत होतं. थोडक्यात, मनाला शांती आणि स्फूर्ती देणारा रंग म्हणजे निळा रंग! निळा हा तांबडय़ा रंगाच्या तुलनेत छोटी वेव्हलेंग्थ म्हणजे कमी तरंगलांबी असलेला रंग आहे. त्याची फ्रीक्वेन्सी म्हणजेच वारंवारता अधिक असल्यामुळे तांबडय़ा रंगाच्या तुलनेत ऊर्जेचं प्रमाण निळ्या रंगात जास्त असतं. साधं उदाहरण घेऊ. गॅसच्या बर्नरची शुद्ध निळ्या रंगातली ज्योत आणि लालसर निळी असलेली ज्योत यांची तुलना केली, तर निळ्या ज्योतीची धग जास्त असते. त्यामुळे अशा ज्योतीवर अन्न अधिक लवकर शिजतं. शिणलेल्या डोळ्यांना निळ्या रंगाकडे पाहताना अशीच अधिकची ऊर्जा मिळते. पण तोच निळा रंग डोळ्यांना शांतवतोसुद्धा! त्यामुळेच बेडरूममध्ये निळ्या रंगाचा वापर प्रभावी ठरू शकतो. बेडरूमव्यतिरिक्त इतर खोल्यांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये निळ्या रंगाचा वापर करताना त्याबरोबर निळ्या रंगाच्या विरुद्ध असलेल्या नािरगी रंगाचा वापरही अधिक खुलवणारा असतो.

पारवा

पारवा रंग तसा बहुचíचत नाही. त्याबद्दल सर्वसाधारणपणे बोललं किंवा लिहिलं जात नाही. या रंगाची तरंग लांबी ४४० ते ४६० नॅनोमीटर इतकी असते. हा रंग मनाला शांतता आणि अध्यात्मिक आनंद मिळवून देतो. मनाची एकाग्रता साधायची असेल किंवा ज्ञानार्जन करायचं असेल, तिथे या रंगाचा वापर अधिक उपयोगी ठरू शकतो. स्टडीरूम कम बेडरूमसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. पण इतर रंगांप्रमाणेच पारवा रंग थेट डोळ्यांसमोर न ठेवता वाचायला बसताना बेडच्या मागच्या बाजूला येईल, असा ठेवावा. निळ्या रंगाप्रमाणेच पारवा रंगाचाही अतिरेक टाळावा. अतिरेक झाल्यास मन शांत होईल, पण ती अबोल शांतता निराशाजनकही ठरू शकते.

जांभळा

आपण निळ्या रंगाकडून इंद्रधनुष्यातल्या शेवटच्या जांभळ्या रंगाकडे जाऊ लागतो, तसं आधी मन शांत होतं. इंद्रधनुष्यात अखेरच्या क्रमांकावर असलेला जांभळा रंग हा दुय्यम रंग असून तो निळ्या आणि तांबडय़ा रंगापासून तयार होतो. म्हणजेच तांबडय़ा रंगापासून सुरुवात करून पारवा रंगापर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा तांबडय़ा रंगाकडे नेऊन रंगचक्र पूर्ण करणारा हा जांभळा रंग! निळ्या रंगाकडे झुकणाऱ्या जांभळ्या रंगाच्या छटा या मन शांत करणाऱ्या विरक्तीकडे नेणाऱ्या, तर तांबडय़ा रंगाकडे झुकणाऱ्या जांभळ्या रंगाच्या छटा या कोमेजलेल्या मनात चेतना निर्माण करणाऱ्या आणि ते फुलवणाऱ्या असतात. आध्यात्मिक उन्नतीसाठी बेडरूममध्ये जिथे तुम्ही ध्यान-धारणा करता तिथे किंवा स्टडीरूमम्ध्ये अर्थात चिंतनाच्या खोलीत, मेंदू आणि मध्यवर्ती चेतासंस्थेवर आधिपत्य गाजवणारा हा रंग दिला, तर अशी कामं अधिक प्रभावीपणे आणि जास्त कार्यक्षमतेने होऊ शकतात. जांभळ्या रंगाची सगळ्यात चांगली गट्टी जमते, ती हिरव्या रंगाशी! निसर्गातही ही किमयागार जोडी आपल्याला पाहायला मिळते. हिरव्यागार पानांच्या पाश्र्वभूमीवर लव्हेंडर रंगाची फुलं डोळ्यांना सुखावून जातात. त्यामुळे बठकीच्या खोलीतल्या सोफ्यामागच्या िभतीवरच्या पडद्यासाठी किंवा सोफ्यासमोरच्या सेंटर टेबलवर रंगांची ही जोडी  ठेवली, तर ती अधिक खुलून दिसेल.

कोणत्याही खोलीसाठी रंगांचा विचार करताना या खोलीत अमुक एक रंग काढणार एवढं म्हणून चालत नाही, तर विविध रंगांच्या वापरातून संतुलन साधून आपल्याला अपेक्षित परिणाम साधावा लागतो. या लेखाच्या निमित्ताने रंगांच्या दुनियेत डोकावून बघायचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. रंग विज्ञानाविषयीची ही मूलभूत माहिती, रंग आणि त्यांचा घरातल्या विविध खोल्यांमधला वापर, याबाबतची ही सर्व माहिती म्हणजे संपूर्ण रंगज्ञान नसले, तरीही या माहितीचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल.

(लेखक इंटिरिअर डिझायनर आणि स्पेस मॅनेजमेंट सल्लागार आहेत.)