एकापाठोपाठ एक असे हिट सिनेमे देणारी परिणिती चोप्रा उत्सुक आहे तिच्या ‘दावत-ए-इश्क’ या नव्या सिनेमासाठी. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनय, सिने इंडस्ट्री, भूमिकेचा अभ्यास, पेज थ्री पार्टी अशा विषयांवर मारलेल्या गप्पा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बबली, चटकन रागावणारी, मनात आहे ते बोलणारी अशी तिची ओळख. अपघाताने का होईना पण, ती या इंडस्ट्रीत आली आणि हिंदी सिनेसृष्टीला एक चुलबुली अभिनेत्री मिळाली. यश चोप्रांच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग टीममध्ये काम करत असतानाच तिला सिनेमाची ऑफर आली. ध्यानीमनी नसताना तिने या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि तिच्या एकामागे एक हिट सिनेमांची रांगच लागली. ही बबली, चुलबुली हिरोइन म्हणजे परिणिती चोप्रा.! खरंतर ही विशेषणं तिला फारशी मान्य नाहीत. ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या पहिल्या सिनेमातच तिने षटकार मारला आणि मग ‘इशकजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’ हेही तिचे सिनेमे हिट झाले. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसलेली परिणिती आता ‘दावत-ए-इश्क’ या आठवडय़ातील तिच्या नव्या सिनेमासाठी उत्सुक आहे. इतर चित्रपटांमधल्या प्रेमकहाण्यांपेक्षा ‘दावत-ए-इश्क’ची कथा काहीशी वेगळी असणार आहे. या हटके प्रेमकथेसाठी परिणितीही तेवढीच उत्सुक आहे.
‘मी टिपिकल बॉलीवूड नायिकांसारखी अजिबात नाही. मी पार्टीज, स्क्रीनिंगला फारशी कधीच जात नाही. मला ते आवडतही नाही. अनेकदा रात्री दहा वाजता मी माझ्या घरीच सापडू शकते. आराम करत..’, असं ती स्पष्ट सांगते. तिच्या ‘मी टिपिकल बॉलीवूड नायिका नाही’ या बोलण्यातला स्पष्ट आणि बेधडकपणा अनेकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. यापूर्वीही तिच्यावर झालेल्या थेट टीकांना तिने सडेतोड उत्तर देऊन ती नेहमी चर्चेत राहिली आहे. मग ते ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात एखाद्या मुलीविषयी कमेंट केलेलं असो किंवा ‘दावत-ए-इश्क’ या सिनेमाच्या वेळी तिला जाडी म्हटलेलं असो. तिने समोरच्याला तितक्यात शिताफीने उत्तरं दिली आहेत.
इतर अभिनेत्रींसारखी ती या क्षेत्रात आवडीने आलेली नाही. अपघाताने तिचं या क्षेत्रात पदार्पण झालं असलं तरी तिने या क्षेत्राकडे नेहमीच गांभीर्याने बघितलं. लंडनहून बँकिंग क्षेत्राची पदवी घेऊन आलेल्या परिणितीला तेच क्षेत्र अधिक जवळचं वाटतं. ती म्हणते, ‘सिनेसृष्टीच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात इतर अनेक गोष्टी आहेत. बँकिंग हे माझं सगळ्यात आवडतं आणि जवळचं क्षेत्र आहे. सिनेक्षेत्रापेक्षाही जास्त माझा त्या क्षेत्राकडे जास्त कल आहे. सिनेमांमध्ये काम करणं ही माझ्यासाठी एक बँकेसारखीच ‘हाय पेमेंट प्रोफाइल’ नोकरीच आहे. त्यामुळे त्याच्याशी मी इतकी जोडले गेलेले नाही.’ असं असूनही तिला बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत आदर आहे. ‘कॅमेऱ्याला सामोरं जाणं हे खूप वेगळं फीलिंग असतं. सगळ्यांप्रमाणे मलाही ते खूप आवडतं. पण, जर पुढे आयुष्यात या क्षेत्रात माझं फारसं काही चांगलं चाललं नाही तर मी बँकिंग किंवा माझ्या अन्य पदव्यांचा वापर करून त्या क्षेत्रांमध्ये काम करू शकते’, असं ती स्पष्ट सांगते. परिणिती सध्याची टॉपची हिरोइन असूनही तिने तिचा बॅकअप प्लॅन तयार ठेवला आहे. सध्या सगळ्याच नायिका गायिकांच्या भूमिकाही बजावतायत. परिणिती चोप्रा मात्र योग्य संधीची वाट बघतेय. ‘एखादं गाणं गाण्यासाठी मी योग्य वेळेची वाट बघतेय. वेळ आली की मी गाईनच’, असं ती आवर्जून सांगते.
शंभर कोटींच्या स्पर्धेत आत्ताच्या अनेक नायिका आहेत. त्यावर ती म्हणते की. ‘मला एक उत्तम अभिनेत्री व्हायचंय. केवळ नायिका नाही. प्रत्येक दिग्दर्शकाला माझ्याकडे बघून आत्मविश्वास वाटला पाहिजे. मी कोणत्याही भूमिकेत फिट बसू शकेन आणि ती भूमिका योग्य प्रकारे वठवू शकेल असा त्यांचा माझ्याबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. आणि यासाठी उत्तम अभिनेत्री होणं हे आवश्यक आहे. तर नायिका होणं नव्हे.’ ‘दावत-ए-इश्क’नंतर परिणिती शाद अलीचा ‘किल दिल’ आणि सैफ अली खानसोबत दिनेश विजनच्या आगामी सिनेमांमध्ये दिसेल. खरंतर या क्षेत्रात असलेली मंडळी वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे सतत बघत असतात. विविध प्रकारचे सिनेमे बघितल्यामुळे कलाकारांना त्यांचा अभिनय आणखी सक्षम करण्यास मदत होत असते. पण, परिणितीचा फंडा जरा वेगळा आहे. ती फारसे सिनेमे बघत नाही. पण, तरी तिच्या अभिनयात सहजता दिसून येते. ती कशी येते याचं सगळ्यांनाच नेहमी अप्रूप आणि आश्चर्य वाटतं. त्याबाबत सांगते की, ‘कोणत्याही भूमिकेत शिरण्यासाठी मला फारसा वेळ लागत नाही. नव्या भूमिकेबाबत माझा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे असतो. सेटवर पोहोचण्याआधी मी त्या त्या व्यक्तिरेखेत शिरलेली असते. म्हणजे त्या व्यक्तिरेखेसाठी लागणारी देहबोली, आवाज, स्टाइल असं सगळं मी सेटवर येण्याआधी माझ्यात आणते. जेणेकरून मी कॅमेऱ्यासमोर आले की सहज ती भूमिका साकारू शकेन. मी कधीच तासनतास सीन्सचा सराव करत नाही.’
(इंडियन एक्स्प्रेसमधून)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of parineeti chopra
First published on: 19-09-2014 at 01:06 IST