भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एके काळी संगीत हा महत्त्वाचा दुवा होता. दोन्ही देशांतील संगीतकार, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यातल्या गमतीजमती, किस्से या सगळ्यांची चर्चा करणारं, माहितीपूर्ण नवं पाक्षिक सदर.
संगीतकार मदनमोहनने संगीतबद्ध केलेला ‘आंखरी दांव’ हा चित्रपट रीलीज झाल्यानंतरची घटना. एका चित्रपट निर्मात्याने दिलेल्या पार्टीत संगीतकार सज्जाद हुसेनला पाहून त्याचा चाहता असलेला पोरसवदा पत्रकार भारावून त्याला म्हणाला, ‘‘सरजी, आप बडे कमाल के मुसीकार हो, माशाअल्लाह, क्या एक से बढकर एक धूनें बनायी है आपने? जब भी सुनो, दिलो-दिमाग़पे छा जाती है.. भुलाये नही भुलती!’’ सज्जाद हुसेनने तेथे उपस्थित असलेल्या मदनमोहनकडे जळजळीत कटाक्ष टाकीत उपरोधिक स्वरात ‘टोमणा’ मारला, ‘‘आप जिन धूनों की बात कर रहे हो बरख़ुरदार, आजकल तो उनकी ‘परछाईयाँ’ भी चल रही है.’’ मदनमोहनने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. सज्जादने हा ‘नथीतून तीर’ खास आपल्यासाठी मारलाय हे कळत असूनही त्याने मूग गिळून गप्प बसणं पसंत केलं.. सज्जादच्या ‘ये हवा ये रात ये चांदनी..’ या ‘संगदिल’ (१९५२) चित्रपटातील सुरावटीशी मदनमोहनने कंपोझ केलेली ‘तुझे क्या सुनाऊं ऐ दिलरुबा..’ (आँखरी दांव’ : १९५८)ची चाल तंतोतंत जुळत होती. प्रतिवाद करण्यात अर्थ नव्हता. हात दाखवून ‘अवलक्षण’ कशाला करा? मदनमोहनने मौन बाळगून प्रसंग निभावून नेला.
‘परछाईयाँ’ या उर्दू शब्दाचा अर्थ सावली किंवा पडछाया असा होतो.. शिवाय ‘नक्कल’, ‘उचलेगिरी’, ‘अनुकरण’, ‘आवृत्ती’ किंवा ‘कॉपी’ अशा आशयाच्या अनेक अर्थच्छटा त्यात अंतर्भूत आहेत. १९४७ साली भारतापासून अलग झालेला पाकिस्तान भारताची सावली बनूनच वावरत आलाय. प्रत्येक क्षेत्रात भारताची नक्कल करायचीच असा एकसूत्री कार्यक्रम या राष्ट्राने सातत्याने राबविलाय. साहजिकच मग तिथले ‘चंदेरी विश्व’ (ज्याला आज आपण ‘लॉलीवूड’ म्हणून ओळखतो.) याला अपवाद कसे असणार? विभाजनानंतर थंडावलेली लाहोरची सिनेसृष्टी नव्याने उभारण्याचा चंग तिथल्या कलावंतांनी बांधला खरा; पण स्वबळावर त्यांना ते शक्यच नव्हते. त्यांना भारतातून स्थलांतरित झालेल्या कलावंतांनी व विस्थापित तंत्रज्ञांनी यथाशक्ती हातभार लावला आणि पाकिस्तानी सिनेसृष्टीला ऊर्जतिावस्था प्राप्त करून दिली.
‘आसपास’ (१९५७) या चित्रपटात कौसर परवीनने गायलेला ‘मेरी नज़्ारोमें कोई समाने लगा’ हा मुजरा तिच्या सदाबहार व अजरामर गीतांमध्ये गणला जातो.
पाकिस्तानातील पंजाबी व उर्दू चित्रपट संगीताचा पायाच मुळात भारतीय उपखंडातील िहदुस्थानी शास्त्रोक्त व सुगम संगीतावर आधारित आहे. त्यात सिंधी, बलुची, बंगाली, पंजाबी व सूफियाना संगीताचे प्रवाह मिसळून तयार झालेलं मिश्रण म्हणजेच पाकिस्तानी चित्रपट संगीत. भारतातील िहदी सिनेमाच्या तुलनेत पाकिस्तानातील उर्दू चित्रपटसृष्टीचे स्थान संख्यात्मक आणि गुणात्मक बाबींचा विचार करता ‘कुठं इंद्राचा ऐरावत नि कुठं श्यामभटाची तट्टाणी’ असं विषम असलं तरी उर्दूचा भाषेचा नजाकतदार ‘लहजा’ आणि पंजाबी शैलीचा ठेकेबाज ‘तडका’ त्यात समाविष्ट असल्याने पाकिस्तानातलं सिनेसंगीत कमालीचं श्रवणीय व कर्णमधुर वाटतं. गायकीची जातकुळीही काहीशी वेगळी व अनोखी असल्याने ऐकताना चित्त आकर्षून घेते.
उभय देशांतील दिग्गज संगीतकारांच्या अजरामर गीतरचनांचा ऊहापोह करताना, एकमेकांच्या चित्ताकर्षक चालीं, त्यामुळे निर्माण झालेला उचलेगिरीचा मोह, पूर्वपरवानगीने, तर कधी निव्वळ खोडसाळपणे लाटलेल्या एकमेकांच्या सुरावटी, सिनेसंगीत व पडद्यावरील कलावंतांचा संक्षेपात परिचय, फाळणीनंतर झालेली कलावंतांची फरफट व स्थलांतरामागची अपरिहार्यता या सर्व घटकांना अधोरेखित करणारे रोचक किस्से व रंगतदार आठवणी, ‘परछाईयाँ’ या सदरांतर्गत दरमहा उलगडण्याचा मानस आहे; मात्र ‘संगीतकारांचे चौर्यकर्म’ दाखवून त्यांना अवमानित करणं हा या मालिकेचा हेतू नसून माहिती आणि मनोरंजन हा मुख्य उद्देश आहे. भारत असो की पाकिस्तान, या लेखमालेत समाविष्ट संगीतकार अत्यंत प्रतिभाशाली व सर्जनशील कलावंत असल्याने केवळ ‘उचलेगिरी’चा कलंक लागल्यामुळे रसिकांनी त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीचं व प्रतिभेचं अवमूल्यन करू नये, ही विनंती.
पाकिस्तानी चित्रपट फाळणीनंतरसुद्धा भारतात येत होते. उत्सुकतेपोटी ते भारतात पाहिलेही जात होते; परंतु १९५४ नंतर ही सांस्कृतिक देवाण-घेवाण ठप्प झाली. साहजिकच तिथल्या चित्रपटाची तहान आपले श्रोते संगीतावर भागवू लागले. सीमेपलीकडून रेडिओ कराची, पेशावर, मुलतान, लाहोर तसेच रेडिओ सिलोनवरून पन्नास, साठ व सत्तरच्या दशकात प्रसारित होणारी सुवर्णकाळातील पाकिस्तानी सदाबहार गाणी ऐकताना मजा यायची. भारत-पाकिस्तान असा भेदाभेद न करता संगीतावर अंत:करणापासून प्रेम करणारे भारतातील असंख्य कानसेन या पाकिस्तानी गाण्यांवर व कलावंतावर लुब्ध व्हायचे. ऐंशीच्या दशकात रंगीत टेलिव्हिजनचं आगमन झाल्यानंतर नभोवाणी केंद्रांकडे श्रोत्यांनी पाठ फिरवली. आजकाल ‘यू-टय़ूब’सारख्या सर्वव्यापी माध्यमातून दोन्ही देशांतील हा अनमोल खजिना विनासायास उपलब्ध असूनही पुरेशा माहितीअभावी तो अक्षरश: अज्ञाताच्या कोपऱ्यात दुर्लक्षित होऊन पडला आहे.
पाकिस्तानात पन्नासच्या दशकात कौसर परवीन या गोड गळय़ाच्या पाश्र्वगायिकेने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. राणी किरण व आशा पोसले (दचकलात ना?) या अभिनेत्रींची कौसर परवीन ही धाकटी बहीण! ज्येष्ठताक्रमानुसार राणी किरण, साबिरा बेगम ऊर्फ आशा पोसले व कौसर परवीन असा क्रम लागतो. पाकिस्तानात १९४८ साली दाऊद चांद यांच्या दिग्दर्शनाखाली रीलीज झालेल्या ‘तेरी याद’ या पहिल्यावहिल्या उर्दू (पाकिस्तानी) सिनेमाचे संगीतकार इनायत अली ‘नाथ’ हे तिचे वडील. दिलीपकुमारचा भाऊ नासिर खान या ‘पडेल’ चित्रपटाचा नायक होता, तर आशा पोसले ही पाकिस्तानी सिनेमाची पहिली नायिका! राणी किरणसुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होती.
पाकिस्तानी चित्रपट फाळणीनंतरसुद्धा भारतात येत होते. उत्सुकतेपोटी ते भारतात पाहिलेही जात होते; परंतु १९५४ नंतर ही सांस्कृतिक देवाण-घेवाण ठप्प झाली.
आशा पोसले हिचे अष्टपलू गायिका आशा भोसले यांच्या नावाशी असणारे साधम्र्य चाहत्यांना बुचकळ्यात टाकतं. अनेकांना तो भारतीयांना डिवचण्यासाठी जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा वाटतो. मात्र अधिक खोलात गेल्यास त्यात तथ्य नसल्याचं आढळून येतं. चाळीसच्या दशकात पाश्र्वगायिका बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या व तशी सिद्धता असणाऱ्या साबिराने आपला इरादा बदलून सहअभिनेत्री म्हणून १९४२ साली ‘गवांदी’(‘गवांदी’चा अर्थ शेजारी असा होतो.) या पंजाबी चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. अभिनेता श्यामचासुद्धा हा पहिलाच चित्रपट होता. इनायत अली ‘नाथ’ त्या वेळी दिल्लीच्या एच.एम.व्ही.त संगीतकार होते.
‘गवांदी’ रीलीज होऊन काही काळ उलटल्यानंतर ‘नाथ’ कुटुंबीय लाहोरला स्थलांतरित झाले. तेथे रूप के. शोरींनी साबिराला त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. शोरींकडे चच्रेसाठी आलेल्या संगीतकार गुलाम हैदर यांनी पडद्यासाठी तिला ‘आशा पोसले’ हे नाव सुचविले. १९४५ साली ‘चंपा’ नामक चित्रपटातून तिने या नावानेच िहदी सिनेमात पदार्पण केलं. मनोरमा ‘चंपा’ची नायिका होती. शोरींच्याच ‘बदनामी’ (१९४६) या चित्रपटात आशा पोसलेने प्राण व गीता बालीबरोबर काम केलं होतं. गीता बालीचा हा पहिलाच चित्रपट होता. शिवाय ‘पराये बस में’ (१९४६), ‘आरसी’, ‘इक रोज़्ा’(१९४७), ‘बरसात की इक रात’ व ‘रूपरेखा’ (१९४८) या िहदी चित्रपटातून तिने विविधरंगी भूमिका साकारल्या.. पुढे पाकिस्तानात ‘तेरी याद’ (१९४८) पासून सुरू केलेला कलाप्रवास, चित्रपट व रंगभूमीची नायिका, सहनायिका आणि खलनायिका अशी वळणे घेत ‘इन्साफ’ (१९८६) या चित्रपटापाशी येऊन थांबला. काही काळ दूरदर्शनवर तिने गायनाचे कार्यक्रमही केले. साबिराची संपूर्ण कारकीर्द आशा पोसले या नावानेच गाजली. गणपतराव भोसलेंबरोबर आशाजींचं (म्हणजे पूर्वाश्रमीच्या आशा मंगेशकर यांचं) लग्न १९४८ साली झालं होतं. त्याच्याही तीन वष्रे आधीपासून साबिराने हे नाव धारण केलेलं असल्याने यात कसलाही खोडसाळपणा नसल्याचं स्पष्ट होतं.
सुरेल कंठाची देणगी लाभलेल्या कौसर परवीनचा जन्म १९३३ साली अखंड भारतातील पंजाब प्रांतात पतियाळा येथे झाला. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी म्हणजेच १९४५ साली ‘चंपा’ या सिनेमात बहिणीबरोबर बालतारका म्हणून तिने काम केले होते. तद्नंतर यथावकाश कौसरने वडलांकडून शास्त्रोक्त पद्धतीने गाण्याची शिस्तबद्ध तालीम घेत १९५३ साली चित्रपटक्षेत्रातील गायनक्षेत्राकडे आपला मोहरा वळविला. पाकिस्तानातले मातब्बर संगीतकार मास्टर इनायत हुसन यांच्या (कौसरचे वडील इनायत अली यांची कृपया मास्टर इनायत हुसन या नावाशी गल्लत करू नये.) संगीत दिग्दर्शनाखाली सुरू केलेली तिची गानकारकीर्द पाकिस्तानी चित्रपट ‘आगोश’ (१९५३ सं. मा. इनायत हुसन) पासून सुरू झाली. ‘गुमनाम’ (१९५४) पासून तिनं धूम मचवली. त्यानंतर ‘सस्सी’, ‘परवाज़्ा’, ‘इंतक़ाम’, ‘जलन’, ‘नौकर’ ‘क़ातिल’, ‘झील किनारे’, ‘नज़्ाराना’, ‘तुफान’, ‘छोटी बेग़म’, ‘हक़िक़त’, ‘कंवारी बेवा’, ‘पवन’, ‘किस्मत’, ‘साबिरा’, ‘दाता’, ‘निग़ार’,‘पासबान’, ‘शोहरत’, ‘सात लाख़’, ‘वादा’, ‘आसपास’, ‘दरबार’, ‘हसरत’, ‘नया ज़्ामाना’, ‘तौहीद’, ‘वाह रे ज़्ामाने’, ‘नई लडकी’, ‘ज़्ाहरे-इश्क़’, ‘नागीन’, ‘हमीदा’, ‘अयाज़्ा’, ‘सहेली’, ‘एक थी माँ’ व ‘इशरत’ या चित्रपटांसाठी तिने नामवंत संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली पाश्र्वगायन केले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गज़्ालगायक व पाकिस्तानी चित्रपटक्षेत्रातील आघाडीचे पाश्र्वगायक मेहदी हसन यांनी ‘कंवारी बेवा’(१९५६) या चित्रपटातून पाश्र्वगायक म्हणून पदार्पण केले. मेहदीजींची ‘कंवारी बेवा’त तीन द्वंद्वगीतं होती व तिन्ही युगूलगीते त्यांनी कौसर परवीनबरोबरच गायली होती. मेहदीजींनी कौसरबरोबर गायलेलं ‘आँखों में चले आओ हम दिल में छुपा लेंगे’ हे युगूलगीत त्या काळात खूपच गाजलं होतं. आजही ते आवर्जून ऐकलं जातं. याशिवाय ‘कोई सूरत नही ऐ दिल कि ग़म की रात ढल जाये’ व ‘तुम मिले ज़िंदगी मुस्कुराने लगी, गुनगुनाने लगी, गीत गाने लगी.’ ही सुमधुर गाणी मेहदीजींनी कौसरबरोबर गायली होती. या चित्रपटाला संगीतकार क़दिर गफरिदी यांचं संगीतदिग्दर्शन लाभलं होतं.
यूटय़ुबवर Aasifali Pathan यांच्या अकाऊंटवर जाऊन कौसर परवीन यांची गाणी ऐकता येतील. किंवा https://www.youtube.com/watch?v=WstipSAEkIM या लिंकवरही त्यांची गाणी ऐकता येतील.
उर्दूतून तब्बल ३५ पेक्षा जास्त व काही मोजक्या पंजाबी चित्रपटांतून कौसर परवीनने शेकडो यादगार गाणी गायली. माधुर्याने ओथंबलेला, अल्लड, लडिवाळ स्वर लाभलेल्या या गुणी गायिकेला अख़्तर हुसन ‘अंखियन’सारखा संगीतकार पती म्हणून लाभला. त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘आसपास’ (१९५७) या चित्रपटात तिने गायलेला ‘मेरी नज़्ारोमें कोई समाने लगा’ हा मुजरा परवीन कौसरच्या सदाबहार व अजरामर गीतांमध्ये गणला जातो. कायम हसतमुख असणाऱ्या या कोकीळकंठी गायिकेला दुर्दैवाने जेमतेम तीस-पस्तीस वर्षांचंच अल्पायुष्य लाभलं. साहजिकच तिच्या गाण्यांची संख्या इतर गायिकांच्या तुलनेत कमी भरते. कौसरने पाकिस्तानातल्या विविध दिग्गज संगीतकारांकडे संस्मरणीय गाणी गायली. ‘गुमनाम’मधलं तिचं ‘ऐ चांद उनसे कहना’, व ‘छम छमा छम नाच उठा’, ‘ क़ातिल’मधलं ‘ ओ मना, जाने क्या हो गया’, ‘सात लाख’ सिनेमातील ‘सितमगर मुझे बेवफा जानता है’ व ‘ये तिरछी नज़्ार ये पतली क़मर’, ‘हमीदा’मधील ‘हर क़दम पर सितम हर घडी ग़म पे ग़म’, ‘जहरे-इश्क़’चं सदाबहार गाणं ‘पल पल झुमूं झूमके गाऊं’, तसेच ‘वादा’ या चित्रपटात शराफत अलीबरोबर गायलेलं ‘बार बार बरसे मोरे नन, मोहे कैसे मिले चन’ यासारख्या गाण्यांवर तिने आपल्या मधाळ स्वरांची मोहोर उमटविली. ‘नौकर’ या सुपरहिट चित्रपटातलं ‘राजदुलारे तोहे दिल में बसा लूं’ हे कौसर परवीनचं सर्वाधिक गाजलेलं अंगाईगीत. या गाण्याने पाकिस्तानात लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित तर केलाच, पण भारतातल्या कानसेनांनासुद्धा भुरळ घातली. तिच्या आवाजाची मोहिनीच अशी होती की, साठच्या दशकात आपल्या मुलींचं नाव कौसर परवीन ठेवण्याची टूमच निघाली होती.
‘नौकर’ (१९५५) या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सद अताऊल्लाह हाश्मी ऊर्फ के. कुमार.! (पाकिस्तानसारख्या धर्माधिष्ठित इस्लामी राष्ट्रातील सिनेकलावंतांची िहदू नावे या लेखमालेत आपल्याला पदोपदी चकित करतील.) रागिनी सहनायिका तर स्वर्णलता चित्रपटाची नायिका होती.. भारतात शीख परिवारात जन्मलेली स्वर्णलता, ‘इशारा’ (१९४३) त पृथ्वीराज कपूर यांची, ‘रतन’मध्ये करन दीवानची, तर ‘प्रतिमा’ (१९४५) मध्ये दिलीपकुमारची नायिका होती. ‘लला मजनू’ ( १९४५) चित्रपटाचे दिग्दर्शक व नायक नजीर अहमद होते. १९४३ साली नजीरसाहेब ‘इशारा’च्या सेटवर स्वर्णलताला पाहून तिच्यावर जीव जडवून बसले होते. ‘लला-मजनू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि १९४७ साली देश स्वतंत्र होण्यापूर्वीच लग्न करून दोघंही आपआपलं वैयक्तिक स्वातंत्र्य गमावून बसले. फाळणीनंतर हे दाम्पत्य लाहोरमध्ये स्थलांतरित झाले.
आशा पोसले या नावामागे खोडसाळपणा नव्हता; तथापि ‘नौकर’ या चित्रपटाची गाणी करताना मात्र ज्याला खरोखरीच ‘खोडसाळपणा’ म्हणता येईल असा प्रकार घडला. जी. ए. ऊर्फ गुलाम अहमद चिश्ती हे ‘नौकर’चे संगीतकार होते. चित्रपट क्षेत्रात ते बाबा चिश्ती किंवा ‘बाबाजी’ या टोपण नावानेही परिचित होते. अत्यंत प्रतिभावान संगीतकार अशी त्यांची ओळख होती. पाकिस्तानातला ‘फेरे’ हा पहिलावहिला पंजाबी चित्रपट बाबा चिश्तींच्याच संगीतामुळेच रौप्य महोत्सवाचा मानकरी ठरला होता. या बुजुर्ग संगीतकाराने ‘नौकर’चे अंगाईगीत कंपोज करताना भारतातल्या एका िहदी सिनेमातील अंगाईगीताची ‘तज़्र्ा’ जशीच्या तशी उचलायची असं ठरविलं. हे गाणं साहिर लुधियानवीसारख्या मातब्बर गीतकाराने लिहिलं होतं. त्यात ‘राजदुलारे’ व ‘अंखियोंके तारे’ असे नितांतसुंदर शब्द हेते. हे गाणं कतील शिफाईंसमोर टाकीत बाबाजींनी फर्मावलं. ‘‘कतीलसाहब, आप सिर्फ अल्गफाजोंमें हेरफेर करके गाना मुकम्मल किजिए. लेकिन ‘राजदुलारे’ को ‘हाइलाईट’ करते हुए उसे बरकरार रखिए. या तो फिर यूं किजिए ‘राजदुलारे’ से ही गाने को शुरु किजिए.’’ क़तील शिफाई अवाक् होऊन चिश्तींकडे पाहातच राहिले. त्यांनी व इतरांनी त्यांना परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु ‘आले बाबाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना’ अशी अवस्था झाल्याने सर्वानी त्यांच्यासमोर गुडघे टेकले.
क़तील शिफाईंसारख्या प्रतिभाशाली शायरचं मन अशा प्रकारची ‘उचलेगिरी’ करायला धजेना. बाबा चिश्ती त्यांना म्हणाले ‘‘जहां तक मेरा सवाल है सिवाय ऑर्केस्ट्रेशन के तरन्नुममें कुछ भी बदलने के ‘मूड’ में म नही हूं. धून को जैसा के वैसा छाप दूंगा. बस्! आपको तो म फिर भी अल्फाज़्ाोंको बदलने की छूट दे रहा हूं.’’ कतीलसाहेबांनी साहिरच्या ‘त्या’ं गाण्याचं ‘मीटर’ आणि ‘बहर’ (वृत्त किंवा छंद) विचारात घेऊन आपल्या शैलीत हे अंगाईगीत लिहिलं. काहीसे नाराज होऊनच तिथून कतील शिफाई निघून गेले. पण जाता जाता गाण्यात ‘ग्यानबाची मेख’ मारायला मात्र ते विसरले नाहीत. साहिरच्या ‘राजदुलारे’ या शब्दाइतकीच ‘म तो वारी वारी जाऊं’ ही कमालीची आकर्षक व समर्पक शब्दरचना त्यांनी मुखडय़ाच्या दुसऱ्या ओळीत पेरली. ‘राजदुलारे’ व ‘अंखियों के तारे’ या शब्दांचा अपवाद वगळता संपूर्ण गाणं त्यांनी त्याच ‘मीटर’मध्ये नव्यानं लिहून काढलं. चिश्तीसाहेबांनी ढोलकचा आकर्षक ठेका व ऑर्केस्टेशनमध्ये थोडेफार बदल करून गाण्याचा ‘स्कोअर’ लिहून काढला.
आशा पोसले हिचे अष्टपलू गायिका आशा भोसले यांच्या नावाशी असणारे साधम्र्य चाहत्यांना बुचकळ्यात टाकतं.
स्वर्णलतावर चित्रित झालेलं हे गाणं मुनव्वर सुलतानाच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. गाण्याची ध्वनिमुद्रिका मात्र कौसर परवीनच्याच आवाजात निघाली. या गाण्याला कौसर परवीनने जादूई परिमाण बहाल करीत वेगळ्याच उंचीवर नेलं. घराघरात हे अंगाईगीत दुमदुमू लागलं. अल्पावधीतच कौसर रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. गाण्याची सुरुवात जरी ‘राजदुलारे’ अशी असली तरी ऐकणारा ‘म तो वारी वारी जाऊं’ (‘अला-बला’च्या आविर्भावात कानशिलावर बोटं मोडीत ‘स्वत:ला तुझ्यावरून ओवाळून टाकते आहे’, असं दर्शविण्याची स्त्रियांची प्रथा.) कडे नकळत खेचला जातो. गाण्याचे बोल लक्षपूर्वक पाहा. जमल्यास ‘यू टय़ूब’वर हे गाणं कौसर परवीन व मुनव्वर सुलताना दोघींच्या आवाजात अवश्य ऐका..
राजदुलारेऽऽ,
राजदुलारे तोहे दिलमें बसाऊं तोहे गीत सुनाऊं
गीत सुनाऊं,
ओऽ मेरी अंखियोंके तारे
म तो वारी वारी जाऊं
राजदुलारेऽऽ
सारे जहानपर फैली है चांदनी,
तेरे मुखडे के आगे मली है चांदनी
तारोंका रुप तो पहले ही मांद है,
चंदा को म क्या जानूं तू मेरा चांद है
झूम के गाऊं,
ओऽ मेरी अंखियोंके तारे
म तो वारी वारी जाऊं
दुसऱ्याच्या चालीवर राजेरोस ‘डल्ला’ मारणे संगीतकाराच्या प्रतिष्ठेला बाधक व एकूणच त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने कमीपणाचं मानलं जाईं. त्यात सांगून सवरून उघडउघड एखाद्याची चाल ढापण्याचा विक्षिप्त प्रकार तर भारत-पाक सिनेइंडस्ट्रीला नवाच होता. बाबाजींना त्याची ना खंत फिकीर. ते आपल्याच विश्वात मग्न होते. ‘‘होय मी ‘उचलेगिरी’ केलीय. हे सांगताना आपल्याला त्याचा खेद वाटत नाही.’’ असा त्यांचा पवित्रा होता. पाकिस्तानातल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ संगीतकाराने असलं ‘खोडसाळ कृत्य’ करण्यामागचा हेतू काय होता? ज्या चित्रपटाची चाल उचलली तो िहदी सिनेमा कुठला? त्याचा संगीतकार कोण? मूळ अंगाईगीत भारतात कुणी गायलं होतं? साहिरने लिहिलेल्या त्या लाजवाब गीताचे बोल काय होते? आणि सर्वात महत्त्वाचं; या उपद्व्यापामागचं प्रयोजन किंवा नेमकी पाश्र्वभूमी काय होती? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तसेच संगीतकार जी. ए. चिश्ती यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा लेखाजोखा पंधरा दिवसांनी याच सदरात..तोपर्यंत अलविदा!!