एका जागी बसतील, ती मुलं कुठली? पण घरची मंडळी मात्र हे मान्य करायला जराही तयार नाहीत. हे असं, नेहमीच होतं. मोठय़ांना वाटतं की, लहानांनी शहाण्यासारखं बसावं, शांत असावं. आणि लहानांना वाटत असतं की, त्यांनी सतत काही तरी नवनवीन प्रयोग करत राहावं, काही नवीन समजून घ्यावं. शिवाय एखादी गोष्ट करून पाहिली की, ती लक्षात राहते. मनात पक्की होते, असं तर बालमानसशास्त्र पण सांगतं. पण मुलांचं ऐकतंय कोण?
म्हणूनच तर ‘लोकप्रभा’ने मुलांचं ऐकण्याचा निर्णय घेतला. मुलांना आवडतात त्या अ‍ॅक्टिव्हिटीज, नवीन प्रयोग. मुळात आपण प्रत्येक माणसाला व्यक्ती असं म्हणतो. त्याच कारणंच मुळी माणूस आणि प्राणी यातील भेद स्पष्ट करणारा आहे. प्राणीही स्वतला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. पण माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो स्वतला नेमकेपणाने व्यक्त करण्याची क्षमता राखतो. म्हणूनच तर त्याला नेमका व्यक्त होणारा म्हणून व्यक्ती म्हणतात आणि प्राण्यांना प्राणी. पण होते काय की, अनेकदा घरातली वडीलधारी मंडळी नेमके हेच विसरतात. म्हणून तर बालसंगोपनशास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. लता काटदरेआजींशी आम्ही सर्वानी संवाद साधला आणि मग ठरलं, आता मुलांचं ऐकायचं, त्यांना व्यक्त होण्याची संधी द्यायची.
यावेळचा हा सुट्टी विशेषांक पाहिलात तर सहज लक्षात येईल की, पहिल्या पानावरचे विख्यात चित्रकार वासुदेव कामतयांचे चित्र असो किंवा मग सॅमदादाचा फोटो. अगदी पहिल्या पानापासून सुरू झाली आहे एक अ‍ॅक्टिव्हिटी. तुमच्या विचारांना चालना देणारी! आता तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे चित्र, फोटो आणि गोष्टींवर. तुमचे विचार तुम्हाला ‘लोकप्रभा’ला लिहून कळवायचे आहेत. त्यातले निवडक विचार तर आम्ही तुमच्या नावासह प्रसिद्धही करणार आहोत. सोबत तुमच्या शाळेचे नाव आणि ठिकाण कळवायलाही विसरू नका. कारण जूनमध्ये शाळा सुरू होईल तेव्हा तुमचे नाव आणि विचार प्रसिद्ध झालेला लोकप्रभाचा अंक बाजारात आलेलाही असेल आणि तुम्हाला असेल संधी पहिल्याच दिवशी कॉलर ताठ करत शाळेत प्रवेश करण्याची! मग आहात ना तयार?
ऑल द बेस्ट, तुम्हाला व्यक्त होण्यासाठी!