एअर व्हाइस मार्शल मनमोहन बहादूर (निवृत्त) – response.lokprabha@expressindia.com

भारत-चीन सीमेवर उद्भवलेल्या संघर्षांचे निराकरण सध्या तरी दृष्टिपथात नाही. परिणामी संपूर्ण हिवाळ्यात सीमेवर अधिक प्रमाणात सैन्य तैनात ठेवण्याची तयारी भारतीय लष्कराने सुरू केली आहे. या तैनात तुकडय़ांना आवश्यक रसद पुरवण्यात हवाई दलाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. या अतिदुर्गम प्रदेशात आणि कडाक्याच्या थंडीत त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील सैन्याच्या गरजा भागवण्यासाठी भारतीय हवाई दल सक्षम आहे का?

सक्षमपणे रसद वितरण करण्यासाठी रस्ते वाहतुकीच्या सुविधा हा महत्त्वाचा भाग ठरतो. त्याची तयारी हिवाळा सुरू होऊन परिसरातील घाटरस्ते बंद होण्यापूर्वीच केली जाते. त्यासाठी हवाई दल तातडीची मोहीम हाती घेते. सी-१७ ग्लोबमास्टर, आयआय-७६ आणि एएन- ३२ चा समावेश असलेले उत्तम वाहनपथक तयार केले जाते. १३० सुपर हक्र्युलस वाहने केवळ विशेष मोहिमांसाठीच असतात, पण गरज पडल्यास रसद वितरणासाठीही त्यांचा वापर केला जातो.

आघाडय़ांवर जाण्यासाठी आपल्याकडे एमआय- १७ आणि चीतल लाइट हेलिकॉप्टरसुद्धा आहेत. वजनदार साहित्याची ने-आण करण्यासाठी चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर्सही वापरली जाण्याची शक्यता आहे.

लेह किंवा पूर्व लडाखमधील आघाडय़ांवर हेलिकॉप्टर किंवा विमान उतरवताना तिथल्या दुर्गम भूभागामुळे कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

लेह आणि थॉइसची समुद्रसपाटीपासूनची उंची हे सर्वात मोठे आव्हान आहे. पण गेल्या कित्येक दशकांपासून आपण तिथे ये-जा करत असल्यामुळे वैमानिकांना त्या प्रदेशाच्या वैशिष्टय़ांची उत्तम जाण आहे.

उंचीवरील धावपट्टय़ांची स्वतची अशी वेगळी आव्हाने असतात. तिथे विमाने आणि चॉपर्सची वजन वाहून नेण्याची क्षमता घटते. शिवाय वैमानिकाला डोंगर-दऱ्यांतून कौशल्याने विमान उडवत अतिशय लहान आकाराच्या धावपट्टय़ांवर ते उतरवावे लागते. या डोंगरांवर मोठय़ा धावपट्टय़ा तयार करण्यासाठी पुरेशी जागाच नसते.

हिवाळ्यामुळे आणखी कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?

हिवाळ्यात पश्चिमेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांचा परिणाम उत्तरेकडील राज्यांत जाणवतो. लडाखमधील हवामान हिवाळ्यात आधीच अतिशय बिघडलेले असते. त्यात या वाऱ्यांची भर पडून दृश्यमानता कमी होणे, ढग अतिशय खाली येणे अशा समस्या उद्भवतात. अशा प्रतिकूल हवामानातून मार्ग काढताना वैमानिकांची कौशल्ये पणाला लागतात. दरवेळी विमान उतरवणे शक्य होईलच, असे नाही. विमान वाहतूक थांबवावी लागण्याची वेळ अनेकदा येते.

अतिथंड हवामानाचा वजन वाहून नेण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो?

जेवढे कमी तापमान, तेवढी वजन वाहून नेण्याची क्षमता अधिक. कारण हवेची घनता जेवढी अधिक तेवढी या उडणाऱ्या यंत्रांची सामान वाहून नेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात अधिक वजन वाहून नेता येते.

हा सर्वात मोठा फायदा आहे. उदारणार्थ – एखादे आयआय- ७६ जे उन्हाळ्यात जेमतेम काही वजन वाहून नेऊ शकते, तेच हिवाळ्यात तब्बल २० टन वजन पोहोचवण्यास सक्षम ठरते. हेलिकॉप्टर्सचेही तेच. १७ ते २० हजार फुट उंचीवर वजन वाहून नेण्याची त्यांची क्षमता हिवाळ्यात लक्षणीय प्रमाणात वाढते आणि उन्हाळ्यात अतिशय कमी होते.

उंची आणि भूभागाचा परिणाम विमानाला दिशा दाखवण्याची आणि रात्रीच्या वेळी उड्डाणाची क्षमता यांवर होतो का?

सध्या उपलब्ध असलेली आधुनिक दिशादर्शक उपकरणे आणि तंत्रे यामुळे बरीच आव्हाने सोपी झाली आहेत. पण केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे मोहीम फत्ते होणे नव्हे. विमान सुरक्षितरीत्या उतरवावे लागते. इथेच तापमान, हवामान आणि उंची हे सर्व निकष महत्त्वाचे ठरतात. दिशा दाखवणे ही समस्या राहिलेली नाही, पण विमान उड्डाण आणि उतरवणे ही कौशल्याची कामे आहेत.

रात्रीच्या प्रवासाचा विचार करता, त्याची वेगळी आव्हाने आहेत. डोंगरांच्या सावल्या पडलेल्या असतात, चंद्राच्या कला आणि त्याचे स्थान याचाही मोठा परिणाम होतो. पौर्णिमा आणि अमावास्येच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. डोंगराळ भागात रात्रीच्या मोहिमांसाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.

लडाखमधील हवाई क्षेत्रांत केवळ ठरावीक विमानांनाच उड्डाणाची परवानगी असते की सर्व विमाने त्या भागांत उड्डाण करू शकतात?

सैन्याची रसद वाहून नेणारी सर्व विमाने या हवाई क्षेत्रांतून प्रवास करू शकतात, फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांसाठी आवश्यक हवामान वेगवेगळे आहे. त्या विमानात असलेली दिशादर्शक उपकरणे आणि वैमानिकाची कौशल्ये यावर ते बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे मोहिमेच्या स्वरूपानुसार वैमानिकांना सूचना दिल्या जातात.

युद्ध सुरू असताना दुरुस्ती आणि देखभालीसाठी शस्त्रास्त्रांची ने-आण करावी लागू शकते. आपल्याकडे उपलब्ध असलेली विमाने, अशा स्वरूपाची सेवा देण्यासाठी सक्षम आहेत का?

आघाडीवरील हवाई क्षेत्रांतून शस्त्रास्त्रं परत आणण्यात कोणतेही अडथळे नाहीत. पण अशा वेळी जवान, जखमी आणि एव्हिऑनिक्ससारखी महत्त्वाची उपकरणे यांपैकी कशाची ने-आण करणे महत्त्वाचे आहे, याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.

अशा स्वरूपाच्या मोहिमांत इंधन, दुरुस्ती इत्यादी कामांसाठी हवाई दलाला कोणत्या स्वरूपाच्या मदतीची गरज पडू शकते?

सर्व हवाई क्षेत्रांत इंधन, तेल आणि वंगणाचा पुरेसा साठा उपलब्ध असतो. त्यासाठी सतत अतिशय तंतोतंत नियोजन सुरू असते. त्याचा अभ्यास आणि तरतूद करण्यासाठी अतिशय सुसज्ज व्यवस्था गेल्या सहा-सात दशकांपासून निर्माण करण्यात आली आहे. आघाडीवरील हवाई क्षेत्रांत जमिनीवर योग्य ठिकाणी पुरेसा इंधन साठा उपलब्ध ठेवण्यात आर्मी सव्‍‌र्हिस कॉर्प्स महत्त्वाची भूमिका बजावतात. ते एव्हिएशन टर्बाइन फ्यूएलचे बॅरल्स आधीच तिथे ठेवतात.

जेव्हा जमिनीवरच समोरासमोरचे युद्ध सुरू असते, तेव्हा विमानाला काय धोका निर्माण होऊ शकतो?

शत्रुपक्षाची विमाने नक्कीच हल्ला करू शकतात, पण अशा स्वरूपाच्या धोक्यांचा समाना करण्यासाठी एक निश्चित कार्यपद्धती अस्तित्वात आहे. दौलतबेग ओल्डीसारख्या भागांत विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळून जातात. त्यामुळे अशा ठिकाणी जमिनीवरून किंवा हवेतून होणाऱ्या हल्ल्याला कसे उत्तर द्यावे, याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिलेले असते.

लढाऊ विमानांना काही खास आव्हानांचा सामना करावा लागतो का?

एवढय़ा उंचीवर लढाऊ विमानांना काही खास आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांचा प्रचंड वेग, हवेची घनता, अतिशय जवळ असणारे पर्वत आणि बंकर किंवा मर्यादित जवानांच्या तुकडय़ा अशी छोटी लक्ष्ये इत्यादींचा विचार करता, लढाऊ विमानांचे काम निश्चितच कठीण असते.

अशा लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी काही विशिष्ट शस्त्रे आणि कौशल्यपूर्ण वैमानिकाची गरज असते. कारगिल युद्धाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे आणि आजच्या लढाऊ वैमानिकांना तो अनुभव नक्कीच फायदेशीर ठरेल, याची मला खात्री आहे.

राफेल कितपत फायदेशीर ठरेल?

राफेलची उड्डाण आणि शस्त्र डागण्यासंदर्भात काही खास वैशिष्टय़े आहेत. पण आजच्या काळातील युद्ध हे दोन यंत्रणांमधील आणि दोन विमानांमधील आहे, हे विसरून चालणार नाही. वॉर्निग अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसारख्या यंत्रणांसाठी राफेल सक्षम असू शकते. आजच्या काळात, स्वतंत्र लढय़ासाठीची यंत्रणाही संपूर्ण युद्ध रणनीतीएवढीच उत्तम असते.