विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

खरे तर नववर्षांला सुरुवात होण्याआधीच पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांचा डंका वाजण्यास सुरुवात झाली होती. त्याचे रणशिंग गेल्या वर्षअखेरीस अमित शहा यांनी कालिमाता मंदिरातच फुंकले. सध्या तरी देशभरात २४ तास कंबर कसून केवळ आणि केवळ राजकारण करणारा भाजपासारखा दुसरा पक्ष नाही. वर्षांचे ३६५ दिवस मोर्चेबांधणी करण्याचे त्यांचे नियोजन इतर पक्षांनी केवळ शिकण्यासारखे आहे. या मोर्चेबांधणीचे फळही त्यांना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने मिळताना दिसते आहे. एक एक करत राज्ये आणि स्थानिक महत्त्वाच्या महापालिका पादाक्रांत करत भाजपाचे मार्गक्रमण सुरू आहे. जिथे विरोध होतो त्या त्या ठिकाणी सामदामदंडभेद सारे काही वापरून विरोधकांना नामोहरम करण्याचे गेल्या काही वर्षांतील त्यांचे कौशल्यही वादातीत आहे. ईडीची पीडा तर अनेकांना भोवताना दिसते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाला कडवे आव्हान देणारे नेतृत्व म्हणजे ममता बॅनर्जी. सध्या तरी राष्ट्रीय राजकारणात त्यांच्याइतका कडवा भाजपाविरोधक दिसत नाही. त्यामुळे भाजपाही ममतांच्या मागे हात धुऊन लागलेली दिसते आहेत. नंदिग्रामचे मोहोळ उठवणारे सुवेंदू अधिकारीच आपल्या गळाला लावून भाजपाने ममतांना आव्हान दिले आहे. रोज तृणमूलचे अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर सत्ताधीशांविरोधातील असंतोष ममतांना भोवणार असे म्हणत भाजपाने त्यांच्याविरोधात रान पेटवले आहे. हाळी देणे तर सातत्याने सुरूच आहे. परिणामी बंगालमधील वातावरण तापले असून भाजपाच्या या मानसशास्त्रीय दबावाला एरवीसारखे यश येणार का, या प्रश्नाची आता गांभीर्याने चर्चा होऊ लागली आहे, हे भाजपाने केलेल्या रणनीतीचे यश आहे. पण या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती काय सांगते हे पाहणे रोचक ठरावे. त्यासाठी गेल्या दहा वर्षांतील सर्वच स्पर्धकांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घ्यावा लागेल.

सलग तीस वर्षे सत्तेत असलेल्या डाव्यांना सत्ताच्यूत करण्याचे श्रेय ममतांच्या नावावर जमा असून ती त्यांची ऐतिहासिक अशीच कामगिरी आहे. रस्त्यावरच्या लढवय्या राजकीय नेत्या हा त्यांचा परिचय आहे. राजकीय कार्यकत्यांची एक मोठी फळीच त्यांनी गावपातळीपर्यंत उभी केली आहे. त्यांचे सारे यश त्यावर पेललेले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपाला मते मिळतात तशीच ती तृणमूललाही ममतांच्या नावावर मिळतात.

२०११ च्या विधानसभा निवडणुकांपासून ते २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंतचा (खासकरून गेल्या चार वर्षांमधील) भाजपाचा प्रवास अधिक लक्षणीय आहे. मतटक्क्यांमध्ये ४.०६ वरून त्यांनी थेट ४० टक्क्यांपर्यंत अविश्वसनीय अशी मजल मारली आहे. या काळात काँग्रेसच्या बंगालमधील यशाला तर ओहोटीच लागली असून आता त्यांचे यश सहा टक्क्यांच्या आसपास आहे. डाव्यांची तर बातच सोडा. डाव्यांचे बहुतांश मतदार भाजपाकडे वळले असे आकडेवारीवरून दिसते आहे. या संपूर्ण काळात ममता सरासरी ४४ टक्के मते राखून आहेत. आता त्यांची चिंता आहे ती म्हणजे भाजपा व त्यांच्यामध्ये केवळ पाच-सहा टक्क्यांचेच अंतर आहे. याची सध्या तरी असे दिसते आहे की, काँग्रेस आणि डावे ही आघाडी ममतांच्या मदतीला धावून येईल आणि हिंदूू मतांच्या ध्रुवीकरणाच्या भाजपाच्या प्रयत्नांना सत्तेपर्यंत पोहोचवणारे यश मिळणार नाही. त्यामुळे ममतांचे निभावून जाईल, पण भाजपाच्या जिंकलेल्या जागांच्या संख्येमध्ये या खेपेस लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. असे असले तरी भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा लायक चेहरा नसणे हा भाग ममतांच्या पथ्यावर पडेल असे दिसते आहे. त्यामुळे सत्ता-मत्ता असली तरी भाजपाला चेहऱ्याची अडचण भेडसावत असून तीच त्यांना सत्तेपासून रोखेल असे वास्तवचित्र सध्या दिसते आहे!

@vinayakparab

vinayak.parab@expressindia.com