07 March 2021

News Flash

स्मरण : थिएटर ऑफ रिलेव्हन्स नेतृत्वनिर्माणाची भूमी!

नेते आकाशातून पडत नाहीत आणि कुठल्या कारखान्यात तयार होत नाहीत. ते जमिनीतून अंकुरतात. संस्कार, संवेदना, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादांमध्ये त्यांचे संगोपन होते.

महात्मा गांधी

धनंजय कुमार – response.lokprabha@expressindia.com

नेते आकाशातून पडत नाहीत आणि कुठल्या कारखान्यात तयार होत नाहीत. ते जमिनीतून अंकुरतात. संस्कार, संवेदना, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादांमध्ये त्यांचे संगोपन होते. ते शोषण-अन्याय पाहून उद्विग्न होतात. ते स्वत:ला सामाजिक प्रयोगशाळेत घडवतात आणि मग इतरांसाठी  सुगम मार्ग शोधतात. जोपर्यंत कमकुवत व्यक्तींचे दु:ख तुम्हाला दु:खी करत नाहीत, अस्वस्थ करत नाही, तोपर्यंत तुम्ही नेता होऊ शकत नाही. गांधीजींचा नेता होण्याचा प्रवास पाहिला, तर खूप काही स्पष्ट होते. गांधीजी लहानपणी सामान्य मुलांप्रमाणेच होते, ते खोटेही बोलायचे आणि जिथे अस्वस्थ/ असहज वाटायचे, तिथून सुटका करून घेण्यासाठी मार्ग शोधायचे. त्याच क्रमाने, मुंबईतील न्यायालयात महिनोन्महिने ये-जा करूनही ते खटला लढवण्यासाठी धैर्य मिळवू शकले नाहीत. खरे बोलण्याचा संकल्प त्यांच्या मार्गात आडवा येत असावा. दक्षिण आफ्रिकेला जाण्याची गोष्ट आली तेव्हा वकिली करण्यातील अडचणींमुळे गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा पर्याय स्वीकारला. आपल्या आईकडून मिळालेली शिकवण बरोबर घेऊन गेले आणि त्याचे पालन होईल याचा पूर्ण प्रयत्न केला. मग ती मांसाहार न करण्याची गोष्ट असो किंवा आपल्या कौटुंबिक संस्कारांचे पालन करण्याची गोष्ट असो.. स्वत: बदलण्याऐवजी गांधीजींनी पारंपरिक मार्ग शोधला. गुजराती समाजाशी जोडले गेले. परंतु तिथे नियमाविरुद्ध घडते आहे, अन्यायकारक घडते आहे, असे पाहिले तेव्हा तेव्हा तिथे विरोध केला. माणसामाणसांतील भेदभाव पाहिला, ब्रिटिश भारतीयांसोबत अत्यंत अमानुषपणे वागतात, अमानवी व्यवहार करतात हे पाहिले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यांचे हृदय पिळवटून निघाले आणि विरोधासह सेवेचा मार्ग त्यांनी स्वीकारला. सेवा आणि विरोधासोबत ते सत्य, निष्ठा आणि अहिंसा या तत्त्वांवर ठाम होते. ब्रिटिशांनी त्यांचा अपमान केला, त्यांना मारहाण केली, परंतु गांधीजींनी सत्य, अहिंसा, प्रतिकार आणि सेवा यांचा मार्ग सोडला नाही. आणि या निष्ठेने गांधीजींना ‘महात्मा गांधी’ या मुक्कामापर्यंत नेले.

गांधीजींना मजबूत करण्याचे काम नरसी मेहता यांच्या ‘वैष्णव जन तो तेने कहिये जो पीर पराई जाणे रे’ या भजनाने केले. बालपणी पाहिलेल्या ‘सत्य हरिश्चंद्र’ या नाटकाने गांधींना घडवले. बॅरिस्टर पदवीच्या अभ्यासाने गांधींना बळकटी दिली. त्यांच्या संवेदनशीलतेने त्यांना मजबूत केले. ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या जिद्दीने त्यांना पुढे नेले. आणि हे करत असताना, ते अधीर होत नसत, उलट सतत मानवी प्रवृत्तीने वागत. त्याचा परिणाम असा व्हायचा की, अन्याय करणारे स्वत: बेचैन व्हायचे. अन्याय करणाऱ्यांवर रागवण्याऐवजी गांधीजी त्यांना आरसा दाखवत असत आणि हे अन्याय करणाऱ्यांना, जुलूम करणाऱ्यांना हेलावून टाकत. त्यांचे मतपपरिवर्तन करण्यात शेवटी गांधी सफल होत.

गांधी स्वत:चे गुण-अवगुण जाणत होते, अवगुणांवर विजय मिळविण्यासाठी सतत प्रयोग करीत होते. मनुष्यात अनेक त्रुटी असतात हे ते जाणत होते आणि त्या त्रुटींना जिंकून जगासमोर ते एक उदाहरण ठेवू इच्छित होते की, मनुष्य स्वत:च्या दोषांवर विजय मिळवू शकतो. हिंसा, द्वेष आणि चढाओढ या सगळ्यापासून वाचता येते आणि जगाला सुंदर बनवता येते. परंतु गांधीजींच्या हत्येने त्यांचे हे कार्य पूर्ण होऊ शकले नाही. ते माणसाला माणूस करण्याची कला जाणत होते. ही कला येते कुठून? रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात की, मनुष्याला मनुष्य बनवण्याची कला कलेत अंतर्निहित आहे. गांधीजींचे उदाहरण घ्या, त्यांच्या बालमनावर सत्य हरिश्चंद्र या नाटकाचा गहिरा प्रभाव पडला आणि त्यांनी नेहमी खरे (सत्य) बोलण्याचा वसा घेतला. या एका सवयीने त्यांना आयुष्य समजून घेण्याची गुरुकिल्ली मिळाली.

मंजुल भारद्वाज यांचा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये नेता होण्याचे गुण असतात, परंतु ते संगोपन करून वाढवण्याची आवश्यकता असते. स्पष्ट दृष्टी, स्पष्ट उद्दिष्टे आणि ध्येय गाठण्याची जिद्द व्यक्तीला नेतृत्व बहाल करते. गांधींची जिद्द ही केवळ ध्येय गाठण्यासाठीचा आग्रह नव्हता, त्यांना ते ध्येय चांगल्या मार्गाने साध्य करायचे होते. या जिद्दीने गांधीजींना नेता केले. अन्यथा राजाही ध्येय गाठतो, अगदी वाईट व्यक्तीदेखील ध्येय साध्य करते. दुसरे म्हणजे गांधीजींचे ध्येय साध्य करणे हा चमत्कार नव्हे तर तो एक वैज्ञानिक प्रयोग आहे. गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चाला, ध्येय कितीही दुर्मीळ असले तरीही ते साध्य होईल. मंजुल म्हणतात, सांस्कृतिक चेतनेशिवाय हे जागृत होऊ शकत नाही. गांधीजी हे आपल्या सांस्कृतिक चेतनेचे नायक आहेत आणि मी त्यांना पहिला गुरू मानतो. जगात अनेक क्रांती झाल्या, पण कोणतीही क्रांती माणसाला माणूस करू शकली नाही. प्रत्येक क्रांती सत्तेवर येऊन संपली आणि सत्ता पुन्हा ज्या व्यवस्थेविरुद्ध क्रांती घडली होती त्याच व्यवस्थेत बदलली.  साम्यवादी क्रांतीची तीच दशा का झाली? आज दोन्ही मोठे साम्यवादी देश अमेरिकेपेक्षा मोठे साम्राज्यवादी बनले आहेत. तर प्रश्न असा उद्भवतो की क्रांती कुठे आणि का भरकटते? क्रांतीचा मार्ग भरकटतो. कारण त्यात सत्य आणि निष्ठा नसते. क्रांतीत इतरांना व्यवहाराने जिंकून घेणे किंवा आपलेसे करण्याची क्षमता नाही. दुर्बल व्यक्तीची वेदना जाणणारे हृदय नसते. सत्ता बंदुकीच्या गोळीतून निघू शकते, परंतु मनुष्य कलेतून निर्माण होतो. सांस्कृतिक चेतनाच मनुष्याला मनुष्य बनवू शकते. आम्ही ज्या नाटय़सिद्धांताचे समर्थन करतो, तो थिएटर ऑफ रिलेव्हन्स हा नाटय़सिद्धांत सांस्कृतिक चेतनेचे दार उघडतो. माझ्यासाठी थिएटर हे केवळ करमणुकीसाठी केलेले कलेचे प्रदर्शन नाही तर कलेच्या माध्यमातून मनुष्यात सांस्कृतिक दीप प्रज्वलित करण्याचे थिएटर हे माध्यम आहे. म्हणूनच मी याला थिएटर ऑफ रिलेव्हन्स म्हटले. ते कलाकाराला केवळ विषयाशी जोडत नाही तर त्याच्या आत परिवर्तनाची गंगा प्रवाहित करते.

मंजुल म्हणतात की, जोपर्यंत माणसाचे जीवन बदलत नाही तोपर्यंत कला अपूर्ण आहे आणि मानवी जीवन बदलण्यात राजकारणाची महत्त्वाची भूमिका आहे, म्हणून माझा असा विश्वास आहे की, कला आणि राजकारणाचा गहन/ थेट संबंध आहे. गांधी राजकारणी नव्हते, ते एक संवेदनशील व्यक्ती होते, इतरांचे दु:ख त्यांना अस्वस्थ करायचे आणि ते त्या वेदनेपासून मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करायचे. ते मुक्तीच्या मार्गावर मार्गस्थ झाले, तेव्हा त्यांचा सत्ता आणि शोषण करणाऱ्या शक्तींशी सामना झाला. गांधींनी रंगमंचावर अभिनय केलेला नसला तरी ते जीवनरूपी रंगमंचावरील खूप मोठे अभिनेते होते. त्यांच्यामुळे इंग्रजांचेही अंत:करण बदलायचे. म्हणूनच जगाला गांधीजींसारख्या एक नाही अनेक नेत्यांची गरज आहे. गांधीजी म्हणजे संपूर्ण मानव जातीला मानवतेच्या दिशेने नेणारा नेता! आणि हे केवळ सांस्कृतिक क्रांतीद्वारेच शक्य आहे. ही मशाल हाती घेऊन ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ चालत आहे. गांधीजींचे स्वप्न हे बंद डोळ्यांनी पाहिलेले (निद्रेतील) स्वप्न नव्हते, तर उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न होते आणि ते साकार होणार हे निश्चित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 7:06 am

Web Title: mahatma gandhi smaran dd70
Next Stories
1 राशिभविष्य : २२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२१
2 जगातील सर्वांत जुने गुंफाचित्र इंडोनेशियात
3 लस हवीय पण पाणीपुरीतून!
Just Now!
X