मराठी सिनेमाचा आजचा सुपरस्टार कोण या प्रश्नावर सगळ्यांचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे मकरंद अनासपुरे.. ‘लोकप्रभा’च्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेते जितेंद्र जोशी यांनी या सुपरस्टारशी मारलेल्या दिलखुलास गप्पा-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 लहानपणीचा मकरंद कसा होता..?
माझा जन्म औरंगाबादचा पण शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. बाबा सहकार खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यामुळे बालवाडी ते पहिली पैठण, दुसरी-तिसरी माजलगाव, चौथीपासून बारावीपर्यंत बीडला आणि कॉलेजला औरंगाबाद. घरी एक मोठा भाऊ, एक मोठी बहीण. वडिलोपार्जित अडीच एकर कोरडवाहू शेती होती. बहिणीच्या लग्नाच्या वेळी बाबांनी ती विकली. लहानपणी मी खूप खोडकर होतो. एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी खूपच चालायच्या. पण घरच्यांना माहीत नसायचं, कारण मी कधी सांगायचोच नाही. स्पर्धामध्ये भाग घ्यायचो, बक्षीस मिळालं की मग घरी सांगायचो. सातत्याने व्यग्र असलेला मुलगा अशीच माझी प्रतिमा होती.
 नाटकांकडे केव्हा वळलास?
चौथीत असताना ‘आप्पासाहेब झिंदाबाद’ नाटक केलं होतं. कारकुनाची भूमिका होती. सिद्धेश्वर शाळेत कार्यक्रम होता. रंगीत तालीम होती. नाटक सुरू झालं. संपूर्ण नाटकात मी एका ठिकाणी खाली मान घालून उभा राहिलो. मी भयंकर घाबरलो होतो. माझं वाक्य आलं की खाली मान घालून बोलायचो, हावभाव नाही, जागेवरून तर हललोच नाही. रंगीत तालीम संपल्यावर गणिताचे कुलकर्णी मास्तर आत आले. जाड भिंगाचा चष्मा, हातात छडी असे ते टिपिकल मास्तर भयंकर संतापले होते. ‘‘खाली काय खिळे मारलेते का?’’ असे म्हणून त्यांनी मला ठपकन मारलं. त्याच वेळी नेमके वडील आत आले. मास्तरांनी वडिलांसमोर मारणं हा माझ्यासाठी अपमान होता. वडिलांनी घरी नेताना उसाचा रस पाजला, काम चांगलं होतं म्हणाले. मी मनात म्हटलं हे गंडवतायत आपल्याला. दुसऱ्या दिवशी ग्राऊंडवर प्रयोग होता. स्टेजबीज लावलेलं. कालचा अपमान लक्षात होताच. प्रयोग सुरू झाला. माझं वाक्य आलं की मी माईकजवळ जायचो, माईक खाली घ्यायचो आणि जोरात बोलायचो. तो एक मोठा विनोदच झाला. माझं वाक्य आलं की लाफ्टर यायला लागला. मी बोललो काय हे गौण ठरायला लागलं, पण माझी ती अदाकारीच सर्वाना आवडली. लोकांना वाटलं याला हेच शिकवलं आहे. ही ट्रिक एकदम वर्कआऊट झाली. मला अभिनयाचं पहिलं बक्षीस म्हणून मागं खोडरबर असलेली शिसपेन्सिल मिळालं.
 म्हणजे नाटकाची सुरुवातच मुळातला आकृतिबंध मोडून विनोद निर्माण करून झाली?
हो. नंतर एकदा मी बीडला विनोद सांगा स्पर्धेत भाग घेतला होता. एक रुपया प्रवेश फी आणि खुला गट होता. सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा होती. माझी वेळ आली तेव्हा माईक आधीच्या उंच माणसामुळे वर गेला होता. मी पुन्हा माईक जवळ आणायला वर हात केला आणि माझी चड्डी थोडीशी घसरली. बटनं तुटलेली, काज तुटलेली अशी ती चड्डी एका हाताने पकडून माईक खेचून मी विनोद सांगितला. पहिला लाफ्टर तर त्या चड्डी आणि माईक पकडण्याला मिळाला. माझ्या विनोदाला कमालीचा रिस्पॉन्स आला.
नंतर मग अनेक वेळा वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धामध्ये भाग घेत राहिलो. मुकुंद कुलकर्णी आमच्या बीडच्या चंपावती शाळेचे हेडमास्तर होते. त्यांनी मला दहावी झाल्यावर स्वत:च्या खर्चाने ‘वक्तृत्व आणि नाटय़ यात सातत्याने यशस्वी’ असं सर्टिफि केट दिलं. ते मी आजही जपून ठेवलंय. नंतर मला खूप सर्टिफिकेट मिळाली, पण आजही हे सर्टिफिकेट मला खूप महत्त्वाचं वाटतं.
त्यानंतर दोन वर्षे मी काहीच केलं नाही. दहावीला मी डिस्टिंक्शनमध्ये आलो होतो. ८० टक्के मार्क होते. आमचं कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय. माझ्या भावंडांना इतके मार्क कधीच नव्हते, त्यामुळे घरच्यांना वाटायचं हा पोरगा वेगळाच निघाला. पण पुढची दोन वर्षे क्रिकेटचा नाद लागला. त्यामुळे बारावीला माझा मेडिकल ग्रुप ८२ टक्के आला. ८२ ला मेडिकलला कोणी दारात पण उभं करत नसे. ९१.५%ला अॅडमिशन बंद झाली होती. वडिलांची माझ्यासाठी पैसे खर्च करायची तयारी होती, त्यांना वाटत होतं मी बी.फार्म. करावं. पण वडिलांचे पैसे असे खर्च करून शिकण्यात मला काही अर्थ वाटत नव्हता. तसंही बी.फार्म. होऊन मी काय करणार असंदेखील वाटायचं. म्हणून मग बीडहून औरंगाबादला आलो. मोठा चुलत भाऊ व्हिडीओकॉनमध्ये नोकरी करायचा. तो आणि त्याचा मित्र एकत्र राहायचे. त्यांच्याबरोबर मी राहू लागलो. बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. तेव्हाच मला नाटय़शास्त्रालाही प्रवेश घ्यायचा होता. भावाची सायकल घेऊन विद्यापीठात नाटय़शास्त्र विभाग शोधत फिरलो.
 नाटय़शास्त्रच का? तुला तर क्रिकेटचा नाद लागला होता. टक्केवारी घसरली म्हणून क्रिकेट बाजूला पडलं का?
नाही.. नाही! क्रिकेट बाजूला पडलं म्हणण्यापेक्षा मला दहावीनंतर नाटक बंद करावं लागलं होतं. आपल्याकडे परंपरा असते ना, महत्त्वाचं वर्ष आहे, नाटकंबिटकं असले धंदे नाही करायचे. असंच ऐकवलं जायचं. तसंही नाटकाला अजूनही व्हाईट कॉलर्ड लोकांमध्ये इभ्रत नाहीच. नाटकं करून काय माती करणार माहीत आहे, असंच त्याकडं पाहिल जातं. आजही बहुतांश तेच आहे. थोडाफार बदल होत आहे.
 म्हणजे तू एकटाच आलास, तुझा तू प्रवेश घेतलास, नाटय़शास्त्रासाठी धडपड केलीस. घरच्यांनी हे सर्व तुला करू दिलं?
त्यांचा पाठिंबा होताच. ८० टक्के मिळाले म्हणजे या पोराला अक्कल आहेच, असाच त्यांचा विश्वास होता.
 मग नाटय़शास्त्राला प्रवेश घेतलास?
ती खूप मजेशीर गोष्ट आहे. आमच्या विद्यापीठाचा कॅम्पस खूप मोठा. दहा एकरच्या त्या परिसरात १५ मिनिटं चाललं की दुसरा विभाग यायचा. मी भावाची सायकल घेऊन नाटय़शास्त्र विभाग शोधला. गेलो. विभाग उघडायची वाट पाहत थांबलो. बराच वेळ गेला, कोणीच येत नव्हते. समोर ती वास्तू, मी, माझी सायकल, निर्मनुष्य परिसर, शांत निसर्ग असेच किती तरी तास गेले. भूक लागल्यावर चहा -पाव खाऊन आलो. संध्याकाळी पाच वाजता खाकी गणवेश घातलेल्या एका म्हाताऱ्या माणसानं उघडलं. त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘‘हे संध्याकाळीच उघडतं.’’ मग कर्मचारी आले आणि कळलं की या वर्षीच्या अॅडमिशन झाल्या आहेत.

पथनाटय़ांनी माझ्यावर संस्कार घडवले, भाषा घडवली. स्पाँटेनिटी, हजरजबाबीपणा शिकायला मिळाला. त्याचा उपयोग आज होतो. आज मी त्याच दशम्या सोडून खातोय.

तोपर्यंत काय करणार. माझ्या मावस भावाच्या ओळखीने एक नाटकवाला ग्रुप शोधला. औरंगाबाद शहर, त्यामुळे बीडचा पोऱ्या म्हणजे खेडय़ातनं आलेला असंच मला समजायचे. त्यांनी प्रेमाने वागवलं, पण नाटक करायला मिळालं नाही. त्यासाठी भरपूर फिरलो, पण संधी मिळत नव्हती. तेव्हा जाणिवा नावाची एकांकिका स्पर्धा होणार होती. मी राहायचो त्याच एरियात एक नाटकाचा ग्रुप होता. त्यांनी ‘ट्रॅक’ नावाची स्त्रीपात्रविरहित एकांकिका बसवायचं ठरवलं. तो दिग्दर्शक म्हणजे ‘माझीच बॅट माझाच बॉल’ असा होता. मुख्य कलाकार तोच, संगीत तोच, दिग्दर्शक तोच. ऐन प्रयोगाला त्याचाच आवाज बसला. संपूर्ण प्रयोगात तो काय बोलतोय कोणालाच कळले नाही. नाटक तोंडावर पडतं म्हणजे काय हे मला या पहिल्याच प्रयोगाला कळले.
आम्ही तालमी करायचो तेथेच जवळच माझा मित्र समीर राहायचा. तालमीच्या वेळेस आम्ही त्याच्याकडून अनेक वस्तू मागायचो. तो स्वत:च आणून द्यायचा. पुढच्या दोन वर्षांंत त्याच्या घरातली माणसंच आणायचं शिल्लक ठेवलं होतं. तो या नाटकाला आला होता. त्याने मला जरा धीर द्यायचा प्रयत्न केला. पुढे गॅदरिंगमध्ये ‘बायको उडाली भुर्र’ या नाटकात छोटासा रोल मिळाला. तिथं अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर कॉलेज संपेपर्यंत मी कायम अभिनयाचं बक्षीस मिळवलं. बॉटनी हा माझा अतिशय आवडता विषय. अभिनेता झालो नसतो, तर वनस्पतिशास्त्रज्ञ झालो असतो. बीएस्सीला रँकला होतो. मला पीएचडीदेखील करायची होती. त्याचवेळी नाटय़शास्त्रालादेखील मेरीट रँकमध्ये होतो. नाटकाचे संस्कार खऱ्या अर्थाने झाले ते सरस्वती भुवनमध्ये दिलीप घारे आणि यशवंत देशमुख (‘गाजराची पुंगी’ या द्विपात्री गाजलेल्या नाटकाचे लेखक कलाकार) यांच्यामुळे.
 हे दोघे कसे काय भेटले?
मी सायन्स कॉलेजला कल्चरल सेक्रेटरी होतो. मंगेश देसाई बरोबर होता. त्या वेळी आर्ट्स-कॉमर्स कॉलेजकडून एक टीम युथ फेस्टिव्हलला जायची. त्या क्षेत्रात त्यांची जणू काही मक्तेदारीच होती. आम्हालापण जायचं होतं. पण प्राचार्य म्हणाले ‘‘ते जातात ना, आपलंच कॉलेज आहे. तुम्हाला जायची काय गरज आहे?’’ शेवटी त्यांनी परवानगी दिली. चारशे रुपये बजेट मंजूर झालं. बीडला फेस्टिव्हल होता. औरंगाबाद ते बीड एकेरी भाडे वीस रुपये. आमची वीस जणांची टीम होती. सगळे पैसे येथेच संपले. तीन दिवस राहायचं होतं. दोन जेवणं, एक नाष्टा म्हटले तरी वीस जणांना दिवसाला हजार रुपये लागणार होते. आमच्याबरोबर हॉस्टेलचा सीनिअर हेमंत ० होता. गेवराई क्रॉस केल्यावर हेम्याने सर्वाना सांगितले, आपल्याकडे फक्त चारशे रुपये होते, ते एसटीच्या भाडय़ात संपले. सर्वांनी आपल्याकडचे पैसे काढा. थोडेफार जमा झाले, पण पुरेसे नव्हते. बीड माझं गाव होतं. गावातल्या मित्रांना सांगितलं, आम्ही उपाशी आहोत, मग त्यांनी आम्हाला ब्रेडची पाकिटं वगैरे काय काय आणून दिलं. आमचे आर्ट्स कॉलेजवालेदेखील होतेच. त्यांचं बजेट ७५ हजार होतं. पण त्या फेस्टिव्हलमध्ये आम्हाला थिएटर चॅम्पिअनशिप मिळाली.
 अरे वा. काय काय केलं होतं फेस्टिव्हलमध्ये?
श्रीकांत सराफ ने स्कीट, एकांकिका आणि माईम लिहिलं होतं. दिग्दर्शन माझं. आम्हाला सगळीच बक्षिसं मिळत गेली. कप, शिल्ड मिळाले, पैसे नाही. बक्षीस वितरणाच्या वेळेस आर्ट्स-कॉमर्सवाले लांबच उभे होते. त्यांना लक्षात आलं आम्हाला बक्षिसं मिळताहेत. त्यांना म्हटले, ‘‘या ना लांब का उभे राहिले? आपलंच कॉलेज आहे.’’ औरंगाबादला परत आल्यावर कॉलेजने १८ हजार मंजूर केलं. वीसजणांनी मिळून मोठय़ा हॉटेलात पार्टी केली. या फेस्टिव्हलमधल्या घटनेमुळे आम्ही घारे-देशमुखांच्या जवळ गेलो. खूप शिकायला मिळालं.
 नेमकं काय शिकवलं? म्हणजे ते दोघेही लोकप्रिय शिक्षक. तू स्वत:देखील मित्रांमध्ये- विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय; अशा वेळी दोन लोकप्रिय शिक्षकांकडून, उत्तम नटांकडून विनोद आणि लोकप्रियतेव्यतिरिक्त काय काय शिकलास?
मुळात या सगळ्या प्रवासाची एक गंमत असते. आज या टप्प्यावर आल्यावर वाटतं तेथेही गोंधळ होता, येथेही आहे. आपला गोंधळ हा असतो की माणसाचा जन्म मेटामॉर्फीसस आहे. एक कळी असते, तिचं फूल होतं. मग फूल झालं तरी ती कळी नसते का? आता तू फुलपाखरू आहेस म्हणजे तू मुळात काय होतास.. हे लक्षात ठेवायचं असतं.

माझी श्रद्धा हौशी रंगभूमीवर होती, आहे आणि राहील. तेथे मी माझे पैसे खर्च करून जातो. पण व्यावसायिक रंगभूमीच असं नाही कारण तो व्यवसाय आहे.

घारे सरांकडून जास्त शिकलो. ते फार मूलभूत गोष्टी सांगायचे. माणसाच्या जगण्याच्या गोष्टी सांगायचे. तुझं जगणं आणि कलावंत असणं हे हे मिक्स असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मग तू कलावंत म्हणून काही वेगळा अॅटिटय़ूड ठेवून वेगळा परफॉर्म करणार नाहीस. तू माणसांमधल्याच गोष्टी मांडशील. तू माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहेस, हे तू कलावंत म्हणून किती श्रेष्ठ आहेस यापेक्षा महत्त्वाचं आहे.
त्या वेळी कॉलेजमध्ये असताना आम्ही पथनाटय़ांचे ५०० प्रयोग केले. हुंडा, व्यसनबंदी असे अनेक विषय असायचे. घरून काहीच घेऊन जायचो नाही. गावात उतरलो की जे काही पारावरच्या माणसाकडून मिळेल तेच आमचं साहित्य. कोणाची टोपी घे, कोणाची मफलर घे, दोरी बांधलेला चष्मा घे असं सगळं साहित्य गोळा करायचो आणि पथनाटय़ करायचो. त्यामुळे मी थेट लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागलो. लोकांच्या भाषेत, त्यांच्या समस्या मांडू लागलो, त्यांना प्रश्न विचारू लागलो.
 म्हणजे तू लोकांशी जोडला गेलास..
त्यांच्याच भाषेत जोडला गेलो. त्यामुळे माझी भाषा मूळची मराठवाडय़ातली आहे, पण बऱ्याच जणांना ती नगरपट्टय़ातील वाटते, कोणाला जुन्नर-नारायणगावची वाटते, तर कोणाला ती आणखी कुठल्यातरी ग्रामीण भागातली वाटते. तिच्यावर संस्कार खूप गोष्टींचे आहेत. त्या सगळ्या पथनाटय़ांनी माझ्यावर संस्कार घडवले, माझी भाषा घडवली. स्पाँटेनिटी, हजरजबाबीपणा त्यातून शिकायला मिळाला. त्याचा उपयोग आज होतो. आज मी त्याच दशम्या सोडून खातोय. नव्याने मी काही शिकलेलो नाही. आज याचा फायदा होतो. अजय-अतुलचा शो होता नागपूरला. त्यांच्या शोला भव्य सेट असतो, ते कोठून कोठून एंट्री घेतात. त्या दिवशी जमिनीतून येणार होते. पण नेमका ट्रॅक वाजेना. त्यामुळे त्यांची एंट्रीच झाली नाही. मग तेथे मी ताबा घेतला. म्हणालो, प्रेक्षकाहो, माफ करा, एक पारंपरिक गडबड झाली आहे, ट्रॅक वाजत नाही, त्यामुळे अजय- अतुलची नेहमीसारखी एंट्री होत नाही, ते तेथेच स्टेजखाली उभे आहेत. मग दोन-तीन किस्से सांगितले. रामायणातला प्रसंग वैदर्भीय भाषेत सांगितला. प्रेक्षक खूश झाले.
 पथनाटय़, फेस्टिव्हल, घरून पाठिंबा हे सर्व ठीक आहे, पण बीएस्सी झाल्यावर पुढे पोटापाण्याचं काय?
कॉलेजला असताना सकाळी कॉलेज, संध्याकाळी नाटय़शास्त्र, तालमी असा भरगच्च दिवस असायचा. बीएस्सीला चांगले मार्क्स पडले. घरच्यांना वाटत होतं नोकरी करावी. मग तसे प्रयत्न केले. ‘बाळकृष्ण टायर्स’ नावाच्या कंपनीत मुलाखतीला बोलावले होते. दक्षिण भारतीय गृहस्थ होते, त्यांनी मुलाखत घेतली. त्यांनी विचारलं, ‘केव्हापासून जॉइन होणार?’ मी म्हणालो ‘आत्तापासून.’ ते हसले आणि म्हणाले ‘उद्यापासून या’. म्हणजे नोकरी पक्की झाली होती. तिथे मी माझी दुसरी फाइलपण घेऊन गेलो होतो. त्यात नाटक, वक्तृत्व स्पर्धा यांची सर्टिफिकेटं, कात्रणं होती. त्यांनी सगळं वाचलं. अॅकेडमिक आणि नाटय़ दोन्ही फाइल्स उचलल्या. म्हणाले ‘‘तुझ्या अॅकेडमिक फाइलमध्ये केवळ चार- पाच सर्टिफिकेट्स आहेत आणि नाटक आणि इतर स्पर्धाची फाइल मला उचलतादेखील येत नाही इतकी जड आहे. तेव्हा आता तू जा आणि पुढची दोन वर्षे तुझ्या या आवडीच्या क्षेत्रात काम शोध. नाही मिळालं तर माझ्याकडे परत ये, मी हीच नोकरी देतो.’’
हा जो माणूस भेटला त्यामुळे मला देव ही वेगळी संकल्पनाच वाटत नाही. ती माणसांमध्येच असते. आपल्या लौकिक जीवनातच अलौकिकत्वाचे धागे जोडलेले आहेत, आपल्याला शोधता आले पाहिजेत. म्हणून मला असे वाटते की, डेस्टिनी ही कोण कोणाची ठरवू शकत नाही. जो तो आपली डेस्टिनी घेऊनच आलेला असतो.
नोकरीचं हे असं झालेलं. आता घरी कसा सांगणार हा दीडशहाणपणा? मग काहीतरी सांगून वेळ मारून नेली. पुन्हा नाटय़शास्त्राकडे वळलो. ‘रंगकर्मी’ नावाच्या संस्थेत मी आणि मंग्या काम करत होतो. नाटकाला बक्षिसे मिळतात, पैसे मिळतात, पण आम्हाला काहीच पैसे देत नाही यावरून आमचे ‘रंगकर्मी’च्या प्रमुखाशी भांडण झालं. त्यांचे पैसे त्यांना लखलाभ म्हणून आम्ही ग्रुप सोडला. मी आणि मंग्या असा ग्रुप (स्त्रीपात्रविरहित) सुरूकेला. एका वर्षांत आम्ही २७ बक्षिसं मिळवली. मग आमच्यावर आरोप होऊ लागले. ‘दोघंच काम करता, तुम्हाला गॅलरी प्लेइंग आलंय. लाइट नाही, सेट नाही’ असं बोलणं सुरू झालं. नेहमी आम्हाला अभिनयाची बक्षिसं असायची. कारण सेट, लाइट नसल्यामुळे एकांकिकेला तिसरं वगैरे बक्षीस असायचं. श्रीकांत आमच्यासाठी एकांकिका लिहायचा.
एकदा आम्ही नेपथ्य, लाइट, संगीत, मोठा सेट सारं जमवलं होतं. स्मशान जोग्यावरची एकांकिका होती. स्मशानजोगी आणि त्याच्या मुलातील वाद असा विषय होता. मी हे काम करणार नाही म्हणून मुलगा निघून जातो. एके दिवशी मुलगा बापाला भेटायला येतो, तर बाप मेलेला असतो. त्या प्रसंगाचं बापाच्या चितेचं अद्भुत दृश्य आम्ही रचलं होतं. मी डिरेक्ट केलं की मंग्या मेन रोल करायचा, त्यामुळे मंग्याने मुलाची भूमिका केली होती. एका प्रयोगाला चिता पेटलीच नाही. मी चितेवर त्यामुळे मला काही हलताच येईना. माझी चिडचिड झाली. मंग्या म्हणाला, ‘‘माचिसमध्ये एकच काडी होती. ते गुल तुटलं. आता गुल शोधायचा की डॉयलॉग म्हणायचा.’’ पण आम्हाला सगळी बक्षिसं मिळाली.
एकदा मंग्याने सांगितलं मुंबईच्या नाटय़दर्पणसाठी त्याने अर्ज भरला आहे. २६ जानेवारीला स्पर्धा आहे. एकाच विषयावर सर्वानी नाटक करायचं आहे. हे तो मला २३ जानेवारीला सांगत होता. आता तीन दिवसांत कसं होणार? बरं, करायचं तर एकांकिका कोठे आहे? मंग्या म्हणाला, ‘‘दास्याला (दासू वैद्य) सांग लिहायला.’’ दास्या तेव्हा विद्यापीठात हॉस्टेलमध्ये राहायचा. त्याला सांगितलं तर तो म्हणाला, ‘‘आधीच एका ग्रुपला दिली आहे आणि एका दिवसात कसं लिहिणार?’’ असं म्हणून त्यानं मला उडवून लावलं. मी खिन्न होऊन कॉलेजच्या चहाच्या टपरीवर बसलो. मंग्या आणि मी एकमेकांवर चरफडत होतो. तेवढय़ात दास्या आला. मी चिडलो होतो. बोलायला लागलो त्याला उद्देशून. ‘तुम्ही आम्हाला कशाला देणार एकांकिका? तुम्ही शहरी, पॉश लोकांना देणार’.. ‘तुम्ही आमच्याकडे कशाला बघणार?’
माझ असं तास- दीड तास चालू होतं. दास्यादेखील हसत होता. दास्याने दोन वेळा चहा घेतला आणि उठला. म्हणाला, ‘‘आज संध्याकाळी येऊन एकांकिका घेऊन जा.’’ आणि त्याने एकटाकी एकांकिका लिहून दिली, ‘देता आधार का करू अंधार’, एका अटीवर, मेन रोल मी करायचा. पंचवीस तारखेला आम्ही संवाद पाठ केले. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या प्रवासात एशियाडमध्ये संपूर्ण एकांकिका बसविली.
पुण्याला सुदर्शन हॉलवर येईपर्यंत एकांकिका तयार. अंतिम फेरीसाठी मुंबईवरून पाच आणि पुण्यातून तीन निवडल्या जाणार होत्या. या आठ जणांची अंतिम फेरी नेहरू सेंटरवर होणार होती. पुण्यात तीन फेऱ्या होत्या. पूर्वप्राथमिकला ८८ एकांकिका, प्राथमिक ८ एकांकिका, अंतिमसाठी तीन एकांकिका निवडल्या जाणार होत्या.

काही कमर्शियल सिनेमांमध्ये मी पैसे घेऊन मनस्ताप घेतो आणि काही सिनेमांमध्ये माझ्या आनंदासाठी कमी पैसे घेऊनदेखील काम करतो.

मंगेश कुलकर्णी आणि विजया राजाध्यक्ष परीक्षक होते. आमचा नंबर आला. आम्ही प्रयोग सुरू केला. तेव्हा हसणं सोडाच, पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषदेखील हलत नव्हती. आम्हाला तर लाफ्टरची सवय. म्हटलं संपलं, फुकटचा खर्च आणि वेळ वाया गेला. पुढची फेरी मुख्य हॉलवर होती. आमची एकांकिका त्या आठमध्ये होती. तो हॉल खच्चून भरला होता. अंतिम फेरीसाठीच्या तीनमध्ये आमचा नंबर होता.
मंगेश कुलकर्णीनी नाना पाटेकरांना सांगितले, औरंगाबादच्या दोन मुलांची एकांकिका पाहा. मुंबईच्या अंतिम फेरीसाठी नाना पाटेकरआले. त्यांनी कौतुक केलं. जीवनात त्या त्या टप्प्यावर अशी माणसं भेटतातच.
 मुंबईत आलास, आमदार निवासात राहिलास, भजी खाल्लीस, पण ते एकप्रकारे साजरंच केलंस.. कसं जमलं हे..?
हो पण मला स्ट्रगल म्हणणं चुकीचं वाटतं. आपल्या आवडीच्या क्षेत्रासाठी जे काही करायचं ते आपण करतोच ना. मला अभिनयातच जायचं होतं मग त्यासाठी पडतील श्रम केलेच पाहिजेत ना. म्हणूनच त्या कालखंडाबद्दल मी सहानुभूतीने बोलत नाही.
 नाना पाटेकरांची मदत कशी झाली?
त्यांनी सुरुवातीला खूप मदत केली. मुंबईत माझ्या ओळखीचे फक्त नाना पाटेकर होते. मी त्यांना फार त्रास दिला आहे. अगदी एखाद्या पत्त्यावर कसं जायचं हे पण त्यांना फोन करून विचारायचो. त्यांनी हे सारं फार संयमाने घेतलं. मी मंग्याला शब्द दिला होता तो मुंबईत येईल तेव्हाच पाटेकरांना भेटायचं त्यामुळे भेटायला गेलो नव्हतो.
 ‘देता आधार’च्या आधारे काही काम मिळालं का..
थोडंफार मिळालं. पण लगेच नाही. पाच महिने शोधाशोध झाली होती. इतक्या मोठय़ा शहरात आपलं काहीच होत नाही असंदेखील वाटू लागलं होत. मंग्या नव्हता. तो आल्याशिवाय पाटेकरांना भेटणार नव्हतो. मग एकदा निराशेत एकटा असताना घरी मोठे पत्र पाठवलं. त्यावर भावाने एक मला शेर लिहून पाठविला. ‘फलक को चाह है जहा बिजलिया गिराने की, हमे भी जिदही वही आशिया बनाने की.’ त्यातून मला खूप स्फूर्ती मिळाली.
केदार शिंदे नाटय़दर्पणच्या स्पर्धेत आमचा प्रतिस्पर्धी होता. त्याचं कार्ड माझ्याकडे होतं. त्याला भेटलो. त्यानं मला जेवू-खाऊ घातलं. मुंबईत जर सर्वप्रथम कोणाच्या घरी जेवलो तर ते केदारच्या घरी. केदारने संध्याकाळी शिवाजीवर नेलं. सुधीर भट, विजय केंकरेंना भेटवले. सात मिनिटांची एक छोटी भूमिका मिळाली. विशेष म्हणजे त्या नाटकावरील वृत्तपत्रातील प्रत्येक परीक्षणात माझ्यावर एक परिच्छेद होता. माझ्या असण्याची नोंद होती. नंतर केदारचं ‘टुरटुर’ मिळालं. नाना पाटेकरांना भेटल्यावर यशवंतमध्ये काम दिलं. असिस्टंट डिरेक्टर केलं. एन. चंद्रांच्या ‘वजूद’मध्ये काम मिळालं. जयसूर्या नावाचा आझिझ मिर्झाच्या सिनेमात मोठा रोल मिळाला, पण तो सिनेमा काही आला नाही. आमदार निवासात राहिलो, दूरच्या बहिणीच्या घरी वर्षभर राहिलो. कामं सुरू होती. घाटकोपरला मित्रांनी मिळून एकत्रितपणे रूम घेतली. पण खर्चाची जुळणी होत नव्हती. महिन्याला तीन हजार रुपये लागायचे, पण तेवढेदेखील मिळत नव्हते. नाटकाची नाइट शंभर आणि ‘यशवंत’चं शूटिंग झालं तर सातशे रुपये मिळायचे.
 अभिनयाव्यतिरिक्त काही कामं शोधली का?
रेल्वेत आर्टिस्ट कोटय़ातून नोकरी मिळवायचा प्रयत्न केला. पण नाही मिळाली. रूमचं भाडं परवडत नव्हतं. बाकीचे सर्व जोडीदार कोठे ना कोठे राहायला निघून गेले. आता मला एकटय़ाला भाडं झेपणार नव्हतं. एका संध्याकाळी सारं गुंडाळून परत जायचं असा विचार सुरू होता. तेवढय़ात पुन्हा एकदा देव भेटला. ‘बकरी’ नावाच्या एका प्रायोगिक नाटकात काम केलं होतं. त्यात रमेश होता त्याला मी जागेची अडचण सांगितली होती. त्याने अनिल गावडेला सांगितले. त्या संध्याकाळी अनिल गावडे घाटकोपरच्या रूमवर आला. तो भायखळ्याला चाळीत राहतो. त्याने विचारलं ‘तुला आवडेल चाळीत राहायला?’ मी एका पायावर तयार झालो. पुढे साडेतीन वषर्र् त्याच्याकडे राहिलो. या काळात माझा प्रवास खूप शार्प झाला.
नाटक, सीरिअल, चित्रपट असं सुरू झालं. ‘चमत्कार’ सीरिअल मिळाली. त्यात फारुख शेख होते. मला सेल्समनचं काम होतं. मुश्ताख खानने एक अॅडिशन घेतली. मग फारुख शेख यांनी एक घेतली. मग मी एक घेतली.
तेवढय़ात दिग्र्दक महादेवन ओरडले, ‘‘ए तेरोके जितना बोला है उतना कर ना’’
फारुख शेखनी सांगितलं ‘‘करने दो ना.. अच्छा कर रहा है वो।’’
फारुख शेखनी मला सीन झाल्यावर भेटायला सांगितलं. माझा तेवढाच एक शॉट होता तो झाल्यावर लगेच गेलो. म्हणाले, ‘‘इतने साल तुने थिएटर किया, फिर इधर क्यो झक मार रहा है?’’
मी विचारलं ‘‘आपको कैसा मालूम?’’
‘‘तेरा अॅक्टिंग बताता है तूने कितना थिएटर घिसा है. इधर मत आना.’’
‘‘पैसा नही है, यहा एक हजार मिलता है’’ इति मी.
‘‘फिर भुखा रह ना. तेरा करिअर अलग है. वापस इधर मत दिखना.’’
एका महिन्याने परत त्या सेटवर गेलो. फारुख समोरच होते, ‘‘फिर आया.’’ मी म्हणालो ‘‘एक महिना भूखा रहा ना.’’
 पण त्यानंतर तुला बऱ्यापैकी सिनेमे मिळत गेले.
‘यशवंत’मध्ये छोटंसं काम मिळालं, ‘वजूद’ मिळाला. ‘सरकारनामा’ हा पहिला मराठी सिनेमा. ते काम मिळालं त्याची गंमतच आहे. जुहूच्या बंगल्यात मी एका सीरिअलच्या शूटिंगसाठी गेलो होतो. त्यातील व्हीलनचा रोल हर्षदा खानविलकरमुळे मला मिळाला. या सीरियलचा कॅमेरामन दीपक कजारिया हा देबुदांचा कॅमेरामन. त्याने सांगितलं जवळ एन. चंद्रांच्या स्टुडिओमध्ये ‘सरकारनामा’चं कास्टिंग सुरू आहे. देबुदा ‘वजूद’मुळे ओळखायचे. देबुदांच्या पत्नी ‘सरकारनामा’ करत होत्या. लंचटाइमला मी गेलो.
दार वाजवलं आणि ‘‘माझ्या रोलचं काय झालं? किती दिवस काम आहे? मला शूटिंगचं सगळं ठरवायचं.’’ आत शिरताच पहिल्या भेटीतच डॉयलॉग फेकला.
ताई समोर होत्या, म्हणाल्या ‘‘अरे हो तुझा रोल आहे. पण तुझं नाव कळलं तर बरं होईल.’’
आणि मला ‘सरकारनामा’मध्ये नाथाचा रोल मिळाला. नंदू माधवबरोबर काम होतं. मोठी फिल्म होती. मी आणि उपेंद्र लिमये दोघे छोटय़ा भूमिकेत. माझ्या भूमिकेचं कौतुक झालं. मग काही सीरिअल मिळाल्या. ‘दी एंड अँकर शो’मुळे चार जणांमध्ये ओळख मिळाली. ‘मावशी नंबर’ हा दूरदर्शनचा पाच मिनिटांचा स्लॉट करायचो. ‘बेधुंद मनाच्या लहरी’, ‘आमच्यासारखे आम्ही’, ‘टिकल ते पोलिटिकल’ आणि ‘जाऊ बाई जोरात’ आलं. ‘जाऊ बाई’चे तर हजार प्रयोग झाले. त्यात मंग्या आणि मी दोघेही होतो.
 या सगळ्या पलीकडे जाणारं, वाचनाचं तुझं वेड कुठून आलं?
चौथीत माझ्या भावाने मला मृत्युंजय दिलं. ते मी वाचलं, मला खूप आवडलं. माझा मामा प्रकाशक होता. मी सुट्टीला तळेगावला आलो की त्याच्या वाचनालयात पडीक असायचो. पुस्तकांचा फडशा पाडला. आवड लागली. व्यसनच होतं.
पण असं खूप वाचन करणारी माणसं एकलकोंडी, आत्मकेंद्री होतात..
वाचन माणसाला प्रगल्भ करतं का नाही हा माझ्या मते फार दुय्यम मुद्दा आहे. पण वाचन तुमच्यामध्ये जाणीव निर्माण करतं, हे मात्र नक्की. समज इथं बसून एखाद्या गेयशेच्या जीवनावरचं पुस्तक वाचलंस. तर तिच्या कालखंडाची, भौगोलिक परिस्थितीची तुला माहिती होते ना. तसंच वाचनाने बरेच विषय, प्रवृत्ती माहीत होतात. आपल्याला कुठं एखाद्या माणसाची प्रवृत्ती माहीत असते? बऱ्यापैकी वाचल्यावर एखाद्या ती कळते. वाचन तुमचे विचार सुस्पष्ट करत जाते.
म्हणून मी सद्गुणी मनुष्य आहे असं म्हणायचं धाडस करणार नाही. मीपण दुर्गुणी आहेच की. प्रत्येक जण थोडे सद्गुणी, थोडे दुर्गुणी असतोच. चित्रपटातील डाकू असला तरी तो त्या जत्रेच्या देवीकडे येतोच ना. आपल्या सद्गुण-दुर्गणांना ओळखून घेतो आणि हा सगळा खेळ हा आपल्या वासनेचाच खेळ आहे.
 तू विविध प्रकारचं वाचतोस त्यातून तुझी एक विचारधारा तयार झाली आहे. ही विचारधारा, क्षमता यातून जगणं ओळखल्यावर तयार झालेला मकरंद अनासपुरे हा ‘बाबूरावला पकडा’, ‘मला एक चानस हवा’ असे सिनेमे कसे करतो? त्यांचा त्रास होत नाही का?
इथं एक लक्षात घ्यायला हवं. हा आपला पूर्ण वेळ व्यवसाय आहे. माझी श्रद्धा हौशी रंगभूमीवर होती, आहे आणि राहील. तेथे माझा पैशाशी संबंधच नव्हता. स्वत:चे पैसे घालून मी तेथे जातो. म्हणून त्या रंगभूमीवर माझी श्रद्धा आहे, पण व्यावसायिक रंगभूमीचं असं नाही. कारण तो व्यवसाय आहे. नाटक यशस्वी असलं तर निर्माता तीन तीन प्रयोग रेपटावून घेतो. पडलं तर महिन्यातून एकच शो लावतो. हा व्यवसाय झाला. तेथे आत्मीयता वगैरे आहे असं म्हणायचा खोटेपणा मी करणार नाही.
आता हा व्यवसायाचा भाग आहे हे मान्य केल्यावर गोंधळ कुठं होतो की अभिनेता असण्याबरोबर तू माणूस असतोस. तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. यशस्वी झाल्यानंतर तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या आर्थिक असतील अथवा अन्य काही असतील. सर्वसाधारणपणे नट म्हटले की तुला लक्षात येईल तू काही विकत घ्यायला गेलास की यांना काय कमी असते असं बोलून चार पैसे जास्तच घेतले जातात किंवा एखाद्या ठिकाणी गेलास की अपरिहार्यपणे काही द्यावं लागतं. मग हे सारं आर्थिक गणित सांभाळण्यासाठी हे असे काही सिनेमे करावे लागतात. त्यातही गंमत अशी की कधी कधी सुरुवातीला माहीतच नसतं. चित्रपट झाल्यावर शेवटी कळतं, अरे हे असं आहे होय. आता ‘बाबूराव’ या मराठी चित्रपटाचं बँकॉकला शूटिंग होणार म्हटल्यावर आपण इथंच गारठतो ना. असा सिनेमा चांगला होणार असं वाटतं.

जास्तीत जास्त कितीजणांना आनंद देऊ शकतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे.

 असा एखादा सिनेमा चांगला होत नाही तेव्हा यातना होतात का?
त्रास होतो ना. पण कोणत्याही गोष्टीची अनुभूती घेऊन मग काय चांगलं, काय वाईट हे ठरवावं. कोणीतरी सांगतं म्हणून एखादी गोष्ट वाईट मानायची हा मूर्खपणा आहे.
 मग एखाद्या दिग्दर्शकाबरोबर काम केल्यावर न आवडलेला दिग्दर्शक टाळतोस?
हो टाळतो.
 तुला स्वत:ला तू हीरो होशील असं वाटलं होतं का?
‘यशवंत’ चित्रपटातील एका मिनिटाच्या भूमिकेपासून माझी चित्रपट कारकीर्द सुरू झाली. आज हा प्रवास अडीच तासांच्या पूर्ण लांबीच्या पूर्ण भूमिकेपर्यंतच्या चित्रपटापर्यंत झाला आहे. या संदर्भात एकदा प्रशांत दामलेंनी मला फार चांगली गोष्ट सांगितली होती. ‘कॅलेंडर घ्यायचं आणि एक तारखेला मला काम आहे, दोन तारखेला मला काम आहे, असं मोजत तीसही तारखा खोडायच्या. अशा रीताने रोज काम असलंच पाहिजे. मग एक दिवस तुझ्या लक्षात येईल की तू प्रसिद्ध माणूस झाला आहेस, बऱ्यापैकी पैसे जमा झाले आहेत. काम चांगलं होत चाललंय.’’ हा सारा एवढाच प्रवास आहे.
चांगलं-वाईट आपण ठरवू शकत नाही. ठरवतो कोण? प्रेक्षक ठरवतात! दुसरं असं की अलीकडे मराठी सिनेमाची जरा बरी परिस्थिती आहे. पण दहा वर्षांपूर्वीचे राज्य सरकारचे पुरस्कारप्राप्त सिनेमे आठवून बघ, किती सिनेमे थिएटरला लागले. दहा देखील लागले नाहीत. मग चांगलं-वाईट कसं म्हणायचं? आपण म्हणायचं त्याने फार चांगलं काम केलं, सिनेमा वाईट होता इतकंच.
माझ्या बायकोने मला एकदा साधी गोष्ट सांगितली, ‘‘चांगला दिग्दर्शक, चांगला निर्माता, चांगला कॅमेरामन या संचात कोणीही चांगलं काम केलं तर त्यात कसलं आलंय बोडक्याचं कौतुक? ते तर कोणीही करू शकेल. वाईट कॅमेरामन, वाईट निर्माता, वाईट दिग्दर्शक यांच्याबरोबर चांगलं काम होणं महत्त्वाचं आहे.’’ हा विचार श्रेष्ठ नाही का?
कधी कधी या सर्वाचा मनस्ताप होतो. मग आपण हे प्रमाण कमी कमी करत जातो आणि एके दिवशी बंद करतो. म्हणूनच आज मी भारंभार सिनेमे करत नाही.
बऱ्याच वेळा आपल्या मनात चित्रपटाबद्दल वेगळीच संकल्पना असते. एखादा चित्रपट लेखनात चांगला उतरलेला असतो. दिग्दर्शक गोष्ट अशी भन्नाट सांगतो की, रात्री झोपच नाही येत. पण पडद्यावर पाहिलं की त्याचं भजंच झालेलं असतं. मग त्या वेळी तोंडदेखलं चांगलं बोलावंच लागतं.
 तू अनेक सिनेमे केलेस, पण सुपरस्टार ही ओळख तुला चंदू सरांनी मिळवून दिली?
चंदू सरांच्या ‘कायद्याचं बोला’च्या आधी ‘सातच्या आत घरात’ ने मला एक ओळख दिली. या सिनेमाने रौप्य महोत्सव साजरा केला. त्यात माझ्यासाठी बरेच सीन होते. त्यामुळे मला बराच वाव होता.
‘कायद्याचं बोला’ तर माझ्यासाठी टेलरमेड सिनेमा होता. अजितदादांनी तो अप्रतिम लिहिला होता. मी काय बोलू शकतो हे डोळ्यासमोर ठेवूनच जणू काही त्यांनी संवाद लिहिले होते. चंदू सरांनीही भरपूर मोकळीक दिली. त्यांना माहीत होतं मी काय करू शकतो. अनेक वेळा ते सांगत, ‘‘हा तुझा सीन, आता कर तुला हवं ते.’’ त्याचप्रमाणे त्यांना हवं त्या ठिकाणी माझ्याकडून चांगलं काम करून घेतलं. ‘कायद्याचं बोला’मुळे मी पूर्ण लांबीचं काम कसं आणि काय करू शकतो हे लोकांना कळलं.
 या सिनेमाने त्या वेळी मराठवाडय़ात मराठी सिनेमाला बराच काळ न मिळालेलं गँड्र ओपनिंग प्रथमच मिळालं..
निजामपट्टय़ात हा सिनेमा खूप चालला. ‘कायद्याचं बोला’चं वैशिष्टय़ म्हणजे हा सिनेमा ३६ आठवडे सिटी प्राईड कोथरूडला चालू होता. तेव्हा आम्हाला प्रभात मिळालं नव्हतं. नंतर त्याने सुवर्ण महोत्सव साजरा केला.
 त्यानंतर ‘गाढवाचं लग्न’ खूप गाजला. त्यामध्ये तुला जी मोकळीक मिळाली ती अन्य कोणाला मिळाली असती तर त्या भूमिकेचं मातेरं झालं असतं असं मला वाटतं. क्लासी आणि मासी दोघांनाही तू आवडलास.
‘गाढवाचं लग्न’ हे माझ्यासाठी चॅलेंज होतं. दादू इंदुरीकरांनी सावळ्या कुंभाराची भूमिका आधीच एका उंचीवर नेलेली होती. मी फक्त त्यातील अश्लीलपणा टाळला. कारण त्यात अश्लीलतेपेक्षाही सावळ्या कुंभाराचं अतिशय निरागस असणं हा त्याचा यूएसपी आहे. त्याला जगण्याविषयी अनेक प्रश्न पडलेले आहेत. त्याने तो वैतागलेला आहे. मी ते मांडलं.
मी काय, दादूने काय, आम्ही त्या भाषेतील गाणं पकडलं. कोणत्याही ग्रामीण भाषेत गाणं सापडतं. एक लय असते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, वऱ्हाडी, कोकण, बाल्यांची भाषा घे, प्रत्येक भाषेत गाणं आहेच. त्या भूमिकेसाठी आम्ही हे गाणं पकडलं. मी दादूंच्या बोलण्याची नक्कल केली नाही. मी नकलाकार नाही. मी ते गाणं मात्र पकडलं. कारण सावळ्या कुंभार त्या ग्रामीणतेचे प्रतीक आहे. त्याने देवालादेखील प्रश्न विचारले आहेत. अध्यात्माच्या ढोंगबाजीवरदेखील तो बोलतो. त्याला पडणारे प्रश्न निरागस आहेत.
 पाठोपाठ आलेल्या ‘साडेमाडेतीन’मध्ये तू मिशी कापून टाकली.
त्यात को-आर्टिस्ट म्हणून माझी आणि भरत्याची (भरत जाधव) चांगली केमेस्ट्री आहे. पहिलंच नाटक अशोक मामांबरोबर (सराफ) केलं होतं. त्यामुळे हा चित्रपट धमाल होता. मिशी कापण्यासाठी भरत्यानं मला जाम पटवलं. चित्रपटात मी जो काही छान छान दिसलो ते संजय जाधव आणि अंकुश मोने यांच्यामुळे.
ए त्यानंतर वेगळ्या वळणाचा ‘दे धक्का’ आला. त्यात तुझं काम उत्कृष्ट होतं. विनोदाची जबाबदारी दुसऱ्यावर सोडून तू एक वेगळंच काम केलं आहेस. असे तू अनेक सिनेमे केले आहेस. गजेंद्रबरोबर तर सगळेच वेगळे सिनेमे केलेस. हे कसं काय?
‘दे धक्का’ हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा होता. एका सामान्य कुटुंबाची गोष्ट होती. गजेंद्र तर मला दर वेळी वेगळा रोल देतो. त्याबद्दल गज्याचेच माझ्यावर खूप उपकार आहेत. ‘चंदा’, ‘सुंबरान’, ‘शासन सिंहासन’, ‘पारध’, ‘पिपाणी’ आणि आता येणारा ‘अनवट’. ‘अनवट’मधली भूमिका तर एकदम वेगळीच आहे. म्हणून मी गजाकडे सिनेमा करायला उत्सुक असतो. येथे एक लक्षात घ्यावं लागेल काही कमर्शियल सिनेमांमध्ये मी पैसे घेऊन मनस्ताप घेतो आणि काही सिनेमांमध्ये माझ्या आनंदासाठी कमी पैसे घेऊनदेखील काम करतो. गजाकडे मी पैशासाठी कधीच भांडलो नाही. ते मी दुसरीकडे वसूल करतो.
 विजू मोनेच्या ‘चूकभूल देणेघेणे’साठी आपण डोंगरात रस्त्यावर बसून जेवलो, तिथेच मेकअप केला.
कारण विजूचा प्रयत्न जेन्युईन आहे ना. तिथं आपण हिशेब लावत बसत नाही.
 शिक्षण घेताना, लग्न करताना आणि इतरत्र तुझा स्वावलंबीपणा दिसून आला. तुला जेमतेम अन्न मिळत असताना एका सुस्थितीतील कुटुंबातल्या मुलीशी तू लग्न केलंस. लग्नाच्या खर्चाचा भार तू सगळा स्वत:वर घेतलास.
निसर्गाने मला सातत्याने मदत केली. मग मी स्वावलंबी का असू नये, इतकाच माझा मुद्दा आहे. जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की तू कोणत्या क्षेत्रात आहेस, काय करतोस हे सगळं खोटं आहे. जीवनाच्या प्रवासात आपण किती समंजस झालो, तुझी अक्कल, मानसिकता किती उत्क्रांत झाली हे महत्त्वाचं. म्हणून मी सुरुवातीलाच मेटामॉर्फसिस शब्द वापरला. मी त्याला क्रांतिकारक बदल म्हणतो. एका अळीचं फुलपाखरू होणं हा जसा क्रांतिकारी बदल आहे तसं आयुष्य असलं पाहिजे, असा माझा समज आहे. किती लक्झरी जगलो यापेक्षा किती समंजसपणे जगलो, यालाच महत्त्व आहे.
 तुझ्यातलं अध्यात्म हे कोठून आलं?
मला माहीत नाही. देव आहे की नाही यावर अनेकांशी भरपूर वाद घातलेत. अध्यात्माविषयीची ओढ कोठून आली असं निश्चित नाही सांगता येणार. जगण्याकडे सजगपणे पाहणं कशामधून आलं असावं असं वाटतं? मला कधी कधी गंमत वाटते की एकेकाळी खाणं ही माझी गरज होती, मला खूप भूक लागलेली असायची. पण मी बरोबरच्या माणसाकडे मागू शकत नव्हतो, मागितलंदेखील नाही. मग कधीकधी तालमीच्या वेळेस समोर येणारा बिस्किटांचा ट्रेच घ्यायचो. कारण भूकच तशी लागलेली असायची. आणि आज कोठेही गेलो की ड्रायफ्रूट डिश, फळं, मिठाई असं काय काय येतं समोर. मी आता यातलं काहीच खाणार नाही, मला गरज नाही हे मला माहीत असतं तरीदेखील हे सारं येतंच, याचंच मला हसू येतं. म्हणजे ज्या कालखंडात ज्याची गरज नाही ती गोष्ट आपल्यासमोर सातत्याने येत राहतं. अगदी सोप्पंच सांगायचं तर ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येत,ं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. या प्रकाराने मला विचारमंथन करायला भाग पाडलं. मग लक्षात आलं की अभिनय, वाचन हे सारं सोडून आपला माणूस म्हणूनही एक वेगळा प्रवास आहे. आपण सर्वानी एक मुखवटा घातला आहे. तोच घेऊन आपण वावरत असतो. त्या मुखवटय़ाच्या आत एक माणूस आहे हेच आपण विसरतो. त्याला कधीतरी बेडवर मनसोक्त लोळावंसं वाटतं. आपल्या आत एक बालिश चेहरा असेलच ना. म्हणून मला मुखवटय़ांचं वावरणं खोटं वाटतं. पण मला या मुखवटय़ांना छेद द्यायचा नाही. कधी एखादा गोडबोल्या भेटतो, तोच पुढे जाऊन शिव्या घालतो, तेव्हा हा खरा की तो खरा असा प्रश्न पडतो.
 अध्यात्म आणि विद्रोह या जवळजवळच्या गोष्टी आहेत. तू जेथून आलास ते पाहता, तुझ्या मनात आग, विद्रोह असल्याशिवाय तू येथपर्यंत पोहोचणार नाहीस. आता त्या विद्रोहाचं रूपांतर कशात झालं आहे?
ग्रामीण भागात ऐन तारुण्य काढलं आहे, आता शहरात आहे. बऱ्या घरात राहतो, मुलं चांगल्या शाळेत आहेत. मी ग्रामीण भागात होतो तेव्हा फारशा उपलब्धी नव्हत्या. म्हणून त्या भागाकडे पाहताना मी थोडासा हळवा होतो. तेथील झगडाच इतका छोटा आहे, की वीस रुपयांवरूनदेखील वाद होतात. त्यांच्यासाठी जगणं अवघड आहे.
पण आपल्याकडे व्यवस्थेची अवस्था भयंकर आहे. एखाद्या अभियंत्याकडे शंभर कोटी सापडले तर त्यावर चौकशा कसल्या करता? त्याचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला माहीत आहे ना, मग कारवाई थेट करा ना. आता गारपीट झालेली आहे. मदत किती द्यायची यावरून चर्चा सुरू आहे. कोरडवाहू शेतकरी दुबार-तिबार पेरणी करतो. त्यामुळे २०-२५ हजारांच्या ऐवजी त्याचा खर्च तिप्पट होतो. त्याला अपेक्षा असते ३५ हजार मिळण्याची. अशा वेळेस ७५ हजार खर्च केल्यावर गणित कसं जमणार आणि आता आपण येथे कसली चर्चा करतो?सरकारला माहीतच नाही का? असा सगळा विरोधाभास आहे. आपण शाळेत राष्ट्रीय एकात्मता शिकवतो आणि शाळेच्या सुरुवातीलाच जात लिहिल्याशिवाय आपला फॉर्म पूर्ण होत नाही. दुसरं असं की दोनशे रुपये भरून शिकणारा मुलगा आणि दोन लाख खर्च करून शिकणारा विद्यार्थी एकाच पातळीवर कसे येणार? ही तफावत राहणारच. ती माझ्यासारख्या अस्वस्थ माणसाला जास्त त्रास देते. मग आपलं शल्य वाढत जाते.
 त्यासाठी तू काय करतोस…
पुलंचं एक खूप सुंदर वाक्य आहे. हे जग मी सुंदर करून जाईन. माझ्यापुरतं का होईना मी सुंदर करतोच आहे.
 लोक म्हणतील एवढं बोलता तर उतरा मैदानात, निवडणूक लढवा. तू निवडणूक लढवणार का?
राजकारणावर बोलायला काहीच लागत नाही. आपण घरात सोफ्यावर बसून क्रिकेट पाहत असतो. सचिन आऊट झाला की आपण असंख्य कॉमेंट करतो. अरे असं मारलं असतं तर आऊट झाला नसता. मागच्या वेळीदेखील असाच आऊट झाला. हे बोलायला काहीच करावं लागत नाही.
मी अभिनयाच्या क्षेत्रात येऊन आता वीस र्वष झाली. या क्षेत्राचा मला अनुभव आहे. त्यात काही काम असेल, अडचण असेल तर मी त्या ठिकाणी काम करेन. अभिनेता म्हणून मी यशस्वी आहे म्हणजे मी राजकारणी म्हणून यशस्वी होणार हे कशावरून? आता यशस्वी अभिनेता आहे म्हणून मी यशस्वी इलेक्ट्रिशिअन होईन का? बिल्डिंग बांधेन का? त्यासाठी त्या त्या विषयाचा अभ्यास महत्त्वाचा. मी राजकारणात जायचं तर मुळात मला अभ्यास करायला लागेल. पण मी त्याकडे पाहणार नाही.
 आज तू आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेस की तुला अमाप प्रेम मिळालं आहे, तकलादू प्रेम, खरं प्रेम तू जाणतोस. इथून पुढचा जो प्रवास आहे, त्याबद्दल तुझ्या स्वत:च्या काय अपेक्षा आहेत?
मी अभिनेता आहे, म्हणून मी सर्वानाच कसा आवडावा? कोणी मला बेंगरूळ म्हणेल, कोणी म्हणेल मी सर्वोत्तम आहे. माझ्यामध्ये जे काही आहे ते चिरंतन नाही. निसर्गाने माझ्यामध्ये दिलेलं आहे. ते दोन्ही हातांनी देणं एवढंच माझं काम आहे. मी भारवाहक आहे. मी ते अत्यंत चांगल्या रीतीने पोहोचवू इच्छितो. सर्वाना मी आवडावा, अशी माझी अपेक्षाच नाही. सर्व देदीप्यमान यश मलाच मिळावं असं मी म्हणणार नाही. मी ज्या झाडावर उगवलो आहे, त्या झाडावर माझ्यापेक्षादेखील दुसरं गोड फळ येणारच आहे. हाच निसर्गाचा नियम आहे. ग्रामीण भागातून येणारी मुलं माझ्यापेक्षा चांगली आणि ठाम मांडणारी असणारच. मी काही ग्रेट आहे असं मी कधीच मांडणार नाही. मागे वळून पाहिलं तर काही थोर होते आणि पुढे डोकावलं तर तिकडेही काही ग्रेट लोक आहेत.
मी बऱ्याच चुका केल्या आहेत, करतो आहे, पुढेदेखील करेन. मी परिपूर्ण आहे याची मी खात्री देत नाही. मी अतिशय सामान्य आहे. व्यवहारी आहे तर कधी कधी हरिश्चंद्राचा अवतार आहे. जास्तीत जास्त किती जणांना आनंद देऊ शकतो हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे.
मी जात असताना त्या रस्त्यावर फक्त आनंदाचं गाणं ऐकू येत असतं, हा एक प्रवास आहे. मी जात असताना दु:खाचं गाणं ऐकू येतं हा एक प्रवास असतो आणि मी जात असताना दगड पडत होते हा एक प्रवास आहे. यातला आपला मार्ग कोठला आहे हे ठरवलं पाहिजे. माझा प्रवास आनंदाच्या गाण्याच्या मार्गावरचा आहे. हा प्रवास अत्यंत समंजसपणे करणं इतकंच माझ्या हातात आहे.
 तुला आजवरच्या कारकिर्दीत काय करायचं राहिलं असं वाटतं…
पूर्वीचं वाटणं आणि आताचं वाटणं यात फरक आहे. मी निर्माता अथवा दिग्दर्शन करताना मांडायचं ते कायम नवं मांडलंय. मी जुनी गोष्ट परत आणत नाही. माझा सिनेमा हा कंटेंपररी आहे. त्या त्या काळाचं, समाजाचं प्रतिबिंब दिसलं त्यात पाहिजे. ते अजून शंभर वर्षांनंतरदेखील जाणवलं पाहिजे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘डँबिस’ यातून हेच मांडलंय. उद्ध्वस्त कुटुंबव्यवस्थेची समस्या मला दिसली ती ‘डँबिस’मध्ये मांडली. त्याला येथे नाही, पण बोस्टन फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरवलं गेलं.
 कंटेपररीमध्ये नव्या पिढीतली कोण आवडतात?
जेनुईनली सिनेमा करणारी मुलं आवडतात. काही जण ग्रॅजर आहेत, त्यांच्याकडे कंटेट फारसा नसतो, सांगण्यासारखं नसतं. उगाच गाजावाजा असतो. काही जण शांतपणे मांडतात. अलीकडची नवी पिढी खूप शार्प आहे. उमेश कुलकर्णी, सुजय डहाके, मंगेश हाडवळे, नागराज मंजुळे या लोकांनी अत्यंत स्वच्छ, प्रगल्भ आणि नेमक्या गोष्टी मांडल्या आहेत.
कलाकृती वाईट किंवा चांगली असते. जितके मतभेद जास्त, तितकी कलाकृती चांगली आहे असं मानायला हरकत नाही. कारण त्यावर चर्चा होत असते.
 तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देतोस? आजवरच्या आयुष्यात मित्रांचं काय स्थान आहे?
माझ्या घडण्यात अनेकांचा वाटा आहे. क्रेडिट द्यायचं म्हटलं तर दोन खंड लागतील. एखाद्या व्यक्तीला क्रेडिट देता येणार नाही. त्यासंदर्भात मला राम नगरकरांच्या प्रस्तावनेतील लिखाण आठवतं.
जत्रेत सासण काठीवर दोरावर एक इसम लटकत असतो. त्याची टोकं गर्दीतल्या चार-पाच माणसांकडे असतात. त्या गर्दीला माहीत नसतं की ही टोकं कोणी पकडली आहेत, पण त्या वरच्या माणसाला त्या गर्दीतदेखील माहीत असतं आपल्याला कोण सांभाळतं आहे. ही आपल्याला बॅलन्स करणारी माणसं आहेत.
माझ्या आयुष्यात असंच आहे. त्या त्या टप्प्यावर अशी माणसं भेटतात. आयुष्य खूप सुंदर आहे. मला बाळकृष्ण टायरमध्ये तो साऊथ इंडियन भेटला. अन्या गायकवाड भेटला हे सारे मला देवच वाटले. आमदार निवासात राहत असताना आकाशवाणीसमोर एक सँडविचवाला होता. तो कोण कोठून आला होता माहीत नाही. तो मला रोज सँडविच द्यायचा. पैसा है तो दो, नही तो रहने दो. असं खूप माणसांनी मला घडवलं आहे. कोणाचं एकाचं नाव कसं काय घ्यायचं? मी त्या सासण काठीवर उभा आहे, पण मला ती माणसं माहिती आहेत.
आपण काही कृतघ्न नसतो. ज्यांच्या बाबतीत असं वागलोय असं ज्यांना वाटतंय त्यांनी पण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. मी एखाद्याचा सहवास सोडला त्यांनीपण ते का सोडला याचा विचार करायला पाहिजे. मी कृतघ्न आहे असं एका वाक्यात मांडू नये.
छायाचित्र : प्रशांत नाडकर / छायाचित्र : दीपक जोशी

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor makarand anaspure
First published on: 28-03-2014 at 01:09 IST