News Flash

आग रामेश्वरी…

एकेक शब्द मराठी भाषेत किती प्रकारे वापरला जातो याचं वैविध्य थक्क करणारं आहे. आग हा एकच शब्द घेतला तरी त्यावरून भरपूर म्हणी, वाक् प्रचार तयार

| November 28, 2014 01:11 am

01prashantएकेक शब्द मराठी भाषेत किती प्रकारे वापरला जातो याचं वैविध्य थक्क करणारं आहे. आग हा एकच शब्द घेतला तरी त्यावरून भरपूर म्हणी, वाक् प्रचार तयार झाले आहेत.

आज मी पद्मजाची शिकवणी ‘आग’ या शब्दावरून चालू करण्याचे ठरविले. ‘फायर’ म्हणजे ‘आग’ हे पद्मजाला आधीपासूनच ठाऊक होते. पण हा शब्द विविध प्रकारे कसा वापरतात यात तिला नेहमीप्रमाणे जास्त रुची होती.

‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ या वाक्प्रचारावरून मी सुरुवात केली. योगायोगाने मला याच वाक्प्रचाराची हेडलाइन असलेली बातमी आजच्या वर्तमानपत्रात सापडली. या बातमीमध्ये लिहिले होते की, ईशान्येकडील राज्यांमधील अस्वस्थतेवर अपेक्षित असणारा इलाज सोडून केंद्र सरकार भलत्याच उपाययोजना करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. आसामसह ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये पसरत गेलेल्या असंतोषामागे बांगलादेशींची घुसखोरी, हे एकमेव कारण आहे. या घुसखोरीवर दीर्घकालीन आणि बांगलादेश सीमेवर चिरेबंदी उपाययोजना अपेक्षित असताना केंद्र सरकार केंद्रीय पथके पाठविणे आणि शांततेचे आवाहन अशा तात्पुरत्या मलमपट्टीवर भर देत आहे. ते वाचल्यावर मी पद्मजाला म्हटले, ‘‘या वाक्प्रचाराचा अर्थ होणार समस्या एकीकडे व उपाय भलतीकडे.’’ म्हणजे एक प्रॉब्लेम दिसत असताना लोक भलत्याच ठिकाणी उपाययोजना करायला जातात तेव्हा ही म्हण वापरतात.

दुसऱ्या एका बातमीमध्ये मथळा होता की, ‘निवडणुकीच्या दरम्यान धर्मावर आधारित भाष्य करून सर्वच राजकीय पक्ष आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘आगीत तेल ओतणे म्हणजे आधीच स्फोटक झालेल्या एखाद्या समस्येत अजून वादग्रस्त मुद्दे घुसडून ती समस्या अधिकच ज्वलंत करून ठेवणे.’’

एवढय़ात सौमित्र व नूपुर नाश्त्याच्या टेबलवर आले व प्राजक्ताला म्हणाले, ‘‘आई काल आम्ही रात्री न जेवताच झोपून गेलो, त्यामुळे आता पोटात आग पडली आहे. काही तरी पटकन खायला दे.’’ त्यावर सौ म्हणाली, ‘‘मला माहीतच होते म्हणून मी गरमागरम परोठे केले आहेत तुमच्यासाठी.’’ नूपुर म्हणाली, ‘‘पद्मजाताई तुला परोठे पण मिळणार व एक नवीन अर्थसुद्धा. पोटात आग पडणे म्हणजे खूप भूक लागणे.’’

नाश्त्याला जॉइन होणारी स्नेहा आजी म्हणाली, ‘‘माझ्याकडे पण एक अर्थ आहे.. ‘आगपाखड करणे’. याचा अर्थ होणार एखाद्यावर राग व्यक्त करणे.’’

यावर मलाही एकदम एक म्हण आठवली, ‘शुभ बोल नाऱ्या.’ तर म्हणे मांडवाला आग लागली. माझी ही म्हण पद्मजाला खूपच गमतीशीर वाटली. तेव्हा सौ म्हणाली, ‘‘काही माणसांना सदैव वाईट चिंतण्याची सवयच जडलेली असते. वाईट बोलून अपशकुन करण्याची खोड असते. अशा लोकांना दमात घेण्यासाठी ही म्हण वापरतात.’’

ऑफिसला पळण्यापूर्वी पद्मजाला मी अजून एक वाक्प्रचार शिकवायचे ठरविले. तो म्हणजे, ‘आगीशिवाय धूर निघत नाही.’ इतका वेळ नाश्त्याच्या टेबलवर न आलेली रश्मी आजी म्हणाली, ‘‘पद्मजा याचा अर्थ मी सांगते .. काही तरी सबळ कारण असल्याशिवाय कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट चर्चिली जात नाही. तुमच्या तरुणाईच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास कोणीतरी मुला-मुलीला एकत्र हिंडताना, फिरताना पाहिल्याशिवाय त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत नाही.’’ यावर पद्मजा गोड लाजली.

गृहपाठ म्हणून मी पद्मजाला ‘आगीशी खेळणे’ व ‘आगलाव्या’ यांचे अर्थ शोधून ठेवायला सांगितले. ऑफिसमध्ये पोहोचताक्षणीच मी कामामध्ये इतका गढून गेलो की वेळेचे भानच उरले नाही. माझा बॉस म्हणजे डोक्यात राख घालून घेणाऱ्यांपैकी होता. जरा काही मनाविरुद्ध घडले तर तो खूप चिडायचा. त्यामुळे कामे अर्धवट ठेवून त्याचा रोष मी कधीच पत्करत नाही. पण माझ्या एका सहकाऱ्याकडून नकळत एक चूक झाली आणि माझ्या बॉसला थयथयाट करायची संधीच मिळाली. त्याच्या डोक्यात राख घालून घ्यायच्या स्वभावामुळे मला घरी गेल्यावर राखेवरून पद्मजाला नवनवीन अर्थ सांगायची कल्पना सुचली.

घरी जाताच आधी फ्रेश झालो. आता पद्मजा, तिने स्वत: केलेला इडली-उपमा व चहा माझ्यासाठी घेऊन आली. मी उशिरा व तेही दमून आलेलो पाहून तिने गृहपाठ न सांगायचे मनापाशी ठरविलेले मला जाणवत होते. मग मीच तिच्या रेसिपीची तारीफ करत अभ्यासाचा विषय काढला. त्यावर तिची कळी मनापासून खुलली. ‘आगलाव्या’ म्हणजे दोघांमध्ये भांडणे लावून देणारा मनुष्य व ‘आगीशी खेळणे’ म्हणजे नको त्या गोष्टीचे दु:साहस करणे असे अचूक अर्थ तिने सांगितले.

मी पद्मजाला म्हटले की, एखाद्या फायरचा द एंड काय असतो? तेव्हा ती म्हणाली, ं२ँ. मी म्हटले, या ं२ँ लाच मराठीमध्ये राख म्हणतात. आता आपण यावरून काही नवीन अर्थ शोधू या.

‘राखेतून भरारी घेणे’ म्हणजे पूर्णपणे नेस्तनाबूत झाले असतानादेखील नव्याने व पूर्ण शक्तीनिशी यशासाठी जोर लावणे या सकारात्मक नोटवर आम्ही शिकवणी सुरू केली.

‘डोक्यात राख घालून घेणे’ हा दुसरा वाक्प्रचार समजावून देण्यासाठी मी पद्मजाला म्हटले, ‘‘अविचार करून किंवा आततायीपणे विचार करून किंवा चिडून जाऊन एखादी गोष्ट केल्यास काहीही साध्य होत नाही; झालेच तर स्वत:चे व इतरांचे नुकसानच होते.’’

‘स्वप्नांची राखरांगोळी होणे’ म्हणजे आपण पाहिलेली स्वप्ने चक्काचूर होणे असा एक उदासवाणा अर्थदेखील मी पद्मजाला सांगितला.

आग व राख यावरून आता तरी अजून नवीन काही अर्थ सापडत नाहीत असे सांगून मी आजची शिकवणी आवरती घेऊ या असे पद्मजाला सांगत असतानाच शेजारच्या घरातून आवाज ऐकू आला. रोहिणी स्वत:च्या भावाला दरडावत होती, ‘‘माझी मस्करी करू नकोस. मी चिडले की तुला माहीत आहे मी भाऊ वगैरे काही बघत नाही.’’ त्यावर रोहिणीच्या आईचा आवाज आला, ‘‘रोहन तिच्या वाटेला जाऊ नको, तुला माहीत आहे ना की तुझी बहीण चिडली म्हणजे आग आहे आग!’’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘बघ अजून एक अर्थ सापडला तुझी डायरी बंद करता करता. ‘आग असणे’ म्हणजे अत्यंत तिखट किंवा भडक माथ्याची व्यक्ती.’’

उद्याचा शिकवणीचा शब्द काय असेल हे गुलदस्त्यामध्ये ठेवूनच मी पद्मजाची आजची शिकवणी समाप्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2014 1:11 am

Web Title: marathi language 3
Next Stories
1 पी हळद, हो गोरी…
2 असतील शिते…
3 हत्तीच्या पावलांनी…
Just Now!
X