News Flash

‘भावे’प्रयोग -मला दिसलेले रोमँटिक लोकमान्य!

‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू. त्यांच्यावरचा ‘लोकमान्य’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात लोकमान्यांची भूमिका करणाऱ्या सुबोध

| January 2, 2015 01:48 am

‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू. त्यांच्यावरचा ‘लोकमान्य’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात लोकमान्यांची भूमिका करणाऱ्या सुबोध भावे यांचे नवे सदर-
एका अभिनेत्याच्या आयुष्यात शक्यतो लेखकांनी लिहिलेली वाक्यं बोलण्याचा योग वारंवार येतो. पण त्यापलीकडे जाऊन ज्यांनी आजपर्यंत स्वत:चे विचार लेखनातून मांडले अशा सर्वाना आधी नमस्कार करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन लेखाला सुरुवात करतो.
हा लेख तुमच्या समोर येईल तेव्हा माझा ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असेल. अनेकांनी तो पाहिला असेल किंवा पाहण्याच्या वाटेवर असतील. खरं तर ‘बालगधवार्ं’नी हा चित्रपट माझ्याकडे दिला.  ‘बालगंधर्वां’ची माझी भूमिका आवडल्याने मराठीतील उत्तम अभिनेते शरद पोंक्षे यांनी मला काहीतरी भेट द्यायचं ठरवलं. ती भेट होती, लोकमान्यांच्या आयुष्यावरील ‘दुर्दम्य’ ही गंगाधर गाडगीळांची कादंबरी. मला खरंच असं वाटतं की ‘बालगंधर्वा’नी विचार केला असेल की माझ्यासारख्या कलावंतावर तू चित्रपट केलास पण ज्या माझ्या बापाने मला ‘बालगंधर्व’ ही ओळख दिली त्याचं काय? त्याच्यावरही तू चित्रपट करायला हवास. कदाचित म्हणूनच शरदला मला लोकमान्यांवरची कादंबरी द्यावी असं वाटलं असेल.
  23ही कादंबरी वाचल्यानंतर मी अक्षरश: हेलावून गेलो. ज्यांना शाळेतल्या धडय़ाच्या पलीकडे मी कधीही वाचलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं त्या लोकमान्यांनी मला त्यांच्यावर लिहिलेल्या कादंबरीतून मात्र पछाडलं होतं. कादंबरी वाचून संपल्या संपल्या एकच विचार मनात आला की या महापुरुषावर चित्रपट होणं आवश्यक आहे. त्यांचं कार्य इतकं जिवंत आहे की, ते आजच्या तरुणांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. लोकमान्यांच्या घरात जन्मलेले माझे मित्र रोहित टिळक (लोकमान्यांचे खापर खापर पणतू) यांना मी फोन केला. त्यांना सांगितलं की आपण त्यांच्यावर चित्रपट करूया. आम्ही दोघं पुण्यात भेटलो व चित्रपट कसा असावा, त्यात काय काय असावं याची साधकबाधक चर्चा केली. त्या दृष्टीने मी चित्रपटाची जुळवाजुळव करायला लागलो. तोपर्यंत लोकमान्यांच्या विचारांनी माझा ताबा घ्यायला सुरुवात केली होती. त्यांच्याच गणिती पद्धतीने मी चित्रपटासंदर्भात एकेक गोष्टी आखायला सुरुवात केली होती. त्यांच्या जीवनावरील पुस्तकं माझ्या स्वत:च्या संग्रहात जमा व्हायला सुरुवात झाली होती.
पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला त्यांच्यावर चित्रपट व्हावा असं वाटत असलं तरी मी त्यांची भूमिका करावी किंवा त्या चित्रपटात इतर कुठली भूमिका करावी असं मात्र मला चुकूनही वाटलं नव्हतं. कारण लोकमान्यांच्या भूमिकेत मी स्वत:ला कधीच पाहिलं नव्हतं. मी फक्त तो चित्रपट व्हावा म्हणून प्रयत्न करत होतो आणि तरीसुद्धा ‘लोकमान्यां’चा मी अविभाज्य भाग होतो.
पण अचानक एके दिवशी मला नीना राऊत यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की त्या एका चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहेत आणि त्यात मी काम करावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. मी त्यांना विचारलं की कुठला चित्रपट? त्यांचं उत्तर होतं ‘लोकमान्य’!
त्यांचा मुलगा ओम राऊत हाच त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे हेही त्यांनी मला सांगितलं. प्रथम माझा विश्वास बसेना, कारण मी लोकमान्यांच्या भूमिकेत स्वत:ला कधीच पाहिलं नव्हतं. पण तरी नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी मी ओम राऊत यांना भेटलो. पहिल्याच भेटीत ओमने मला त्याच्या मनात आकारलेल्या लोकमान्यांवरील चित्रपटाविषयी विस्तृत सांगितलं. आंतराय प्रामाणिकपणे व नेमकेपणाने त्याने त्याचे सर्व विचार माझ्यासमोर मांडले. मीही त्याला माझ्या बाजूने मी जी चित्रपटाची जुळवाजुळव करीत होतो तेही त्याला सांगितलं. तत्त्वत: जरी मी त्याला लोकमान्यांची भूमिका करायला 21होकार दिला असला तरी मन अजून साशंक होतं. आपण त्या भूमिकेत शोभून दिसू का याविषयी जरा शंका होती. पण त्या पहिल्या भेटीनंतर चित्रपटाच्या तयारीला मात्र आम्ही अतिशय मनापासून सुरुवात केली. चित्रपटाच्या संहितेवर काम करायला सुरुवात झाली. कौस्तुभ सावरकर हे त्याचे संवाद लेखक होते. ओमच्या कार्यालयात वरचेवर आमच्या भेटी आणि चित्रपटावर चर्चा सुरू झाल्या. चित्रपटाचं शूटिंग आपण कशा पद्धतीने करणार आहोत हे ओम मला व इतर सर्व सहकाऱ्यांना समजावून द्यायचा. माझंही एकीकडे लोकमान्यांवर लिहिलेल्या साहित्याचं वाचन सुरूच होतं. अनेक मुद्दे नव्याने कळत होते. अनेक गोष्टी वाचनाने गळून पडत होत्या. लोकमान्यांचं एक वेगळंच रूप मनात आकार घेऊ लागलं होतं. त्यांच्या छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या छबीपेक्षा जाणवणारे लोकमान्य कैकपटींनी जिवंत असल्याचं सतत सिद्ध होत होतं आणि त्याच वेळेस ओमने या चित्रपटाची घोषणा केली व त्यात मी ‘लोकमान्यां’ची भूमिका करतोय हेही जाहीर केलं. त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. काहींनी त्याचं स्वागत केलं, काहींनी अत्यंत नकारात्मक भूमिका घेतली. काहींनी टीका केली तर काहींनी दुसऱ्याच अभिनेत्यांची नावं सुचवायला सुरुवात केली. लोकमान्यांच्या आयुष्यावर चित्रपट म्हटल्यावर वाद-प्रतिवाद आलेच. पण या सगळ्यात ओम मात्र अतिशय शांत व निश्चिंत होता. स्वत:च्या भूमिकेशी अत्यंत खंबीर (लोकमान्यांवर चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाला साजेसा). त्या सगळ्या टीकापर प्रतिक्रियांमधलं एक वाक्य मात्र मला, किंबहुना माझ्यातल्या अभिनेत्याला फार लागलं, बोचलं. ते होतं ‘सुबोध भावे यांची लोकमान्यांच्या भूमिकेसाठीची निवड अत्यंत चुकीची आहे. कारण त्यांचे डोळे कोमल आहेत, मृदू आहेत. त्यामध्ये लोकमान्यांच्या डोळ्यांतील करारीपणा कधीच येणार नाही.
24या वाक्याने माझी झोप उडवली. मला राग नाही आला उलट मला ती प्रतिक्रिया एखाद्या ज्योतीसारखी वाटली, जिने मला लोकमान्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविला. त्यानंतर मी माझ्याकडची सगळी पुस्तकं बाजूला ठेवली आणि आता एकच अभ्यास सुरू केला तो लोकमान्यांच्या ‘तेजस्वी डोळ्यांचा’. त्यानंतर सतत जाता-येता कुठेही त्यांचा पुतळा दिसला किंवा चित्र दिसलं की मी जायचो आणि कितीतरी वेळ त्यांचे डोळे पाहत बसायचो. खरं सांगतो, माणसाचं स्वत्त्व सर्वात प्रथम त्याच्या डोळ्यात दिसतं हेच मी विसरलो होतो. ते त्या प्रतिक्रियांनी माझ्या लक्षात आणून दिलं. लोकमान्यांच्या डोळ्यांवाटे त्यांच्या हृदयात पोहोचायचा माझा प्रवास मात्र सुरू झाला.
हे डोळे बघणं सुरू असतानाच लोकमान्यांनी एक वर्ष शिक्षण सोडून व्यायाम केला त्यामुळे मीही व्यायाम करायला लागलो. त्यांच्याविषयी वाचताना, अभ्यासताना असं वाटत होतं की ते आत्ता त्यांच्या ‘केसरी’च्या कार्यालयात बसून लिहिताहेत. त्यांचे विचार आजच्या काळाच्या संदर्भातही किती तंतोतंत लागू पडतायत. यावरच आमचं सतत बोलणं, चर्चा सुरू असायच्या. हळूहळू चित्रपटाची संहिता आकार घेत होती. त्याचं वाचन सुरू झालं. अनेक पटलेले न पटलेले मुद्दे समोर येऊ लागले. पुन्हा त्यावर काम होऊ लागलं. तरी काहीतरी राहतंय असं सतत जाणवत रहायचं. याचं एक कारण म्हणजे लोकमान्यांचं ६४ वर्षांचं आयुष्य आम्हाला दोन तासांच्या चित्रपटात सामावायचं होतं. सहा वर्षांच्या मंडालेच्या कारावासातही ब्रिटिश सरकार ज्यांची उर्जा थोपवू शकलं नाही, ते लोकमान्य आमच्या दोन तासांच्या चित्रपटात कसे सामावणार? पण ही अडचण दूर करण्यासाठी पुन्हा लोकमान्यच मदतीला आले. त्याच दरम्यान लोकमान्यांच्या आवाजातील दूर्मिळ ध्वनिफीत सापडल्याची बातमी वाचनात आली आणि जाणवलं की या ध्वनिफितीचा चित्रपटाची सुरुवात होण्यासाठी आणि अजून नेमकेपणा येण्यासाठी वापर होऊ शकतो. (या ध्वनिफितीतील आवाज टिळकांचाच आहे हे अद्याप सिद्ध झालेले नाही.)
त्या दृष्टीने पुन्हा संहितेची नव्याने आखणी करण्यात आली. ध्वनिफितीच्या वापराने पुन्हा काही प्रसंगांची अदलाबदल झाली आणि आता मात्र चित्रपटाचा आकार सर्वाच्या नजरेसमोर स्पष्ट, स्वच्छ दिसू लागला. दुसरीकडे डॉ. दीपक टिळकांचा अभ्यास व रोहित टिळकांचं प्रेम आमच्या बरोबर होतंच.
हे सर्व चालू असताना शूटिंगच्या तारखा ठरायला सुरुवात झाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शूटिंग सुरू करायचा निर्णय घेण्यात आला. आता माझ्याकडे सहा महिने उरले होते. मला विचारांनी, आचारांनी लोकमान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. त्यााकरिता शिक्षण घ्यायला लागलो. मी ज्यांच्याकडे शारीरिक शिक्षणासाठी जातो त्या शैलेश परुळेकर सरांनी मला मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली. सरांच्या व्यायामशाळेतील एका खोलीत मल्लांची चित्रं जाऊन तिथे लोकमान्यांची चित्रं आली. लोकमान्यांच्या भूमिकेसाठी चाललेला अभ्यास लोकमान्य स्वत: बघतायत असं मला बऱ्याच वेळा जाणवायचं. मध्येच कधीतरी मी त्यांच्याकडे बघून हसायचो. (कशासाठी इतका व्यायाम केलात? आता तुमच्यामुळे मलाही करायला लागतोय- असं मनात यायचं) ते कळल्यासारखं त्यांचेही डोळे अचानक हसतायत असं वाटायचं.
आणि एक दिवस ओमने आपण आता सर्वाची त्या वेशभूषेत चाचणी घेणार आहोत असं सांगितलं. मेच्या पहिल्या आठवडय़ातील दिवस ठरला. शूटिंगला आता फक्त २० दिवस राहिले होते. माझा मात्र लोकमान्यांच्या डोळ्यांचा अभ्यास पूर्ण होत नव्हता. अजून जे हवं ते जाणवत नव्हतं आणि चाचणीच्या आधीच्या दिवशी मात्र ‘युरेका.. युरेका..’ सारखं काहीतरी जाणवलं.
काय होतं त्या डोळ्यात?
लोकमान्यांचे डोळे मला अत्यंत रोमँटिक माणसांचे डोळे वाटले. एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यांतील स्वप्नं, त्याचं आभाळ मला त्यांच्या डोळ्यांत दिसलं. लोकमान्यांचा शुद्ध रोमँटिसिझम फार जाणवला. आपल्या मायभूमीवर प्रेम करणारा, आपल्या लोकांच्या सुखात सुख पाहणारा, त्यांच्याशी समरस झालेला, आपल्या देशवासीयांच्या उन्नतीची स्वप्नं पाहणारा रोमँटिसिझम. ‘स्वराज्य’ मागणारा रोमँटिसिझम. म्हणूनच ते डोळे मला अत्यंत पवित्र वाटले. संतांच्या डोळ्यातील विठ्ठलाचं रूप आणि लोकमान्यांच्या डोळ्यातील ‘स्वराज्या’चं रूप मला एकच वाटलं. ‘गीतारहस्य’ लिहिलेल्या, त्यानुसार कर्मयोगाने स्वत:चं आयुष्य जगलेल्या एका ऋषींची शांतता, तटस्थता त्यांच्या डोळ्यात दिसली. एका अत्यंत बलाढय़ शत्रूशी मुकाबला करताना स्वसामर्थ्यांची जाणीव झालेल्या एका योद्धय़ाची आपल्या शस्त्रावरील पकड मला त्या डोळ्यात दिसली. आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या अग्नीमध्ये अर्पण करावयास निघालेल्या एका योग्याचं वैराग्य मला दिसलं. ते डोळे अगतिक नव्हते. मुसमुसणारे नव्हते. त्यात कसलीही बोच नव्हती, परकेपणा नव्हता, बुद्धीचा कैफ नव्हता. लोकांच्या प्राणाशी एकरूप झालेलं एकत्वपण त्यात होतं.
मी त्या दिवशी त्या डोळ्यांमध्ये वाहून गेलो. बुडण्याची भीती नव्हती, मनसोक्त डुंबण्याचा मात्र आनंद होता.
दुसऱ्या दिवशी आमची चाचणी झाली. आमचे जादूगार मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांचा हात चेहऱ्याला लागला. त्यांच्या हातातील कौशल्याने त्यांनी मला या स्वराज्याच्या मैफिलीमधला ‘सा’ दाखविला. मी लोकमान्यांचा अंगरखा, जोडे, पगडी आणि हातात काठी या वेशात सर्वाच्या समोर आलो तेव्हा अचानक एक शांतता पसरली. कोणीच एकमेकांशी बोलेना. लोकमान्यांच्या डोळ्यांच्या परिसस्पर्शाने माझ्यासारख्या दगडाचं सोनं झालेलं प्रत्येकजण याचि देही याची डोळा अनुभवत होता. माझ्या दिग्दर्शकाच्या डोळ्यातून एक अश्रू मला ओघळताना दिसला. मला वाटतं तो एक अश्रू या सर्व अनुभवांसाठी पुरेसा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:48 am

Web Title: marathi movie lokmanya 3
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 तरुणाई -नवे वर्ष.. तरुण सूर
2 आदरांजली -एका युगाची समाप्ती
3 टिप्पणी -गडय़ा आपलाच देश बरा..
Just Now!
X