कशासाठी, आरोग्यासाठी !

जंक फूडमधील अतिसाखर, अतिमीठ अधिक घातक असते.

दिवसभर आपण काबाडकष्ट करतो किंवा काम करतो ते कशासाठी? कामाचे समाधान आदी सर्व गोष्टी नंतर येतात पहिले उत्तर असते ते पोटासाठी! पण काही वेळेस ‘पोटासाठी’ हे उत्तर आपण एवढय़ा गांभीर्याने घेतो की, पोटाचा घेर हळूहळू वाढतच जातो. मग चोरपावलाने रक्तदाब, मधुमेह आपल्या शरीरात प्रवेश केव्हा करतात कळतच नाही. खरे तर गेल्या काही वर्षांत आरोग्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार आपल्याला इशारे देत आहेत. परंतु, जोपर्यंत आपल्या घरात विकारांचा प्रवेश होत नाही तोवर सर्व जण निर्धास्त असतात. भारतातील मधुमेहींची संख्या एवढय़ा झपाटय़ाने वाढते आहे की, येणाऱ्या काळात मधुमेहींची राजधानी हा भारताचा परिचय असेल, असा इशारा तर जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही अलीकडेच दिला. मधुमेह म्हणजे उतारवयात होणारा विकार असे पूर्वी म्हटले जायचे मात्र आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता तर शाळकरी मुलांनाही मधुमेह होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. किंबहुना हे लक्षात आल्यानंतरच हैदराबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेने ही बाब केंद्र शासनाच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, २०११ सालीच दिल्ली उच्च न्यायालयाने या जीवनशैली बिघडवणाऱ्या जंक फूडवर शाळांमध्ये बंदी घालण्यासंदर्भातील निवाडा दिला होता. सीबीएसई शाळांमध्ये यावर याआधीच बंदी आणण्यात आली असून आता महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानेही तसाच स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.

परिणामी वेफर्स, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, शीतपेय, बिस्किटं, कँडीज, जेली यांच्याऐवजी आता चांगले घरगुती व पौष्टिक पर्याय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उपलब्ध होतील. जंक फूडमध्ये अनेक विकारांचे मूळ असलेला मैदा मोठय़ा प्रमाणावर असतो. आमचे नियमित लेखक वैद्य प. य. वैद्य खडीवाले तर नेहमी म्हणतात की, मैदा दूर ठेवा आणि आंबवलेले पदार्थ खाऊ नका, अर्धे विकार दूर होतील. महाराष्ट्रीय माणसाने ज्वारी-बाजरी सोडली आणि विकार जवळ आले. आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती चंद्रशेखर यांनी मध्यंतरी मुंबई विद्यापीठात या संदर्भात पालकांसाठीची एक कार्यशाळा घेतली. मुलांपेक्षाही त्यांना सवय लावणारे पालक हेच त्यांच्या मुलांच्या सवयींसाठी अधिक कारणीभूत आहेत, असे त्यांचे निरीक्षण आहे. जंक फूडमधील अतिसाखर, अतिमीठ अधिक घातक असते. शिवाय अलीकडे कुरकुरीत खाण्याच्याही सवयी मुलांना आहेत. कुरकुरीत गोष्टी अतितळलेल्या असतात. या तिन्हींचा परिपाक हा जीवनशैलीशी संबंधित विकारांच्या दिशेने प्रवास करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे जिभेच्या चोचल्यांपेक्षाही आपले आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच वेळेस आहारतज्ज्ञांचा इशाराही पालकांनी समजून घ्यायला हवा. दोन मिनिटांत तयार होणाऱ्या बाजारू गोष्टींची सवय वेळ वाचविण्यासाठी म्हणून लावली तर नंतर तीच सवय विकारांनी घरात मूळ धरण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे जंक फूडच्या पर्यायाऐवजी आपल्याचकडच्या दोन मिनिटांत होणाऱ्या ज्वारीच्या उकडीचा पर्याय चांगला, स्वस्त, पौष्टिक आणि वेळ वाचविणाराही आहे. यापुढील काळात ‘कशासाठी पोटासाठी’ याऐवजी ‘कशासाठी, आरोग्यासाठी’ हे ब्रीदवाक्य म्हणून लक्षात ठेवू या!
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Food for healthy living

ताज्या बातम्या