भरकटलेले…

९ मार्च रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अचानक एक क्षेपणास्त्र भारतातून अपघाताने डागले गेले.

missile-india-pakistan
भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रे आहेत. त्यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
सायंकाळच्या वेळेस सारे चिडीचूप होत असताना ९ मार्च रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अचानक एक क्षेपणास्त्र भारतातून अपघाताने डागले गेले. सिरसाहून निघालेले हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या महाजन फायरिंग रेंजच्या दिशेने ४० हजार फूट उंचीवरून जात असतानाच ८० किलोमीटर्सचे अंतर पार केल्यानंतर अचानक क्षेपणास्त्राने दिशा बदलली. त्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे १०० किलोमीटर्स आतमध्ये हे क्षेपणास्त्र आदळले. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने पत्रकार परिषद घेत ही घटना जगजाहीर केली.  तर त्यानंतर भारताने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत अपघातानेच हे घडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून दोन्ही देशांतर्फे  संयुक्त चौकशीची मागणी केली. हा घटनाक्रम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण गेल्या सुमारे सहा महिन्यांमध्ये भारत- पाक संबंधांमध्ये झालेल्या बदलांचा प्रभाव या घटनेवर स्पष्ट पाहायला मिळतो.

काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानने त्यांचे संरक्षण धोरण जाहीर केले त्यात भारतावर हल्ला करणे हा आपला हेतू नाही, असे प्रथमच म्हटले. हा बदल अनेकांसाठी धक्कादायक होता. त्याचे विश्लेषण यापूर्वीच ‘मथितार्थ’मध्ये केले आहे.  मात्र धोरण केवळ कागदावर बदललेले नाही तर प्रत्यक्षातही त्याचा प्रभाव आहे, हे या घटनेनंतर स्पष्ट झाले. एरवी आक्रस्ताळ्या पाकिस्तानकडून फारशा संयमाची अपेक्षा कधीच राखता येत नव्हती. मात्र हे प्रकरण पाकिस्तानने अधिक संयमाने हाताळले हे जेवढे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा अंमळ अधिक भारतासाठी महत्त्वाचे आहे.

भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रे आहेत. त्यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भारताशी सलोखा ही अर्थव्यवस्था खालावलेल्या पाकिस्तानची गरज आहे. कारण त्यांना मिळणारी  आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत व इतरही बाबी त्यावर अवलंबून आहेत. असे असले तरी आजवरचा पूर्वेतिहास पाहता पाकिस्तान हे धोरण अमलात कितपत आणेल याविषयी साशंकता होती. एरवीचा पाकिस्तान असता तर एव्हाना युद्धसदृश परिस्थितीच निर्माण झाली असती. मात्र या घटनेनंतर असे काहीही झाले नाही. एक तर २४ तासांनंतर पाकिस्तानने घटना उघड केली आणि ते करतानाही लष्करी अधिकारी मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी शब्दप्रयोगही संयमाने केले. ‘अपघातानेच झालेले असण्याची शक्यता’ही त्यांनीच बोलून दाखवत परिस्थिती प्रसारमाध्यमांतून हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतली. पाकिस्तानचे हात अर्थव्यवस्थेच्या दगडाखाली किती अडकले आहेत, याचाच प्रत्यय यानिमित्ताने यावा.

अर्थात भारतासाठी ही घटना निश्चितच भूषणावह नाही. जगाने आपले आण्विक बळ मान्य करावे, अशी अपेक्षा असेल तर त्याच्या हाताळणीत कोणत्याही भरकटलेपणास किंचितही वाव असता कामा नये. किंबहुना आपली शस्त्रास्त्र हाताळणी ही काळजीपूर्वकच केली जाते, याची खात्री पटल्यानंतरच जग  मान्यता देऊ शकते. हाताळणीतील भरकटणे त्यामुळे पूर्णपणे टाळावेच लागेल, ती आपली गरज आहे. क्षेपणास्त्र का भरकटते याचाही ऊहापोह यानिमित्ताने झाला. मात्र ही दुर्घटना अतिमहत्त्वाची असून तीत दुर्घटनेमागच्या कारणांना नव्हे तर दुर्घटनेस महत्त्व आहे. त्यामुळे चूक झाली, सुधारणा केली, असा हा विषयच नाही, याचे भान भारतीय संरक्षण दलांनी राखणे गरजेचे आहे. तरच संहारक शस्त्र हाताळणीतील विश्वासार्हता व त्यांचे कौशल्य सिद्ध होईल आणि त्यावरच भविष्यातील आण्विक शक्ती होऊ पाहणाऱ्या भारताची आन, बान आणि शान अवलंबून असेल!

मराठीतील सर्व मथितार्थ ( Matitarth ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India accidentally fired missile falls in pakistan dd

Next Story
मथितार्थ : रेशन, प्रशासन आणि बुलडोझर!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी