विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
रशिया-युक्रेन युद्धाला आता सुरुवात झाली असून त्याचा संपूर्ण झाकोळ जगावर आहे. दोन दिवसांपूर्वीच काही ठिकाणांवरून सैन्य माघारीची माहिती पुतिन यांनी स्वत:च जाहीर केल्याने काही तोडगा निघतोय का, याकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते. दुसरीकडे चीन आणि भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. कारण अर्थातच गेल्या काही दशकांमध्ये बदललेली समीकरणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युद्धाचे ढग जमलेले असतानाच रशिया आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट होणे हा जगाला वेगळे संकेत देण्याचाच प्रकार होता. ‘दोन्ही देशांच्या संबंधांना कोणतीही मर्यादा नाही’, असे सांगणे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकत्रच आहोत, याचा ठाम निर्धारच होता. ते रशियासाठी जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षा अधिक चीनसाठी महत्त्वाचे  होते. रशिया, चीन, पाकिस्तान या त्रिकोणासाठी अमेरिकाविरोध हा त्यांच्या मैत्रीचा पाया आहे. अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानची किंमत आता कमी झाली आहे. खरे तर ती गेल्या काही दशकांत तशी कमीच होत आली होती. तरीही माघार अतिमहत्त्वाची असल्याने अमेरिकेकडून या ना त्या कारणाने पाकिस्तानला मदत दिली जात होती. आता ती रसद आटली आहे. याच पाश्र्वभूमीवर रशिया- युक्रेन संघर्ष एका बाजूला सुरू असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही रशियाला भेट दिली, त्याकडे अनेकांचे दुर्लक्षच झाले. पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून या भेटीला वेगळे महत्त्व आहे. कारण चीन आणि रशियाची सर्वार्थाने मदत, ही अर्थव्यवस्था कोलमडलेल्या पाकिस्तानची गरज आहे. त्यामुळे युद्धाचे ढग जमलेले असतानाही इम्रान खान यांनी रशियास भेट देणे महत्त्वाचे ठरते. अर्थात ही पूर्वनियोजित भेट होती आणि ती रद्द करणे पाकिस्तानला परवडणारे नव्हते. शिवाय अमेरिकाला संकेत देण्यासाठीही पाकिस्तानसाठी हा दौरा आवश्यकच असावा.

या संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

दरम्यान, जागतिक पटलावर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण तेवढे सरळ कधीच नसते. त्यामुळे चीन- रशिया मैत्रीला बरेचसे वेगळे कोन आहेत. या दोन्ही देशांचा दुतर्फा व्यापार आता ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे; तर रशियाचे २० टक्के व्यवहार हे एकटय़ा चीनसोबत आहेत. चीनच्या इंधन आयातीमध्ये सर्वाधिक वाटा हा रशियाकडून येतो. त्यामुळे र्निबध आल्यानंतर चीन- रशिया मैत्री ही दोन्ही देशांसाठी अधिक आवश्यक आहे. शिवाय गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांनी एकमेकांची पाठराखणच केली आहे. तीही एवढी की, गुरुवारी युद्धाला सुरुवात झाल्यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी ‘चीन सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकतेचा मान राखतो, असे सांगत युक्रेन प्रकरण हे व्यामिश्र असून ऐतिहासिकतेच्या अक्षांश- रेखांशावर पाहावे लागते. त्यामुळेच रशियाच्या सुरक्षेचा तर्कसंगत, कायदेशीर प्रश्न चीन समजून घेतो’, असे विधान केले. यात रशियाला पािठबाच आहे, मात्र तो थेट नव्हे इतकेच. मात्र चीनसाठीदेखील ही कसरतच ठरणार आहे. कारण रशियाला पािठबा म्हणजे अमेरिकेच्या र्निबधांसाठीची पूर्वतयारीच जणू. यात भारताची स्थितीही तेवढीच नाजूक आहे. ‘तणाव निवळायला हवा आणि क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हायला हवी’, एवढेच मोघम वक्तव्य भारताने केले. युक्रेनला पािठबा दिलेला नाही. कारण रशियासोबत असलेल्या संरक्षण करारांबरोबरच व्यापारातील इतर बंधही महत्त्वाचे आहेत. आणि अमेरिकेसोबतचे मैत्रही तेवढेच मोलाचे आहे. भविष्यासाठीही चीनविरोधात तेच महत्त्वाचे असेल. मात्र त्यामुळे कोणतीही ठोस व ठाम भूमिका घेणे अडचणीचे आहे. येणाऱ्या काळात युद्ध सुरूच राहिले तर मुत्सद्देगिरीची कसरत करत चीन आणि भारत या दोघांचाही कस लागेल, असे विद्यमान चित्र आहे, त्यातही अधिक कस भारताचाच लागेल हे वास्तव आहे!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war russia conflict china india mathitartha dd
First published on: 25-02-2022 at 19:09 IST