प्रतिवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन येण्याच्या दोन दिवस आधीपासून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे संदेश सोशल मीडियावरून फिरू लागतात. पर्यावरण संवर्धनाचे संदेश असलेली टी शर्टस् घातलेली मंडळी त्या दिवशी हातात लहानसे रोपटे घेऊन दिसतात.  दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये सेलिब्रिटीज आणि मंत्री-संत्री यांचे वृक्षारोपण करतानाचे फोटो प्रसिद्ध होतात. अनेकदा खड्डा तोच असतो, दरवर्षी त्यात लावले जाणारे रोप बदलते, असे प्रकार याहीपूर्वी उघडकीस आले आहेत. म्हणजेच आपण जी झाडे लावल्याचे मिरवतो, त्याची पुरेशी काळजी घेणे मात्र टाळतो. पुतळा बसविणाऱ्यानेच त्याची काळजी घेण्याची तयारी दर्शविल्याशिवाय परवानगी मिळणार नाही, अशी नवीन तरतूद करण्याचे निश्चित झाले; तसेच आता झाडांच्या बाबतीतही करावे लागणार की काय अशी दुरवस्थाच आहे. अन्यथा एवढय़ा सर्व वर्षांमध्ये कोटय़वधींच्या संख्येने झालेल्या वृक्षारोपणानंतर अनेक सुस्थितीतील जंगलेच या देशात अस्तित्वात यायला हवी होती. पण तसे झालेले दिसत नाही. पर्यावरणाला आपण गृहीतच धरले आहे. पाऊस पडला नाही, अवकाळी पाऊस-गारपीट झाली, दुष्काळ पडला की, मग आपण पर्यावरणाच्या नावे गळे काढतो, या परिस्थितीला आपणच खरे जबाबदार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण पर्यावरणाचे काय करून ठेवले आहे, याचा प्रत्यय घ्यायचा तर एखाद्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ, तीर्थस्थळ किंवा गड-किल्लय़ाला भेट द्यायला हवी. खरे तर तीर्थस्थळी आपण जातो ते देवदर्शनाच्या निमित्ताने. पुण्य गाठीशी असावे, असेही अनेकांच्या मनात असते. पण तिथून परत येताना अनेकांनी ते तीर्थस्थळ प्लास्टिकमय करण्यास पुरता हातभार लावलेला असतो. पर्यावरणाची ही विदारक अवस्था लक्षात आल्यानंतर त्यावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने ‘लोकप्रभा’ने सर्वप्रथम ‘भीमाशंकरच्या मस्तकी, कचऱ्याची गंगा’ ही कव्हरस्टोरी केली. त्यासाठी ‘लोकप्रभा’चे वरिष्ठ प्रतिनिधी सुहास जोशी यांनी भीमाशंकरचे जंगल पूर्णपणे पालथे घालून वार्ताकन केले. त्याची दखल घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अभयारण्याच्या परिसरातील आमदार- खासदारांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांकडून स्वच्छता मोहीम पार पाडली. मात्र आता हे जंगल एकदाच स्वच्छ करून भागणार नाही तर त्यासाठी ही मोहीम ‘स्वच्छ भारत’ मोहिमेप्रमाणे अखंड सुरू ठेवावी लागेल. मोहीम अखंड सुरू ठेवणे हाही उपाय नाही तर खरा उपाय हा मानसिकता बदलण्याचा असणार आहे.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save environment
First published on: 10-06-2016 at 01:31 IST