10 July 2020

News Flash

अर्थाची भावपावलं…

नदीनं वाहतं राहिलं पाहिजे. ती कोणत्याही एका किनाऱ्यावर अडकली, तरी वाहणं थांबतं आणि त्या साचल्या पाण्याचं डबक्यात रूपांतर होऊ लागतं.

दुखाचा अभाव म्हणजे सुख अशी आपली सुखाची व्याख्या आहे.

शब्दार्त
चैतन्यप्रेम – response.lokprabha@expressindia.com

आपलं जगणं द्वैतमय आहे. सुख आणि दुख, लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, मान आणि अपमान अशा अनेकानेक दोन टोकांवर आपली जगण्याची कसरत सुरू असते. त्यातील अनुकूल भासणारं एकच टोक घट्ट पकडून ठेवण्याची आपली धडपड असते. म्हणजेच जीवनात फक्त सुखच मिळावं, दुख कधीच वाटय़ाला येऊ नये. सदैव यशच मिळावं, अपयश कधी येऊ नये, लाभच होत जावा, हानी कधीच होऊ नये, ही आपली इच्छा असते. दुखाच्या भीतीमुळे सुखही निश्चितपणे भोगता येत नाही, अशी आपली गत असते.

निसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘जीवनाची नदी सुख आणि दुखाच्या किनाऱ्यांमधून वाहत आहे. पण केवळ सुखाचाच किनारा धरून ठेवण्याची आपली इच्छा असते!’

खरंच आहे. नदीनं वाहतं राहिलं पाहिजे. ती कोणत्याही एका किनाऱ्यावर अडकली, तरी वाहणं थांबतं आणि त्या साचल्या पाण्याचं डबक्यात रूपांतर होऊ लागतं. त्यामुळे दुखाप्रमाणेच सुखातही न अडकता आपण नदीप्रमाणे वाहत राहिलं पाहिजे. पण सुख आपल्याला हवंसं वाटतं आणि दुख नकोसं वाटतं. खरं तर आपल्या आयुष्याच्या परिघातील बरीचशी दुखं ही स्वनिर्मित अर्थात मनोनिर्मित असतात, तर भोवतालच्या जगातील बरीचशी दुखं ही मानवनिर्मितच असतात. सगळीच दुखं काल्पनिक असतात, असं नव्हे, पण ती आपल्या वाटय़ाला का आली, याचा उलगडा काही होत नाही. अनेक जन्मांच्या वाटचालीतल्या चुकांचा हा हिशेब आहे, असं उत्तर प्रारब्ध कठोरपणे देत असतं! कोणतंही कारण असो, जीवनात दुखं नसावं, ही आपली तीव्र इच्छा असते. श्रीनिसर्गदत्त महाराजांची आणखी दोन वचनं स्मरतात. ते म्हणतात, ‘अनपेक्षित असतं तेच घडतं!’ आणि ‘दुखाचा अभाव म्हणजे सुख अशी आपली सुखाची व्याख्या आहे.’ म्हणजेच आपल्याला सुखाची अपेक्षा असते, पण अनपेक्षित असं दुख पदोपदी वाटय़ाला येतं. आपली सुखाची व्याख्या ही दुखावलंबी आहे! म्हणजे दुखं कितीही वाटय़ाला आली तरी मी ती आनंदानं भोगीन, माझ्या सुखाला दुखभोग नखही लावू शकत नाहीत, अशी काही आपली स्थिती नसते. नव्हे! तशी स्थिती आपल्याला काल्पनिकच वाटते! त्यामुळे दुखभयाचे काळे ढग जमू लागले तरी आपण मनानं खचू लागतो. ती दुखं टाळण्याचे उपाय शोधू लागतो. त्या उपायाच्या शोधात आपण सकाम भक्तीच्या पायवाटेवर जातो. आपण स्वामी समर्थाना, साईबाबांना, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज आदींना आळवू लागतो.

या सदगुरू रूपावर आपलं सुरुवातीला निरपेक्ष प्रेम नसतं. त्यांच्यातील नििश्चती, निर्भयता आणि असामान्य शक्तीवर आपलं मन जडत असतं. त्यांची कृपा झाली, तर आपल्याही जगण्यातल्या सगळ्या अडचणी मावळतील आणि आपल्याही जगण्यात नििश्चती येईल, असा आपला खरा सुप्त हेतू असतो. त्यांच्यासारखं निर्भयतेनं जगता यावं, शक्तीचा प्रवाह आपल्याही हाती येऊन सर्व संकटांवर सहज मात करता यावी, अशी सुप्त आस असते. त्यामुळे दुखाच्या भीतीपोटी आपण त्यांच्यापाशी जाण्याचा प्रयत्न करू लागतो. मग कधी त्यांच्या ओवीबद्ध चरित्राची पारायणं करू लागतो. कधी काही स्तोत्रांचा नेमानं पाठ करू लागतो. कधी त्यांच्या भजनांचं गायन करू लागतो.

सुरुवातीला त्या वाचनात, त्या पारायणात, त्या नेमात कृत्रिमता असते. शब्द नुसते वाचले जात असतात, पण मन दुखजाणिवांमध्येच घुटमळत असतं. अंतकरणाच्या पटलांवर त्या शब्दांची भावपावलं काही उमटत नसतात, पण तरीही त्या शब्दांचं एक फार मोठं अदृश्य सामथ्र्य असतं.

निसर्गदत्त महाराजांना एक शिष्य म्हणाला, ‘आम्ही इथं येतो. तुमचं बोलणं ऐकतो, पण त्यानं काहीच पालट घडताना दिसत नाही. मग या येण्याचा काही उपयोग आहे की नाही?’

श्रीमहाराज म्हणाले, ‘काहीच उपयोग नाही असं नाही. बी रुजलं आहे. आज ना उद्या कोंब फुटल्याशिवाय राहणार नाही!’

याचाच अर्थ महाराजांचे शब्द कानांवर पडत असले, तरी कानांतून हृदयात स्थिरावत नव्हते. त्या शब्दा-शब्दांतून अर्थाचा प्रकाश प्रस्फुटित होत असला, तरी अंतकरणातला अंधार हटत नव्हता. कारण ‘मी’पणाचा वज्रलेप घट्ट होता. पण म्हणून काय झालं? दिव्य सत्पुरुषांचे शब्द चिरंतन असतात. बी रुजताच वृक्ष लगेच कुठं डोलू लागतो? मातीत रुजलेली बी दिसतही नाही, पण ज्या अर्थी रोप तरारून वर येतं आणि हळुहळू त्याचं विराट वृक्षात रूपांतर होतं तेव्हा आधी बीज होतंच, हे अध्याहृत असतं.

मुंबईत इंदिराबाई दांडेकर म्हणून एक सिद्ध महिला सद्गुरू होत्या. त्यांच्याकडे कथा चालत. महिलांचीही गर्दी असे. त्या महिलांची अनेक लहान मुलंही येत. तिथंच खेळत. कुणीतरी त्यावर तक्रारीच्या सुरात म्हणालं की, ‘या मुलांच्या येण्यावर बंदी घालावी. ती दंगा करतात.’

सद्गुरू त्यावर म्हणाल्या, ‘दंगा तर सगळेच करतात. तुम्हा मोठय़ा माणसांचा दंगा मनात सुरू असतो, त्यापेक्षा हा परवडला! आणि असं पाहा. या मुलांच्या कानावरही तर काही पडतच आहे. आज ते त्यांना कळत नसेल. पण उद्या आठवल्याशिवाय राहणार नाही!’

त्यावेळी तिथं खेळण्यात दंग असलेल्या एका मुलानं मोठेपणी हा प्रसंग मला सांगितला आणि म्हणाला, ‘आईंचे शब्द खरेच होते. आज इतक्या वर्षांनी मला तिथले त्यांचे काही काही शब्द असे आठवतात की जे आजही मला सावध करताहेत, सांभाळताहेत, हे जाणवतं.’

तर असे हे शब्द अमर असतात. संकट दूर करण्यासाठी, दुखनाशासाठी, रोगनिवारणासाठी, अपयशाची प्रथा मोडण्यासाठी, भौतिकातील न्यून भरून काढण्यासाठी म्हणून आपण स्तोत्रं, प्रार्थना, पोथ्यांतील त्याच शब्दांचं बोट पकडतो. त्या शब्दांचं खरं आर्त वाचताक्षणी वा म्हणताक्षणी हृदयापर्यंत पोहचत नाही, पण हळूहळू का होईना, ते शब्द अंतर्मनात भावमुद्रा उमटवू लागतात. त्या अतिपरिचित शब्दांमागचा अपरिचित अर्थ कधीकधी विजेप्रमाणे लख्खकन चमकून जातो. शब्दांची टरफलं हळूहळू गळून पडू लागतात आणि त्यातले विशुद्ध भावार्थाचे दाणे मनोभूमीत रुजू लागतात. त्याच परिचित शब्दांचं बोट पकडून आपण मग चिंतनाच्या विराट प्रदेशात पाऊल ठेवतो..

सुरुवातीला असंही वाटू शकतं की, जो अर्थ आपल्या मनात उमटतोय तोच खरा असेल की ही कल्पनाच आहे? पण मग जाणवतं की आजवर आपण या ओव्यांचा, श्लोकांचा जो अर्थ ऐकला होता, वाचला होता, तोही त्या पातळीवर खराच होता. आज मनाला नव्यानं भिडत असलेला अर्थ इतका अमीट आहे की आता तो मनातून कधीच पुसला जाणार नाही.

शब्दांचा जो अर्थ सांगितला जातो तो परिचितच असतो. पण सत्पुरुषांनी रचलेल्या किंवा त्यांच्यावर रचल्या गेलेल्या स्तोत्रं, भजनं, आरत्या वा प्रार्थनांतील शब्दांचा अर्थ दिव्यत्वानं भरला असतो. ते शब्द प्रचलित अर्थापलीकडच्या गूढार्थाचाही संकेत करीत असतात. त्यानं आपलं चिंतन होत जातं, भावपोषण होत जातं.

एकदा माझ्या सद्गुरूंनी विचारलं, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या, याचा अर्थ काय?’

मी म्हणालो, ‘देवाच्या द्वारी उभं असताना एक क्षणभर तरी इतकं एकरूप व्हावं की चारही मुक्ती साधाव्यात.’

त्यावर गुरुजींनी विचारलं की, ‘मग हिमालयात हजार-हजार र्वष तप करीत असलेल्यांना असा एकही क्षण आजवर गवसला नसेल का? मग चारही मुक्ती त्यांच्या वाटय़ाला का आल्या नाहीत?’

मी निरुत्तर होतो. गुरुजी म्हणाले, ‘उभा क्षण, म्हणजे काय, याचा विचार करा. तुम्ही म्हणता ना? की, ‘उभा जन्म’ वाया गेला, ‘उभं पीक’ हातचं गेलं, तर उभा जन्म म्हणजे पूर्ण जन्म, उभं पीक म्हणजे सगळं पीक. त्याप्रमाणे ‘उभा क्षण’ म्हणजे प्रत्येक क्षण! जेव्हा प्रत्येक क्षण देवाच्या द्वारी व्यतीत होईल तेव्हाच चारही मुक्ती साधतील. आता तुमचेच डोळे, कान, मुख ही देवाची द्वारं आहेत. नामस्मरण, सद्दर्शन आणि सद्श्रवणात पूर्ण क्षण जेव्हा व्यतीत होऊ लागेल तेव्हाच हे शक्य आहे!’

एक खरं की कधी कधी आपल्याला जाणवणारा ‘नवा’ अर्थ खराच असेल, असं नव्हे. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधुनि पाहे,’ या श्लोकाचा वेगळाच अर्थ मला जाणवला. तो असा की, या जगात सर्वात सुखी कोण आहे? तर विचार करणारं मनच सुखी आहे! मी हा अर्थ गुरुजींना सांगितला. त्यावर ते म्हणाले, ‘विचार तर काय वेडाही करतो, कैदीही करतो. मग तो काय जगात सर्वात सुखी का आहे?’ मलाही वाटलं की, खरंच आहे. माणसाचं मन कमालीच्या वाईट विचारातही रमतं की! म्हणून काही तो सुखी नसतो.

मग गुरुजीच म्हणाले, ‘आधी खरा विचार कोणता ते पाहा. शाश्वताचा, भगवंताचा विचार हाच खरा विचार आहे. बाकी माणूस जो जो विचार करतो तो तो अविचारातच परिवíतत होतो. तेव्हा जे मन भगवंताचा विचार करतं तेच या जगात सर्वात सुखी असतं.’

तेव्हा स्तोत्रातील, प्रार्थनेतील दिव्य शब्दांचा शुद्ध अर्थ हा सत्पुरुषाच्या कृपेनं मनात जागा होऊ लागतो. अशाच काही प्रार्थनांचा, स्तोत्रांचा, रचनांचा भावार्थ आपण या सदरातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे ती स्तोत्रं किंवा रचना म्हणताना याही भावार्थाची जोड मिळेल आणि तेच परिचयाचे शब्द नव्यानं भावसंस्कार करू लागतील!

या शब्दचिंतन यात्रेचा प्रारंभ आपण करणार आहोत तो अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाच्या आळवणीनं. त्या आळवणीचं मुख्य आणि मनाला दिलासा देणारं सूत्र आहे..

अशक्य ते शक्य करतील स्वामी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 1:04 am

Web Title: meditation and positive thoughts
Next Stories
1 विद्यार्थी चळवळी नेतृत्वाच्या शोधात!
2 झलक टेकफेस्टची!
3 पृथ्वी गोल की सपाट?
Just Now!
X