जिओमीचा एमआय ४’चा बोलबाला
नव्या वर्षांत, काय नवीन? असा प्रश्न तर सर्वानाच पडतो. टेकप्रेमी युवापिढीला हाच स्मार्टफोन्स आणि गॅझेटस्च्या संदर्भात पडतो. म्हणून समजून घेऊयात की, नव्या वर्षांच्या सुरुवातीला बाजारपेठेत कोणते स्मार्टफोन्स प्रवेश करताहेत.
गेल्या वर्षअखेरीस बोलबाला होता तो, जिओमी या चिनी कंपनीचा. ही कंपनी चीनमधली अ‍ॅपल म्हणून ओळखली जाते. या जिओमीने आपण भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी प्रवेश केलाही. पहिल्या फ्लिपकार्टसोबत त्यांनी करार केला होता. त्यानुसार, त्यांच्या स्मार्टफोन्सच्या विक्रीला ऑनलाइनत तडाखेबंद सुरुवात झाली आणि पहिल्या काही मिनिटांतच जिओमीने ऑनलाइन स्मार्टफोन विक्रीचे भारतातील सर्व विक्रम मोडीत काढले! सुरुवातीच्या पाच मिनिटांतच लाखभर भारतीयांनी फोनखरेदी ऑनलाइन केली होती.
याच जिओमीतर्फे येत्या काही दिवसांत बाजारपेठेत येणाऱ्या एमआय ४ या मॉडेलकडे सध्या लक्ष लागून राहिलेले आहे. ५ इंची स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वापरला असून ३ जीबी रॅमचा वापर करण्यात आला आहे. मागच्या बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याला ४के व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोयही आहे. समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे. एमआययूआय ऑपरेटिंग सिस्टिम यात पाहायला मिळेल. तर याची बॅटरी तब्बल ३०८० एमएएच क्षमतेची असणार आहे. आयफोनसारख्याच दिसणाऱ्या या फोनची किंमत मात्र किफायतशीर असेल, असे म्हटले जाते.

किफायतशीर युरेका!
Untitled-6स्मार्टफोन हे काही सामान्यांसाठी नाहीतच. ती केवळ आणि केवळ श्रीमंत वर्गाचीच मक्तेदारी आहे, असे वाटत असतानाच मायक्रोमॅक्स या कंपनीने भारतात एक वेगळीच क्रांती केली. स्वस्तातील या स्मार्टफोन्सची दखल तर सॅमसंग सारख्या दिग्गज कंपन्यांनाही घेणे भाग पडले. तरुण पिढी तर स्मार्ट गॅझेटस्साठी आसुसलेली असते, त्यांचे स्मार्टफोन बाळगण्याचे स्वप्न मायक्रोमॅक्सने पूर्ण केले आणि ही कंपनी तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली.
याच कंपनीची उपकंपनी असलेल्या युरेकाने आता स्मार्टफोन्सच्या दुनियेत नवा बोलबाला करण्याचा घाट घातलेला दिसतो आहे. या बोलबाल्याची घोषणा आहे, युरेका! यू टेलिव्हेन्चर्स नावाच्या या उपकंपनीने मध्यम किमतीच्या वर्गवारीमध्ये युरेका हा नवा स्मार्टफोन बाजारपेठेत आणला आहे. २०१५च्या सुरुवातीलाच आलेल्या या स्मार्टफोनने तरुणाईत उत्साह नसता संचारला तर नवलच. कारण यात तरुणाई हवे असलेले अधिक पिक्सेल्स आहेत, स्मार्ट लूक आहे, चांगली रॅम क्षमताही आहे. स्क्रीन तर तब्बल ५.५ इंचाचा आहे, तोही एचडी डिस्प्ले असलेला. त्यात ६४ बिट क्वालकॉम प्रोसेसर १.५ गिगाहर्टझ् क्षमतेचा ऑक्टाकोअर. २ जीबी रॅम आणि तब्बल १३ मेगापिक्सेल कॅमेरा.. आणखी काय हवंय?
भारतीय बाजारातील किंमत –  ८,९९९/-