पावसात मनमुराद भिजायचं आहे? रेनी पिकनिक, आऊटिंग, लाँग ड्राइव्ह.. येस्स.. हे सगळं करा, पण पावसाळ्याची तयारी तर करा..

पावसाने मस्त वर्दी दिली आहे, मातीचा मस्त गंध सुटलेला आहे, बाहेर भजीवाल्याच्या ठेल्यावर खरपूस भजी तळली जातायत आणि तुम्ही नवीन वर्षांत, नुकत्याच सुरू झालेल्या लेक्चरमध्ये फळ्याकडे तोंड करून बसलेले आहात. अर्थात खिडकीतून आत येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी तुम्हाला चिडवायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे ‘आता काही तरी करायचं आणि वर्गाबाहेर पडायचं’ याचे प्लान तुमच्या ग्रुपमध्ये ठरायला लागलेत. पण तितक्यात तुमच्या लक्षात येतं, ‘अरेच्या.. आज जीन्स घातली आहे, बाहेर पडायचं झालं तर पावसात ती भिजणार आणि जड होणार.’ किंवा ‘नेमका आजच जो कुर्ता घातलाय त्याचा प्रचंड रंग निघतो, बाहेर भिजली की रंगपंचमीच होणार माझी.’ की मनात विचार येतो, ‘नाही बॉस, आज नको.. फिर कभी. पाऊस तर आहेच चार महिने’ आणि मग त्या ‘फिर कभी’ची वाट पाहत परत फळ्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करतो.
पण या वेळी या ‘फिर कभी’ची वाट पाहण्यापेक्षा आतापासूनच पावसाळ्याच्या तयारीला सुरुवात करा. त्यासाठीच यंदाच्या पावसाळ्यातील काही खास ट्रेंड्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यात ट्रेंडी तर दिसलाच, पण पावसाची मजाही तितकीच अनुभवता येईल. चला तर मग यंदा खास पावसाच्या दिवसांमधील फॅशन फंडय़ांबद्दल थोडंसं बोलूयात.
सुरुवात कपडय़ांपासून करूयात. सगळ्यात आधी कॉटनच्या सर्व कपडय़ांना रजा द्या. कारण एक तर पावसात भिजल्यावर ते जड होतात, सुकायलासुद्धा वेळ घेतात. त्यात चुकून एखाद्याचा रंग निघत असेल तर मग विचारायलाच नको. इंद्रधनुष्य आकाशात दिसण्याऐवजी तुमच्या हातापायावर दिसायला लागतं. छान जॉर्जेट, शिफॉन किंवा पॉलिएस्टर लायक्रा फॅब्रिक्स वापरणं केव्हाही उत्तम. सध्या अनेक प्रिंटेड टय़ुनिक्स, शर्ट्स बाजारात उपलब्ध आहेत, त्यांची मजा घ्यायची हीच ती वेळ. पण हे टय़ुनिक्स वापरताना चांगल्या प्रतीचे इनर्स किंवा गंजीस् वापरायला विसरू नका. जीन्स वापरण्याऐवजी शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स वापरू शकता. कुर्तीज वापरण्यापेक्षा लाँग लेन्थ टय़ुनिक्स वापरायला काहीच हरकत नाही. लायक्राच्या लेगिंग्ससोबत तुम्ही त्या पेअर करू शकता.
मुलांसाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप कमी पर्याय असतात. पण तुम्ही जीन्सच्या ऐवजी बर्मुडाजचा पर्याय नक्कीच ट्राय करू शकता. कित्येक कॉलेजेस्मध्ये बर्मुडा घालायला परवानगी नसते, अशा वेळी कन्व्हर्टेबल ट्राउझर्स वापरायला हरकत नाही. लाइट वेटेड डेनिम्ससुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. पावसाळ्यात प्रिंटेड टी-शर्ट्स वापरणं कधीही उत्तम. बोल्ड प्रिंट्स पावसाळ्यात मस्त उठून दिसतात. ब्राइट कलर्ससुद्धा वापरू शकता. जेणेकरून तुम्ही भिजून आला असाल तरी कंटाळवाणे दिसणार नाही. तुमचा मूड फ्रेश दिसतो. स्ट्राइप्सचा ऑप्शनसुद्धा आहे तुमच्याकडे.
या सिझनमध्ये खास पावसाचा मूड दाखवणारे डिजिटल प्रिंट केलेले टी-शर्ट्स, टय़ुनिक्स किंवा वन-पीस ड्रेस मिळतात. यातील काही तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला काहीच हरकत नाही. पावसाळ्याचा ‘फील गुड’ मूड याच्यामुळे मिळून जातो. मुलांसाठी प्रिंटेड गंजीस्पण सध्या उपलब्ध आहेत. पावसाळ्यात त्यातील काही ट्राय करायला काहीच हरकत नाही. थोडा वेगळा लुक आणण्यासाठी त्यावर शर्ट घालू शकता.
अ‍ॅक्सेसरीबद्दल बोलायचं झालं तर, सर्वात आधी तुमचे लेदर शूज, बॅग्स, बेल्ट्स पहिल्यांदा कपाटात ठेवून द्यात. पावसाळ्यात भिजून ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. सध्या बाजारात प्लास्टिकच्या फंकी बॅग्स आल्या आहेत, त्या पावसाळ्यात वापरण्यास उत्तम असतात. त्यामध्ये फंकी कलर्स, प्रिंट्स किंवा लोगोस उपलब्ध असतात. फक्त या बॅग्स पारदर्शक असतात, त्यामुळे त्यात सामान नीट ठेवणं गरजेचं असतं. नाही तर अस्ताव्यस्तपणा कोणाच्याही नजरेत पटकन येतो आणि आपलं इम्प्रेशन खराब होतं. मोठय़ा बॅग्स कॅरी केल्यास त्यात तुमच्या छत्रीपासून खूपशा गोष्टी ठेवता येतात आणि पावसाचा मनमुराद आनंद घेता येतो. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात स्लिंज वापरण्याऐवजी टोट बॅग वापरणं सोयीचं ठरतं. पण बॅग मोठी आहे म्हणून भरपूर सामान भरणंपण चुकीचं ठरेल. त्यामुळे मोजकं पण गरजेचं सामान त्यात असू द्यात. सध्या बाजारात छान गमबूट पाहायला मिळतात. तुम्हाला हटके लुक हवा असेल तर गमबूटचा पर्याय वापरायला हरकत नाही. पण रोजरोज गमबूट वापरून नंतर बोिरग वाटायला लागतात. त्यामुळे त्यासोबत एक जोड जादा चप्पल असू द्यात. यंदा बॅलरिनामध्ये छान विविधता पाहायला मिळते आहे. त्यांच्याकडेसुद्धा तुमचं लक्ष असू द्यात.
पावसाळ्याबद्दल बोलतोय आणि छत्री, रेनकोटचा विषय निघणार नाही असं होणं शक्यच नाही. यंदा रेनकोटस्ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते आहे. रेनकोटस्मध्ये स्टायलिश डिझायनर रेनकोटस् तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या त्यांना पावसाळ्यातील ‘ट्रेन्च कोट्स’पण म्हटलं जातं. पण ते आपल्याच रेनकोटस्चं नवीन व्हर्जन आहे. लांब छत्र्यांची हौस भागली असेल, तर आता छोटय़ा छत्र्या वापरायला हरकत नाही. मागच्या सिझनपर्यंत कित्येक मुलींनी लांब छत्र्या स्टायलिश दिसतात म्हणून वापरायला सुरुवात केली होती. पण नंतर हातातलं ओझं वाटायला सुरुवात झाली. छोटय़ा छत्र्या बॅगमध्ये ठेवता येतात आणि हात मोकळे राहतात. सध्या छत्र्यांवर कॅलिग्राफी किंवा पेंटिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. या छत्र्या तुम्हाला चारचौघात मिरवायला नक्कीच उत्तम ठरतील.
पावसाळ्यात मेकअपचे जास्त लाड नकोत. बेसिक मेकअप आणि हवं असल्यास ब्राइट लिप्स पुरेसे आहे. सध्या कित्येक कंपन्यांचे वॉटरप्रूफ मेकअप किट बाजारात आले आहेत. पावसाळ्यात हे किट्स सर्वात जास्त उपयोगी येतात. काजळ आणि लायनर पाण्यात भिजून खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आयमेकअप लाइट ठेवावा.
बाकी काय.. पावसात मनमुराद भिजायचे बहाणे आपल्याकडे काय कमी असतात..? या वेळीही पावसात बेधुंद होऊन भिजून घ्या. फक्त थोडे स्टाइल से..