scorecardresearch

पावसाळा विशेष : पाऊस.. कांदाभजी.. मिरची..

पूर्णब्रह्माचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेता यावा यासाठीच पाऊस पडतो की काय..

पावसाळा विशेष : पाऊस.. कांदाभजी.. मिरची..

पूर्णब्रह्माचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेता यावा यासाठीच पाऊस पडतो की काय..

पहिल्या पावसाचे मोत्याचे टप्पोरे थेंब पहिल्या भेटीला येतात ते ताजेपणाचं मूर्तिमंत प्रतीक बनून. त्यामुळेच पहिल्या पावसाचा पहिला थेंब अंगाखांद्यावर झेलणारा प्रत्येक जण त्या ताजेपणानं थरारून गेला नाही तरच नवल. या थेंबांचं स्वागत होतं ते आसमंताला वेडावून टाकणाऱ्या मातीच्या गंधानं. पहिल्या पावसाशी आपलं नातं असं स्पर्श, गंधाचं आहे.
लहान मुलांसारखं दोन्ही हात पसरून, पावसात भिजण्याचा अनुभव ताजातवाना करणारा असला तरी शरीराला आलेला गारवा मागणी करतो ती गरमगरम चहाची. नुसता चहाच नाही तर पहिल्या पावसाबरोबर गरमगरम कुरकुरीत कांदाभजी हवीच आणि तिच्याबरोबर आवाज काढणारी जिभेला चटका देणारी तळलेली हिरवी मिरची विसरून कसं चालेल. या कांदाभजीचं, गरमगरम खमंग बटाटेवडय़ांचं आणि पावसाचं नेमकं काय नातं आहे काय माहीत, पण पावसानं हलका झालेला जीव गरमगरम कांदाभजीत अडकतो खरा. नवा नवा लाडाचा असलेला पाऊस आणि कढईतल्या उकळत्या तेलातून थेट प्लेटमध्ये येणारी आणि त्या वेगाने पोटात जाणारी भजी उन्हाळ्याच्या तीन-चार महिन्यांच्या काहिलीनं तप्त झालेल्या जिवाला जणू काही आता सगळं आलबेल होणार असा दिलासा देत असतात.
या भज्यांचे तर इतक्या ठिकाणी इतके प्रकार असतात की पूछो मत. कुणी कांदा चिरून त्याला मीठ-तिखट लावून तासभर ठेवून दिल्यावर त्या कांद्याला जे पाणी सुटतं त्यात मावेल तेवढंच पीठ घालून खेकडा भजी करतं तर कुणी असला खटाटोप करण्यापेक्षा भरपूर तिखट घालून भजी झणझणीत कशी होतील याकडे लक्ष देतं. कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा भजी हे नेमस्तांचं खाणं. जातीच्या ‘बाहेरखादी’पणा करणाऱ्याचं या नेमस्त भज्यांबरोबर कधीच जमत नाही. त्याला भजी लागतात ती खमंगटमंग आणि झणझणीत. त्यामुळेच या भज्यांच्या पिठात अख्ख्या मिरच्या घालून तळलेली मिरची भजीही त्याच्यासाठी पावसाची रंगत आणखी वाढवते.
जिव्हादेवीला तृप्त करणारी भजी खाल्ल्याबरोबर गरमागरम चहाही हवाच. भज्यांची रंगत, पावसाची संगत आणि सोबतीला वाफाळता चहा.. खरं तर चहा कसा आहे, हा प्रश्न बाहेर चहा पिताना विचारायचा नसतोच. चहा आहे, हेच महत्त्वाचं मग तो पुळकावणी असो किंवा अमृततुल्य. खमंग भज्यांमुळे तेलकटलेली जीभ आणि घसा त्या गरम, गोड चहानं कसा फुलून येतो. पाऊस, गप्पा आणि चहा यांची मग मैफलच जमते.
हे सगळे पहिल्या-दुसऱ्या पावसाचे लाड.. पाऊस मुरायला लागतो तसा आलं घालून केलेला जरासा तिखटपणाकडे झुकणारा चहा हवाहवासा वाटायला लागतो. पावसानं सतत ओलसर झालेला आसमंत, स्वच्छ आंघोळ केल्यासारखे रस्ते, झाडं, डोंगर, पावसात भिजत बसणारे, उडत जाणारे पक्षी हे सगळं बघत हातात आलं घालून केलेला चहाचा कप असताना, लताचा एखाद्या गाण्यात लागलेला सूर ऐकत नुसतं बसून राहणं म्हणजे क्या बात है..
पण असं होत नाही.. ये जालीम जमाना, ये पापी पेट का सवाल आपल्याला घराबाहेर पडायला भाग पाडतात. एखाद्या संध्याकाळी अशा भरल्या पावसात बस रिक्षा मिळत नाही म्हणून तुम्ही कुठेतरी आडोशाला पाऊस थांबायची वाट बघत उभे असता.. सहज बाजूला नजर जाते, खरं तर एक खमंग वास तुमच्या नजरेला तिथे घेऊन जातो.. तिथेच आडोशाला एक गाडी उभी असते. गाडीचा पालक-मालक त्या ढीगभर कणसांच्या मागे दिसत नसतो. दिसत असते ती एक कोळशाची शेगडी. आजूबाजूला तुफान पाऊस पडत असताना तिच्यातले ते पेटलेले धगधगते निखारे नुसत्या नजरेनंच ऊब देतात. त्या निखाऱ्यांवर ती टप्पोरी कणसं भाजली जात असतात. पावसाच्या सुरावटीइतकाच तो कणीस भाजल्याचा वास आपल्या रोमारोमात भिनायला लागतो. भय्या एक भुट्टा दो अशी आपली ऑर्डर जाते. भय्या ते कणीस सोलून भाजायला घेतो. आयुष्य जसं शेकलं जगण्याच्या भट्टीत तसं कणीस शेकलं जातंय असलं काहीतरी भंकस आपल्याला सुचत असतानाच भय्या त्या भाजलेल्या कणसावर कापलेलं लिंबू चोळतो. मग त्या तापल्या कणसालाच हाताने तिखटमीठ चोपडतो आणि छत्रीतून हात पुढे करून म्हणतो ये लो.. आपण ते कणीस हातात घेतो.. दोन्ही बाजूंनी पकडतो आणि त्या कणसाच्या दाण्यांवर आपले पुढचे दात रोवून त्याचा एक चावा घेतो.. गरमागरम, तिखट, खारट, आंबट आणि मक्याच्या कणसाची मूळ गोडसर चव.. आहाहा.. एरवी कधीही कणीस खाऊन बघा.. पावसानं गारेगार झालेल्या वातावरणात हे असं कणीस खाताना परब्रह्म भेटल्याचा साक्षात्कार होतो. पाऊस त्याचसाठी पडतो बहुतेक.
बाहेर धुवांधार पाऊस पडतोय.. तो आता नवलाईचा राहिलेला नाही. अशा वेळी हातात चहाचा कप आणि जोडीला काय हवं माहितेय.. छे छे आता भजीबिजी नको झालीत. अशा वेळी उन्हाळ्यात निगुतीने करून ठेवलेल्या कुरडय़ा पापडय़ा बाहेर निघतात. कितीही तळाव्यात आणि खाव्यात. त्याहीपेक्षा भन्नाट प्रकार म्हणजे भाजलेल्या, सोललेल्या शेंगदाण्यांना तूप-तिखट-मीठ लावायचं आणि सोबत चहा.. कुणीकुणी डाळीच्या पिठात तळलेले शेंगदाणे हवेत म्हणेल. पण खरं सांगू का, तूप-तिखट-मीठ लावलेले खमंग शेंगदाणे आणि ते संपल्यावर बोटांना लागलेलं तूप-तिखट-मीठ.. चहा आणि शेंगदाणे यात टेस्टी काय असा प्रश्नच पडेल..
पाऊस वस्तीला येऊन राहायला लागतो. भाज्या कडाडतात, कधी कधी तर मिळेनाशा होतात, तेव्हा मटकी, मूग, मसूर, चवळी अशा सगळ्या चटकमटक साळकायांची फौजच आपल्या जेवणाचा ताबा घेते. या उसळींच्या सोबतीनं मिसळीचा प्रोगॅ्रमही रंगतो.
पावसाची शालीन लज्जत पाहायला मिळते ती श्रावणात. घरोघरी उपासतापासांच्या जोडीला सात्त्विक आहाराची पंगत रंगायला लागते. मांसाहारच नाही, तर कांदालसूणही हद्दपार होतात. नैवेद्याला पुरणाच्या वेगवेगळ्या प्रकारांबरोबर वेगवेगळ्या खिरी आटायला लागतात. डावीकडच्या चटण्या-कोशिंबिरी-लोणची, उजवीकडच्या भाज्या, झालंच तर पापड-वडय़ासारखी तळणं, लिंबाची फोड, वरणभाताची मूद आणि वर तुपाची धार, पुरणपोळी, कडबू किंवा दिंडं असं सगळं ताट नैवेद्याचं म्हणून समोर येतं तेव्हा तो जगन्नियंताही मनाने तृप्त होत असेल.
एखाद्या रात्री पाऊस कोसळत असतो. लाइट गेलेले असतात. टीव्ही बंद असतो. मेणबत्ती लावून सगळे गप्पा मारत बसतात. आता या अंधारात जेवण तरी काय आणि कसं बनवायचं.. आणि अध्र्या पाऊण तासात समोर येतं, गरमागरम पिठलं भात, तळणीची मिरची आणि सोबतीला पोह्य़ांचा पापड.. पूर्णब्रह्माचा आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेता यावा यासाठीच पाऊस पडतो की काय..

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-08-2014 at 01:11 IST

संबंधित बातम्या