पुणे
ओहोळासारख्या दिसणाऱ्या आणि नेहमी निश्चल असणाऱ्या पाण्याला पावसामुळे गतिमानता प्राप्त झाली होती. लांबवरच्या निळ्या-जांभळ्या डोंगररांगा पाऊसधारा झेलत होत्या. संध्याकाळचं कोवळं ऊन सोनपावलानं खाली उतरत होतं.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा पुण्याहून मुंबईला फोनवर बोलण्यासाठी एस.टी.डी. कॉल करायला लागायचा त्या वेळची. जरा कुठे पाऊस सुरू झाला की ती सेवासुद्धा खंडित व्हायची किंवा फोन लागलाच तर तारसप्तकात बोलायला लागायचं. त्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता; परंतु माझ्या मावस बहिणीला अंजलीला महत्त्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून मी फोन लावला. निरोप सांगून झाल्यावर मी म्हणाले, ‘‘पुण्यात गेले आठ दिवस अगदी मुंबईसारखा बदाबदा पाऊस कोसळतोय. नदीला नक्की पूर येणार.’’

‘‘पूर यायला पुण्यात नदी कुठे आहे?’’
‘‘कमाल करतेस. दरवर्षी सुट्टीला पुण्यात येतेस. लाकडी पुलावरून तर हजारदा गेली असशील. त्या खालची नदी तुला आठवत नाही?’’
‘‘ओह! म्हणजे पुलाखालून जो ओहोळ जातो त्याला तुम्ही नदी म्हणता होय? त्याला पूर येतो म्हणजे काय होतं?’’
तिच्या प्रश्नानं नाही म्हटलं तरी माझा अहं थोडा दुखावलाच. पण तिच्या शब्दात जराही कुत्सितपणा नव्हता. होता तो प्रामाणिक, चौकसपणा. मग मीही तिला एस.टी.डी.च्या मेहरबानीनं रंगवून रंगवून सांगितलं की आमच्या मुठा नदीला पूर आला की पाणी पार ओंकारेश्वराच्या नंदीपर्यंत जाऊन पोचतं. कधीकधी तर पुलाखालच्या मोठय़ा कमानीवर असलेल्या छोटय़ा गोलातून वहायला लागतं. माझे बाबा तर कॉलेजात होते तेव्हा ते आणि त्यांचे मित्र पुलाच्या कठडय़ावरून पुरात उडय़ा मारायचे. शिवाय..’’
पुण्यात आज मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर काही वर्षांपूर्वी अंजली बरोबर झालेला संवाद आठवला आणि लक्षात आलं की अलीकडे काही वर्षांत आपल्या मुठा नदीला पूरच आलेला नाही. आजी म्हणते तसा पुण्याचा पाऊस खरंच कमी झाला की काय? मग पावसाकडे पाहता पाहता मुठा नदीवर बांधल्या गेलेल्या धरणांची आणि बंधाऱ्यांची यादी आठवली. पाऊस कमी वगैरे झाला नाही असं स्वत:ला बजावत पुणेरी पावसाची मी अनुभवलेली, आठवणीत भिजलेली कितीतरी रूपं डोळ्यासमोर उभी राहिली.
दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी आकाशात मळभ दाटून येतं. सोसाटय़ाचा वारा सुटतो. अशा वेळी कधी पाऊस कोसळतो तर कधी नुसताच भुरभुरतो. तरीही वाऱ्याच्या झुळकीबरोबर येणारा मृद्गंध सुखद गारवा घेऊन येतो. हा गारवा कधी चार दिवस टिकतो तर कधी फक्त चार तास. पहिल्या पावसानंतर त्यानं जर खूप दिवस विश्रांती घेतली तर वैशाख वणवातो. पुण्यात फुललेली गुलमोहराची असंख्य झाडं उन्हाचा दाह निवविण्याचा प्रयत्न करत राहतात. कधीकधी मात्र अगदी जूनच्या पहिल्या दिवसापासून पाऊस पडायला लागतो. तो खास पुणेरी पाऊस असतो. बेताबेतानं पडणारा. छत्री जवळ ठेवावी की नाही अशा संभ्रमात टाकणारा. पाऊसधारांच्या हलक्याशा शिडकाव्याने पुणेकरांना निसर्गातील नवता अनुभवायला मिळते ती पुण्याला वेढून राहिलेल्या लहानमोठय़ा टेकडय़ांमुळे. सात जूनला मृग नक्षत्र लागतं. मग व्हेल्वेटी लाल रंगाची झूल पांघरून मृगाचे किडे टेकडीवर फिरायला लागतात. अवघ्या काही दिवसांचे आयुष्य लाभलेले हे किडे मृत होऊन मातीत मिसळतात तेव्हा मन हळहळतं. क्षणभर वाटतं की लालचुटूक रंगाच्या कळ्या इथे तिथे विखुरल्या आहेत. मोरांचा केकारव ऐकताना आपण नक्की शहरात आहोत ना याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो तर क्वचित कधी पिसारा फुलवून नाचणारे मोर दृष्टीस पडले की मनमोराचा पिसाराही आपोआप उलगडतो. कधीकधी धुवाधार कोसळणारा पाऊस कवी कालिदासानं अजरामर केलेल्या आषाढातील पहिल्या दिवसाची आठवण देऊन जातो. फक्त हा दिवस पुण्यामध्ये आषाढातच उगवेल याची शाश्वती नसते.
पावसाळ्यातील शनिवार, रविवारची सुट्टी म्हणजे भटकण्याची आवड असणाऱ्या पुणेकरांना पर्वणीच वाटते. कारण दुचाकीवर स्वार होऊन अध्र्यापाऊण तासाच्या आत ढगांच्या राज्यात उतरता येते. मुळशी परिसरातील धबधबे. सिंहगडावरचे भन्नाट वारे. नदीकाठी झाडीमध्ये लपलेली टुमदार रिसोर्टस. परत टप्प्याटप्प्यावर कणसाच्या गाडय़ा, भजीवडय़ाचे ठेले, शुद्ध शाकाहारी जेवणापासून चिकनमटणाचे धाबे खवय्यांसाठी सज्ज असतात. त्यांची खरी मजा लुटता येते ती पावसात भिजून ओलेचिंब झाल्यावर. रोजच्या रटाळ दिनक्रमातून आणि कामाच्या ताणातून निवांत विसाव्याचे नि पाऊसपक्षी होऊन अंतर्बाह्य़ भिजण्याचे क्षण पावसाळ्यात सापडतात. मग तो पाऊस झिमझिमणारा असो वा धबाधबा कोसळणारा. तो आपलासा वाटतो. आपल्यासाठीचा वाटतो.
शहरात परतल्यावर स्वत:ला कामात जुंपून घेतलं की मग मात्र झिमझिमणारा पाऊस पिरपिरणाऱ्या पोरासारखा वाटायला लागतो. रस्त्यावरचे खड्डे. त्यावर खडी टाकून केलेली तात्पुरती डागडुजी. विखुरलेल्या खडीवरून घसरणारी वाहने. वहातुकीची कोंडी. चौकाचौकांत साचलेलं पाणी. मनात असलेली स्वाइन फ्लूची धास्ती. फुटपाथवर झालेली छत्र्यांची गर्दी. त्यातून वाट काढताना मनमोराचा पिसारा मिटून गेल्याचं जाणवतं. पावसाची अनेक साजिरीगोजिरी रूपं मनात ठसलेली असताना शहरातल्या या साऱ्या गैरसोयी सोसताना पाऊस नको नकोसा वाटायला लागतो.
परवा असाच रिपरिप पाऊस पडत होता. उगाच वहानांच्या गर्दीत फसायला नको म्हणून मी पायीपायी घराबाहेर पडले. लकडी पूल आल्यावर माझी नजर सहज नदीपात्राकडे गेली. काही वर्षांपूर्वी आमच्या मुठा नदीला अंजली ओहळ म्हणाली होती म्हणून माझा अहं दुखावला गेला होता त्याची आठवण झाली. पण धरणांची संख्या वाढल्यामुळे गेले काही वर्ष गावातून वाहणाऱ्या मुठेचे स्वरूप पावसाळ्यातही ओह्ळासारखे राहते, ही वस्तुस्थिती स्वीकारणं भाग पडलं होतं. धरणाच्या परिसरात प्रचंड पाऊस पडला की धरणाची दारं उघडली जातात. नदीला पाणी येतं. तिचं पात्र जरासं हातपाय पसरतं. मग पाण्याच्या नेहमीच्या पातळीपासून काही फूटच वर असलेल्या भिडे पुलावरून पाणी वाहायला लागतं. पाणी सोडणार असण्याची सूचना कधी मिळते. कधी उशिरा पोचते. अचानक पाणी आलं की नदीच्या कोरडय़ा पात्रात उभ्या असलेल्या वाहनांची दैना उडते. गेल्या वर्षी पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे नदीचं अर्धअधिक पात्र भरलं होतं. पाऊस कोसळत असतानाही असंख्य पुणेकरांनी नवा पूल, लकाडी पूल, एस. एम. जोशी पूल, राजाराम पूल अशा ठिकाणी छत्र्या, रेनकोट सावरत धाव घेतली होती. ओंकारेश्वराच्या नंदीपर्यंत पाणी पोचल्याच्या आठवणी कुणी जागवल्या होत्या तर सत्तरी ओलांडलेल्या कुणीकुणी पार पानशेतचं धरण फुटल्याच्या. पाणी आलं तसं ओसरलं. एरवी कोरडं असलेलं नदीपात्र पार चिखलमय झालं. त्यामध्ये पाय रोवून उभ्या असलेल्या खुरटय़ा झाडांच्या फांद्याफांद्यावर आता पाण्याबरोबर वाहत आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या पताका लटकल्या. नदीपात्रात जणू प्लास्टिकचं शेत अंकुरल्यासारखं वाटलं. ठिबकणाऱ्या पावसात पिशव्या वाहून नेण्याचं सामथ्र्य नव्हतं. पावसाचं आणि नदीचं इतकं ओंगळवाणं रूप आठवणंही मला नकोसं वाटलं. तरीही लकडी पूल संपत आला असता माझी नजर अभावितपणे नदीपात्राकडे वळली आणि मी जागच्या जागी थांबून पाहातच राहिले. खाली ओहोळासारख्या दिसणाऱ्या आणि नेहमी निश्चल असणाऱ्या पाण्याला पावसामुळे गतिमानता प्राप्त झाली होती. अध्र्या चड्डीतील तरुण मुलंमुली नदीपात्रातील चिखलात उभं राहून प्लास्टिकचा कचरा गोळा करत होती. आकाशात इंद्रधनूची कमान डौलात उभी होती. एका रांगेत विहरणारे बगळे पाहताना बालकवींच्या कवितेतील ‘कल्पसुमांच्या माळेचा’ भास होत होता. लांबवरच्या निळ्या-जांभळ्या डोंगररांगा पाऊसधारा झेलत होत्या. संध्याकाळचं कोवळं ऊन सोनपावलानं खाली उतरत होतं. मी नदीपात्राकडे परत एकदा पाहिलं. सगळीकडे खळाळता जीवनौघ भरून राहिल्याच्या जाणिवेनं मी हरकून गेले.
छायाचित्र : संदीप दौंडकर