विनायक परब – response.lokprabha@expressindia.com / @vinayakparab
मुंबईतील बिबळ्या गेली अनेक वर्षे मनुष्य-प्राणी संघर्षांमुळे चर्चेत आहे. त्याच्या समस्या मांडण्यासाठी ‘बिबळ्या निघाला दिल्लीला’ नावाचा लघुपटही दरम्यानच्या काळात येऊन गेला. मनुष्य-प्राणी संघर्षांमध्ये खूप सारे आरोप या बिबळ्यावर झाले. माणसाची हत्या करण्याच्या उद्देशानेच तो येतो असा आजवरचा समज होता. मात्र डॉ. विद्या अत्रेयी या वन्यजीव संशोधिकेने महाराष्ट्रातील जुन्नर परिसरात केलेल्या पहिल्या प्रकल्पामध्ये खूप बाबी लक्षात आल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब होती ती म्हणजे बिबळ्या माणसाला घाबरतो. आजवरचे सर्व हल्ले हे बिबळ्याने बसलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तींवर (प्रामुख्याने नैसर्गिक विधीला बसलेले असताना) केले आहेत. कारण आकारावरून त्याला असे वाटते की, हे आपले भक्ष्य असावे. लहान मुलांच्या बाबतीतही आकारावरून झालेल्या समजातूनच हे हल्ले झालेले असतात. डॉ. विद्यांच्या या प्रकल्पाने मनुष्य-प्राणी संघर्षांच्या या चर्चेला एक वेगळेच वळण दिले. रेडिओ टेलिमेट्रीचा वापर त्यासाठी करण्यात आला होता. म्हणजेच बिबळ्याच्या गळ्यात त्याचा ठावठिकाणा सांगणारी कॉलर लावण्यात आलेली होती. उपग्रह किंवा व्हीएचएफद्वारे त्यामुळे बिबळ्या नेमका कुठे आहे आणि तो कुठून, कुठे आणि कसा जातो याची माहिती मिळते. आता अशाच आशयाच्या एका नव्या प्रकल्पाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरुवात झाली असून सावित्री (मादी) आणि महाराजा (नर) या दोन बिबळ्यांना कॉलर लावण्यात आली आहे. हा प्रकल्प २०२० सालीच सुरू व्हावयाचा होता. मात्र टाळेबंदीमुळे अलीकडेच २० फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. सावित्री ३ वर्षांची असून ती साधारणपणे उद्यानाच्या दक्षिण बाजूस अधिक वावरते, तर महाराजा ६ ते ८ वर्षांचा असून त्याचा अधिवास उद्यानाच्या उत्तरेकडील बाजूस अधिक असतो.
दोन महत्त्वाच्या बाबी गेल्या महिन्याभरात त्यांच्या बाबतीत लक्षात आल्या आहेत. त्याबाबत माहिती देताना वन्यजीव संशोधक निकित सुर्वे सांगतात, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमा ओलांडून आजवर तीन वेळा महाराजाने तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये ये-जा केली आहे. त्याने तुंगारेश्वर परिसरास एक भलीमोठी प्रदक्षिणाही घातली. रेडिओ कॉलरच्या माहितीनुसार, त्याने सहा दिवसांत ६२ किलोमीटर्सचे अंतर पार केले. त्यातील ८ तास प्रवास त्याने दिवसा केलेला असून उर्वरित ५४ किमी. प्रवास सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात केला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या विसाव्याची ठिकाणेही या अभ्यासात लक्षात आली. झऱ्याकाठी मोठाल्या खडकांच्या सान्निध्यात त्याला निवांतपणा आवडतो. एखाद्या टेकडीवर चढून जाऊन वरच्या बाजूने निसर्गरम्यता अनुभवणे हे काही केवळ माणसालाच आवडते असे नाही, तर बिबळ्यालाही आवडते. तुंगारेश्वरमधील एका उंच टेकडीवरील सर्वोच्च ठिकाण हे सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेचे त्याचे निवांत ठिकाण होते. त्या ठिकाणाहून दिसणारा सूर्यास्त केवळ नयनरम्यच असतो, त्याचे छायाचित्रही सोबत दिले आहे. जे महाराजाच्या बाबतीत तेच सावित्रीलाही लागू. तिनेही दक्षिणेकडील एक सर्वोच्च ठिकाण निवांत क्षणांसाठी निवडले, त्याही ठिकाणाहून मुंबईचा दिसणारा नजारा केवळ नयनरम्य असाच आहे.
महाराजाच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची बाब संशोधकांना लक्षात आली. त्याबाबत डॉ. विद्या अत्रेयी सांगतात, भिवंडी- चिंचोटी मार्गालगतच रेल्वेमार्गही आहे. हा रेल्वेमार्ग त्याने वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणांहून पार केला. मात्र रस्ता पार करताना त्याने एक विशिष्ट जागाच निवडली. हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी संशोधकांनी कॅमेरा ट्रॅप बसवले आणि त्यात महाराजा नजरबंदही झाला. तुंगारेश्वर भ्रमंतीदरम्यान तो एका मादी बिबळ्याच्या संपर्कातही आल्याचे संशोधकांना त्याच्या पायाच्या ठशांवरून लक्षात आले. मात्र त्याचे तिचे नाते नेमके काय स्वरूपाचे आहे, याचा अंदाज अद्याप संशोधकांना आलेला नाही. संशोधकांचा हा सारा शोध गुप्तहेर शेरलॉक होम्सचीच आठवण करून देणारा आहे. फक्त हे संशोधक शेरलॉक जंगलातील आहेत, इतकेच!
हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या टप्प्यातून महाराजाने रस्ता आणि रेल्वेमार्ग पार केला, याच ठिकाणाहून मल्टिमोडल कॉरिडॉर जाणार आहे. त्यात हायस्पीड रेल्वे, मालवाहतुकीचा विशेष रेल्वेमार्ग, शिवाय महामार्ग यांचा समावेश असणार आहे. या सर्व गोष्टी अस्तित्वात आल्यास बिबळ्यासाठी ते आव्हानच असेल. याचाच संदर्भ देत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम) सुनील लिमये सांगतात, या कॉरिडोरमुळे बिबळ्याची अडचण होऊ नये यासाठी काही ठिकाणी ओव्हरपास, तर काही ठिकाणी अंडरपास म्हणजेच या मार्गाखालून जाणारे विशेष हरित मार्ग सुचविण्यात आले आहेत. या प्रकल्पातील अभ्यासादरम्यान बिबळ्याच्या वावरासंदर्भातील माहिती हाती आल्यानंतर या प्रकल्पांमुळे त्यांची प्राणहानी टाळण्यासाठी निश्चितच मदत होईल. कारण त्यांचा वावर समजून घेऊन उपाययोजना करता येतील. उद्यानाचे विद्यमान संचालक व मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन सांगतात, हा प्रकल्प केवळ येऊ घातलेल्या महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांसाठीच नव्हे तर मनुष्य-प्राणी संघर्षांच्या संदर्भातही तेवढाच महत्त्वाचा आहे. यातून हाती आलेल्या माहितीचा वापर हा संघर्ष कमी करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल, याची खात्री आहे. विविध हल्ल्यांमुळे ‘का उगाच बदनाम?’ अशी अवस्था बिबळ्याची झाली आहे. माणसाने त्याच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणापासून अनेक आव्हाने त्याच्याही समोर आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने त्याच्या संदर्भातील अधिक अभ्यासपूर्ण माहिती समोर येऊन त्याच्या संदर्भातील गैरसमजांना छेदही देता येईल आणि समस्यांवर उपायही शोधता येईल!