आपल्याकडे इतिहास मांडण्याच्या दोन रूढ पद्धती आहेत. एक ललित अंगाने अथवा शाहिरी ढंगानं केलं जाणारं इतिहासकथन आणि दुसरं अस्सल कागदपत्रांतून दिसणारं सत्यकथन. पहिल्या पद्धतीत स्वातंत्र्य घेत भावभावनांच्या आधारे लिखाण असल्यामुळे साहजिकच इतिहासाचा अपलाप होण्याचे प्रमाण अधिक. तर दुसरं टोक हे केवळ कागदपत्रांवर विसंबून राहणारं त्यामुळे सर्वसामान्यांपासून काहीसं दूर असणारं. निनाद बेडेकर हे या दोहोंच्या बरोबर मध्यावर होते. पहिल्या पद्धतीतलं लालित्य त्यांनी स्वीकारलं पण त्यातील अपलापाचा भाग वज्र्य करून दुसऱ्या पद्धतीतला मूळ कागदपत्रांचा अट्टहास मात्र कायम ठेवला. अर्थातच जिज्ञासूंच्या अस्सल कागदपत्रीय माहितीची गरज तर पूर्ण झालीच, पण त्याचबरोबर लालित्यपूर्णतेमुळे सर्वसामान्यांपर्यंतदेखील इतिहास नेमक्या पद्धतीने पोहोचू लागला. निनाद बेडेकरांच्या जाण्याने या दोहोंमधला सुवर्णमध्य सांधणारा दुवा निखळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभियांत्रिकी विद्याशाखेतल्या शिक्षणामुळे एखादी गोष्ट केवळ कोणी तरी सांगितली म्हणून जशी आहे तशी स्वीकारणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच कोणतीही ऐतिहासिक घटना त्यांनी जशीच्या तशी कधीच स्वीकारली नाही. पण केवळ ऐतिहासिक कागदपत्रांचा अट्टहास धरत ते सर्वसामान्यांपासून दूरदेखील गेले नाहीत. त्याला जोड मिळाली ती ओघवती भाषा, प्रभावी वाणी, शांतचित्त आणि मुद्देसूद तांत्रिक मांडणीची. अभिनिवेशाचा लवलेशही नसल्यामुळे त्यांना ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असायची.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या घटनेबाबत कागदपत्रांचा आधार नाही, त्याबाबत आपल्याला माहीत नाही हे सांगताना त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. शेकडो श्रोते तुमच्या ओघवत्या भाषणावर माना डोलवत असताना, स्फुरण पावत असताना एखाद्याला चार स्वरचित कल्पना घुसडण्याचा मोह होऊ शकतो, पण निनाद बेडेकर त्याला अपवाद होते. कागदपत्रांचा योग्य अर्थ लावता यावा म्हणून त्यांनी फारसी, अरबी, उर्दू अशा भाषा अवगत केल्या. पातशाह्य़ांची पत्रे समजावीत म्हणून शिकस्त लिपीदेखील शिकले. पण म्हणून इतिहास संशोधकाची झूल पांघरून त्यांनी उगाच आपलं म्हणणं रेटून नेलं नाही.
निनाद बेडेकरांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे सर्वासाठी असणारी त्यांची उपलब्धता. साधारणत: इतिहास अभ्यासक म्हणजे कागदपत्रांमध्ये गढून गेलेला, लोकांपासून दूर अशीच प्रतिमा असते. पण बेडेकरांकडे कोणीही, केव्हाही, कोणतीही (मग तो अगदीच नवशिका हौशी अभ्यासक असला तरी) शंका घेऊन जाऊ शकत असे. इतक्या मोठय़ा अभ्यासकाकडे गेल्यावर तो सांगेल ते प्रमाण मानायची आपली तयारी असली तरी बेडेकरांची पद्धत मात्र वेगळी असे. आपल्या प्रचंड ग्रंथसंग्रहातून ते नेमकी पुस्तकं शोधून काढायचे आणि आलेल्या अभ्यासकाचं पूर्ण शंकासमाधान कसं होईल हे पाहायचे. गरज पडलीच तर ते त्या नवागत अभ्यासकाला आपल्याकडची पुस्तकंदेखील द्यायचे. त्यांचे अनेकांशी ऋणानुबंध जुळले होते. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये तरुण पिढीचा भाग खूप मोठा होता. किंबहुना तरुण हौशी अभ्यासकांसाठी निनादराव हे हक्काचा माणूस होते.
त्यांच्या याच स्वभावामुळे ते पुण्यात राहत असले तरी महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांशी जवळीक होती. वयाची साठी उलटल्यावरदेखील नव्या पिढीतल्या तरुणांबरोबर गडकिल्ले भटकायचे. ६१ व्या वर्षांत तर त्यांनी एका वर्षांत ६१ किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. पन्हाळा, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग अशा किल्ल्यांवर त्यांनी नव्या दमाच्या किल्लेप्रेमींबरोबर शेकडो वेळा भेटी दिल्या आहेत. त्यांच्याबरोबर गडकिल्ले भटकणे म्हणजे पर्वणीच असायची. एक वेळ ऐकणारा थकेल पण बेडेकर किल्ल्यावर भटकताना आणि बोलताना कधीच थकायचे नाहीत. बेडेकरांच्या अफाट व्यासंगाला भटकंतीची अशी जोड होती. त्यातूनच ‘शर्थीचे शिलेदार’, ‘शिवाजी महाराजांच्या ४० लढाया’, ‘साक्ष इतिहासाची’, ‘थोरले राजे गेले सांगून’, ‘गजकथा’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’ आणि ‘इतिहास उद्गारांचा’ अशी ग्रंथसंपदा साकारली. इतिहासातले चाकोरीबाहेरचे विषय घेऊन त्यांनी त्यामागचे एकदम वेगळे पैलू मांडले. अपरिचित शिवाजी महाराज, पानिपतचा महासंग्राम, प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे, दक्षिण दिग्विजय, दुर्ग माहात्म्य अशा अनेक विषयांवर त्यांनी अक्षरश: हजारो व्याख्यानं दिली आहेत.
निनाद बेडेकर केवळ इतिहासात रमले नाहीत. त्यांनी शिवकाळ आणि वर्तमानकाळाची सांगड घालत टाइमलेस मॅनेजमेंट टेक्निक्स इन शिवकाल या विषयावर अनेक व्याख्यानं दिली, तीदेखील इंग्रजीतून. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील आजही उपयोगी पडणारी तत्त्वे मांडून त्यांनी इतिहासाचं वर्तमानातलं स्थानच अधोरेखित केलं आहे.
कवी भूषण हा निनाद बेडेकरांचा सर्वात लाडका विषय. शिवराज्याभिषेकादरम्यान उत्तर भारतातून आलेल्या या कवीने ब्रज भाषेत रचलेल्या काव्याचा अर्थ उलगडण्याचं काम त्यांनी अतिशय ममत्वानं पूर्ण केलं. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित झालेल्या भूषणाने वर्णिलेले महाराज बेडेकरांनी मूर्तिमंत उभे केले. स्पष्ट आणि खणखणीत आवाजात, योग्य तो चढउतार साधत ते भूषणाचं काव्य मांडत तेव्हा काही क्षणभर कवी भूषणच समोर आहे की काय असा भास होत असे. त्यांच्या जाण्याने भूषणावर इतक्या अधिकाराने बोलणारा आज तरी कोणी नाही.
दुर्गसंवर्धनाबद्दल त्यांच्या भूमिका स्पष्ट होत्या. अभ्यासू होत्या. किमान एक तरी किल्ला पुन्हा पूर्वीसारखा करावा ही त्यांची इच्छा होती. नुकतीच राज्य शासनाच्या दुर्गसंवर्धक समितीवर मार्गदर्शक म्हणून त्यांची निवड झाली होती. मॉडेल फोर्टच्या संकल्पनेला आता कोठे ठोस स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण होत असतानाच अकाली मृत्यूने त्यांना या सर्वापासून दूर नेलं आहे. लोकप्रभा परिवारातर्फे या त्यांना श्रद्धांजली…
सुहास जोशी

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ninad bedekar
First published on: 15-05-2015 at 01:31 IST