News Flash

हॅलो.. हॅलो.. : माझा ‘नो मोबाइल डे’!

आपल्या हातातला मोबाइल हा आता आपला एक अवयवच झाला आहे. तो असेल तर दुसरं काहीही सुचत नाही आणि तो नसेल तर मग विचारूच नका.. पण

| January 9, 2015 01:08 am

आपल्या हातातला मोबाइल हा आता आपला एक अवयवच झाला आहे. तो असेल तर दुसरं काहीही सुचत नाही आणि तो नसेल तर मग विचारूच नका.. पण कधीतरी एक दिवस मोबाइल विसरला तर..? आपलं नेहमीचंच जग आपल्याला वेगळं वाटायला लागतं.

शाळेतले दिवस आठवले. मस्ती-दंगा आणि खूप गप्पा. शाळेच्या सहली आणि घरी येऊन रंगवून सांगितलेल्या गोष्टी. आता तसं होत नाही. कारण खूप गप्पा मारण्यासाठी त्या शिल्लकच राहत नाहीत. 01youthसगळं आम्ही मुलं मेसेजेसद्वारे सतत शेअर करत असतो. काहीही घडलं की लगेच एकमेकांना अपडेट करतो. मग प्रत्यक्ष भेटून बोलायला विषयच उरत नाहीत. सहलीला जाऊन आल्यावर आई-बाबांना काही रंगवूनही सांगता येत नाही, कारण त्यांना फोटोजवरून लगेच कळतं सहलीत आम्ही काय काय बघितलं. तेसुद्धा हल्ली ‘काय बघितलं’ असं विचारण्यापेक्षा ‘फोटो काढले का’ असंच विचारतात. असो! तर आज शाळेतले दिवस आठवण्यामागे तसंच काहीतरी घडलं. आज मी माझ्या ‘बेस्ट फ्रेंड’ मोबाइलला घरीच विसरून कॉलेजला गेले! घरातून निघाल्यावर जेव्हा त्याची जाणीव झाली तेव्हा माझ्यावर जणू आभाळच कोसळलं. मोबाइलशिवाय एक अख्खा दिवस काढायचा या विचारानेच शहारा आला.
सकाळी नेहमीप्रमाणे मी मोबाइलच्या अलार्मने उठले आणि मोबाइल चार्जिंगला लावला. ब्रेकफास्ट करताना मेसेजेस चेक केले. आज दिवसभरात कुठली लेक्चर्स आहेत ते चेक केलं. मोबाइलवर गाणी ऐकत बॅग भरली, आईने भरून ठेवलेला डबा घेतला आणि कॉलेजला जायला निघाले. आई गाणी बंद करायला मोबाइल जवळ गेली तर मी जवळजवळ ओरडलेच ‘मी करते. तू नको करूस!’ आणि मी गाणी बंद करून फोन चार्जिंगवरून काढला. तो बॅगमध्ये ठेवणार तोच आईने मला घराची चावी आणून दिली आणि कधी नव्हे तो मी निघताना मोबाइल टेबलवर ठेवला. आणि तिथेच सगळा घोळ झाला. ती चावी बॅगमध्ये टाकून मी तशीच निघाले या आविर्भावात की मी फोनसुद्धा बॅगमध्ये ठेवला आहे. आई मागून हाका का मारतेय हे कशाला बघतेय मी! ते तर रोजचंच असतं ना! पैसे घेतलेस का? डबा घेतलास का? पास आहे ना अजून? मी लक्ष न देता रिक्षात बसले. स्टेशन तसं घरापासून खूपच जवळ. रिक्षाने अगदी दोन मिनटांत स्टेशनला पोचले, त्यामुळे तेवढा वेळ पैसे काढण्यातच गेला. नेहमीच्या ट्रेनमध्ये कशीबशी चढले आणि नीट जागा बघून उभी राहिले. कारण ट्रेनमध्ये फोनवर मेसेजेस करायचे म्हणजे नीट जागा हवी ना! आणि फायनली किती मेसेजेस आले असतील या विचाराने बॅगमध्ये फोन शोधायला लागले. पाच मिनिटं झाली फोन काही सापडेना आणि तेव्हा अचानक जाणवलं आई आज का हाका मारत होती! मी फोन घरी विसरले होते! आईच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे हा पहिला धडा मी आज फोनच्या अनुपस्थितीत घेतला.
फोन घेण्यासाठी घरी परत जाणं आता शक्य नव्हतं. आजचा पूर्ण दिवस फोनशिवाय काढायचा होता. आणि त्याची सुरुवात ट्रेनमधल्या एक तासाच्या प्रवासाने करायची होती. विचारानेच घाम फुटला. मी काही फक्त मेसेजेस करणार नव्हते, तर मोबाइलवर पुस्तक वाचणार होते. आता किती वेळ माझा फुकट जाणार या विचाराने मी निराश झाले. तितक्यात एका बाळाचं हसणं कानावर पडलं. मी वळून बघितलं तर साधारण एक वर्षांचं बाळ आईच्या कडेवर बसून इकडेतिकडे बघत होतं आणि मध्येच हसत होतं. बघून खूप गंमत वाटली. कानात हेडफोन्स असते आणि हातात मोबाइल असता तर आज कदाचित ही गंमत मी मिस केली असती. मी त्या बाळाशी खेळायला लागले. बाळाचं निरागस हसणं, वेडेवाकडे हावभाव करणं हे सगळं एन्जॉय करता करता अर्धा प्रवास कधी संपला कळलंच नाही. मला सीट मिळाली तसं मी बसून आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करू लागले. ९० टक्के बायका तर फोनमध्येच शिरलेल्या दिसल्या आणि मी परत माझा फोन मिस करू लागले. कोणी गेम खेळत होतं, कोणी गाणी ऐकत होतं, कोणी चॅटिंग! माझ्याच वयाच्या दोन मुली माझ्या समोर बसलेल्या. दोघी मैत्रिणी असाव्यात, कारण त्या मध्ये मध्ये एकमेकींशी बोलत होत्या आणि फोनमध्ये काहीतरी दाखवत होत्या. पण इतर वेळेस त्या दोघीही फोनमध्ये गुंतलेल्या होत्या. तेव्हा परत अचानक जाणवलं (आजच्या दिवसात किती वेळा असं अचानक जाणवणार होतं काय माहीत!). तर, मला जाणवलं की मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही पण हल्ली अशाच वागतो. एकमेकींशी कमी आणि फोनवर जास्त बोलतो. एकत्र असलो की इतरांशी बोलतो आणि वेगळ्या झालो की लगेच एकमेकींशी मेसेजेस वर बोलायला लागतो. सगळ्यांचं हल्ली असंच होतं तर! पूर्वी नव्हतं असं होत. तेव्हा मोबाइल फोन तरी कुठे होते. खरं तर हल्ली आम्ही मुलं जास्त कनेक्टेड असतो, पण ते फक्त व्हर्चुअली. हातात हात घेऊन कनेक्ट कसं व्हायचं ते आम्ही विसरलोय. कारण हातात सतत फोन्स असतात आणि ते आम्हाला २ जी आणि ३ जीद्वारे कनेक्ट व्हायला शिकवतात. असो. मी जरा जास्तच फिलॉसॉफिकल होतेय! कमिंग बॅक टू माय स्टोरी, फायनली मी तो ट्रेनमधला प्रवास संपवला आणि स्टेशनवर उतरले.
चालत कॉलेजला निघाले. रस्ता तोच होता नेहमीचा पण आज नव्याने ओळख झाल्यासारखी वाटत होती. कारण एरवी मोबाइलमध्ये गुंग असलेली मी आज रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे निरखून पाहत होते. बहरलेल्या झाडांकडे, टवटवीत पाना-फुलांकडे बघताना छान फ्रेश वाटत होतं. तेव्हाच मी ठरवलं यापुढे या रस्त्यावरून जाताना रोज असंच हे निसर्गसौंदर्य अनुभवत फ्रेश मूडमध्ये कॉलेजला पोहोचायचं. कॉलेजजवळ पोहोचताच सहज माझं लक्ष गेटशेजारी असलेल्या झाडाकडे गेलं. तिथे एका चिमणीने घरटं बनवलं होतं. घरटय़ात हालचाली वरून दोन-तीन पिल्लं असणार असं वाटत होतं. म्हणून मी निरखून पाहू लागले. आणि पुढची पाच मिनिटं मी त्या घरटय़ाकडे बघत तिथेच उभी राहिले. हे निसर्गरम्य दृश्य मी पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक पाहत होते. कदाचित याआधी निसर्गाशी मैत्री करायला वेळच मिळाला नव्हता. तितक्यात मैत्रिणीची हाक ऐकू आली. तिला बघताच मी भानावर आले आणि कॉलेजमध्ये शिरले. मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी नोटीस बोर्डकडे गेले. परीक्षेबद्दल एक महत्त्वाची नोटीस लावली होती. तिचा फोटो काढावा, म्हणून मी हात खिशात घातला आणि परत एकदा फोनची प्रकर्षांने आठवण झाली. जास्त विचार न करता मी सरळ वही-पेन घेऊन नोटीस बोर्डवरचा मजकूर लिहून काढला.
कॉलेजमध्ये लेक्चरला बसलेले असताना सारखा फोन व्हायब्रेट होत असल्याचा भास होत होता. आज पूर्ण दिवस हे होत राहणार तेव्हा लक्षात आलं. किती आहारी गेले होते मी फोनच्या. तो बरोबर नसताना व्हायब्रेट झाल्याचा भास होणं म्हणजे जरा अतीच नाही का? एकीकडे वाटत होतं लवकर घरी जावं आणि फोन हातात घ्यावा पण दुसरीकडे कसलं तरी वेगळंच समाधान वाटत होतं. मोबाइलपासून लांब असल्याचा, कोणालाही ‘आन्सरेबल’ नसण्याचा, त्या स्क्रीनच्या डोळ्यांना त्रास देणाऱ्या प्रकाशापासून लांब, ‘ताठ मानेनं’ बसण्याचा, चालण्याचा मला आनंद होत होता. कॉलेजच्या कट्टय़ावर बसलेले असताना एक लाजिरवाणी गोष्ट घडली. एका बाईने वेळ विचारली. फोन नसल्यामुळे मी घडय़ाळाकडे बघितलं आणि तेव्हा लक्षात आलं की घडय़ाळ बंद पडलंय! कधीपासून बंद पडलं होतं काय माहीत. कारण घडय़ाळ मी घालत होते खरी, पण वेळ बघण्यासाठी फोनचाच वापर करत होते. त्या बाईने माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं आणि मला लाजल्यासारखंच झालं!
कॉलेज संपल्यावर मी बाहेर मैत्रिणीची वाट बघत उभी होते. बराच वेळ झाला तरी ती आली नाही. म्हणून पीसीओ कडे गेले आणि रिसीव्हर उचलला. तर मैत्रिणीचा नंबरच आठवेना. कारण नंबर पाठ करण्याची वेळ कधी आलीच नव्हती. मोबाइलवर इतकं अवलंबून असण्याचा मला खरं तर तेव्हा रागच आला. घरी यायला निघाले तेव्हा कॉलेज ते स्टेशन रस्ता सकाळचाच होता. पण तरी संपूर्ण वेगळा दिसत होता. अशा वातावरणात एखादी कविता सुचतेय की काय असं वाटत होतं. पण ती लिहून ठेवायला परत हातात मोबाइल नव्हता. सवयच झाली होती मला सगळं मोबाइलच्या ‘नोट्स’मध्ये लिहून ठेवायची. गाण्याच्या लिरिक्सपासून, चेकलिस्टपासून पासवर्ड्सपर्यंत सगळंच. कविता करायचा मोह आवरता घेऊन मी निसर्गाचं ते सुंदर रूप डोळ्यांमध्ये साठवत स्टेशनवर पोहोचले.
ट्रेनची वाट बघत, आज दिवसभरात काय काय घडलं ते आठवत मी प्लॅटफॉर्मवर उभी होते. ट्रेनचा हॉर्न लांबून ऐकू आला तसं मी थोडी मागे सरकले. पण एक मुलगी कानात हेडफोन्स घालून फोनमध्ये बघत तशीच प्लॅटफॉर्मच्या टोकाला उभी होती. इतर बायका तिला ओरडून मागे होण्यासाठी सांगायला लागल्या, पण तिला काही ऐकूच येत नव्हतं. ट्रेन जवळ आली तशी मी हिम्मत करून पुढे गेले आणि तिला मागे खेचलं. आम्हा दोघींच्याही हृदयाचे ठोके वाढलेले, छातीत धडधडत होतं. एकमेकींकडे पाहून आम्ही किंचित हसलो आणि आपापल्या मार्गाने निघालो. मी ट्रेनमध्ये चढले तरी ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. कधी काळी अशी एक घटना माझ्याबरोबरसुद्धा घडली होती हे आठवलं आणि स्वत:लाच एक प्रश्न विचारावासा वाटला. आपण फोनमध्ये इतकं का गुंतलेले असतो की इतर कसलं भानच राहत नाही? अगदी स्वत:च्या जिवाचंही नाही? विचार करून सुन्न व्हायला झालं. या विचारातच गर्क, मी ट्रेनचा प्रवास संपवून घरी कधी पोहोचले कळलंच नाही.
घरात शिरताच आई म्हणाली, अगं तू फोन विसरून गेलीस इथेच सकाळी. आणि सहज माझ्या तोंडून शब्द निघाले ‘बरं झालं!’ या गोष्टीचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. सकाळी फोन विसरले म्हणून हवालदिल झालेले मी आत्ता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते! तरी फोन दिसताच मी तो हातात घेतला. मेसेजेस बघितले. पण आता मी भानावर आले होते. फोन परत ठेवून दिला आणि आईबरोबर गप्पा मारायला गेले. आज माझ्याकडे तिला सांगण्यासारखं खूप काही होतं. जेवतानाही आज मी आई-बाबांबरोबर खूप गप्पा मारल्या. आज घडलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा रंगवून सांगितल्या. अगदी शाळेत असताना सांगायचे ना तशा. आज खूप दिवसांनी मला माझ्या डायरीची आठवण झाली. फोन दूर कुठे तरी चार्जिगला लावून मी आत्ता डायरीमध्ये मनातलं सगळं लिहून काढलंय. रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. खरंच, स्वत:ला चार्ज करण्यासाठी मोबाइलशिवाय एक दिवस तो बनता है! बरोबर ना?
तेजल शृंगारपुरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2015 1:08 am

Web Title: no mobile day
टॅग : Story
Next Stories
1 फॅशन पॅशन : पेहराव कसा करू?
2 ट्रॅव्हलॉग : परंपरेचे ‘आमिष’
3 पर्यटन : ख्रॉनिंगन.. पुरातन तरीही आधुनिक
Just Now!
X