lp11दिवाळीची चाहूल लागली की भरभरून खरेदी करणाऱ्या ग्राहकराजा आता ऑनलाइन बाजारपेठा खुणावू लागल्या आहेत. घरबसल्या, हवं तसं, स्वस्त आणि मस्त शॉपिंग करण्याच्या या फंडय़ामुळे आणि ऑनलाइन बाजारपेठेच्या आक्रमक शैलीमुळे पारंपरिक बाजारपेठेची गणितंच बदलण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वीची टीव्हीवरील एक जाहिरात…
कॅफेटेरियात बसून वायफायचा वापर करत ऑनलाइन शॉपिंग करणारा मॉडर्न तरुण. शेजारी बसलेला मित्र विचारतो, ‘‘ऑनलाइन शॉपिंग करतोयस, पण तो एमपी थ्री प्लेअर आवडला नाही तर? आणि त्यात काही प्रॉब्लेम असेल तर?’’
शॉपिंग करणारा तरुण त्याला सांगतो, ‘‘मग काय, बदलून घ्यायचा.’’
सध्या गाजत असलेली एक महत्त्वाची जाहिरात..
बायकोच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून नवरा ऑनलाइन शॉपिंगद्वारे गिफ्ट मागवतो. ते तिला द्यायला गेल्यावर त्या दिवशी तिचा वाढदिवस नाही हे लक्षात येतं. लगेचच तो पॅक तो परत करतो ऑनलाइन शॉपिंगची सेवा देणाऱ्या कंपनीला..
या दोन जाहिराती आपल्याकडील ऑनलाइन शॉपिंगमधला महत्त्वपूर्ण बदल ठळकपणे दाखवून देतात. एखादी वस्तू विकत घ्यायची, तीदेखील प्रत्यक्षात न पाहता, ती वस्तू दिसते कशी आहे, किंमत काय आहे वगैरे सारी माहिती केवळ त्या वेबसाइटवर पाहिलेली. त्या वस्तूला हातदेखील लावलेला नाही. पैसे आधी भरायचे, वस्तू येणार का, आलेली वस्तू आवडणार का, नाही आवडली तर काय करायचं, असे हजारो प्रश्न. हे सारं भारतीय ग्राहकाच्या टिपिकल आणि परंपरागत मानसिकतेला अजिबात झेपणारं नव्हतं. तरीदेखील आज भारतातील ई-कॉमर्समध्ये तब्बल ८८ टक्के इतकी वाढ झाली आहे. ही आकडेवारीच आपल्या बाजारपेठेत ऑनलाइन शॉपिंग किती आणि कसं रुजलं आहे याची जाणीव करून देते. दुकानात जायचं, वस्तू हाताळायची, चार पैशांची घासाघीस करायची आणि वस्तू विकत घ्यायची, या पारंपरिक खरेदीकडून आजच्या ग्राहकांचं शॉपिंग दुकानातून बाहेर पडून घरातील डेस्कटॉपच्या विंडोमध्ये किंवा मोबाइलमध्ये विसावलं आहे.
ऑनलाइन शॉपिंगच्या जगात सुरुवातीच्या काळात ऑनलाइन पोर्टलची सुरुवात पुस्तकविक्रीतून झाली, भारतही काही त्याला अपवाद नव्हता. आज टप्प्याटप्प्याने हा सारा रोख इलेक्ट्रॉनिक्स, लाइफ स्टाइल उत्पादने आणि आता तर थेट आपल्या स्वयंपाकघरातच घुसू पाहत आहे. पारंपरिक पद्धतीने अनेक गोष्टी करण्यावर भर असणाऱ्या आपल्या देशात अशा प्रकारे वस्तूंची खरेदी-विक्री ऑनलाइन पद्धतीने करणे हे खरं तर पचनी पडणारं नव्हतं. तरीदेखील आज ऑनलाइन हा शॉपिंगमधला परवलीचा शब्द झाला आहे. हे नेमकं कसं साध्य झालं? शोरूममधील खरेदीची गर्दी ऑनलाइन पोर्टलवर कशी वाढली आणि आजदेखील कशी वाढत आहे?

ई-कॉमर्सचा पसारा
‘इंडस्ट्री बॉडी अ‍ॅसोचेम’च्या सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन खरेदीसाठी असणारी बहुपर्यायी साधनं आणि कॅश ऑन डिलिव्हरी यामुळे भारतीय ई-कॉमर्स मार्केट २०१३ मध्ये ८८ टक्क्यांवर गेलं आहे. भारतीय
ई-कॉमर्स मार्केट २००९ मध्ये २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं होतं. २०१२ मध्ये ते ८.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं. त्यानंतरच्या एका वर्षांत ते थेट १६ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचलं आहे.
ई-कॉमर्सचा पसारा वाढण्यात आकर्षक सवलती, पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि ऑनलाइन साइटवर असलेले मुबलक पर्याय यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता असा क्रम लागतो.

मोबाइल विकत घेण्यापूर्वी भारतीय ग्राहक त्या मोबाइलची तुलना किमान इतर सहा मोबाइलशी करतो आणि तेही सर्व काही घरबसल्या, असे अलीकडेच एका सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ऑनलाइन शॉपिंग पोर्टलने दिलेली सुविधा हे त्या मागचं महत्त्वाचं कारण आहे. अनेक कंपन्यांची उत्पादनं एकाच वेळी तुलनात्मक पद्धतीने अनेक पोर्टल्सवर पाहता येणं हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक. दुसरं असं की, वस्तू खरेदीची सोपी प्रणाली. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगसाठी संगणकतज्ज्ञ असण्याची गरज नव्हती. त्याचबरोबर वस्तूचे पैसे देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व व्यवहारांतील lp108पारदर्शकता. वस्तू खरेदी केल्यापासून ते तुमच्या हातात येईपर्यंत सर्व टप्प्यांवर विकसित केलेली संदेशप्रणाली. त्यामुळे ऑनलाइन खरेदीतील ग्राहक आश्वस्त झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक प्रकारच्या सवलती अर्थात सेल. म्हणजेच ग्राहकाला हवं तेव्हा, हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणी, हवी ती वस्तू, हव्या त्या पद्धतीने खरेदी करता येणे हा ऑनलाइन शॉपिंगचा मूलभूत फंडा. त्याला जोड मिळाली ती पैसे देण्यासाठीचे अनेक पर्याय, कर्ज सुविधा, किमतीत सवलत आणि सेल यांनी. आजचं ऑनलाइन शॉपिंग या पाश्र्वभूमीवर विकसित झालं आहे आणि आता ते झपाटय़ाने सर्वच क्षेत्रांत घुसू पाहत आहे.
एके काळी केवळ पुस्तक, इलेक्ट्रॉनिक्सवर असणारा रोख आज लाइफ स्टाइल उत्पादनांकडे वळला आहे. कपडे आणि दागिने हा भारतीय महिलांचा दीर्घकाळ चालणारा आणि सर्वात आवडीचा खरेदी पर्याय. कापडाचा पोत, डिझाइन अशी हजारो प्रकारे चिकित्सा करून मगच त्यांची खरेदी पूर्ण होते. त्यामुळे या वस्तू भारतात ऑनलाइन विकल्या जाणं अशक्यच आहे, असादेखील एक सूर सुरुवातीच्या काळात होता. मात्र आज त्यावर वेगवेगळे पर्याय, क्लृप्त्या शोधून ऑनलाइन कपडेविक्रीतदेखील ऑनलाइन पोर्टल यशस्वी होताना दिसत आहेत. नुकतीच आलेली कपडे विकणाऱ्या एका पोर्टलची जाहिरात आठवली तर हे अगदी सहज लक्षात येईल. ऑर्डर दिलेले कपडे घेऊन संबंधित पोर्टलचा प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुम्हाला कपडे दाखवतो. कपडे आवडले तर रक्कम देऊन व्यवहार पूर्ण करायचा अन्यथा वस्तू परत पाठविण्याची मुभा असते. अर्थातच हे सारं भारतीय मानसिकतेला धरून डिझाइन केलेलं व्यापाराचं नवं मॉडेल आहे.

तरुणाईचे प्राधान्यक्रम
ऑनलाइन शॉपिंगमध्ये तरुणाईची संख्या मोठी असली तरी त्यांचे प्राधान्यक्रमदेखील वेगवेगळे आहेत. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् अ‍ॅण्ड रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार ५७ टक्के तरुण हे ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतात. या ५७ टक्क्यांमध्येही जवळपास ९० टक्के तरुण पारंपरिक खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंग साइट्स सुचवतात. तरुणाईमध्ये फ्लिपकार्ट ही साइट अधिक लोकप्रिय असल्याचं त्या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे. या सर्वेक्षणामध्ये जवळपास हजार मुलांचा समावेश होता. सर्वेक्षणानुसार, ४० टक्के तरुणाई ही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी, तर बिल भरणं किंवा रिचार्ज करणं यासाठी ३७ टक्के तरुण ऑनलाइन सेवांचा वापर करतात. खाण्यापिण्याच्या ऑर्डर्स देण्यासाठी एक टक्का तरुण अशा साइट्सचा वापर करतात.

साहजिकच कपडेविक्रीतील या यशानंतर ऑनलाइन पोर्टल्स वळणार आहेत ते किचनकडे. स्वयंपाकघरातील भांडय़ाकुंडय़ांपासून ते थेट किराणा मालापर्यंत साऱ्या वस्तू ऑनलाइन उपलब्ध करणं हा भविष्यातील सर्वात मोठा ऑनलाइन व्यापार राहणार आहे. कारण या सेगमेंटवर असणारं महिला वर्गाचं वर्चस्व आणि सातत्यानं खरेदी करायची गरज या दोन गोष्टी उपयुक्त ठरणार आहेत. अर्थात सर्वेक्षणांनी हे दाखवून दिले आहे, की गेल्या काही वर्षांत ऑनलाइन शॉपिंगमधील महिलांचा सहभाग बराच वाढला आहे आणि महिला आणि लहान मुलं हीच मार्केटची दिशा ठरवितात हे यापूर्वीच सिद्ध झालं आहे. त्यामुळेच महिलांचा सर्वात मोठा वीक पॉइंट असणारी दागिने खरेदीदेखील ऑनलाइन झाली तर नवल असणार नाही, किंबहुना नुकतीच फ्लिपकार्टने पीसी ज्वेलर्सबरोबर केलेली व्यावसायिक भागीदारी ही त्याचंच द्योतक म्हणावी लागेल.
भारतात खूप झपाटय़ाने शहरीकरण होत असलं तरी देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सुविधा उपलब्ध असतेच असे नाही, पण ग्रामीण आणि निमशहरी भागांत मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा वापरणारे स्मार्ट युजर खूप आहेत, तर दुसरीकडे मोठय़ा शहरांमध्ये तर मोबाइल स्मार्ट युजर नसणे हेच मागासलेपणाचं लक्षण असल्यासारखं आहे. अर्थात हा संपूर्ण वर्ग ऑनलाइन शॉपिंगचा सर्वात मोठा संभाव्य ग्राहक आहे. म्हणूनच सर्वच ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्सनी मोबाइलवरून आपलं पोर्टल त्वरित अ‍ॅक्सेस कसं करता येईल याची काळजी घेतली आहे. घरातील संगणकावरून खरेदी करण्याची मर्यादादेखील आता राहिली नाही. त्यामुळेच ऑनलाइनचा व्यवहार हा
ई-कॉमर्स म्हणून ओळखला जात असला तरी आता मोबाइलच्या वापरामुळे हा सारा व्यापार एम-कॉमर्स म्हणून ओळखला जात आहे, किंबहुना एम-कॉमर्स हाच भविष्यातील ऑनलाइन शॉपिंगचा मूलाधार असणार आहे.

ऑनलाइन ग्राहकपेठांचा खरेदी महोत्सव
चौकाचौकातून आणि वर्तमानपत्रातून ग्राहकपेठांच्या खरेदीपेठांच्या जाहिराती सुरू झाल्या की दिवाळीची चाहूल सगळ्या बाजारपेठेला लागते. आज ऑनलाइनच्या बाजारपेठेत देखील दिवाळीची चाहूल ही अशीच वेगवेगळ्या सेलमुळे होताना दिसत आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडिल अशा आघाडीच्या ऑनलाइन पोर्टल्स्नी सध्या ऑनलाइन सेलचा धमाकाच सुरू केला आहे. फ्लिपकार्टने नुकताच ‘द बिग बिलिअन डे’ नावाने एक दिवस सवलतींची बरसात केली होती, तर स्नॅपडिलवर ‘दिवाळी बंपर सेल’ सुरू आहे. हीच परिस्थिती जवळपास सर्वच ऑनलाइन पोर्टलवर सुरू आहे. अमेझॉनने तर या सर्वावर कडी करीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिशन टू मार्स, ‘सेलिब्रेशन धमाका’ नावाने आठवडाभर सेल सुरू केला होता. अ‍ॅमेझॉनला भारतात आपले पाय रोवायचे असल्यामुळे त्यांनी येथील ग्राहकांना भावनिकदृष्टय़ा आकर्षित करण्यासाठीच मंगळ मोहिमेचा वापर त्यांनी केला आहे. त्यादरम्यान त्यांनी आपल्या वेबसाइटवर जगभरातील बॅ्रण्डचा भडिमार केला आहे आणि हा सेल संपताच पुन्हा दिवाळी धमाका वीक सुरू होणार आहे. एकंदरीतच प्रत्येक पोर्टल येनकेनप्रकारे ग्राहकाला आकर्षित करू पाहात आहे.

ऑनलाइन शॉपिंग हा आज जरी अनेकांचा परवलीचा शब्द झाला असला, तरी त्याला अनेक पैलू आहेत. केवळ वस्तूची खरेदी-विक्रीची सुविधा हे जरी त्याचं बाह्य़ रूप असलं तरी त्यामागची अर्थव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था आणि बँकिंग प्रणाली या सर्वाचा आवाका प्रचंड प्रमाणात विस्तारला आहे. देशाची मध्यवर्ती बँक आणि व्यापार मंत्रालयाने हाती घेतलेल्या सुधारणा हे त्याचंच द्योतक म्हणावे लागेल.
आपल्याकडे सुरुवातीच्या काळात केवळ कॉपरेरेट बँका, खासगी बँका ऑनलाइन बँकांची सुविधा देत असत. पण ऑनलाइन बँकांच्या माध्यमातून होणारा हा व्यवहार काही ठरावीक वर्गापुरताच (कॉपरेरेट क्षेत्रात काम करणारे आणि उच्च वर्गीय) मर्यादित होता. तर ज्यांच्याकडे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते, असा देशातील एक मोठा वर्ग आणि कोणत्याही स्वरूपातील बाजारपेठेतील संभाव्य ग्राहक हा या सर्वापासून काहीसा लांबच होता. ऑनलाइन शॉपिंगची सुविधा या सर्वांपर्यंत पोहोचणंदेखील गरजेचं होतं. परिणामी अनेक सरकारी बँकांनीदेखील आपल्या ग्राहकांना ऑनलाइन सुविधा देणं सुरू केलं. अर्थात हे करण्यामागे आणखी काही घटकदेखील कारणीभूत होते. त्यापैकीच एक म्हणजे देशातील सर्वच व्यवहार हे बँकांमार्फत व्हावे, जेणेकरून काळ्या पैशाला आळा बसेल आणि व्यवहारातील पारदर्शकता जोपासली जाईल. दुसरे म्हणजे या सर्व व्यवहाराला मुख्य व्यवस्थेत आणता येईल आणि या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राखणं शक्य होईल. नेमका हाच मुद्दा रिझव्‍‌र्ह बँकेने उचलून धरला. सर्वच बँकांना ग्राहकांना ऑनलाइन सुविधा देणं भाग पाडलं आहे.

सुरक्षित ऑनलाइन व्यवहार
इंटरनेटवर खरेदी करताना सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यासाठी कायमच काही गोष्टींची आवर्जून काळजी घेतली पाहिजे. एकतर आपण कोणत्याही साइटवर जातो तेव्हा ती खरी आहे का, हे तपासून पाहणं आवश्यक असतं. कारण कोणतीही साइट तशीच्या तशी तयार करणं हे या क्षेत्रात गैरव्यवहार करणाऱ्यांना सहज शक्य असतं. म्हणून कोणत्याही साइटवर जाताना त्या साइटचा पत्ता टाइप करताना फक्त www टाइप करणं पुरेसं नसतं, तर https:// टाइप करणं आत्यंतिक गरजेचं असतं. या http मध्ये s आणि :// खूप महत्त्वाचं असतं. तो टाइप करायला अजिबात विसरू नका. समजा, तुम्हाला स्टेट बँकेच्या साइटवर जायचं आहे, तर यूआरएलवर https://www.sbi.co.in/ टाइप केल्यावर जी साइट उघडेल तिथे यूआरएलवर https://www.sbi.co.in/ च्या अलीकडे state bank of india (in)
ही अक्षरं हिरव्या रंगातच असायला हवीत. शिवाय त्यांच्या आधी कुलपाचं चिन्ह असायला हवं. अर्थात एवढय़ाच गोष्टींमुळे ती साइट सुरक्षित आहे असं मानता येणार नाही. त्या कुलपावर क्लिक केल्यावर खाली जी चौकट येईल तिच्यावर जे ऑप्शन येतील, त्यात मोअर इन्फर्मेशनवर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यावर जी चौकट येईल त्यात व्ह्य़ू सर्टिफिकेट असा एक ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करा. त्यामध्ये व्हॅलिडिटी डेट्स दिलेल्या असतील. त्या अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत दिलेल्या असतात. म्हणजे २-११-२०१४ ते २-११-२०१६. ही तारीख तुम्ही ज्या दिवशी ही साइट बघत असाल त्याच्या आधीची असेल तर चुकूनसुद्धा व्यवहार करू नका.

र्थात केवळ अशा सुविधा देऊन काम होणार नव्हतं. एकदा का सुविधा निर्माण झाली, की त्याचे चांगले-वाईट परिणामदेखील आपसूकच येतात. ऑनलाइन व्यवस्थेतील धोकेदेखील कमी करणं आणि त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तेच काम रिझव्‍‌र्ह बँकेने पुढाकार घेऊन संबंधित बँकांना जबाबदारी घेणं बंधनकारक केलं. त्यामुळेच ऑनलाइन व्यवहारात काही अडचणी आल्या, तंटा निर्माण झाला, हॅकिंगमुळे ग्राहक लुबाडला जात असेल तर अशा प्रत्येक वेळी रिझव्‍‌र्ह बँकेने वेळोवेळी हस्तक्षेप केला आहे. मात्र तरीदेखील सध्या ऑनलाइन शॉपिंगमध्ये सुरू असणाऱ्या एका सुविधेने काही उद्दिष्टांना धक्का बसत आहे. ते म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. एखाद्या वस्तूसाठी पैसे भरायचे आणि मग त्याची वाट पाहायची त्यापेक्षा वस्तूची मागणी नोंदवायची आणि वस्तू दारात आल्यावर पैसे द्यायचे, हे कधीही कोणत्याही ग्राहकासाठी अधिक सुखकारक असते आणि हीच भारतीय मानसिकतादेखील आहे. त्यामुळेच अनेक ऑनलाइन पोर्टल्सनी कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा दिली. मात्र सर्व व्यवहार बँकांमार्फत व्हावेत आणि काळ्या पैशाच्या वापराला आळा बसावा या सूत्राला त्यामुळे बाधा येत आहे.
एखादी इंडस्ट्री मोठय़ा प्रमाणात विकसित होत असताना, त्यासाठी शासकीय नियमांची कायद्याची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात असते. आजवरच्या पारंपरिक व्यापार व्यवस्थेसाठी सरकारी कायदेकानून होते. पण नव्याने विकसित झालेल्या ऑनलाइन व्यवस्थेसाठी नियम होण्यासाठी बराच काळ जावा लागला. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र जसजसं विकसित होत गेलं, तसतसं ही गरज आणखीन तीव्र झाली. पण त्यासंदर्भात कायदा होण्यासाठी २००० साल उजाडावं लागलं. आज १४ वर्षांनंतर परिस्थिती खूपच बदलली आहे. या पाश्र्वभूमीवर मूळ कायद्यातील त्रुटी दूर करणं हेदेखील गरजेचं ठरतं. तेच करायची आता वेळ आली असल्याचं नुकतंच सरकारने उचललेल्या पावलांवरून दिसून येतं.नुकतेच केंद्रीय दूरसंचारमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ई-कॉमर्सच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान कायद्यात अनेक बदल करून ऑनलाइन व्यवहारातील कायदेशीर त्रुटी/ अडचणी दूर करण्याचे संकेत दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक व्यवहारातील त्रुटी दूर करण्याचं कारण स्पष्ट करताना भविष्यातील ऑनलाइन क्षेत्रातील वेगाने होत असलेली वाढ हे कारण आता शासनाकडूनच दिले जात आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्सबाबत कायदेशीर विश्वासार्हता वाढावी अशी जागतिकदृष्टय़ा स्वीकारार्ह नियमावली तयार करण्याकडे आपला कल असल्याचं जाणवतं. अर्थात हीच भूमिका युनायटेड नेशन्सदेखील घेतली असून त्यांनी मॉडेल लॉ ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स तयार केला आहे.
कम्युनिकेशन कन्व्हर्जन बिलाच्या माध्यमातून आपल्या २००० सालच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात मूलभूत बदल करण्यासाठी सरकारने एक विशेष समितीच स्थापन केली. दूरसंवाद मंत्रालय हा कायदा येत्या हिवाळी आधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. इतकेच नाही तर तब्बल ३५ हजार कोटी रुपये खर्चून देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा पुरविण्याची योजना दूरसंचार मंत्रालयाने आखली आहे.

ऑनलाइन मक्तेदारी
ऑनलाइन शॉपिंगला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यावर ऑनलाइन बाजार व्यवस्थेने गेल्या वर्षभरात आपली मक्तेदारी निर्माण करायची सुरुवात केली आहे. एखादं विवक्षित उत्पादन आता थेट फक्त ऑनलाइन पोर्टलवरच लाँच होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते अन्यत्र कुठेही उपलब्ध नसतं. मोटोरोलाचा मोटो जी, ई हे मोबाइल याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. आणि मोटो जी/ई ला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहिल्यावर ही खेळी यशस्वी झाल्याचं देखील सिद्ध होत आहे. परिणामी मागील महिन्यात आलेला अ‍ॅण्ड्रॉइड वन हा मोबाइलदेखील केवळ ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यातील ऑनलाइन मक्तेदारीची ही सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ई-कॉमर्सचं भारतातील अस्तित्व वाढतं आहे हे तर आतापर्यंत अनेक सर्वेक्षणांनी सिद्ध केलं आहे. पण त्यापलीकडे जाऊन त्यातून पर्याप्त नफा मिळविता येतो का? एखादी वस्तू विकण्याचा आणि ती ग्राहकापर्यंत योग्य वेळेत पोहोचविण्यासाठी आज बहुंताश पोर्टल मोफत सुविधा पुरवीत आहेत. मग या सर्वामध्ये पुरवठादार कंपनीचा फायदा नेमका कशात आहे? तर याचं गमक दडलं आहे ते डेटा बँकिंगमध्ये. ग्राहकाचा र्सवकष डेटा ही यापुढच्या काळात या व्यवस्थेतील श्रीमंती आहे. त्यालाच या व्यवसायाच्या परिभाषेत बिग डेटा म्हटलं जात. ग्राहकाला नेमकं काय आवडतं, कोणत्या वस्तू खरेदी करण्याकडे त्याचा कल आहे, काय स्वरूपाचा व्यवहार तो करतो हे सारं या डेटा बँकेत दडलेलं असतं. अनेकांना प्रश्न पडतो की हे सारं माहीत असून करणार काय, तर याचं सरळ साधं उत्तर आहे ते म्हणजे मार्केटिंग. ग्राहकापर्यंत आपली माहिती योग्य आणि आकर्षक पद्धतीने पोहोचवणं, त्याला आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करणं, विवक्षित ग्राहकाने संबंधित पोर्टलवर लॉगइन केल्यावर त्याच्या आवडीनिवडीच्या उत्पादनांची माहिती व्यवस्थित पुरवणं आणि ग्राहक आपल्याच पोर्टलवर आधिकाधिक खरेदी कसा करेल यासाठी त्याला उद्युक्त करणे हाच या बिग डेटाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे.

घरबसल्या सेवा :
वस्तूंच्या खरेदी-विक्रीसोबतच आता काही सेवाही ऑनलाइन मिळू लागल्या आहेत. बुक माय शो, मेक माय ट्रिप, ९९ एकर्स, गोआयबीबो, पॉलिसीबाझार अशा काही वेबसाइट्स महत्त्वाच्या आणि मनोरंजनाच्या सोयी पुरवतात. बुक माय शो सिनेमांच्या तिकिटांची सेवा पुरवते. सिनेमांची आगाऊ तिकिटं काढण्यासाठी लांबलचक रांगा टाळण्यासाठी ही साइट फायदेशीर ठरते. ‘मेक माय ट्रिप’ या साइटमुळे सुट्टीतल्या सहलीच्या बेताला चार चाँद लागतात. ठिकाण, खर्च, राहण्या-खाण्याची सोय या सगळ्याविषयी यामध्ये माहिती दिली जाते. तसंच बुकिंगही केलं जातं. ‘९९ एकर्स’ ही साइट भाडय़ाचं घर, तयार नवीन घर, बांधकाम सुरू असलेलं घर, पेइंग गेस्ट होम अशी वेगवेगळ्या प्रकारची घरं ऑनलाइन शोधण्यात मोठी मदत करते. विमानाचं तिकीट बुकिंग करण्यासाठी ‘गोआयबीबो’ ही साइट म्हणजे उत्तम पर्याय. आता एका क्लिकवर कार, हेल्थ, टू व्हीलर, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी ‘पॉलिसीबाझार’ या साइटवर काढून मिळतात.

आज अनेक छोटय़ा मोठय़ा ऑनलाइन व्यापार व्यवस्थांचं एकत्रीकरण होताना दिसतं. एखादं मोठं पोर्टल छोटय़ा पोर्टलला विकत घेतं तेव्हा हे विकत घेणं म्हणजे कागदोपत्री खरेदी व्यवहार होत असला तरी महत्त्वाचं असतं डेटा मिळवणं. त्यामुळे फ्लिपकार्टने मायंत्रा विकत घेणं हा जरी काही कोटींचा व्यवहार असला तरी त्या पलीकडे जाऊन मायंत्राचं नेटवर्क आणि डेटा हा फ्लिपकार्टसाठी अधिक महत्त्वाचा आहे. किंबहुना अशा प्रकारच्या डेटावर आधारित व्यवसाय करणं हा भविष्यातील सर्वात मोठा व्यवसाय ठरणार आहे. जागतिक स्तरावर बिग डेटा मार्केटची उलाढाल २०१५ पर्यंत तब्बल २५ बिलिअन डॉलरच्या आसपास जाण्याची शक्यता नासकॉम-क्रिसिलच्या अहवालात नोंदविण्यात आली आहे. असं असलं तरी आज भारतात कार्यरत असणाऱ्या अनेक ई-कॉमर्स कंपन्या फार मोठय़ा प्रमाणात वापर करताना दिसत नाहीत असं अनेक तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. किंबहुना भारतात बिग डेटाच्या वापराची आत्ता कुठं थोडी फार सुरुवात झालेली आहे.
थोडक्यात काय तर बिग डेटा हा या पुढच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा सर्वात कळीचा घटक ठरणार आहे. देशात असा सर्वव्यापी डेटा असणारी अनेक पोर्टल्स् आहेत. साहजिकच त्यांना मागणी आहे आणि हाच येथील पारंपरिक व्यापाराला धक्का देणारा आहे. मग होतंय काय तर हे सारेच परंपरागत व्यापारी आज ऑनलाइनच्या जाळ्यात घुसायचा प्रयत्न करीत आहेत.
प्रस्थापित ऑनलाइन पोर्टलशी टायअप, विशेष सवलत अशा अनेक माध्यमांतून हे व्यावसायिक आपलं उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. इतकेच काय तर आजवर ऑनलाइन व्यवसायाला विरोध करणारे मेगा स्टोअर्सदेखील प्रस्थापित पोर्टल्स्बरोबर जात आहेत. त्यांना हे करावंच लागणार आहे, अन्यथा त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी ही संधी घेणार आहेच.

lp12संपूर्ण माहिती मिळते – युगंधरा मोरे
मी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन शॉपिंग करते. याचं कारण म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाइन साइटवर बघताना त्याविषयीची संपूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळाल्यावर त्या वस्तू विश्वासाने घेतल्या जातात. तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वॉरंटीही दिली जाते. तशी कपडे, चपला, घडय़ाळ, कॉस्मेटिक्स अशा अनेक वस्तूंची वॉरंटी मिळतेच असं नाही. या वस्तूंची इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखी संपूर्ण माहिती मिळतेच असं नाही. तसंच इतर वस्तूंचे ब्रँड चांगले असतीलच याची मला खात्री वाटत नाही. म्हणूनच मी इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाच प्राधान्य देते. काही साइट्सवर आपल्याला कोणत्याही विक्रेत्याकडून वस्तू हवी आहे हेही निवडता येतं. तसंच आपल्या घराजवळच्या ठिकाणी त्या वस्तूची उपलब्धता आहे की नाही हेही बघायला मिळतं. जंगली डॉट कॉम या साइटवर हव्या असलेल्या वस्तूच्या किमतीची तुलना केली जाते. सगळ्यात कमी किमतीत ती वस्तू कुठे उपलब्ध आहे हे सांगितलं जातं. ही ग्राहकांसाठी उत्तम सोय आहे असं मला वाटतं. वस्तू नाही आवडली तर ती परत करता येते. पैसेही परत मिळतात. फ्री शिपिंग हीदेखील एक महत्त्वाची सोय ऑनलाइन साइट्सवर असते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग हा उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं.

lp14पर्याय असतात आणि सूटही मिळते – प्रसाद खेडकर
ऑनलाइन शॉपिंग करताना मी इलेक्ट्रॉनिक वस्तू टाळतो. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वत: बघून, नीट पारखून घेतल्याशिवाय अर्थ नाही असं मला वाटतं. भलेही मला दुकानात तीच वस्तू ऑनलाइन साइटपेक्षा महाग मिळेल पण, मी एका चांगल्या दुकानातून घेण्यास प्राधान्य देईन. याउलट कपडे, चपला, शूज या वस्तूंची खरेदी मी ऑनलाइन करतो. यामध्ये ऑनलाइन साइट्सवर भरपूर पर्याय असतात. तसंच वेगवेगळ्या प्रकारची सूटही मिळते. कपडे, चपला, शूज यांचे मोठमोठे ब्रँड साइटवर उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांची निवड करताना वाव मिळतो. ऑडिओ सीडीही मी अनेकदा ऑनलाइन घेतो. मला वाटतं, या वस्तूंमध्ये फारशी रिस्क नसते. त्याचप्रमाणे यामध्येही ब्रँडेड वस्तू मिळतात पण, ब्रँडच्या मानाने किंमत फारशी नसते. म्हणून अशाा वस्तूंची खरेदी ऑनलाइन करणं सोयीचं असतं. मी मायंत्रा, झोवी या साइट्सवरून खरेदी करतो.

lp13कमी वेळात भरपूर खरेदी -सुजाता साहू
ऑनलाइन साइट्सवर कोणतीही वस्तू घ्यायची असल्यास पर्याय असतात. पर्यायासोबत आकर्षक सूट, सवलतही असते. खरेदी केलेली एखादी वस्तू आवडली नाही तर ती परत करण्याचे, बदलायचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. तसंच मॉल किंवा मोठय़ा दुकानांमध्ये एखादी ब्रँडेड वस्तू आपल्याला जास्त किमतीत मिळते. तीच वस्तू ऑनलाइन मार्केटमध्ये मात्र कमी दरात उपलब्ध असते. कपडे, शूज, पेनड्राइव्ह, मोबाइल, गॉगल्स अशा अनेक वस्तू मी ऑनलाइन खरेदी केल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये १५ ते २० हजारांची खरेदी मी ऑनलाइन केली आहे. खरेदी केलेली वस्तू आवडली नाही तर ती परत करून बदलता येते किंवा आपले पैसे परतही मिळतात. मला असे पैसे परत मिळाले आहेत. त्यामुळे हा ऑनलाइन व्यवहार मला सुरक्षित वाटतो. तसंच पैसे देण्याच्या विविध पर्यायांची महत्त्वाची सोय ऑनलाइन मार्केटमध्ये आहे. मध्यंतरी मी इंजिनीअरिंगची पुस्तकंही ऑनलाइन मागवली होती. तेव्हाही काही प्रमाणात सूट मिळाली होती. ऑनलाइन मार्केटमुळे कमी वेळात घरबसल्या हजारोंची खरेदी करता येते.

lp15निवडीला भरपूर वाव असतो.. – वनिता पवार
आजकाल नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातही कपडय़ांच्या खरेदीसाठी खूप फिरावं लागतं. तितका वेळ नसतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून मी आता कपडय़ांची ऑनलाइन खरेदी करते. ऑनलाइन खरेदी करताना माझ्या असं लक्षात आलं की, दुकानात काही वेळा साइजप्रमाणे मर्यादित पॅटर्न असतात. ऑनलाइन साइट्सवर मात्र भरपूर प्रकार बघायला मिळतात. घरी बसून एका क्लिकवर हे काम आता सोपं झालंय. दुकानांमध्ये खरेदी करायला जायचं म्हणजे हाताशी पुरेसा वेळ घेऊन आणि दुकानांच्या वेळेनुसार बाहेर पडावं लागतं, पण ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी घडय़ाळाकडे बघण्याची गरज भासत नाही. मायंत्रा, जबाँग या साइट्सवरून मी कपडय़ांची खरेदी करते. मला यातल्या रिटर्न्‍स पॉलिसीज महत्त्वाच्या वाटतात. दुकानांमध्ये अनेकदा खरेदी केलेले कपडे बदलून दिले जातात. त्यासाठीही विशिष्ट वेळ नेमून दिलेली असते, पण ऑनलाइन साइटवर कपडे बदलूनच नाही तर ग्राहकांना आवडले नाहीत तर ते परतही घेतले जातात. या सुविधा मला आवडतात. यात आणखी एक चांगला मुद्दा म्हणजे या साइट्सवर जे नियमित ग्राहक आहेत त्यांना प्रत्येक खरेदीवर विशिष्ट पॉइंट्स दिले जातात. मी एकदा एक साडी खरेदी केली होती. अडीच हजार रुपयांची ती साडी मला १८०० रुपयांना मिळाली. याचं कारण मला त्या साइट्सवर मिळालेले पॉइंट्स. नियमित खरेदी केल्यामुळे माझे पॉइंट्स वाढत गेले आणि म्हणून मला त्या साडीच्या खरेदीवर सूट मिळाली. हेच प्रत्यक्ष दुकानांमध्ये नियमित ग्राहक असलो तरी इतक्या मोठय़ा प्रमाणावर सूट मिळतेच असं नाही.

lp16दुकानापर्यंत जावं लागत नाही – गिरीश टकले
मला पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड आहे. त्यातही इतिहासविषयक पुस्तकांची विशेष आवड. त्यामुळे जी पुस्तकं भारतात मिळत नाहीत ती परदेशातून मिळवताना ऑनलाइन साइट्सचा फार मोठय़ा प्रमाणावर उपयोग होतो. गेल्या पाच वर्षांत मी फ्लिपकार्टवरून अनेक पुस्तकं मागवली आहेत. इन्फीबीम (infibeam.com) या साइटवर भारतात प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर २० ते ३० टक्के सूट मिळते. ही इतकी सूट दुकानांमधूनही फारशी मिळत नाही. तसंच अनेकदा ऑनलाइन मागवलेल्या पुस्तकांवर डिलिव्हरी चार्जेस लागत नाहीत. परदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरच लावले जातात. तेही फारसे नसतात. तसंच दुकानदारांना आपल्याला अमुक एक पुस्तक हवंय असं सांगितलं तर ते नेमक्या किती दिवसांत आणून देतील याची खात्री नाही. किंबहुना ते अनेकदा दुर्लक्षितही केलं जातं, पण ऑनलाइन साइट्सवर ते मिळतंच. अगदी त्यांच्याकडे नवीन स्टॉक नसेल तर जुन्या स्टॉकमधून काढून देतील, पण ग्राहकांपर्यंत ते पुस्तकं निश्चितपणे पोहोचवलं जातं. या ऑनलाइन सेवेमुळे आता पुस्तकांच्या दुकानापर्यंत जायची वेळ येत नाही. हीच वेळ साइट्सवर वेगवेगळी पुस्तके बघण्यासाठी वापरली जाते.

कारण आता ऑनलाइन पोर्टल्सनी स्वत:ची उत्पादनं विकायला सुरुवात केली आहे. हे करताना ते प्रस्थापित उत्पादकाशी करार करतात आणि त्या माध्यमातून थेट ते उत्पादन आपल्या नावाने तयार करवून घेतात. हे करण्यामुळे उत्पादक आणि ऑनलाइन विक्रेते या दोघांचा फायदा असतो. उत्पादकाच्या उत्पादनात वाढ तर होतेच पण ऑनलाइन विक्रेत्याला घरबसल्या प्रस्थापित उत्पादन मिळतं. उत्पादन करण्यासाठी मूलभूत व्यवस्था उभी करणं, कामगार सांभाळणं, प्रशासकीय व्यवस्था राबवणं यातील काहीही ऑनलाइन विक्रेत्याला करावं लागत नाही. तो उत्पादकाच्या जिवावर आपले उत्पादन करीत राहतो. सध्या एक प्रसिद्ध गृहोपयोगी उत्पादन याच पद्धतीने ऑनलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अर्थात ही मागणीदेखील भविष्यात वाढणार असल्यामुळे दर्जेदार ब्रॅण्डदेखील ती नाकारू शकणार नाही.
थोडक्यात काय तर यत्र तत्र सर्वत्र ऑनलाइन शॉपिंगचं अस्तित्व नाकारता येणार नाही.
(लेखातील सर्व चौकटी चैताली जोशी.)