आपण मुलांना चांगल्या शाळेत घातलं, क्लास लावले, गलेलठ्ठ फिया भरल्या तरी आपली मुलं वाकडय़ा वाटेनं कशी गेली या विचाराने पालक उद्विग्न होतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की या सगळ्यापेक्षाही एक वेगळी गोष्ट मुलांना गरजेची असते.

किशोरवयीन मुलांच्या विपरीत वर्तनानं त्यांचे आई-बाबा सुरुवातीच्या काळात त्या मुलांना रागावतात; त्यांची निर्भर्त्सना करतात. ही मुलं जसजशी मोठी होत जातात, तसतसे त्यांचे आई-बाबा अधिकाधिक चिडचिडे आणि उद्विग्न होत जातात. त्यांच्या मते त्यांनी या मुलांच्या संगोपनातून त्यांचे सर्व लाडकोड पुरवलेले असतात, त्यांना उत्तम शाळेत पाठवलेलं असतं. भरीला गलेलठ्ठ फी भरून क्लासची सोय करून दिलेली असते. हे सारं पुरवताना या आई-बाबांना खर्च तर भरपूर होतच असतो, पण त्यांना शारीरिक कष्टही फार उपसावे लागलेले असतात. त्यामुळे ही मुलं आता जणू काही पालकांची उद्ध्वस्त स्वप्नंच एक राक्षस बनून त्यांच्या साऱ्या सौख्याचा घास घेताहेत, असं पालकांना वाटतं. ते दु:खी होतात. या संगोपनात आपलं गणित कधी आणि कसं चुकलं हेच त्यांना समजत नाही.
याबाबतीत मानसशास्त्राची मदत घेतली, तर हे गणित कुठे आणि कसं चुकलं ते चटकन ध्यानात येईल. एखादं गणित चुकतं तेव्हा ते सोडवताना काय केलं गेलं, हा कृतीचा भाग सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे संगोपनाचं गणित तपासतानाही मुलांच्या आई-बाबांनी आणि त्यांचे आजी-आजोबा व शिक्षक अशा इतर पालकांनी काय काय केलं हे महत्त्वाचं असतं. मात्र हे सारे कष्ट, उस्तवारी त्यांनी कशी केली हे तपासून पाहणं त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. मुलांसाठी खर्च, कष्ट तर सारेच करतात. आपल्या घरी राबणारे नोकरही त्यांच्या मुलांसाठी तसाच खर्च आणि कष्ट करताना आपल्याला आज दिसताहेत. या उस्तवारीतून काही मुलं छान अभ्यास करताना, चांगलं वागताना आपल्याला दिसतात, तर काही भटकताना, बेपर्वाईनं वागताना दिसतात. अगदी एकाच घरात वाढणाऱ्या दोन मुलांतही असा फरक दिसतो. याचं कारण म्हणजे वस्तुत: जरी संगोपन तेच असलं, तरी ते संगोपन करताना पालकांचं आणि मुलांचं नातं कसं राहिलं, त्या काळात घरातलं वातावरण कितपत स्वस्थ, शांत होतं हे महत्त्वाचं असतं.
मानसशास्त्र म्हणतं की, हे संगोपनाचं गणित अगदी मुलांच्या बालवयातच चुकू लागलेलं असतं. बालवयातच ज्या मुलांच्या वर्तनात संयम, कर्तव्यदक्षता आणि सहानुभूती दिसते, ती मुलं किशोरवयात सद्वर्तनी होतात. हे गुण मुलांमध्ये वयाची तीन-चार र्वष पूर्ण होईस्तोवर प्रकट होताना दिसतात. हे गुण पालक मुलांमध्ये जोपासू शकत नाहीत. मुलं प्रत्येक गुण किंवा अवगुण स्वत:त जोपासत असतात. घरी प्रेम, आपुलकी आणि स्वीकार अनभुवत वाढलेली मुलंच स्वत:मध्ये हे गुण जोपासू शकतात. बालवयात मुलांमध्ये संयम, कर्तव्यदक्षता आणि सहानुभूती रुजत जाते, तसतशी मुलं स्वत:ला उत्तम शिस्त लावत जातात, शहाणी बनतात. फारसा या शहाणपणाचा त्यांच्या जन्मजात लाभलेल्या उत्तम बुद्धिमत्तेशी संबंध नसतो. आपल्या संगोपनातून त्यांची भावनिक जपणूक कशी झाली आहे, यावर त्यांचं शहाणपण अवलंबून असतं. या गुणांपैकी सर्वप्रथम आपण संयमाचा विचार करू या.
मुलांचं खरं शिक्षण तीन वर्षांची झाल्यावर जेव्हा ती शाळेत जाऊ लागतात तेव्हाच सुरू होतं असं बहुसंख्य पालकांना वाटतं, पण ते फक्त शालेय अभ्यासक्रमाबाबत खरं असतं. वयाच्या पहिल्या तीन वर्षांत घरीदारी स्वत:ला येणाऱ्या अनुभवांतून मुलांना जे शिकायला मिळतं, त्यातून मुलं मोठेपणी प्रत्यक्ष जीवन जगताना जे गुण अंगी असावे लागतात ते स्वत:त जोपासत असतात. संयमाचं महत्त्व समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक मजेदार प्रयोग केला. एका चार वर्षांच्या मुलांच्या गटाला परीक्षकानं सांगितलं, ‘‘या बरणीत मार्शमॅलोच्या गोळय़ा आहेत त्या तुमच्यासाठी आहेत. पण मला जरा एक निरोप देऊन यायचंय. तोवर जी मुलं थांबतील त्यांना दोन गोळय़ा मिळतील. ज्यांना थांबवणार नाही असं वाटतंय , त्यांना लगेचच गोळी मिळेल, मात्र फक्त एकच. ‘‘काही मुलांनी लगेच गोळी मागून खाऊन टाकली. इतरांनी गोळय़ांनी भरलेली बरणी समोर दिसत असतानाही थांबणं पसंत केलं. ते त्यांना कठीणच गेलं. पण त्यांनी स्वत:चं मन रमवण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले, काहींनी डोळे मिटून झोपायचा प्रयत्नही करून पाहिला. पण त्यांनी शेवटी दोन गोळय़ा मिळवल्या. ज्या मुलांचं चारचौघांतलं वर्तन अधिक शिस्तशीर होतं, जी मुलं उतावळेपणे वागत नव्हती, तीच मुलं दोन गोळय़ा मिळवू शकली होती हे या चाचणीचा अर्थ लावताना परीक्षकांच्या स्पष्टपणे ध्यानात आलं. पुढे मुलांचा हा गट किशोरवयात आल्यावर असं आढळून आलं, की चार वर्षांची असताना थांबू शकलेली, संयमानं वाट पाहू शकलेली मुलं आत्मविश्वासानं समाजात वावरत होती, आव्हानांना ती धीटपणे सामोरं जाऊ शकत होती आणि ती अडचणींचा सहजतेनं सामना करू शकत होती. त्यामुळे स्वत:चं ईप्सित साध्य करणं त्यांना सहज जमू शकत होतं. संयमाचा अभाव असलेल्या गटातील मुलं भांडखोर, काही लाजरी, भित्री तर काही उर्मट, उद्दाम बनली होती. अभ्यासात ती मागे पडू लागली होती. शाळा संपून कॉलेजात प्रवेश घ्यायच्या वयाच्या टप्प्यावर हा फरक अधिक स्पष्ट झाला. संयमशील मुलं अभ्यासात चमकत होती, स्वत:च्या भावभावना स्पष्टपणे, नेमकेपणानं व्यक्त करू शकत होती, नवनवीन गोष्टी जिद्दीनं आत्मसात करत होती. हे सारं मिळवण्यासाठी पडणारे कष्टही सारी मुलं आनंदानं घेत होती. दुसऱ्या गटातली मुलं अभ्यासातला रस हरवून बसल्यामुळे मागे पडली होती. त्यांचं लक्ष नको त्या गोष्टींकडे जात राहिल्यानं ती बहकली होती. काही भरकटली होती तर काही गुन्हेगार बनण्याच्या वाटेवर होती. बालवयातली ही संयम परीक्षा ‘सॅट स्कोअरपेक्षा’ वयाच्या चवथ्या वर्षीच मुलाचं भवितव्य अधिक नेमकेपणे हेरू शकते असंही चाचणी घेणाऱ्यांच्या ध्यानात आलं.
हा संयम इतक्या लवकर मुलांत कसा रुजवायचा? त्यासाठी एकच करायचं. बालवयातील मुलांवर त्यांच्या दुबळेपणाचा फायदा घेत पालकांनी अरेरावी करायची नाही. ती स्वत:ला शिस्त लावतात हे वास्तव स्वीकारून त्यांना शिस्तीच्या जाचक चौकटीत कोंबण्याचा मोह पालकांनी टाळायचा. त्यांना नाना गोष्टी शिकवणं टाळून त्यांना हवं ते करू देत त्यांना शिकू द्यायचं. त्यांची सुरक्षितता डोळय़ांत तेल घालून सांभाळायची. मुलांच्या लहानसहान हट्ट करत आपलं प्रेम मागण्याच्या अभिव्यक्तीला समजून घेत त्यांच्या निव्र्याज बाललीलांचं कौतुक करायचं. दैनंदिन व्यवहारात मुलांना जितक्या वेळा नकार मिळत राहतो, तितकी ती अधिकाधिक संयमशील बनतात. माझे पालक हे माझे रक्षक आहेत, ते माझ्यावर प्रेम करतात, माझ्यावर विश्वास ठेवतात, माझं खुल्या मनानं (तोंडदेखलं नाही) कौतुक करतात, माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचा प्रयत्न ते जागरूकतेनं करतात, असा अनुभव मुलांना पहिल्या तीन वर्षांत घरी सातत्यानं आला पाहिजे. अशा संगोपनातून मुलांमध्ये संयमशीलता येते. वर वर्णन केलेलं पालकांचं वर्तन फक्त या चिमण्यांशी तसं असून चालत नाही. पालकांची संपूर्ण जीवनशैली प्रेममय, इतरांविषयी, जगाविषयी आणि जीवनाविषयी आदर बाळगणारी असायला हवी. अशी जीवनशैली असणारे पालक स्वत: कर्तव्यदक्ष असतात. इतरांच्या सुख-दु:खाची, सोयी-गैरसोयींची ते अत्यंत जागरूकतेनं कदर करत असतात. त्यांच्यासमवेत वाढणारी मुलं त्यांचं हरघडीचं वर्तन पाहात पाहात त्यांचं अनुकरण करत स्वत:ला जीवनशिक्षण देत असतात.
वयाच्या चार वर्षांपर्यंतच्या बालवयातील मुलांच्या वाढीच्या दृष्टीनं त्यांच्या आईची भूमिका इतर सर्व पालकांपेक्षा अधिक महत्त्वाची आणि निर्णायक ठरते. सदा प्रसन्न, आनंदी वृत्तीची आई स्वत: संयमशील, कर्तव्यदक्ष असते. इतरांच्या सुख-दु:खाची कदर करत ती एकीकडे स्वत:चं जगणं अर्थपूर्ण करत असते. कष्ट करणं ती टाळत नाही तसंच अकारण कष्ट करत इतरांच्या आळशीपणाला ती उत्तेजनही देत नाही. हे सारं करताना, भांडण, वादावादी, अपमान करण्याची वेळ तिच्यावर येत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिच्या ठायीचा संयम.
आपण या कुटुंबात नवीन आहोत. हे कुटुंब चांगलं आहे म्हणून आपण या घरी लग्न करून आलेले आहोत. इथल्या माणसांची परस्पर नाती या घरच्या जीवनशैलीतून आकाराला आलेली आहेत. मला या सर्वाशी एक नवं नातं जुळवायचं आणि जोपासायचं आहे, कारण आता माझ्या माहेरच्या नातेवाइकांप्रमाणे ते सारेही माझे कौटुंबिक आप्त झाले आहेत हे अशा आईला नेमकेपणानं समजलेलं असतं. ही माणसं जशी गुणावगुणांनी बनलेली आहेत तसेच माझ्यातही गुणदोष आहेतच हेही भान तिला असतं. आता यापुढे मी आणि माझ्या नवऱ्यानं त्यांच्या आपसातील नात्यांची चिरफाड न करता त्यात सामावून जात आपलं दोघांचं एक स्वतंत्र सुंदर आणि निकोप नातं निर्माण करायचं आहे ही समज तिला असते.
अशी आई कुटुंबात एक प्रसन्न, शांत वातावरण निर्माण करत राहाते. त्यासाठी आवश्यक असेल तेव्हा ती स्वत:च्या भावनांना मुरड घालते. आनंदी वृत्तीमुळे घरातील किरकोळ कुरबुरींमुळे ती व्यथित होत नाही. त्यातलं किरकोळपण ती जाणून असते.
आईच्या या स्वभावामुळे मूल एका आनंदी वृत्तीसोबतच वाढत राहतं. प्रत्येक घटनेची त्याच्या मेंदूत होणारी नोंद आनंदाचं कोंदण घेऊनच ठसत जाते. घरातील इतरांच्या बाबतची नाराजी, राग अशा भावना ही आई इतरांना न दुखवता आणि स्वत:ही घायाळ न होता समजुतीनं व्यक्त करत असते. त्यामुळे तिचं मुल जीवनातलं सुख आणि दु:ख सहजतेनं स्वीकारायला शिकतं. अशी आई खूप माणसं जोडते, त्यांची सरबराई करते, त्यांच्या अडीअडचणीत मदत करते हे पाहात वाढणारं मूल एका सुसंस्कृत आईसोबत वाढत असतं. त्यातून ते सहजीवनाचा एक उत्तम संस्कार मिळवतं.
या आईचं बाळाशी नातं कसं असतं? ती बाळाचं निरागसपण कसोशीनं जपते. हे करू नकोस तू पडशील, ते खाऊ नकोस तुला सर्दी होईल, असा बागुलबुवा दाखवून ती मुलात भीतीला खतपाणी घालत नाही. त्याऐवजी हे करण्यापेक्षा तू ते कर. यात धोका आहे. त्यात आनंद आहे असा स्पष्ट कार्यकारणभाव मुलाच्या ध्यानात ती आणून देते. मूल खुर्चीत चढू जातं, हातानं खाऊ जातं अशा प्रसंगी ती त्याला प्रोत्साहन देते आणि त्याची सुरक्षितताही ती जपते.
आणखी एक महत्त्वाची बाब मूल आईच्या वर्तनातून शिकत राहतं, ती म्हणजे समता ‘सर्वत्र सदा सम’ असं तिचं वागणं असतं. तिच्या वागण्यातून न्यायानं वागणं म्हणजे कसं हे मुलाला पाह्यला मिळतं. तिच्यावर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा ती शांतपणे त्याला सामोरी जाऊन आधी त्या अन्यायाची नीट मीमांसा करून मगच पुढच्या वेळी त्या अन्यायाला कसं सामोरं जायचं याचा विचार करते.
अशा आईच्या स्वत:च्या वर्तनातून तिच्या मुलात सर्व चांगले गुण आपोआप रुजतात. आत्मकेंद्री, विचारांचा आवाका नसलेली, उतावळय़ा किंवा उच्छृंखल स्वभावाची आई मुलांसमोर स्वत:च एक विपरीत, अगदी विरोधी असा आदर्श हरघडी मांडत असते. आपण संगोपनात एक घोडचूक करत आहोत, हे तिच्या गावीही नसतं. घरातील आर्थिक परिस्थिती, सोयीसुविधा एवढंच नव्हे तर घरातील इतर माणसांचे स्वभाव आणि त्यांची आपसातली नाती सदोष असली तरीदेखील तशा परिस्थितीत बाळाची आई जर समजूतदार, प्रेमळ आणि न्यायी असेल, तर ते मूल अंगी संयम, कर्तव्यक्षमता आणि सहानुभूती रुजवू शकतं.
आईकडून हे सारं मुलाला मिळायला हवं असेल तर मुलांच्या बाबांची कुटुंबातील समन्वयी भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांच्या बाबांनी आपल्यातील पती-पत्नीचं नातं जपण्याला आणि मुलाचं सक्रिय संगोपन करण्याला या टप्प्यावर प्राधान्य देणं अत्यावश्यक असतं. बाबांच्या ठायी जर हे तिन्ही गुण असले, तरच बाळाचं नीट संगोपन करणं तिला सोपं जातं.
म्हणूनच पुढच्या लेखात बाबांनी आणि आईनी, इतर पालकांनी कसं असणं, वागणं गरजेचं आहे ते आपण पाहू या. त्याशिवाय या बालवयात त्यांची शाळा ही घराइतकीच महत्त्वाची भूमिका वठवत असल्यानं शाळेबाबतही थोडं वास्तव समजून घेऊ या. तेवढं केलं की आज किशोरवयीन मुलांवर जी टीका आणि आगपाखड होत राहते आहे ती टळेल. मुख्य म्हणजे या किशोरवयीन मुलांकडे अंगुलीनिर्देश करताना स्वत:ची उरलेली चार बोटं आपल्याकडेच निर्देश करताहेत, हे वास्तव सर्व पालकांच्या ध्यानात येईल.
(क्रमश:)

वयाच्या चार वर्षांपर्यंतच्या बालवयातील मुलांच्या वाढीच्या दृष्टीनं त्यांच्या आईची भूमिका इतर सर्व पालकांपेक्षा अधिक महत्त्वाची आणि निर्णायक ठरते.