कव्हरस्टोरी
बीडजवळचा धर्मपुरीतील- म्हणजे चालुक्यांची दुसरी राजधानी येथला शिलालेख तिथल्या एकाच्या घरात ज्वारीच्या कणगीखाली ठेवायचा दगड म्हणून वापरण्यात आलाय.  फलटणचा शिलालेख धुणं धुण्यासाठी दगड म्हणून वापरला गेला. रट्टबल्लाळाचा शिलालेख मंदिराच्या आवारात इतर काही प्रतिमांसोबत पडून आहे.
सोन्याचा गणपती दिवेआगरातून चोरीस गेला आणि पाठोपाठ जळगावजवळील नेरी येथून पंचधातूच्या आठ प्राचीन मूर्ती जैन मंदिरातून चोरीला गेल्या.
अशा तऱ्हेने प्राचीन मूर्तीची चोरी होणे हे काही नवीन नाही. या संदर्भात एका पुरातत्त्व तज्ज्ञाने तळतळून एक माहिती कळवली आहे.
१९९६-९७ साली नांदेडजवळील कंधारच्या किल्ल्याजवळील एका मुस्लीम शेतकऱ्याच्या शेतात खणताना एक मूर्ती सापडली. ती मूर्ती केशवराज-विष्णूची अतिशय सुंदर अशी एक मीटर उंचीची होती. ही मूर्ती काही गावकऱ्यांनी ताब्यात घेऊन तेथील मोठय़ा वाडय़ाच्या तळघरात नेऊन ठेवली. तेथील तत्कालीन पुरातत्त्व विभागाचे अधिकारी ही मूर्ती सापडल्याचे कळताच ती निखाते निधी म्हणून तिचा ताबा घेण्यासाठी गेले. त्या लोकांनी ती त्यांना पाहू देण्यासही सुरुवातीस नकार दिला. त्या अधिकाऱ्याने चिकाटीने तहसीलदार, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभागाचे मुंबई ऑफिस वगैरेंशी पाठपुरावा करण्यास सुरु वात केली. अखेर त्या घरातील एका मुलाशीच ओळख करून घेत हे अधिकारी तळघराच्या हातापर्यंत- म्हणजे किल्लीला स्थानिक शब्द- पोहोचले. त्या मूर्तीची वैशिष्टय़े नोंद करून घेत या अधिकाऱ्यांनी या मूर्तीचा ताबा पुरातत्त्व विभागाकडे यावा म्हणून लेखी माहिती कळवली. विधानसभेत प्रश्न विचारला गेला. प्रजावाणीमध्ये बातमी आली. ‘लोकसत्ता’त आली. अखेर तेथील डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार वगैरे मंडळी कामास लागली आणि ती मूर्ती व्यक्तिगत ताब्यातून काढून कंधार या राष्ट्रकूट राजा कंधारपुराधिश्वर कृष्ण (तिसरा) याने बांधलेल्या किल्ल्यात सुरक्षित ठेवून देण्यात आली. पण या सुरक्षेला कवच होते ते केवळ एका पुरातत्त्वनिष्ठेच्या मनुष्याचेच. त्यापुढील वर्षी त्या अधिकाऱ्याची बदली झाली आणि काही महिन्यांतच त्या सुंदर मूर्तीची चोरी झाली. आजतागायत केशवराजाची ती अखंड मूर्ती कुठे गेली ते कळलेले नाही. कंधार येथे अभ्यास करण्यासाठी गेलेल्या तरु ण पुरातत्त्वतज्ज्ञ, मूर्तीशास्त्राच्या अभ्यासक डॉ. वैशाली वेलणकर यांनी या केशवराज मूर्तीचे जे छायाचित्र घेतले ते या मूर्तीचे चोरी होण्यापूर्वीचे अखेरचे छायाचित्र. त्या मुंबईत परतल्यानंतर चोरी झाली, परंतु चोर सापडत नव्हते म्हणून की काय तपासयंत्रणेने डॉ. वैशाली वेलणकर आणि त्यांच्यासोबत असलेले दुसरे पुरातत्त्व संशोधक डॉ. सूरज पंडित यांनाच धारेवर धरले.
एवढी जड मूर्ती किल्ल्याच्या उतार-चढावावरून नेण्यासाठी कमीत कमी चार जण तरी हवेत. रस्त्याच्या खाचाखोचा माहीत असलेले हवेत हे स्पष्ट असताना चोरीची माहिती देणारे कुणी सापडले नाहीत खरे.
त्या वेळी तेथील आमदार केशवराव धोंडगे परिसरात सापडलेल्या मूर्ती आपल्या वाडय़ात आणून वाडय़ाची शोभा वाढवत असत. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या सर्व मूर्ती शासकीय (जलसिंचन) विभागाच्या विश्रामगृहात मांडून त्याचे राष्ट्रकूट भवन असे नामकरण करण्यात आले होते.

मुंबई विद्यापीठात पुरातत्त्व दिनाचा कार्यक्रम
मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे गतवर्षीपासून भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दिवंगत डॉ. हसमुखलाल सांकलिया यांच्या जन्मदिनी पुरातत्त्व दिन साजरा करण्यात येऊ लागला. या कार्यक्रमाद्वारे विविध वयोगटांच्या विद्यार्थ्यांना, लोकांना पुरातत्त्वशास्त्रासंबंधी ओढ वाटावी या दृष्टीने प्रयत्न केले जातात. पुरातत्त्वीय अवशेषांचे जतन, अभ्यास व्हावा या दृष्टीने दिशादशर्क ठरावे असे उपक्रम यात हाती घेतले जातात. गतवर्षी या कार्यक्रमात उभारलेल्या प्रदर्शनाला आणि त्यातील अनेक उपक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाला. एका दिवसात सुमारे साडेतीन हजार शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि लोकांनी प्रदशर्नास भेट दिली. हे लक्षात घेऊन बहि:शाल शिक्षण विभागाने या वर्षी या निमित्ताने भरवले जाणारे प्रदर्शन आणि कार्यक्रम दोन दिवस आयोजित करण्याचे ठरवले आहे.
मंगळवार, दि. १० डिसेंबर आणि बुधवार, दि. ११ डिसेंबर या दोन दिवशी विद्यानगरी परिसरात आरोग्य केंद्र इमारतीच्या परिसरात बहि:शाल शिक्षण विभागाच्या कार्यालयाजवळ हा कार्यक्रम होणार आहे. हे प्रदर्शन प्रवेशमुक्त असून, शाळांकडून विद्यार्थी गट येण्याची पूर्वसूचना असल्यास तज्ज्ञ मार्गदशर्कांसोबत प्रदर्शन पाहता येईल. बहि:शाल शिक्षण विभागाचे पुरातत्त्वशास्त्राचे, प्राचीन भारतीय कला आणि विज्ञान या विषयांचे विद्यार्थी आणि अनेक शिक्षक मार्गदर्शन करतील. यातील लुटुपुटीचे उत्खनन, प्रश्नमंजूषा, ब्राह्मी-खरोष्टी अक्षरओळख, मोडी अक्षर ओळख या कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. अश्महत्यारे, मातीकामाची प्राचीनता, आदिवासी चित्रकला, प्राचीन कलावस्तूंचे संवर्धन, जीवाश्म आणि त्यांचे संवर्धन हे स्पष्ट करणारी प्रात्यिक्षके दाखवण्यात येतील. या प्रदर्शनांत विद्यार्थ्यांना अनेक कालखंडांतील विविध प्रकारची प्राचीन नाणी पाहता येतील. जुन्या मूर्ती, तलवारी यांचीही मांडणी होणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध प्रकारच्या ‘बरियल साइट्स’ किंवा दगडी दफनपद्धतींची उभारणी केलेली पाहायला मिळेल.
या प्रदर्शनात विविध पुरातत्त्वीय वस्तूंच्या प्रतिकृतीही ठेवण्यात येतील. हरप्पा संस्कृतीतील सुप्रसिद्ध मुद्रा आणि प्रतिमा शाळांना घेता येतील. अनेक माहितीपूर्ण पोस्टर्सही उपलब्ध असतील. आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे पुरातत्त्वीय स्थळांचे छायाचित्रप्रदर्शनही या निमित्ताने पाहता येईल.
या कार्यक्रमांत पुरातत्त्व अभ्यासात गुंतलेले विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी झाले आहेत.

जळगाव, चाळीसगाव भागात एक अत्यंत मौल्यवान असा निखाते निधी- ट्रेझर ट्रोव्ह सापडला. एका स्थानिक मारवाडय़ाच्या मालकीच्या जागेत. रोमन काळातील अनेक सोन्याची नाणी एका हंडीत सापडली. त्याची किंमत केल्यानंतर त्यातील मालकाचा वाटा पुरातत्त्व विभागामार्फत शासनाने मालकाला द्यावा आणि ऐवज ताब्यात घ्यावा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने शासनाला दिले. ती किंमत देण्यासाठी शासनाला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. नियमाधिनियमांच्या गुंतावळ्यात निर्णय अडकल्यामुळे शासकीय तिजोरीचे हात हाती असलेल्या विभागाने ती रक्कम पुरातत्त्व विभागाला दिली नाही. आणि ती ऐतिहासिक महत्त्वाची नाणी त्या खासगी व्यक्तीकडेच राहिली. आज ती वितळवून पाटल्याबिंदल्या झाल्या की वळेसर-गळेसर झाले कुणालाही कल्पना नाही. रोमन राज्यातील नागरिकांना नीलवस्त्रांच्या मोहात पाडून रोमराज्याचा खजिना रिकाम्या करणाऱ्या भारतीयांनी मिळवलेल्या सुवर्णमुद्रांचे ऐतिहासिक महत्त्व आता कुणाच्या लेकींच्या हुंडय़ात विरून गेले असेल कोण जाणे.
इतिहासाची साधनं म्हणून महत्त्वाचे ठरणारे कित्येक शिलालेख पायऱ्यांचे दगड झाले, धुण्याचे दगड झाले काही गणतीच नाही.
बीडजवळचा धर्मपुरीतील- म्हणजे चालुक्यांची दुसरी राजधानी येथला शिलालेख तिथल्या एकाच्या घरात ज्वारीच्या कणगीखाली ठेवायचा दगड म्हणून वापरण्यात आलाय. तो अजिबात द्यायला मागत नाही. फलटणचा शिलालेख धुणं धुण्यासाठी दगड म्हणून वापरला गेला. त्याच्या फक्त कडेकडेच्या दोनदोन शब्दांच्या ओळी शिल्लक आहेत. मधला मजकूर झिजून गेला आहे. आणखी एक शिलालेख रट्टबल्लाळाचा- दीड मीटर बाय एक मीटर रु ंदीचा हा शिलालेख गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात द्यायला नकार दिला. तो आता तेथील मंदिराच्या आवारात इतर काही प्रतिमांसोबत पडून आहे. ज्यांना त्याचे कार्यकारणच कळत नाही असे भक्तगण सगळ्याबरोबर त्यावरही हळदकुंकू वाहतात.
कारणे न जाणता काहीतरी कशावर तरी वाहायचं- बस्स.