दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन. त्यांचा आपणा सर्व भारतीयांना यथोचित अभिमान आहे. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षीच देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आवाका शब्दबद्ध करण्यासाठी आम्ही अजिबातच सक्षम नाही. परंतु आम्ही वेळोवेळी व्यक्त केल्यानुसार गांधीजींचे मौन हा आमच्यासाठी आत्मीयतेचा व तितक्याच कुतूहलाचा विषय आहे. ते दर सोमवारी मौन पाळत असत. त्यांच्यासाठी तो चित्तशुद्धीचा व आत्मशक्तीसंवर्धनाचा मार्ग होता आणि ती त्यांनी ठरवून केलेली कृती होती.

आम्हाला असे मनापासून वाटले की गांधीजींचे पुण्यस्मरण करताना या मौनाशी संबंधित काहीतरी करावे. दिवसभर मौन पाळणे, ही सर्वाच्या आवाक्यातली गोष्ट नाही; व त्याची महती खरीखुरी पटल्याशिवाय मौन पाळणे हा केवळ उपचार ठरेल. आम्हाला गांधीजींचे स्मरण केवळ उपचार म्हणून करायचे नाही.

‘‘आपण मौन पाळण्याबद्दल इतकी चर्चा करतो. पण ज्यांच्यावर मौन लादले गेले आहे, त्यांच्याबद्दल काहीच विचार करत नाही. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.’’ आमचे समानधर्मी स्नेही नेहमीच विचारांना नवे खाद्य पुरवतात.

‘‘मौन कोणावर लादले गेले आहे?’’

‘‘कर्णबधिर व्यक्तींवर!’’

हे ऐकून आम्ही बधीर, नव्हे, स्तब्धच झालो. खरंच, ऐकू न येणे ही वरवर दिसायला एक समस्या दिसते, पण ती अनेक गुंतागुंतींना जन्म देते. बहिरेपणामुळे व्यक्तीवर मुकेपणही लादले जाते, विशेषत: बहिरेपणा जन्मजात असेल तर! कानाने कुठलेच आवाज ऐकू न आल्यामुळे तोंडाने आवाज काढण्याची क्षमता असूनही व्यक्तीची बोलण्याची क्षमता खुरटते. अनेक वर्षांपूर्वी कर्णबधिरपणाविषयी जनमानसात जागृती करण्यासाठी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या जाहिरातीत एक गाणं लागत असे, ‘कानाने बहिरा, मुका परि नाही.’ याबद्दलचे भान निश्चितच वाढत आहे, पण कर्णबधिरांच्या बाबतीत आपल्या समाजाला पूर्ण सजगता आली आहे, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल.

आम्ही गांधीजयंतीचा दिवस या मौन लादले गेलेल्या कर्णबधिर मुला-मुलींबरोबर व्यतीत करण्याचे ठरवले. त्या दिवशी त्यांच्यासाठी आनंद मेळावा भरवून त्यांना आनंदाचे दोन क्षण देणे, एवढाच आमचा उद्देश होता. त्यासाठी कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या भारतभरातील संस्थांची माहिती काढून त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही आयोजित करीत असलेल्या मेळाव्यात त्यांच्या मुलांसह सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या मेळाव्यात कर्णबधिर मुलांच्या विविध क्षमतांना वाव देतील अशा खेळांची व स्पर्धाची आखणी केली, जसे गायनस्पर्धा, वार्ताकन स्पर्धा, अभिव्यक्ती स्पर्धा इ. वेगवेगळ्या वयोगटातील मुला-मुलींनी या स्पर्धामध्ये उत्साहाने भाग घेऊन आपली ताकद दाखवून दिली. ऐकू न येणारी मुले गाऊ शकतात, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करू शकतात किंवा अभिनयातून व्यक्त होऊ शकतात हा त्यांच्या बुद्धीविषयीचे गैरसमज दूर करणारा अनुभव होता. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अनेकांनी नृत्य, समूहनृत्य, नाटिका, नाटय़छटा अशा विविध कलाप्रकारांद्वारे सर्व उपस्थितांची मने जिंकली.

यातला एक प्रसंग तर संस्मरणीय आहे. एका संस्थेची मुले नृत्यासाठी व्यासपीठावर आली. तेव्हा शिक्षकांनी जाहीर केले ‘या नृत्यात तुम्हाला एक चमत्कार बघायला मिळेल.’ एका लोकप्रिय गीतावर नृत्य सुरू झाले. काही वेळात गाण्याची कॅसेट बंद पडली. प्रेक्षकात जरासा गोंधळ माजला. काय झालं म्हणून सगळेच बघायला लागले. पण या गदारोळात मुलांचं नृत्य मात्र निर्वेधपणे सुरू होतं. नृत्य संपल्यावर शिक्षक पुढे येऊन म्हणाले, ‘‘गाण्याची कॅसेट बंद पडली नव्हती, ती मुद्दाम बंद केली होती. आम्हाला हे सर्वाच्या निदर्शनाला आणून द्यायचे आहे की या कलाकारांना गाणं ऐकू येत नाही. त्यांचं नृत्य बोटांच्या व पायांच्या ठेक्यावर सुरू असतं. गाणं वाजवलं जातं ते तुमच्या- आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही.’’ आम्ही सारे अवाक् झालो. खरंच चमत्कार!

यातून आम्हाला अजून एक महत्त्वाचा बोध झाला. सभागृहातला कलकलाट आम्हा बोलक्या माणसांचा होता, कर्णबधिर मुले शांत बसली होती. या मेळाव्यामुळे आम्ही कर्णबधिरांच्या विश्वाच्या जवळ पोहोचलो व आमच्या ज्ञानात बरीच भर पडली. दृष्टिहीनांच्या ब्रेल लिपीचे जगभरात प्रमाणीकरण झाले आहे, पण कर्णबधिरांच्या सांकेतिक भाषेचे जागतिक स्तरावर निरपवादपणे प्रमाणीकरण झालेले नाही; त्यांच्या संवाद प्रक्रियेतला व विकासातला हा मोठा अडथळा आहे. आपला समाज व आपली व्यवस्था त्यांच्या समस्यांबद्दल पुरेसे संवेदनशील आहेत, असे दिसत नाही. एक साधं उदाहरण घ्या. रेल्वेस्थानक व बसस्थानकांवर ज्या उद्घोषणा होतात, त्या कर्णबधिर प्रवाशांपर्यंत कशा पोहोचणार? याचा विचार कुठल्याच यंत्रणेने केलेला दिसत नाही. इतकेच नाही, तर ही काही लक्षात घेण्याएवढी समस्या आहे, याचेही त्यांना भान दिसत नाही.

आपली समाजमान्य भाषा कर्णबधिरांसाठी निरुपयोगी ठरते व म्हणून त्यांच्यासाठी चिन्हांची भाषा विकसित करावी लागते, हे लक्षात ठेवून मेळाव्याचे आयोजन आम्ही द्वैभाषिक शहरांत किंवा सीमाप्रांतात करतो. उदा. बेळगाव, अमृतसर, हैदराबाद इ. तेथे रहिवासी कमीत कमी दोन भाषा जाणतातच. पण प्रश्न असा की समजा कोणी परभाषिक किंवा परग्रहवासी आला, तर त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलणार? ही एका अर्थी आपल्या सर्वसामान्य भाषेची मर्यादाच आहे. पण हृदयाच्या, प्रेमाच्या भाषेला अशी मर्यादा नसते. आम्ही सर्वजण या मुलांशी त्या प्रेमाच्या भाषेने संवाद साधू शकलो. कर्णबधिरांच्या मेळाव्याने आम्हाला प्रेमाच्या भाषेच्या सार्वत्रिकतेची हृद्य अनुभूती दिली!

कर्णबधिरांच्या विश्वात एवढय़ा खोलवर शिरल्यावर आम्हाला काहीजणांनी त्यांच्यासाठी संस्था सुरू करण्याचा सल्ला दिला. पण आमची भूमिका स्पष्ट आहे; आम्ही समाजसेवक किंवा कार्यकर्ते नव्हे तर प्रेमदूत आहोत. आणि गांधीजयंतीच्या निमित्ताने आम्ही कर्णबधिरांसाठी केलेला हा प्रेमाचा प्रयोग आहे.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com