नमसतं अजीते। नमसतं अभीते॥

‘‘काय सांगता? त्या वाडीत अग्निशमन दलाचा बंब जाण्याइतका रस्ता तरी आहे का?’’

16-lp-minal‘‘अहो, दिवाळीच्या दिवसांत त्या पलीकडच्या वाडीत आगडोंब उसळला होता, कळलं का तुम्हाला?’’

‘‘नाही, आम्ही बाहेरगावी गेलो होतो, कालच परतलो. पण काय झालं? फटाक्यांमुळे आग लागली?’’

‘‘नाही तर काय? मुलं फटाके उडवताना इतकी बेभान झालेली असतात की आपल्या आजुबाजूला काय झालंय याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं आणि आई-वडील काय, एकदा मुलांच्या हातात फटाके सोपवले की त्यांचं कर्तव्य संपलं. त्या उडत्या कंदिलांनी बरोबर घात केला.’’

‘‘अरे बापरे! कुणाच्या जिवाला काही दुखापत..’’

‘‘सुदैवाने नाही! दोन-तीन घरांचं मोठं नुकसान झालं. ते आणखीही वाढलं असतं, पण अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहोचले आणि त्यांनी शर्थीने आग आटोक्यात आणली.’’

‘‘काय सांगता? त्या वाडीत अग्निशमन दलाचा बंब जाण्याइतका रस्ता तरी आहे का?’’

‘‘ नाही ना! आणि त्यात आगीचा हाहाकार बघायला बघ्यांची एवढी गर्दी उसळलेली. पण तरीही त्या जवानांनी फार कौशल्याने त्यातून मार्ग काढला, शिडय़ांचा वापर करून पाण्याचे फवारे तिथपर्यंत पोहोचवले आणि आगीवर आणि परिस्थितीवरही नियंत्रण मिळवलं. खरोखरच त्यांची समयसूचकता आणि कामातलं कसब यांना दाद द्यायला हवी!’’

‘‘मग दाद दिलीत की नाही?’’

‘‘आमचा काय संबंध? ज्यांच्याकडची आग विझवली त्यांनी आभार मानायला पाहिजेत ना? आम्ही काय, बघे लोक!’’

हे बोलणं ऐकून आम्ही हतबुद्धच झालो. त्यामधून जमावाच्या मानसिकतेचं जे दर्शन घडलं, ते विदारक सत्य आहे. एकतर आपलं जळत नाही, तोपर्यंत आपल्याला आगीचं गांभीर्य वाटत नाही. आणि दुसऱ्याकडे लागलेली आग विझवायला मदत करण्याऐवजी  गंमत पाहण्याकडेच आपला कल असतो.

या व अशा अनेक आव्हानांना तोंड देत अग्निशमन दलाचे जवान आपलं काम तडीस नेत असतात. मोठमोठय़ा शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी व एकूणच अग्निसुरक्षा राखण्याचं काम ते करत असतात. समाजातील व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी जे प्रमुख आधारस्तंभ असतात त्यांच्यामध्ये अग्निशमन दलाचा समावेश करावाच लागेल. एवढं महत्त्वाचं काम करत असूनही त्यांच्या कामाची म्हणावी तशी दखल आपण घेत नाही.

आम्ही ती दखल घेण्याचं ठरवलं व गुरुनानक जयंतीच्या दिवशी अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये जाऊन तेथील जवानांना धन्यवाद देण्याचा कार्यक्रम आखला.

गुरुनानक जयंतीच का?

त्यामागे एक खास कारण आहे.

गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक. त्यांच्या काळात प्रचलित असणाऱ्या धर्मातील कुप्रथा, अंधरूढी, कर्मकांड बाजूला सारून नतिक व आध्यामिक शुचितेवर भर देणाऱ्या व उमदेपणाने शौर्याचे जीवन जगण्याला प्राधान्य देणाऱ्या नवीन पंथाची स्थापना त्यांनी केली. पण गुरुनानकांबद्दल आम्ही जी गोष्ट ऐकली ती मुद्दाम सांगावीशी वाटते. गुरुनानक हे राजा जनकाचा पुनर्जन्म अशी एक लोकभावना आहे. मिथिलेचा राजा जनक यांच्या सिंहासनाखाली एक अग्निकुंड धगधगत असे. सिंहासनावर बसल्यावर त्यांचं एक पाऊल त्या अग्निकुंडात असे आणि त्याच स्थितीत बसून ते राज्यकारभार करत असत. आपल्याला चटके देणाऱ्या दाहक परिस्थितीचे भान ठेवून लोककल्याणाचे निर्णय घेणारा निष्काम कर्मयोगी राजा अशीच त्यांची ख्याती होती. पंधराव्या शतकात धर्मातील अंधरूढींच्या आगीत होरपळणाऱ्या समाजाला स्वत: त्या आगीच्या ज्वाळांशी लढून गुरुनानकांनी शांततेचा व मानवतेचा मार्ग दाखवला म्हणून ते राजा जनकाचा पुढचा जन्म असे मानतात.

आम्हाला वाटते की एकविसाव्या शतकात प्रत्यक्ष आगीच्या तांडवाशी सामना करून लोकांचे रक्षण करणारे अग्निशमन दलाचे जवान हे लाक्षणिक अर्थाने गुरुनानकांचेच वंशज होत. यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अग्निशमन दलाला शुभेच्छा देण्याचे आम्ही निश्चित केले. इतिहासानुसार गुरुनानकांचा जन्म एप्रिल महिन्यात झाला, पण परंपरेने त्यांची जयंती कार्तिक पौर्णिमेला, म्हणजे नोव्हेंबर महिन्यात साजरी केली जाते. त्यानुसार आमची स्नेही मंडळी गुरुनानक जयंतीला वेगवेगळ्या अग्निशमन केंद्रांमध्ये जातात व त्यांच्याबरोबर थोडा वेळ व्यतीत करतात. त्यांच्या जोखमीच्या कामासाठी, जीव धोक्यात घालण्याच्या निडर प्रवृत्तीसाठी आणि कामावरील निष्ठेसाठी त्यांना धन्यवाद देतात. खास बनवलेली फुले, शुभेच्छापत्रे देतात व मिठाई खाऊ घालतात.

सर्वसामान्य नागरिक आपला एवढा विचार करतात, ही अग्निशमन दलाच्या जवानांच्या व्यावसायिक जीवनातील अनोखी घटना असते. त्यामुळे प्रेमाची खूण पटल्यावर दिलखुलासपणे ते आम्हाला प्रतिसाद देतात. त्यांच्या दलाचे काम कसे चालते याची प्रात्यक्षिकांसहित माहिती देतात. आगीशी लढून विजय मिळवण्याच्या, उंच इमारतींत अडकलेल्यांच्या सुटकेच्या, तारांमध्ये किंवा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांना सोडवण्याच्या त्यांच्या शौर्यगाथा ते आमच्या विनंतीवरून आम्हाला ऐकवतात. बरं, हे सर्व करताना आपण काही फार मोठे काम करत आहोत, असा आव नसतो.

आमच्या शीख बांधवांना जेव्हा आम्ही गुरुनानक जयंती अशा प्रकारे साजरी करतो हे सांगितले तेव्हा या बहादूर जवानांसाठी त्यांनी आपल्या गुरुद्वारातील लंगरचा प्रसाद पाठवला. कठीणातील कठीण गोष्ट प्रेमाने साध्य करून दाखवली. हे आमच्या प्रेमाच्या प्रयोगाचे यशच म्हणायला हवे.

शीर्षकातील ओळी एका शीख प्रार्थनेतील आहेत. ज्याला कुणी जिंकू शकत नाही, कुणी घाबरवू शकत नाही त्याला या प्रार्थनेत नमन केले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना त्या चपखल लागू पडतात, असे आमचे मत आहे.

सर्वाना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Premache prayog article