केवळ टीका नको, कारणमीमांसा शोधा

‘वैऱ्याची रात्र’ (१७ एप्रिल) मथितार्थ वाचला. नवीन मुख्यमंत्री वा पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत त्यांच्याकडून जादूई पद्धतीने सुधारणा करण्याची अपेक्षा करणे हे योग्य वाटत नाही याची कारणे अशी- १) आधीच्या सरकारने कोणत्या पद्धतीने कारभार हाकला होता? २) नवीन मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांचे सहकारी प्रशासकीय कारभाराशी किती अनुभवी आहेत. ३) एखादे सरकार अनेक वर्षे सत्तेवर असले की त्यांच्या हाताखाली असलेले प्रशासक त्या कारभाराच्या साच्याला/ आदेशांना सरावलेले असतात. त्यांच्या मानसिकतेत इतक्या झटपट पद्धतीने बदल होणे कठीण असते.
या सर्वाचा परिणाम नूतन मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर होत असतो. नूतन मुख्यमंत्र्यांचा अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. आधीच्या भ्रष्ट सरकारवर आसूड ओढून हे सत्तेच्या रथावर स्वार होऊन त्यांनी असे आदेश काढणे म्हणजे आधीच्या भ्रष्ट सरकारशी सामील होण्यासारखेच आहे. अनधिकृत बांधकामांना दोन कंगोरे असतात. एक तर ही बिल्डर लॉबीच निवडणुकांना मोठा निधी पुरवीत असते, त्या मोबदल्यात अशी अनधिकृत बांधकामे चालवून घेतली जातात. दुसरी बाब म्हणजे झोपडपट्टय़ांतील अनधिकृत बांधकामे. या झोपडपट्टय़ाच आमच्या लोकशाहीतील मोठी व्होटबँक आहे. आमच्यासारखे शहरी सुशिक्षित व्हाइटकॉलर्ड निवडणुकांच्या दिवशी लोणावळा/ खंडाळा/ लवासाला मौजमजा करीत असतात. जे मतदान करणार नाहीत त्यांचा ‘नो वर्क नो पे’ पद्धतीने पगार कापायला हवा. यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथमत: कुठलीही नवीन बांधकामे अनधिकृत पद्धतीने करू दिल्यास त्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित नव्हे, बडतर्फ करायला हवे व जे राजकारणी या अनधिकृत बांधकामांना आशीर्वाद देतात त्यांना त्या गुन्हेगार बिल्डर्सबरोबर सहगुन्हेगार ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा करायला हवा. असा कायदा होईल का? जी जुनी अनधिकृत बांधकामे आहेत त्या बिल्डर्स, झोपडपट्टी डॉन, राजकारणी यांचे पाय किती भ्रष्टाचाराच्या चिखलात आहेत, हे जाणून घेऊन त्या बिल्डर्सची पुढची बांधकामे रोखायला हवीत. ही बांधकामे अधिकृतच करायची असतील त्या वास्तूंच्या बिल्डर्सवर अत्यंत जबर असा दंड व सक्तीची कारावासाची शिक्षा अशी तरतूद कायद्यात हवी.
मुख्यमंत्र्यांची गृहखात्यावर पकड नाही म्हणजे नक्की त्यांनी काय करावे अशी अपेक्षा आहे? नरेंद्र दाभोलकरांचा खून आधीचे सत्ताधारी असताना झाला आणि पानसरेंचा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर. आता कोणी कोणावर किती व कसे दोषारोप करावेत.
कर्तव्यकठोर पोलीस यंत्रणेच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांनी राहणे आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करणे हे नूतन मुख्यमंत्र्यांचे प्रथम कर्तव्य आहे. आज अनेक भ्रष्टाचारी पोलिसांचे राजकारण्यांबरोबर संधान असते म्हणून तर प्राइम पोस्टिंग मिळते, ही प्रथा त्वरित बंद व्हायला हवी. ड्रगमाफिया बेबी पाटणकरला किती खुबीने व चतुरतेने पकडले! त्याबद्दल पोलिसांना वा गृहमंत्र्यांना शाबासकी दिली काय? फोरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेत वैज्ञानिकांची खूप कमतरता आहे. ही त्रुटी भरून काढून वैज्ञानिक शाळेला सबळ करण्याची आवश्यकता आहे. तसेच या विज्ञानशाखेकडे विद्यार्थ्यांनी वळण्यासाठी या विज्ञानशाखेची जास्तीत जास्त ओळख शाळेत क्रमिक अभ्यासक्रमात करून द्यायला हवी.
सुधीर देशपांडे, विलेपार्ले.

कलाकारांचाही टीआरपी काढता आला असता तर?
सासू-सुना-कुटुंबकलह मालिकांतून सुटका व्हावी म्हणून विनोदी मालिकांकडे वळावे तर तेथेही तोचतोचपणासह द्वैअर्थी, पुरुष, कलाकारांचे स्त्रीवेशातील पांचट विनोद याच्या अतिरेकामुळे प्रेक्षकांना कायमच रिमोटला चिकटून राहावे लागते. मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते हे सूत्र अनुसरून दादा कोंडकेंपासून द्वैअर्थी व कमरेखालचे विनोद आणि त्यात ‘मोरूची मावशी’पासून स्त्रीवेशातील विनोदाची भर या सूत्राचा अवलंब आताचे गुणवान व तथाकथित विनोदी कलाकारही अवलंबत आहेत. परंतु ‘विनोदाचा होतोय इनोद’ (लोकप्रभा ८ मे २०१५) मधून हे कलाकार विनोदी लेखन व विनोदी लेखकांच्या कमतरतेकडे बोट दाखवत असले तरी इतर तीन बोटे आपल्याकडे वळलेली असतात याची जाणीव ठेवत आपण सादर करीत असलेल्या विनोदाचा ‘इनोद’ होतोय इतपत ते सुज्ञ नाहीत का?
त्यामुळे जसा टीव्ही मालिकांचा टीआरपी काढला जाऊन कोणती मालिका प्रिय-अप्रिय हे जाहीर केले जाते तसे टीआरपीचे तंत्रज्ञान अधिक प्रगत करून मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांबाबत टीआरपी काढता आला तर किती बरे होईल. जेणेकरून त्या त्या कलाकारांना आपली त्या त्या मालिकांतील लोकप्रियता किती याची प्रचीती यावी (ओघाने निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांनासुद्धा ‘लेकी बोले सुने लागे’ प्रमाणे लागू ). उदाहरणार्थ ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम विनोदाच्या माध्यमातून मराठी नाटय़-चित्रसृष्टीला व त्यातील कलाकारांना घराघरांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे व नव्याने दाखल होणाऱ्या नाटक-चित्रपटाचा जणू ट्रेलरच सादर करून चित्रपटगृहातील मराठी प्रेक्षक संख्या वाढविण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. परंतु या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात सागर कारंडे, भालचंद्र (भाऊ ) कदम, कुशल बद्रिके या त्रयींचा स्त्रीवेशातील, पांचट विनोदाचा धांगडधिंगा येताच ‘चॅनेल बदलणेच’ क्रमप्राप्त ठरून ओघाने चांगल्या कार्यक्रमाला गालबोटच लागते आणि घराघरांतून हाच ‘चॅनेल बदल’ उपाय योजत असल्याचे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा विषय निघाला की ठासून सांगितले जाते (तीच गत ‘कॉमेडी विथ कपील’ मधल्या दादी अली असगरबाबतसुद्धा). तेव्हा सुज्ञांस सांगणे न लागे!
किरण प्र. चौधरी, वसई, ई-मेलवरून.

कैलास मानसरोवर माफक खर्चात
कैलास मानससरोवर यात्रेवरील १ मेच्या अंकातील लेखाने या यात्रेचे पवित्र दर्शनच घडवले. लेखकाने ही यात्रा काठमांडूहून सदकमार्गाने पूर्ण केली. हीच यात्रा हवाई मार्गानेही पूर्ण होऊ शकते. कैलासमानसहून केवळ १८० किलोमीटर अंतरावर गुन्सा येथे ल्हासाहून हवाई सेवा उपलब्ध आहे. दिल्लीहून हा हवाई प्रवास मात्र फारच दूरचा व खर्चीक. पंतप्रधानांनी आपल्या चीन दौऱ्यादरम्यान गुन्सा विमानतळ भारतीय विमानांसाठी खुला करण्याचे आवाहन करायला हवे होते. दिल्लीहून विमानाने केवळ दोन तासांच्या अंतरावरील गुन्सा येथे, हज यात्रेच्या धर्तीवर, थेट हवाई सेवा सुरू झाल्यास भाविकांना ही यात्रा सोयीस्करपणे व माफक खर्चात करता येईल. ‘लोकप्रभा’चे सुज्ञ वाचक हा विचार निश्चितपणे पुढे नेतील.
रमाकांत वाडकर, ई-मेलवरून.

कमळ शेती आवडली
‘कमळ फुलांची शेती’ हा २४ एप्रिलच्या अंकातील लेख खूप मस्त वाटला. छंद काय करू शकतो याचा प्रत्यय या लेखातून आला. पूर्वी छांदिष्ट माणसाला शौकिया म्हणून टिंगल करायचे पण गदिया यांची छांदिष्ट मेहनत पाहता कमळ शेतीचा स्वर्गच फुलल्यासारखे वाटते.
मनीष हरिश्चंद्र अकर्ते, अकोला.

पडद्यामागचे तारे
‘लोकप्रभा’ २४ एप्रिलच्या अंकातील ‘डान्स फ्लोअरवरचे तारे’ यामधील वास्तव्य मनाला भिडणारे आहे. कोणत्याही चित्रपटामधील नृत्याच्या प्रसंगामध्ये मुख्य नायक-नायिकेच्या बरोबरीने तसेच त्यांच्यामागेही बरेच साहाय्यक नृत्य-कलाकार मोठय़ा प्रमाणात नाचताना दिसतात. तेदेखील प्रचंड मेहनत व कौशल्य पणाला लावून प्रसंग जिवंत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण त्यांचे नाव कोणालाही कळत नाही. सेलेब्रिटींच्या मागे कौशल्यपूर्ण डान्स करूनसुद्धा आपला चेहरा मात्र दिसत नाही, ही खंत बाळगून जिद्दीने काम सुरू ठेवावे लागते. बिनचेहऱ्याची नाव नसलेली ही सर्व मंडळी मात्र आपले काम चोख व अचूक करण्यासाठी दिवस-रात्र झटत असतात. त्यांच्या या समर्पित कौशल्याला आमचा सलाम..
अनिल प्रल्हाद पाठक, विरार.

२५ जुलै १९४८ नव्हे १६४८
‘कौटिल्य आणि शिवराय’मधील पुरंदराची लढाई हा १० एप्रिलच्या अंकातील लेख वाचला. चाणक्याची युद्धनीती आणि युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती यातील सामस्थळे रंजक व माहितीप्रद आहेत. मात्र एकेठिकाणी शहाजीराजांवरील शत्रूंच्या त्रयींकडून झालेल्या हल्ल्याचा दिवस चक्क २५ जुलै १९४८ असा छापला गेला आहे. तो २५ जुलै १६४८ असा हवा होता.
महेशकुमार ग्वाडी, भुईबावडा, (जि. सिंधुदुर्ग).

‘मुलगा मुलगी की रेसचा घोडा’ हा लेख वाचला. सद्य परिस्थितीचे एकदम योग्य परिक्षण ह्य़ा लेखात केले आहे. शिक्षण म्हणजे नुसता धंदा झाला आहे. थेअरीपेक्षा प्रॅक्टीकलवर भर द्यायला हवा.
संजय बाक्रे, ई-मेलवरून.

शेवग्याबद्दल अधिक माहिती हवी..
वैद्य खडीवाले यांचे लेख आम्ही आवडीने वाचतो. १० एप्रिलच्या अंकात फळभाज्या आणि शेंगभाज्याबद्दल प्रकाशित केलेली माहिती खूपच छान आहे. पण त्यांनी शेवग्याबद्दल काहीच लिहिले नाही. शेवग्याच्या शेंगा औषधाचे परिणाम कमी करतात हे खरे आहे का? जिरे पूड करताना जिरे भाजल्यामुळे त्यातील तेल उडून जात नाही का?
आर. व्ही. देशमुख, नागपूर, ई-मेलवरून.