lp13पूर्वी घर म्हटलं की गावातलं टुमदार घर, त्यासमोर अंगण, त्यात भरपूर झाडं आणि पाळणा असं काहीसं चित्र रेखाटलं जायचं. मग त्या गावातल्या घराची जागा शहरातल्या लांबच लांब वाढणाऱ्या इमारतींनी घेतली. त्यांच्यातील खोल्यांमध्ये आबालवृद्धांची स्वप्नं सजू लागली. मग या घरात प्रत्येकाची हक्काची खोली, दिवाणखाना, स्वयंपाकघर यांची चित्रं रेखाटली जाऊ लागली. शाळेमध्ये वर्गात लिहिलेला हा निबंध केवळ वहीच्या पानांमध्ये बंदिस्त राहत नाही, तर वाढत्या वयानुसार घराचं स्वप्नही फुलतं जातं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तरी आपल्या हक्काच्या घरामध्ये आपण राहायला जावे असे स्वप्न जगाच्या पाठीवर प्रत्येक जण पाहत असतो. मग ते घर कितीही छोटं, अडचणीचं असो, पण ते आपल्या हक्काचं छप्पर आहे, याचं समाधान कायम असतं.

अर्थात या स्वप्नात रंगविलेल्या घरात आणि घर घेताना आपल्या गरजा आणि त्यानुसार केलेली घराची निवड यामध्ये तफावत असली, तरी प्रत्येक जण घर घेताना काही ठरावीक बाबींकडे बारकाईने लक्ष देतोच. मग कोणाला अमुक एका ठिकाणीच घर हवं असतं, तर कोणाला खोल्यांचं गणित सांभाळायचं असतं, कोणासाठी आजूबाजूचा परिसर महत्त्वाचा असतो, तर कोणाला ऑफिस, शाळेचं अंतर.. कारणं काहीही असली, तरी घराच्या संकल्पनेत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला जातोच. अगदी गेल्या पाच वर्षांपर्यंत घर घ्यायचं म्हणजे त्याची किंमत, क्षेत्रफळ यांना जास्त महत्त्व दिलं जात होतं. त्यानंतर घरासोबत फर्निचर देणाऱ्या ‘वेल फर्निश्ड’ घरांची संकल्पना बाजारात आली. बदलती पिढी आपल्याबरोबर नवीन नियम घेऊन येते. त्या नियमालाच अनुसरून आता ‘परवडणारं घर’ घेण्यापेक्षा ‘लक्झरिअस होम्स’ घेण्याकडेही तरुणांचा कल दिसू लागला आहे.
आपल्या ग्राहकाला आकर्षित करण्याचे प्रयत्न इतर क्षेत्रांप्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही होतात. अर्थात एकीकडे जागांचे भाव आकाशात पोहोचल्याची ओरड ऐकू येत असतानाच, लोकांची घर घेण्याची इच्छा मात्र संपत नाही. पण अशा वेळी बाजारातील इतर स्पर्धकांपेक्षा आपल्याकडे ग्राहकाला आकर्षित करून घेण्यासाठी बिल्डर्स त्यांच्यासमोर ‘लक्झरी होम’चा पर्याय ठेवू लागले आहेत. इतर नवीन बांधलेल्या बांधकामांप्रमाणे या घरांमध्ये केवळ मूलभूत खोल्यांचं विभाजन, बाथरूम, स्वयंपाकगृहाची संरचना, बटणांची जोडणी इतक करण्यापेक्षा त्यामध्ये प्रत्येक खोलीचं विभाजन डिझायनर्सच्या मदतीने विशिष्ट प्रकारे केलेलं असतं. तसंच खिडक्या, टाइल्सची निवडही जाणीवपूर्वक केली जाते. कित्येक इमारतींसाठी खास प्रकारची बटणं, नळ, भिंतीवरील टेक्शर तयार केलं जातं. विशिष्ट टाइल्स, बटणं परदेशातून आयातही केली जातात. त्यामुळे ग्राहकाला इतरांपेक्षा वेगळं आणि आपल्यासाठी खास बनविलेल्या घराचा अनुभव येथे घेता येतो. मागच्या वर्षी ‘लोढा बिल्डर्स’नी त्यांच्या मुंबईतील ‘द वर्ल्ड वन टॉवर्स’ या प्रकल्पासाठी जागतिक कीर्तीचे ‘डिझायनर जॉर्जिओ अरमानी’ यांच्याकडून घरं डिझाइन करून घेतली होती. फॅशनच्या क्षेत्रामध्ये अरमानी यांचं नाव जगातील प्रमुख डिझायनर्सपैकी एक म्हणून घेतलं जातंच, पण त्यासोबतच त्यांची ‘अरमानी/कासा’ कंपनी इंटिरिअर डिझायनिंगसाठीही प्रसिद्ध आहे. दुबईतील प्रसिद्ध ‘बुर्झ खलिफा’ इमारतीतील घरांचं डिझाइनही याच कंपनीने केलं होतं. मुंबईत लोढा बिल्डर्सच्या साहाय्याने तयार केलेल्या त्यांच्या घरांची किंमत ७.५ कोटींपासून ते थेट ५० कोटीपर्यंत होती. तरीही या टॉवरच्या बांधकामापूर्वीच साठ टक्के घरांची नोंदणी झालेली होती. ‘ओंकार रेल्टर्स’नेही मुंबईच्या मालाड विभागात ‘अल्टा मोंटे’ नामक प्रकल्पाची उभारणी केली आहे. चार ते पाच बेडरूम्स्च्या प्रशस्त घरांसोबतच येथे क्लब हाऊस, स्पा, थेरपी रूम्स, लायब्ररी, स्विमिंग पूल अशा विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
सध्या तरुणाई त्यांच्या तिशीमध्येच ‘घरं घेणं’ या स्वप्नाला प्राधान्य देताना दिसते आहे. त्यामुळे त्यांना केवळ घर हे राहण्यापुरतं नको असतं, तर त्यांना ते त्यांच्या राहणीमानाला साजेसं असणंही आवश्यक असतं. बडय़ा हुद्दय़ावर, मोठय़ा पगारावर काम करणाऱ्या तरुणांना त्यांचं ऑफिस सहकारी, अधिकारी वर्ग यांच्यापुढे आपल्या घराचा तोरा मिरवायचाही असतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने घराच्या किमती, क्षेत्रफळ यासोबतच घराच्या आजूबाजूचा परिसर, बिल्डरने देऊ केलेल्या सोयीसुविधा यांनाही तितकंच महत्त्व असतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या सोयी पुरविणाऱ्या ‘लक्झरी होम्स’ची मागणी १ टक्क्यावरून थेट ३० ते ४० टक्क्यांवर गेली आहे. यामध्ये नव्याने येणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणांचं प्रमाण जास्त आहे.
पुण्याच्या ‘पृथ्वी एडिफिस’ प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक अभय काळे यांच्या मते, जिथे आधीची पिढी त्यांच्या चाळिशी किंवा पन्नाशीमध्ये जमविलेल्या पुंजीमधून घर घेण्याचं स्वप्न पाहत असे, तिथे आजची पिढी लग्नापूर्वी हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहू लागली आहे. पण या पिढीला घर म्हणजे चार भिंती बिल्डरकडून अपेक्षित नसतात. त्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं असतं, इंटरनेटमुळे जग जवळ आलंय, त्यामुळे आजूबाजूला नवीन काय घडतंय याची त्यांना पुरेपूर जाणीव असते. त्यानुसार त्यांच्या मागण्याही बदलतात.
गेल्या काही वर्षांमध्ये मध्यमवर्गाचं प्रमाणही वाढतं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मूलभूत गरजा आणि चैनीच्या वस्तू यांचं सूत्रही बदललं आहे. पूर्वी घरात चैनीचा समजला जाणारा एसी आजच्या पिढीची गरज बनलेला आहे. त्यामुळे घर घेताना छोटय़ात छोटय़ा बाबींचा विचार त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
नेहमीच्या घरांच्या तुलनेत ‘लक्झरी होम्स’मध्ये पूर्वीच्या सिरॅमिक टाइल्सच्या ऐवजी आता इटालियन फर्निश्ड टाइल्सची मागणी केली जाते. लाकडी खिडक्यांऐवजी वेल फिनिश्ड युटिलिटी विंडोज पसंत केल्या जातात. बटणेसुद्धा वेगळ्या जोडणीची आणि डिझाइन्सची तयार केली जातात. एका रिमोट कंट्रोलवर संपूर्ण घरातील एसी, पंखे, दिवे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा ताबा मिळविला जातो. हे रिमोटही प्रत्येक घरासाठी वेगवेगळे तयार केले जातात. टचस्क्रिन, मोशन सेन्सरचा वापरही या घरांमध्ये बटणांच्या जागी केला जातो. अशा इमारतींमध्ये वैशिष्टय़पूर्ण लिफ्ट्स वापरल्या जातात. तुमच्या मजल्यावर जाण्यासाठी स्मार्टकार्ड्सचा वापर, थेट तुमच्या दाराशी उघडला जाणारा लिफ्टचा दरवाजा असे बदल यात केले जातात.
कॉपीराइट पद्धती
अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या या घरांची रचना आणि डिझाइन्स कित्येकदा कॉपीराइट कायद्यांतर्गत सुरक्षित केल्या जातात. त्यामुळे तुमच्या घराची नक्कल करणं इतरांसाठी कायद्याने गुन्हा ठरू शकतो. नेहमीच्या वन/टू बीएचके संकल्पनेतील घरांना ‘डय़ुप्लेक्स घर’ असं गोंडस नामकरण लक्झरी घरांमुळे मिळालं. पण यापुढे जाऊन ‘पृथ्वी एडिफिस’मधील घरांची रचना विशिष्ट प्रकारात केली असून त्यांचं ‘थम्बनेल’ हे नावही कॉपीराइट करून घेतल्याचं अमेय काळे सांगतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरात एक्स्ल्युझिव्हिटीची भावना मिळते. अर्थात या घरांमध्ये शॉवर एरिया, टॉयलेट असं बाथरूम एरियाचं विभाजन, मॉडय़ुलर किचनची रचनादेखील डिझायनरकडून विशिष्ट पद्धतीने तयार केली जाते. घराचे प्लॅस्टर करण्याची पद्धतही येथे वेगळी असते.
लक्झरी होमच्या किमती
पाश्चात्त्य डिझायनर्सकडून तयार करून घेतलेले मर्यादित स्वरूपातील ‘लक्झरी होम्स’ बिल्डर्स तयार करत असले, तरी दुसऱ्या बाजूला ही संकल्पना मध्यमवर्गाच्या खिशाला जास्त चटका लावणारी नसावी याकडेही ते प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्यांना परवडणाऱ्या किमतीतही ‘लक्झरी होम्स’ची संकल्पना देऊ करण्याकडे बिल्डर्सनी मोहरा वळविला आहे. ‘लक्झरी होम्स’ घेणारा ग्राहकाच्या डोळ्यासमोर १,००० ते १,५०० स्क्वे. फूटचे घर असते, त्यामुळे घराच्या क्षेत्रफळाचा तो विचार करत नाही. पण या किमतींची तफावत मुख्यत: जागाचे भाव आणि बांधकामांचा खर्च यावर आधारित असतात. ज्या परिसरात जागांचे भाव बिल्डरच्या बांधकामाच्या खर्चापेक्षा जास्त असतात, तिथे ‘लक्झरी होम्स’ आणि परवडणारी घरं यांच्या किमतीत जास्त फरक दिसत नाही. उलटपक्षी अशा परिसरांमध्ये घर घेऊ इच्छिणारे ग्राहक ‘लक्झरी होम्स’ना पहिली पसंती देतात. पण ज्या ठिकाणी जागेचे भाव हे बांधकामाच्या खर्चापेक्षा कमी असतात, तिथे मात्र ‘लक्झरी होम्स’ आणि परवडणारी घरं यांच्या किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांचा फरक सहजच दिसून येतो. बांधकामाचा खर्च काही अंशी कमी करून मध्यमवर्गाला परवडणारी घरं उपलब्ध करून देणं, बिल्डरला या परिसरात सहज शक्य होतं. पण ‘लक्झरी होम्स’मध्ये खर्च कमी करण्याची मुभा नसते.
मृणाल भगत