साईबाबा देव, गुरू किंवा संत नव्हते, तेव्हा त्यांची पूजा करू नका, त्यांचे फोटो, मूर्ती देवळातून काढून टाका असे आवाहन द्वारकापीठाचे शंकराचार्य, स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केल्यानंतर या मुद्दय़ाची चिकित्सा सुरू झाली आहे.

आध्यात्मिक क्षेत्रात भारताचे स्थान हे नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे. उदात्त आध्यात्मिक मूल्यांचा अंतर्भाव असणाऱ्या भारतीय संस्कृतीविषयी जगभरात कुतूहल आहे. ईश्वर, ज्ञान, भक्ती, मोक्ष, अनुभूती यांच्या बाबतीत आपल्या देशात चर्चा, मंथन चालूच असते. सध्याचा ताजा वाद धर्माचार्य म्हणवणाऱ्या व्यक्तींकडून साईबाबा यांच्याविषयी केल्या जाणाऱ्या निर्थक वक्तव्यांच्या बाबतीत आहे. यानिमित्ताने धर्माचार्याच्या एकूणच आचरणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात व यामुळे त्यांचे खुजेपणच समोर येते.
प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे जगणे समृद्ध करता यावे याक रिता आचरणाविषयी काही मूल्ये विविध मार्गानी सांगितली गेली आहेत, ज्यात ग्रंथांचा प्रामुख्याने समावेश होतो. व्यक्तीमधील जगण्याचा दृष्टिकोन व्यापक व्हावा, उदात्त विचार जगण्याच्या केंद्रस्थानी असावेत जेणेकरून त्याच्यातील मनुष्यत्वाचा, सद्गुणांचा संपूर्ण विकास होऊ शकेल व त्याचे जगणे सुखकारक होईल यासाठी एक आदर्श नियमावली आपण स्वीकारली, ज्याला धर्म हे नाव दिले गेले. आत्मोन्नती साधण्यासाठी उदात्त नीतिमूल्यांचा समावेश असणारी जीवनपद्धती असे आपण धर्म या संकल्पनेकडे पाहतो. ही जीवनपद्धती प्रत्येकाने आचरणात आणावी, त्याने सद्वर्तनाकडे प्रेरित व्हावे यासाठी प्रेरणा आवश्यक असते. ती प्रेरणा निर्माण होण्यासाठी आपल्यासमोर मूर्त स्वरूपात कोणी तरी हवे असते. याकरिता ग्रंथांमधून अवतारकथा व विविध आदर्श सांगितले गेले. ज्यातून व्यक्ती-व्यक्तीमधील नातेसंबंधात मार्गदर्शन मिळत गेले. तसेच व्यवहारात येणाऱ्या अनेक अडी-अडचणी, समस्या यांचे समाधान या व्यवस्थेकडून होऊ लागल्याने ही व्यवस्था रुजली. थोडक्यात असे म्हणता येईल की, व्यक्तीला या व्यवस्थेकडून जीवन जगण्याच्या कलेचे शिक्षण मिळाले. परंतु कालपरत्वे या व्यवस्थेमधील काही अपात्र व धर्मातील तत्त्वांचे आकलन न झालेल्या व्यक्तींकडून काही अनावश्यक भाग धर्माचा भाग असल्याचा भास निर्माण केला गेला. ज्याचा विपरीत परिणाम समाजमनावर झाला व या व्यवस्थेला विविध समस्यांनी ग्रस्त केले. साधन हे साध्य बनले व पुढे चालून तर त्याचे इतके अवडंबर माजले की काही व्यक्तीसमूहांना जगणेच असह्य़ होऊ लागले.
ज्यांना आपण खरे धर्माचार्य म्हणू त्यांची भूमिका इथे सुरू होते. त्यांनी धर्मातील हा अनावश्यक भाग तत्काळ दूर करून सत्यधर्म तत्त्वांची पुनस्र्थापना करणे गरजेचे होते. धर्माचार्य म्हणवून घेणाऱ्यांचे हे आद्य कर्तव्य आहे. कारण ज्यांनी स्वत: अशी उदात्त धर्मतत्त्वे आपल्या आचरणात आणून आत्मोन्नती साधली आहे व जे केवळ लोककल्याणासाठी आपले जीवन व्यतीत करतात, ज्यांनी लोककल्याण हे जीवनव्रत म्हणून स्वीकारले आहे व त्याकरिता त्यांनी स्वत: व्यावहारिक जगातील सर्व आकर्षणांचा त्याग केला आहे, अशा व्यक्तींना आपण धर्माचार्य म्हणतो. ‘शिवभावे जीवसेवा’ हे ध्यानी धरून प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक मार्गदर्शन करणे धर्माचार्याकडून अपेक्षित असते. समाजातील सत्प्रवृत्ती वाढावी, समाज निरोगी असावा याकरिता त्यांनी प्रयत्न करायला हवेत. दरिद्रीनारायणाची सेवा करावी, त्याला दु:खमुक्त करावे, हे त्यांचे उद्दिष्ट असायला हवे.
सध्या ज्या पद्धतीने व्यक्ती स्वत:ला धर्माचार्य म्हणवून घेत आहेत, त्यांच्यात या बाबींचा सुतराम संबंध नाही. मुळात त्यांचे ध्येय केवळ स्वत:ची उन्नती व तीसुद्धा स्वत:चा मठ संप्रदाय निर्माण करण्यात असल्याने पायामध्येच गडबड आहे. अर्थात यालाही आक्षेप नसता, जर यांनी आपली मर्यादा ओळखून आचरण केले असते; परंतु ज्या समाजात राहायचे तेथील व्यक्तींशी, त्यांच्या सुख-दु:खांशी आपली नाळ जोडली असली पाहिजे. अन्यथा समाजात राहून जो संन्यासी केवळ मठ व शिष्य यांच्यात रमला, त्यांना धर्म तत्त्वांचे व्यवस्थित आकलन झालेच नाही असे समजावे. जर असे नसते तर त्यांनी सर्वसामान्यांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन केले असते. आपल्या आजूबाजूला स्तुतिपाठकांचा घोळका त्यांना आवडला नसता व खरा कर्मयोग आचरला असता. त्यामुळे अशा प्रकारच्या धर्माचार्यानी कितीही आवाहन केले तरी त्यांचा समाजमनावरील प्रभाव हा शून्यच राहणार आहे.
राहता राहिला प्रश्न साईबाबा यांच्या देवत्वाविषयीचा. तर साईबाबा हे संत होते. वारकरी संप्रदायात संताविषयी अत्यंत स्पष्ट चित्र मांडले आहे.
ऐसी कळवळ्याची जाती,
करी लाभाविण प्रीती
संतांना सामान्यजनांकडून कसल्याही लाभाची अपेक्षा नसते. त्यांच्या कल्याणासाठी ते सदैव मार्गदर्शन करीत असतात. अनेक वेळा तर त्यांना समाजाची उपेक्षाच सहन करावी लागते. अशी उपेक्षा सहन करूनही ते आपले कार्य सोडून देत नाहीत. दीनजनांची सेवा करण्यात, त्यांना दु:खमुक्त करण्यातच ईश्वराची खरी सेवा आहे याची त्यांना खात्री असते. साईबाबांच्या जीवनचरित्रावरून त्यात कुठेच आध्यात्मिक ज्ञानाचा काटेरी दंभ आढळत नाही. तेव्हा सामान्यजन त्यांच्यावर श्रद्धा ठेवून सद्वर्तनाकडे प्रवृत्त होत असतील, त्यांच्या अस्वस्थ मनाला क्षणभर विश्रांती मिळत असेल तर साईबाबा यांच्याविषयी बेताल वक्तव्ये करून धर्माचार्यानी स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरी प्रकट केली आहे, यात शंका नाही.
संत हे सामान्यजनांच्या वृत्तीत सकारात्मक बदल घडवू शकतात. एका अर्थाने त्यांना देवाच्या जवळ नेणारे आहेत. म्हणून त्यांना देवाच्याही अगोदर वंदन केले पाहिजे. संत कबीरांच्या शब्दांत सांगायचे तर-
गुरु गोबिंद दोनो खडे काके लागू पाय
बलिहारी गुरु की जिन्ह गोबिंद दिनो दिखाय
तेव्हा देव की संत अशा प्रकारची बुद्धिभ्रम करणारी वक्तव्ये करणे हे धर्माचार्याचे काम नाही. त्यांनी शब्दपांडित्य माजवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात कसलाही परमार्थ नाही. शब्दज्ञानाचा वृथा अभिमान बाळगून त्या चैतन्यस्वरूपाची प्राप्ती होणे कधीच शक्य नाही.
व्यक्तींचे जगणे समृद्ध करणारी, त्याला सात्त्विक अर्थ प्राप्त करून देणारी व त्यांच्यामधील मनुष्यपण जिवंत ठेवणारी ‘जीवन जगण्याची कला’ अंगी बाळगणारे व ती सामान्यजनांना शिकवणारे संत समाजाला हवे आहेत.
एक मात्र खरे की, शिर्डी संस्थानाकडे जमा होणारा निधी विधायक कार्यात लावला गेला पाहिजे. या बाबतीत शेगाव संस्थानाचा कारभार आदर्श स्वरूपाचा आहे. जमा-खर्चाची पारदर्शकता, जवळपास ३६ प्रकारच्या विविध सेवाकार्यासाठी निधीचा विनियोग याचा आदर्श शिर्डी संस्थानाने जरूर घ्यावा.धर्मसंसदेची पाश्र्वभूमी
धर्मसंसद हे विश्व िहदू परिषदेचे अपत्य आहे. या परिषदेने १९८३ साली देशात एकात्मता यात्रा काढली. त्या यात्रेत प्रथम धर्मसंसदेची कल्पना पुढे आली आणि १९८४ मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात अशी धर्मसंसद भरविण्यात आली. तिला देशातल्या एकूण ७४ संप्रदायांमधील ५५८ संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित होते. त्या संसदेत रामजन्मभूमी मुक्तीची हाक देण्यात आली. पुढे १९९१ मध्ये झालेल्या धर्मसंसदेत या आंदोलनाची पुढची दिशा निश्चित झाली. त्यानंतरची लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, बाबरी मशिदीचे पतन वगरे इतिहास सर्वानाच माहीत आहे. भाजप आणि वििहप यांच्या घोषणेतले राममंदिर अजून ‘त्याच जागी’ उभे राहायचे आहे; पण त्या आंदोलनातून देशातील राजकीय आणि सामाजिक पट पूर्ण बदलला. त्याहून मोठा बदल झाला तो िहदू धर्माच्या दृश्य स्वरूपात. बाबरी मशिदीचे पतन हा िहदूंच्या गेल्या शेकडो वर्षांतला पहिला विजय मानला गेला, ही गोष्ट येथे लक्षणीय आहे. आजवरचा िहदू धर्म सहिष्णू होता, सर्वाना सामावून घेणारा होता. तो आता तसा असणार नाही, हा संदेश या आंदोलनाने दिला. त्याला देशभरातील िहदूंनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय होता. भाजपच्या सत्ताविजय यात्रेतून ते स्पष्टच दिसले; पण त्या आंदोलनातून निर्माण झालेला उन्माद तात्पुरता होता. तो ओसरला. िहदुत्ववादी शक्तींच्या सत्ताकारणाला त्यातून बळ मिळाले.

साईबाबा कोण होते?
साईबाबा देव नव्हते, संत नव्हतेच, पण गुरूही नव्हते, असा निकाल स्वयंघोषित धर्मसंसदेने दिला आहे. खरं सांगायचं तर बाबांनीही आपल्या उभ्या हयातीत मी देव आहे, संत आहे किंवा गुरू आहे, असं कधीच सांगितलं नाही. मग साईबाबा खरंच कोण होते? बाबा शिर्डीत आले तेव्हा एका मंदिरात बसले. पुजाऱ्यानं हाकललं तेव्हा (पुढे जिचं नामकरण बाबांनीच द्वारकामाई केलं त्या) मशिदीत बसले. गावातली मुलं त्यांच्यावर दगड मारत मागे धावत तेव्हा हसत हसत बाबा हा ‘खेळ’ खेळत. पुढे त्याच शिर्डीत चांदीची मूठ असलेली छत्री त्यांच्या डोईवर धरून त्यांची चावडी ते मशीद अशी मिरवणूक निघे तेव्हाही लोकांच्या आनंदात ते सहभागी होत. ना त्यांना दगडांचं दु:ख झालं, ना छत्रचामरांचा आनंद झाला. तेव्हाची शिर्डी साधारण होती. तिथे बाबांमुळे हळूहळू उच्चशिक्षितांची ये-जा वाढली तरी बाबांची साधी राहणी, त्यांची लोकांशी असलेली वर्तणूक कधीच बदलली नाही. कुणी श्रीमंत आहे म्हणून ते कोणाशी सलगीने वागले नाहीत की गरीब आहे म्हणून कुणाला झिडकारले नाही. उलट कुणाला फटकारताना त्याच्या श्रीमंतीला त्यांनी काडीची किंमत दिली नाही. त्यांनी कुणाच्याच धर्मावर आक्रमण केलं नाही, उलट प्रत्येकाला धर्मरत व्हायला शिकवलं. ‘अल्ला मालिक’ हा मंत्र कायम त्यांच्या मुखी असे, अनेक फकीर आणि हाजीही त्यांच्या संगतीचा लाभ घेत. पण शेकडो हिंदूही त्यांचे निस्सीम भक्त होते. शिर्डीत रामनवमी त्यांनी सुरू केली. अनेकांना विष्णुसहस्रनाम म्हणायला लावले. मशिदीचे नाव ‘द्वारकामाई’ ठेवले!