‘‘काय बाई नशीब! मुलगी दिसायला एवढी सुंदर आहे, पण बिचारी अंध आहे हो!’’ अशी वाक्ये कानावर पडली की, वाटतं, अरे! या लोकांना अशी का काळजी वाटते! उलट मी म्हणते, माझं नशीब जास्त चांगलं आहे, म्हणून देवाने मला अंधत्व दिलं.
मी अंध आहे म्हणून कुठे कमी पडले आहे का? शिक्षणात नाही, कोणाशी मैत्री करण्यात नाही, नोकरी करण्यात नाही. उलट या अंधत्वाचे मला झालेले फायदे ऐकलेत तर तुम्हाला वाटेल ‘‘देवा! ही आमच्यापेक्षाही भाग्यवान कशी रे!’’
मी स्मिता शिंदे जन्मापासूनच अंध असल्याने, आईवडिलांनी मला खूप जपले आहे. मला एक भाऊ व बहीण. भाऊ मोठा. बहीण माझ्यापेक्षा लहान. माझी काळजी घेताना आईबाबांचे तिच्याकडेही थोडे दुर्लक्षच झाले. ताईचेच सगळे जण करतात, अशा तिच्या तक्रारी ऐकून मला आपण कुणी तरी खास आहोत असे वाटायचे. आईवडिलांनी वेळेवरच मला अंधशाळेत घातले. त्यामुळे मी ब्रेललिपी चांगल्यापैकी शिकले. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण डोळस मुलींच्या बरोबरीने घेतले. इथे अंधशाळेतून मिळणाऱ्या सवलती तर मिळाल्याच पण चांगले मार्गदर्शकही (रीडर्स) ही लाभले. माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आणि मला ठअइ च्या एका अंधशाळेत मुख्याध्यापिकेची नोकरीही मिळाली. आपल्या स्वत:च्या पायावर मी आता उभी आहे. नशिबाने, एक नोकरी संपली किंवा सोडली तरी दुसरी अधिक चांगली नोकरी मला मिळते. यात आई-दादाची साथ मोलाची. ‘‘अगं स्मिता तुला मोबाइल वापरायची जेवढी माहिती आहे तेवढीसुद्धा मला नाही.’’ असे जेव्हा गोडबोले बाई म्हणतात तेव्हा तर मला माझा खूपच अभिमान वाटतो. काही गोष्टी आमच्यासारख्यांना पाहायला मिळत नसल्या तरी जवळचे लोक त्या समजावून देतात, जेणेकरून ते सर्व मी माझ्या मन:चक्षूने पाहते. आमची खास काठी हातात असली की मी एकटीने प्रवास करू शकते. मला पाहिजे त्या बसमध्ये कोणी तरी बसवून दिले की झाले. प्रवासात मोबाइलवर टेप केलेली गाणी ऐकते. मग सांगा आहे की नाही मी भाग्यवान?