होतोय अराजकतेचा खेळ…

क्रीडा
येतं वर्ष आहे ते फुटबॉल विश्वचषक, ट्वेंटी २० या स्पर्धाचं. जगभरातले क्रीडा रसिक या स्पर्धेकडे डोळे लावून बसले असले तरी प्रत्यक्ष ज्या देशांमध्ये या स्पर्धा होणार आहेत, त्या यजमान देशांमध्ये मात्र या स्पर्धाच्या निमित्ताने रण माजलं आहे..

क्रीडा
येतं वर्ष आहे ते फुटबॉल विश्वचषक, ट्वेंटी २० या स्पर्धाचं. जगभरातले क्रीडा रसिक या स्पर्धेकडे डोळे लावून बसले असले तरी प्रत्यक्ष ज्या देशांमध्ये या स्पर्धा होणार आहेत, त्या यजमान देशांमध्ये मात्र या स्पर्धाच्या निमित्ताने रण माजलं आहे..
खेळांच्या माध्यमातून दोन देशांमधील संबंध सुधारण्यात मदत होते, असे म्हटले जाते. भारत-पाकिस्तानमधील दुरावा कमी करण्यात क्रिकेटचा मोलाचा हातभार आहे. पण तरीही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरूच राहिल्यानंतरही पुन्हा खेळांच्या माध्यमातूनच दोन देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या अनेक देशांमध्ये असलेली राजकीय अस्थिरता, गोंधळाची परिस्थिती, दहशतवाद्यांचा धोका आणि अनेक कारणांमुळे प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या आयोजनावर परिणाम होऊ लागला आहे. भारतात २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही मोठय़ा प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला. तशाच अनेक अग्निदिव्यातून सध्या यजमान देशांना जावे लागत आहे. नवीन वर्षांत फिफा विश्वचषक फुटबॉल, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि अन्य प्रतिष्ठेच्या स्पर्धाची मेजवानी क्रीडा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. पण यजमान देशांमधील अराजकतेमुळे या स्पर्धाच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ब्राझीलमध्ये पुढील दोन वर्षांत  ऑलिम्पिक तसंच फूटबॉल विश्वचषक या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सध्या ब्राझीलकडे आहे. ब्राझीलची फुटबॉल परंपरा आणि फुटबॉलप्रेम सर्वानाच माहीत आहे. पाच वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणारे आणि पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो यांसारखे अनेक दिग्गज फुटबॉलपटू घडवणारे ब्राझील हे तसे आर्थिकदृष्टय़ा गरीब राष्ट्र. मार्च २००४ मध्ये ब्राझीलला फिफा विश्वचषकाच्या संयोजनपदाचे हक्क मिळाल्यानंतर येथील स्टेडियम्सच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली. ब्राझीलमधील विमानतळ तसेच पायाभूत सोयीसुविधा यांवर सरकारने ११ अब्ज डॉलर खर्च करण्याचे ठरवले. त्यानंतर ऑक्टोबर २००९मध्ये ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे २०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळाले. त्यामुळे सरकारसमोरील खर्चाचा आकडा वाढतच गेला. शिक्षण, दळणवळण या सोयीसुविधांवर लक्ष देण्याऐवजी ब्राझील सरकारने गेल्या वर्षी जून महिन्यात जनतेवर प्रवासखर्चाचा आर्थिक भार टाकला. त्यामुळे लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने करण्यास सुरुवात केली. सरकारी प्रवासावर अधिक अवलंबून असलेल्या जनतेचा उद्रेक कॉन्फडरेशन फुटबॉल चषक स्पर्धेदरम्यान झाला. लोकांनीच रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणा केल्या. याची सर्वात मोठी झळ बसली ती रिओ डी जानेरो, साव पावलो, पोटरे अलेग्रे, बेलो होरिझोन्टे आणि रेकिफे या प्रमुख शहरांना. याच ठिकाणी कॉन्फडरेशन चषकाचे सामने होणार होते. उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी फिफाचे पदाधिकारी ब्राझीलमध्ये येणार होते. त्यामुळे लोकांनी आपली बाजू मांडण्यासाठी रस्त्यांवर उतरून फिफाच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. स्टेडियम्सच्या नूतनीकरणाचा खर्च आता १४ अब्ज डॉलरवर गेला आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचारही होत आहे. त्यामुळे संतापलेल्या जनतेने आम्हाला या स्पर्धा नकोत, तर फक्त प्राथमिक सुविधांची अपेक्षा आहे, अशा मागण्या केल्या आहेत. जून महिन्यात होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसा लोकांच्या  उद्रेक वाढू लागला आहे. त्यामुळे फिफा विश्वचषकाच्या संयोजकांना आपल्या हक्कांसाठी भांडणाऱ्या ब्राझीलमधील जनतेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

जून महिन्यात होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसा लोकांच्या  उद्रेक वाढू लागला आहे.

१६ मार्च ते ६ एप्रिलदरम्यान बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. बांगलादेशच्या इतिहासातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे. अलीकडेच झालेल्या राजकीय हिंसेदरम्यान १३० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अराजकता माजवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पंतप्रधान हसिना शेख यांनी कठोर भूमिका घेतली आहे. याविरोधात अनेक राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे गेल्या काही आठवडय़ांपासून बांगलादेशमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ७४ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी चितगांवमधील हॉटेलबाहेर बॉम्बस्फोट झाल्यामुळे तेथे वास्तव्यास असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने आपला दौरा रद्द केला होता. आता पाकिस्तानच्या संघानेही ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घेण्याचा इशारा दिला आहे. राजकीय अस्थिरतेचा फटका जवळपास बांगलादेशमधील सर्वच शहरांना बसत आहे. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने राजधानी ढाका, चितगांव या ठिकाणी होणार आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सुरक्षाव्यवस्थेविषयीचे शिष्टमंडळ बांगलादेशच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी बांगलादेशमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बांगलादेशमध्येच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा व्हावी, यासाठी आग्रही आहे. पण अन्य देशांनी माघार घेण्याचा इशारा दिल्यास, बांगलादेशमधील विश्वचषक स्पर्धा अन्य ठिकाणी खेळवली जाऊ शकते. या स्पर्धेचे यजमान असलेल्या बांगलादेश क्रिकेट मंडळानेच स्पर्धेच्या आयोजनाबाबत शंका उपस्थित केली आहे. बांगलादेशमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली नाही तर आम्हाला विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क गमवावे लागतील, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी सांगितले आहे. लवकरच या स्पर्धेच्या त्रयस्थ ठिकाणांवर चर्चा करण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक श्रीलंकेत होणार आहे. जानेवारी महिन्यात श्रीलंकेचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर आशिया चषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा यशस्वी झाल्या तरच बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन होऊ शकेल.
पाकिस्तान हे आपल्या शेजारील राष्ट्र. पण या देशात कायम अस्थिरतेचे वातावरण असते. २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचे सर्व दौरे रद्द केले. त्यातच पाकिस्तानमध्ये अनागोंदी माजली असतानाही श्रीलंका संघाने तेथे जाण्याचे धाडस केले. पाकिस्तान सरकारने खेळाडूंना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले. पण ३ मार्च २००९ रोजी श्रीलंकेचा संपूर्ण संघ बसमधून लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी जात असताना दहशतवाद्यांनी बसवर हल्ला चढवला. एका देशाच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंवर झालेला हा पहिला हल्ला होता. त्यानंतर कोणत्याही संघाने पाकिस्तानच्या दौऱ्यावर येण्याचे धाडस केले नाही. २०११मध्ये आशियातील क्रिकेट मंडळांना आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळाले. भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये ही स्पर्धा होणार होती. पण पाकिस्तानातील राजकीय अंदाधुंदीमुळे तेथील सामने अन्य देशांमध्ये खेळवण्यात आले. पाकिस्तानला सध्या यजमानपदाचा मान मिळवण्यासाठी दुबईचा आधार घ्यावा लागत आहे. पाकिस्तानचे घरच्या मैदानावरील सर्व सामने दुबईत होत आहेत. येत्या काही वर्षांत तरी ही परिस्थिती बदलेल, अशी कोणतीच चिन्हे नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातील खेळांची अवस्था बिकट होत चालली आहे.
आतापर्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटे येतच राहिली आहेत. २०१४ च्या मोसमात जवळपास सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे यजमान देशांतील ‘ईडा पिडा टळो, आणि यशस्वी स्पर्धा होवो’, अशीच प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sports problem

Next Story
‘आखाती मराठी’ ची दुबईत गुढी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी