शाळा हे मुलांचं दुसरं घर असं मानसशास्त्र म्हणत. तिथं आपली लेकरं किती सुरक्षित आहेत? तिथले पालक म्हणजे शिक्षकच. ते किती वत्सल आणि सजग आहेत?

किशोरवयीन मुलांच्या दररोज नवनवीन उन्मेषांनी विकसित होणाऱ्या व्यक्तिमत्त्वांकडे एका आजीच्या नजरेनं अगदी साक्षी भावनेनं पाह्यला मिळणं हा माझ्या वाटचा एक उत्तम भाग्ययोग. ही मुलं निव्वळ माझ्या जीवनात असण्यातूनच मला अनेक तऱ्हांनी आनंदित करत असतात. त्यांच्याकडे नुसतं पाहूनही आनंदाचं भरतं येणं हे माझं आजघडीचं वास्तव.
पण या वास्तवाला एक अत्यंत दुखरा, मनाला नाउमेद करणारा कोपराही आहे तो या मुलांच्या शाळा-कॉलेजातील वास्तवाचा. वयाची पहिली एक-दोन वर्षे ही मुलं पूर्णवेळ घरात असतात. त्यांचं घरकुल हेच त्यांचं जग असतं. ज्या मुलांच्या वाटय़ाला प्रेमळ, संवेदनशील कुटुंब येतं, त्या मुलांवर घडलेल्या संस्कारांमुळे घराबाहेरचं जगही असंच छान, प्रेमळ आणि विश्वसनीय आहे अशी त्यांची धारणा बनते. मोठेपणी ही मुलं स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वासानं पुढे सरसावतात. येणाऱ्या आव्हानांना, अडचणींना ती कणखरपणे सामोरी जाऊ शकतात. प्रेमाबाबत, गैरशिस्त, बेपर्वा असणाऱ्या कुटुंबातून वाढणाऱ्या मुलांमध्ये असा आत्मविश्वास आणि कणखरपणा जोपासला जात नाही. घराबाबत हे जसं सत्य असतं, तसंच शाळेबाबतही ते असतं. शाळेतले शिक्षक हे मुलांना खूप जवळचे आप्त वाटत असतात. त्यामुळे आईबाबांच्या वर्तनाचे जसे नकळत संस्कार मुलांवर घडतात, तसेच संस्कार त्यांच्या शिक्षकांच्या वर्तनाचेही घडत राहतात.
अगदी छोटय़ा-मोठय़ा शिशुवर्गात फारसा अभ्यासाचा ताण नसल्यानं मुलं शाळेत खूप रमतात. घरी आल्यावरही ती शाळा शाळा खेळत असतात. हल्ली शाळेतच हसतखेळत शिकवलं जातं. पुस्तकं साधी, सुबक, सचित्र असतात. जीवनाच्या सर्व अंगांचा विकास होऊन मुलांना जगण्याचं एक आदर्श भान यावं असा अभ्यासक्रम शाळांतून राबवला जातो. मग अशा शिक्षणातून खरं तर मुलं आनंदी बनताना दिसायला हवीत. नवनवीन विषय शिकायला ती उत्सुक बनलेली हवीत. त्यांच्या ठायीचं कुतूहल वाढीस लागलेलं असायला हवं. पण बरोबर याच्या उलट चित्र आज दिसतं आहे.
आपापल्या शाळेतले शिक्षक या चिमण्या लेकरांना त्यांचे पालक, रक्षणकर्ते आहेत असं अनुभवता येतं आहे का? ते वत्सल नजरेनं या मुलांकडे कधी पाहतात का? प्राथमिक शाळेपासून वर्गात पहिल्या दोनपाच नंबरात येणाऱ्या मुलांनाच प्रत्येक उपक्रमात संधी देणारे, त्यांचं कौतुक करणारे शिक्षक इतर सर्व मुलांकडे ती निव्वळ मच्छर, कचरा, गाळ असावीत अशा नजरेनं पाहात असतात. त्यांची अवहेलना करत असतात. कचरा, मच्छर, गाळ हे शब्द माझे नाहीत. किशोरवयीन मुलांनी त्यांची व्यथा माझ्यापाशी मांडताना वापरलेले हे शब्द आहेत.
किशोरवयीन मुलं बिथरून, भेदरून गेल्यानं जेव्हा वेडीवाकडी वागतात, तेव्हा त्यांना नावं ठेवण्याऐवजी या मुलांच्या पालकांचं, शिक्षकांचं मुलांशी घडणारं असं वर्तन जे पाहू जातील ते त्यांचं वर्तन पाहून माझ्याइतकेच व्यथित होतील.
नीरज खूप हुशार मुलगा आहे. बालवर्गात तो शिक्षकांचा लाडका होता. साऱ्या शिक्षिका त्याचे खूप लाड करत. तो पहिलीत गेल्यावर चित्र हळूहळू पालटत गेलं. त्याला शिकवलेलं चटकन कळे. शिक्षक जेव्हा इतर सर्व मुलांना कळावं म्हणून एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करू जात किंवा घरी जेव्हा तिला टेन्शन येतं म्हणून त्याची आई पुन्हा पुन्हा त्याची उजळणी घेत राही, तेव्हा तो बिथरून जायचा. तो वर्गात मस्ती करू लागायचा. पहिलीत तो काही अक्षरं उलट लिहायचा. झालं! लगेच शाळेतील सायकॉलॉजिस्टनं त्याला डिसलेक्सिया असावा, हे निदान केलं. त्याची रवानगी डॉक्टरकडे करावी हे सुचवलं. नीरज खूप हुशार होता. आपल्याला सायकॅट्रिस्टकडे नेलं हे त्याला नीट समजलं. तो आतूनच हादरला. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर एक ओरखडा कायमचा उठला. मुलांच्या संगोपनाबाबतच्या माझ्या छोटय़ाशा अनुभवविश्वातून शाळांतून होणाऱ्या अशा डिसलेक्सियाचा बागुलबुवा मुलांना पूरक ठरण्याऐवजी मारक ठरतो आहे असं माझं ठाम मत बनलंय. माझ्या शिबिरात ‘सतत एखादं तरी मूल डिसलेक्सिया आहे असं शाळेनं सांगितल्यानं हादरलेले पालक येतात. पालक इथे रमताच, त्यांनी स्वत:च्या दृष्टिकोनात आणि वर्तनशैलीत ठराविक बदल करताच ही मुलं आपोआप शांत होतात. उत्तम लिहू लागतात, स्वत:ला छान शिस्त लावू लागतात. हुशार मुलं जेव्हा वर्गात मस्ती करू लागतात, तेव्हा शिक्षक त्यांना प्रॉब्लेम चाइल्ड मानू लागतात. खरं तर या मुलांना त्यांच्या हुशारीबद्दल शिक्षकांनी शाबासकी देऊन पाहावं असं मला वाटतं. अशा एका मुलाची आई स्वत: शिक्षिका आहे. ती स्वत:च्या मुलाबद्दल ही तक्रार घेऊन आली, तेव्हा ती सांगू लागली, ‘‘हा गुण हा हुशार मुलांमधला जेनेटिक दोष असावा. सर्वच हुशार मुलं असला व्रात्यपणा वर्गात करतात असाच माझा एक शिक्षक म्हणून अनुभव आहे.’’ मी तिला म्हटलं, ‘‘मुलं कधीच ‘प्रॉब्लेम चाइल्ड’ नसतात. आपला त्यांच्याकडे पाहण्याचा, त्यांना समजून घ्यायचा दृष्टिकोन अपुरा, सदोष असतो. तू गणित शिकवतेस नं?’’ ती म्हणाली, ‘‘गणित आणि भूगोल हे माझे विषय आहेत.’’ मी तिला म्हटलं, ‘‘मग एक प्रयोग करून पाहा. गणित शिकवताना पहिल्यांदा ते समजावून होताच अशा तुझ्या मते व्रात्य मुलांना तू सांग ‘हे तुला छान समजलंय हे मलाही समजलं. तू ही तीन गणितं सोडव’ असं सांगून तू त्याला तो गणिताचा कागद दे आणि मगच इतरांना शिकवू लाग.’’
‘‘आणि भूगोल शिकवताना काय करू? मला आता या वर्गाला भारतातील पिकं शिकवायची आहेत.’’ मी म्हटलं, ‘‘छान! वर्गात एका कागदावर भारताचा नकाशा घेऊन जा. व्रात्य मुलाला सुरुवातीलाच तो देऊन आधी शिकवलेला ‘भारतातील पाऊस’ भरायला सांग. मग मुलांना पिकं शिकवून होताच तो पर्जन्यमानाचा नकाशा दाखव.’’
‘‘पण या व्रात्य मुलाचं लक्ष तेव्हा माझ्या शिकवण्याकडे नसेल. त्याचं नुकसान होईल.’’
मी म्हटलं, ‘‘करून पाहा आणि सांग मला.’’
तिनं तो प्रयोग करून पाहिला. ती सांगत आली. ‘‘आजी, मुलं खरंच छान असतात. त्या दोन्ही विषयात हुशार आणि व्रात्य असलेल्या मुलांना मी वाईट ठरवल्यानं ती अधिकाधिक बिथरून जात होती, ही माझी घोडचूक मला उमजली. त्यांच्या हुशारीला चालना देणं हे माझं कर्तव्य मी विसरून गेले होते. माझ्या सर्वच वर्गात आता फक्त शहाणीच मुलं आहेत.’’
बालवर्गात मुलांना रागावणारे, त्यांचा धिक्कार करणारे शिक्षक मुलांमधला आत्मविश्वास पार घालवतात. या वयात मुलांची अस्मिता शिक्षकांच्या सहज हेटाळणीतूनही खूप दुखावते. प्राथमिक शाळेत प्रेमळ, सहनशील आणि सक्षम शिक्षक असणं ही मुलांची एक अत्यंत महत्त्वाची गरज असते. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच शिक्षक ती भागवू पाहतात.
किशोरवयीन मुलं शाळांच्या वरच्या वर्गात किंवा कॉलेजात शिकत असतात. त्यांच्या शिक्षकांबद्दल त्यांचं मत जाणून घेण्यासाठी एकदा मी एक खेळ घेतला. त्या खेळातून त्यांचे कॉलेजातले आणि क्लासमधले शिक्षक त्यांना सतत परीक्षेतील अपयशाचा बागुलबुवा दाखवून कसे सतत घाबरवून टाकतात, ते त्यांनी मस्त अभिनय करून दाखवलं. त्याहून एक गंभीर गोष्ट मुलांनी व्यक्त केली. मुलांनी वक्तशीर असावं, गृहपाठ वेळेत पूर्ण करावा असा धोशा त्यांच्यामागे लावणारे शिक्षक स्वत: तसे कधीच वागताना मुलांना दिसत नाहीत. हे शिक्षक स्वत:च्या अशा वर्तनातून मुलांना बेजबाबदारपणा, अधिकारशाही आणि हिंसेचेच संस्कार करताहेत, याचं भानच अशा शिक्षकांना नसतं. हिंसेबाबतचा मुलांना पडलेला प्रश्न मला खूप दु:खद वाटला. ती म्हणाली, ‘‘वारंवार ‘दे मार’ चित्रपट आम्ही पाहू नयेत. त्यातून मेंदू बराच काळ अस्वस्थ, बेचैन राहतो, त्यापायी आपली मन:शांती ढळते, असं तू म्हणतेस, पण आजी आमच्या शिक्षकांचं असं अस्वीकाराचं, दादागिरीचं आणि बेजबाबदारपणाचं वर्तन आमच्या मेंदूला कितपत शांत ठेवत असेल? तू आम्हाला एका शास्त्रज्ञानं केलेलं परीक्षण समजावून देताना सांगितलंस की कठीण गोष्टींना, प्रसंगांना सामोरं जाताना प्रसन्नचित्त असणं ही मूलभूत गरज असते. आमचे शिक्षक आमची प्रसन्नचित्तता महत्त्वाचीच मानत नाहीत का?’’
मी यावर काहीच प्रत्युतर दिलं नाही. पण मनात विचार मात्र दोनचार दिवस करतच होते. त्या काळात आठवलेल्या दोन कहाण्या इथं सांगाव्याशा वाटतात.
अखिल आमच्या मित्राचा नातू. दररोज संध्याकाळी आपल्या बाबांसमवेत किंवा आजोबांसमवेत जिमखान्यात येणारा. हौसेनं पोहणारा. वेगवेगळे खेळ खेळणारा. महिनाभरात तो जिमखान्यात कुठे दिसला नाही. एकदा त्याचा बाबा दिसताच मी अखिल कुठे आहे याची चौकशी केली. तेव्हा त्याचा बाबा म्हणाला, ‘‘काय सांगू? एक विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. अखिल इथं त्याच्या एका शाळासोबत्यासोबत टेबल टेनिस खेळायचा. नेहमी त्याचा सोबती छान खेळायचा. पण एक दिवस अखिल लागोपाठ दोनदा जिंकला. अखिलनं जल्लोष केला. हरण्याची सवय नसल्यानं असेल, पण त्याचा सोबती खूपच नाराज झाला आणि अखिलला म्हणाला, ‘‘थांब, तुला दाखवतोच आता!’’ अखिलने हे सारं मला तेव्हाच सांगितलं होतं. नंतरच्या रविवारी अखिलच्या शाळेत स्नेहसंमेलन होतं. आम्ही थोडं उशिरा पोहोचलो, पण अखिल लवकर गेला होता. त्या सोबत्याचे बाबा आणि तो सोबती अखिलला दाराशीच भेटले. अखिल ‘हॅलो’ म्हणून त्या बाबांना अभिवादन करत असताना तो मित्र म्हणाला, ‘‘बाबा, हाच तो अखिल.’’ काय होतंय कळायच्या आतच त्या बाबांनी अखिलच्या मुस्कटात मारली. अखिलच्या वर्गशिक्षिका शेजारीच स्वागताला उभ्या होत्या. अखिल पार घाबरला. वर्गशिक्षिकेपाशी गेला. पण त्या काहीही प्रतिक्रिया न देता पालकांचं स्वागत करत राहिल्या. अखिल मुसमुसत आमची वाट पाहत बसला. आम्ही त्याला समजावलं. पण तेव्हापासून तो खूप घाबरला आहे. तो शाळेत कसाबसा जातो. माझी बायको आणि माझे बाबा शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटले. सारं काही सांगितलं. मुख्याध्यापकांनी वर्गशिक्षिकेला बोलावून घेतलं. तिच्यापाशी शहानिशा करू जाताच तिनं चक्क कानावर हात ठेवले. ‘मी तिथं नव्हतेच,’ एवढंच ती म्हणाली. मुख्याध्यापक म्हणाले, ‘साक्षी पुरावा नसल्यानं मी काहीच करू शकत नाही.’’ आज या गोष्टीला सहा महिने झाले. अखिल पार हिरमुसलेलाच आहे. कायद्यावर बोट ठेवून अखिलचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक तटस्थ राहिले हे कितपत योग्य आहे? मुलांची सुरक्षितता इतकी क्षुल्लक असते का?
नकुलच्या बाबतीत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं वर्तन याहून फारच बेफिकिरीचं आणि स्वत:ची कातडी बचावण्याचं होतं. नकुलला त्याचे दांडगट मित्र ‘लडकी, लडकी’ म्हणून चिडवत. त्याच्या गालाचे पापे घेत. नकुल त्यांना खूश करू जाई. त्याचा फायदा घेत ती मुलं त्याला घरून पैसे आणायला भाग पाडत. नकुल घाबरला, अस्वस्थ झाला. घरातून किरकोळ चोऱ्या करू लागला. त्याच्या आईबाबांनी शाळेत तक्रार केली, तेव्हा ‘पाहतो’ एवढंच म्हणून वर्गशिक्षिकेनं आणि नंतर मुख्याध्यापकांनी त्यांना वाटेला लावलं. नकुलचं स्वास्थ्य पार हरपलं. एक दिवस त्याच्या वहीत वर्गशिक्षिकेला ‘स्युसाइड नोट’ सापडली. तिनं लगेच नकुलच्या आईबाबांना बोलावून ते बेजबाबदार पालक आहेत, आणि नकुलला धाकदपटशा दाखवताहेत, असं म्हणत त्यांना एक लेक्चर दिलं. त्यावर नकुलच्या बाबांनी त्यांना सांगायचा प्रयत्न करताच त्या म्हणाऱ्या, ‘‘त्यानं बरंवाईट काही केलं तर मला पोलीस पकडतील. तुम्ही त्याला शाळेतून काढा.’’ नकुलचं दहावीचं वर्ष. प्रिलिम परीक्षा महिन्यावर आलेली. पालक काय करणार? ते नकुलला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले. औषधं सुरू केली. नकुल जेमतेम परीक्षेला बसला त्याला त्याच्या क्षमतेपेक्षा खूप कमी मार्कस् मिळाले. परीक्षा संपून वर्षभरानंतरही त्याचे उपचार सुरू होते.
शाळा हे मुलांचं दुसरं घर असं मानसशास्त्र म्हणत. तिथं आपली लेकरं किती सुरक्षित आहेत? तिथले पालक म्हणजे शिक्षकच. ते किती वत्सल आणि सजग आहेत? जे अखिल आणि नकुलच्या बाबतीत घडलं, ते या शिक्षकांच्या स्वत:च्या मुलांच्या वाटय़ाला येणारच नाही का? आणि जर आलं, तर त्यांच्या शिक्षकांचं तटस्थपण आणि बेफिकिरी हे शिक्षक एका पालकाच्या भूमिकेतून कितपत स्वीकारू शकतील? असे सारे प्रश्न मनात उभे राहतात. या कोवळ्या, संवेदनक्षम, हळव्या किशोरांचं वास्तव एक करुण आणि दारुण चित्रच रेखाटत राहतं आणि माझी झोप उडते.