News Flash

आदरांजली : संपादक आणि मित्र

‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चे व्यवस्थापकीय संपादक सुनील जैन यांचे नुकतेच करोनामुळे निधन झाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली-

सुनील जैन

‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चे व्यवस्थापकीय संपादक सुनील जैन यांचे नुकतेच करोनामुळे निधन झाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली-

अगदी लेटेस्ट असं मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक हातात आलं तेव्हा सुनील जैन यांच्या डोळ्यांत अगदी लहान मुलासारखा आनंद होता. मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक हा प्रकारच भारतात तेव्हा नवीन होता आणि काही मोजक्या लोकांकडेच ते होतं. आता सुनील जैन अशा मोजक्या लोकांपैकी एक ठरले होते. त्याचा स्क्रीन वेगळा करून ते टॅबलेटसारखं वापरता यायचं. पेनासारखा दिसणारा त्याचा स्टायलस घेऊन नोट्स काढत बसायला त्यांना फार आवडायचं; पण कशामुळे ते माहीत नाही, त्यांचं हे मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक सारखं बिघडायला लागलं. ऑफिसमधल्या कुणाही इंजिनीअरला त्याला नेमकं काय झालं आहे ते समजेना आणि सुनील जैन यांच्या डोळ्यांतला सगळा आनंद जाऊन त्यांच्या कपाळावर आठय़ा आल्या. त्यांची चिडचिड सुरू झाली. आठवडाभर प्रयत्न करूनही काहीच झालं नाही तेव्हा त्यांनी सरळ ईमेल लिहिला. त्यात ‘डिअर मिस्टर नाडेला, तुमचं सरफेस बुक काही कामाचं नाही’ असं लिहीत आपल्या सगळ्या तक्रारींचा पाढा वाचला. नाडेला यांनी लगेचच तो मेल मायक्रोसॉफ्टच्या भारतप्रमुखांना पाठवला. त्यांनीही लगेचच त्याची दखल घेऊन सुनील यांच्याशी संपर्क साधला आणि सरफेस बुक बदलून द्यायची तयारी दर्शवली. या ऑफरमुळे ग्राहक म्हणून कुणीही आनंदून गेला असता; पण सुनील जैन तसे नव्हतेच. ‘तुमच्या या ऑफरसाठी मी तुमचा आभारी आहे; पण मुळात हे नवंकोरं सरफेस बुक खराब का झालं आणि आता ते दुरुस्त का होऊ शकत नाही ते मला सांगा..’ असं त्यांचं म्हणणं होतं. त्या सरफेस बुकसाठी त्यांनी चांगली घसघशीत रक्कम मोजली होती आणि त्यामुळे आता त्यांना या प्रश्नांची उत्तरं हवी होती.

याच्या अगदी उलट गोष्ट म्हणजे करोनाचा संसर्ग झाल्यावर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करायचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा त्यांनी साफ नकार दिला. मी त्यांना विचारलं, दिल्लीसारख्या प्रदूषणग्रस्त शहरात त्यांच्यासारखी तीव्र अस्थमा असलेली व्यक्ती रुग्णालयात भरती व्हायला विरोध का करते आहे? त्यावर त्यांचं उत्तर होतं, मला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मित्रमंडळी इकडेतिकडे फोनाफोनी करणार, जीवतोड प्रयत्न करणार; पण आधीच प्रचंड रुग्णसंख्येमुळे तणावग्रस्त असलेल्या दिल्लीमधल्या रुग्णालयांवर आणखी ताण येऊ नये, असं मला वाटतं.

सुनील जैन या एकाच व्यक्तीच्या या दोन वेगवेगळ्या रूपांची संगती कशी लावायची? तर आपल्या निर्णयप्रक्रियेत ते नेहमी व्यापक पातळीवर विचार करत या मुद्दय़ावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेता येतो.

त्यांच्या मृत्यूनंतर मला आलेले मेसेज, फोन, त्यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर आलेल्या पोस्ट या सगळ्यांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे आणि ती म्हणजे सुनील जैन यांची निर्विवाद नीतिमत्ता, त्यांचा प्रामाणिकपणा. त्यांनी त्यांच्या भूमिका आणि अनेकांशी असलेली मैत्री यांच्यामध्ये कधीही गल्लत केली नाही. त्यांची ही वृत्ती हाच त्यांच्या चांगल्या पत्रकारितेचा पाया होता. या वृत्तीमुळेच लोक त्यांना मानत. या वृत्तीमुळेच त्यांनी जगभरात भरपूर मित्र जोडले होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, उद्योगमंत्री यांच्यापासून ते विरोधी पक्षांमधले नेते, वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रमुखांपर्यंत सगळ्यांचंच सुनील जैन यांच्या व्यवसायावरील निष्ठेबाबत तसंच बौद्धिक क्षमतेबाबत एकमत होतं. यामागचं कारण एकच, ते म्हणजे आपली मतं निर्भीडपणे मांडायला ते कधी कचरले नाहीत. त्याच्या परिणामांची त्यांनी तमा बाळगली नाही. समाजातील ट्रेण्ड्स इतर कुणालाही जाणवण्याआधी त्यांच्या लक्षात येत. सरकारमधले लोक नेहमीच संपादकांशी असहमत असतात. ते सुनील जैन यांच्याशीही असहमत असत; पण कुणालाही कधीही त्यांच्या हेतूंविषयी शंका नसे. जैन यांच्या वाचकांनाही ती नसे.

संपादक म्हणून ते अतिशय संतुलित, खुल्या विचारांचे, खुल्या मनाचे, सगळ्या मतांचा आदर राखणारे, स्वतंत्रपणे विचार करणारे, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असलेले, स्वत:ला अधिकाधिक विकसित करण्यासाठी तत्पर असलेले दुर्मीळ म्हणता येतील असे संपादक होते. आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर तसं सांगण्यात त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. अगदी आपल्या प्रतिस्पर्धी संपादकालाही ‘मला जरा हे समजावून सांगा’, असं म्हणण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नीट समजावून घेऊन लिहिण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांचं लिखाण, त्यांची सदरं वाचनीय असत. सार्वजनिक कंपन्यांमधली निर्गुतवणूक असो की शेती सुधारणा विधेयक, त्यांनी आपली मतं कायमच स्पष्टपणे मांडली. लिहिणं अशक्य होईपर्यंत ते लिहीत राहिले. कोविडशी लढतानाही ते लशीचे दर मुक्त बाजारपेठेत ठरावेत हा मुद्दा आग्रहाने मांडत राहिले. सरकारशी मतभेद असले तरी आत्ता सरकारशी राजकीय लढाई करण्याची ही वेळ नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या त्यांच्या शेवटच्या लेखाचं शीर्षक होतं, ‘आपला शत्रू सरकार नाही, तर कोविडचा विषाणू आहे’.

त्यांच्या मृत्यूमुळे आपण या करोनाबरोबरची एक लढाई हरलो आहोत, अशीच भावना माझ्या मनात आहे. ज्याच्याबरोबर काम करताना मला खूप शिकायला मिळत होतं, असा केवळ एक संपादकच नाही, तर एक चांगला मित्रही मी गमावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 8:23 am

Web Title: sunil jain financial express editor passes away adaranjaly dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २१ ते २७ मे २०२१
2 Twitter मोफत वापरता येणार नाही, ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार पैसे
3 उशिरा आलेली जाग
Just Now!
X