तृप्ती राणे – response.lokprabha@expressindia.com

मार्च २०२० – देशभरात टाळेबंदी, ढासळलेली वैद्यकीय पायाभूत सुविधा व्यवस्था, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कापले गेले, अन्न-जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा – कारण करोना!

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

मार्च २०२१ – स्थानिक टाळेबंदीसदृश कडक निर्बंध, कोलमडलेली वैद्यकीय पायाभूत सुविधा, प्राणवायू आणि औषधांचा तुटवडा, रुग्णाच्या हतबलतेचा गैरफायदा घेणारी वैद्यकीय महागाई, किरकोळ ग्राहकाला पछाडणारी इतर वस्तूंची महागाई, पुन्हा एकदा नोकरी आणि पगाराच्या बाबतीत साशंकता – कारण, करोना आणि त्याबरोबर आपणसुद्धा!

गेल्या वर्षी जेव्हा या सर्व गोष्टींची सुरुवात झाली तेव्हा भीतीमुळे आपण सुरुवातीला काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन केलं. परंतु ऑक्टोबर महिन्यानंतर मात्र आपण सगळेच गाफील झालो. पाटर्य़ा, प्रवास, खरेदी, खादाडी सगळं जणू नॉर्मल झालं. इतकंच काय, आपण करोनावर मात केल्याचं सेलिब्रेशनसुद्धा केलं. पण करोना मात्र त्याच्या पहिल्या वाढदिवसाला चांगलाच गुटगुटीत झाला आणि त्याची मस्ती आणि आगाऊपणा अजून वाढला. तो पुढे काय करेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाहीये. त्याचा पसारा आवरणं जास्त कठीण होऊन बसलंय. गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरीसुद्धा या सर्वांची परिणती होते ती एकाच गोष्टींमध्ये – अनिश्चितता! आपण सगळेच पुन्हा एकदा संभ्रमावस्थेत गुंतलो आहोत की आता काय, पुढे अजून किती काळ हे चालणार आणि काय काय भोगावे लागणार?

गेल्या मार्चपासून जे काही घडतंय त्यातून आपण आर्थिकरीत्या स्वत:ला आणि कुटुंबाला कसे सुदृढ करता येईल यावर एक गुंतवणूक सल्लागार म्हणून प्रयत्न केले. आजही करोना आहे, पुढे अजून काहीतरी येऊ शकतं. संकट कुठल्याही स्वरूपामध्ये येऊ शकतं. आपण फक्त आपली आयुधं तयार ठेवू शकतो. त्यामध्ये आपली शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक परिस्थिती आली. पहिल्या तीन गोष्टींवर समुपदेशन हे माझ्या अखत्यारीत बसत नसल्याने त्याबद्दल मी बोलू शकत नाही, परंतु आर्थिक सुबत्ता आणि त्यातून मिळणारं मानसिक तसंच भावनिक समाधान याबाबत मात्र मी निश्चितच सांगू शकते.

पैशाचं सोंग आणता येत नाही ही म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहे, परंतु आजच्या क्रेडिट कार्ड आणि कर्जाच्या विळख्यात गुरफटलेल्या आणि ऑनलाइन खरेदीच्या आहारी (वाया!) गेलेल्या अनेकांना अंथरूण पाहून पाय पसरावे या तत्त्वाची जाणीव नसल्यागत झालं आहे. आजच्या या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक तणावातून जात आहेत. काही जणांचे उद्योग ठप्प झाले आहेत. रोजच्या कमाईवर जगणारी माणसं हतबल झाली आहेत. डॉक्टर, वकील अशी व्यावसायिक माणसंसुद्धा या त्रासाला चुकली नाहीत. परिस्थिती बदलणार असा आशावाद मांडायचा ठरवला, तरी ‘पण कधी’ या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच नाही तर कुणाचकडे नाही. हा कठीण काळ कदाचित पुढची दोन-तीन र्वषसुद्धा राहू शकेल. तेव्हा अशा वेळी, हताश न होता शक्य-अशक्य विचार करून ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. पैसा सगळ्या समस्यांचं समाधान करू शकत नसला तरी सुद्धा सुदृढ आर्थिक परिस्थिती अनेक समस्यांपासून वाचवू शकते. खाली नमूद केलेल्या काही टिप्स वाचकांच्या उपयोगी पडतील :

  • सर्वात आधी मिळकत आणि खर्चाचा ताळमेळ घाला. खरी गरज काय आहे हे समजून घ्या. इथे भावनिक होऊन चालणार नाही. आपण काय पेलू शकतो याचा सारासार विचार करा आणि तसंच वागा.
  • खर्च जमतील तितके कमी ठेवा. पुढील सहा-सात महिन्यांत परिस्थिती बरी वाटायला लागली, तरीसुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवा.
  • आपत्कालीन निधीसाठी पुढील एक ते दोन वर्षांचे खर्च हे बाजूला काढून मुदत ठेवींमध्ये, कमी जोखमीच्या गुंतवणूक पर्यायामध्ये ठेवा. तुम्हाला काही कमी-अधिक झालं तर तुमच्या कुटुंबाला हे पैसे सहज मिळतील यानुसार गुंतवणूक पर्याय निवडा.
  • तुमच्या सध्याच्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. मिळकतीची अनिश्चितता अधिक असेल तर गुंतवणुकीतील जोखीम कमी करा. सुरक्षित पर्याय निवडा, परंतु एकाच ठिकाणी पैसे ठेवू नका. गुंतवणुकीतून बाहेर पडताना कदाचित नुकसानही होईल, पुढे अजून नुकसान झालं तरी आत्ता हाताशी पैसे असणं हे जास्त महत्त्वाचं आहे.
  • आरोग्य विमा आणि आयुर्विमा नियमित भरा. विपरीत प्रसंगी ही दोन्हीही कवचे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उपयोगी पडतील. गरजेनुसार विमा कव्हर वाढवा. तसं पाहायला गेलं तर सगळेच खर्च काही विम्यामध्ये मिळत नाही. तेव्हा त्यासाठी वेगळे पैसे बाजूला ठेवा. तुमच्या पॉलिसीमध्ये काय मिळत नाही हे तपासा. कधी कधी असं होतं की कव्हर तर भरपूर आहे, पण प्रत्येक खर्चाला मर्यादा लावलेली असल्यामुळे क्लेमची रक्कम खर्चापेक्षा चांगलीच कमी असते.
  • तुम्हाला कुणाकडून पैसे परत घ्यायचे असतील, तर तगादा लावा. थोडे थोडे करून का होईना पैसे परत मिळवा.
  • मागील गुंतवणुकीचा साठा नसेल, तर कुठल्या प्रकारे मिळकतीची सोय करता येईल यावर भरपूर विचार करा. घरबसल्या गृहिणी अनेक उद्योग करू शकतात. शिकवणी, डबे, नाश्ता, शिवणकाम हे असे पर्याय आहेत ज्यात सुरुवातीची गुंतवणूक कमी आहे. एखादी छोटी नोकरीसुद्धा मिळत असेल तर करा. कारण इथे मासिक खर्च भागवायचे आहेत. तेव्हा आणखी चांगलं मिळेल या अपेक्षेने वेळ वाया घालवू नका.
  • कर्जाच्या हफ्त्यांचं नीट अवलोकन करा. जिथे जिथे शक्य होईल तिथे मुदत मागा. परंतु त्याबरोबर वाढीव व्याज किती द्यावं लागेल यावरसुद्धा लक्ष ठेवा.
  • येत्या काळात पुन्हा सगळीकडे सवलतीच्या दरात विक्री अर्थात ‘सेल’ सुरू होतील, त्यांचा मोह आवरा. थोडेसेच पैसे खर्च होतील असं समजून उगीच खरेदी करू नका. परंतु तुमच्या कामासाठी उपयोगी वस्तू स्वस्त मिळत असेल आणि तिचा वापर करून तुमची मिळकत वाढत असेल किंवा भविष्यातील खर्च कमी होत असेल तर नक्कीच याचा फायदा करून घ्या.
  • कुठल्याही पालकाला आपल्या मुलाची शाळा बदलावी हे पटणार नाही. परंतु तुमची शाळा खरंच महाग असेल तर पुन्हा एकदा विचार करा.
  • शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सांभाळा. चांगली वेळ नक्कीच येईल.
  • पैशांची चणचण असल्यामुळे आणि मोबाइलवरून गुंतवणूक करणे सोपे झाल्यामुळे शेअर बाजारात उलाढाली करणं हा करोनाकाळात अनेकांचा उद्योग झाला आहे. शेअर बाजारातून फायदा नक्की होतो. परंतु कमी काळात भरपूर पैसे मिळतील हे स्वप्न अनेक जण पाहतात, पण प्रत्येकाला तसा अनुभव येतोच असं नाहीये. तेव्हा मोहापोटी आहेत तेही पैसे घालवू नका. जोखीम समजून गुंतवणूक करा.
  • आपल्या स्वत: पलीकडेसुद्धा विचार करा. जिथे जमेल आणि जितकं शक्य होईल तितकी मदत इतरांनाही करा. केलेलं आणि दिलेलं वाया जात नाही, कोणत्या न कोणत्या स्वरूपात ते अधिक होऊन परत मिळतं. अर्थात, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे.

प्रत्येक व्यक्तीची गरज, जोखीम क्षमता आणि पैशांकडे पाहायचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. शिवाय कितीही वास्तविक म्हणायचं ठरवलं तरीसुद्धा भावना आपल्या आर्थिक निर्णयांवर अंकुश लावतात. शिवाय एक अधिक एक- दोन हे समीकरण लागू पडेलच असं नाहीये, कारण येणारा काळ आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती याबाबत कोणतीही शाश्वती नाही. परंतु जे काही हातात आहे ते सांभाळणं, नवीन गोष्टींसाठी प्रयत्न करणं आणि स्वत:वरचा विश्वास शाबूत ठेवून येईल त्या परिस्थितीला सामोरं जाणं हेच आपण करू शकतो. संत म्हणतात,

शक्याशक्य विचार, सुज्ञ करावा निरंतर।

तेव्हा सज्जा व्हा.

(सी ए आणि सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)