सिनेअभिनेत्यांची मुलं-मुली सिनेमात येणं हा ट्रेंड बॉलीवूडसाठी नवा नाही. एके काळी ‘हिरो’ सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेल्या रफ अ‍ॅण्ड टफ जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफही ‘हिरोपन्ती’ नावाच्या सिनेमातून पदार्पण करतो आहे.

जॅकी श्रॉफ आणि त्याचा पदार्पणातील चित्रपट ‘हिरो’ या नावावरूनच त्याचा मुलगा टायगर श्रॉफला घेऊन ‘हिरोपन्ती’ हा चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होतोय.
गाजलेल्या स्टार कलावंतांची मुलेमुली जेव्हा जेव्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असतात तेव्हा तेव्हा त्याबद्दल खूप उत्सुकता, कुतूहल प्रेक्षकांमध्ये निर्माण होते. अनेकदा ते कुतूहल माध्यमांद्वारे निर्माणही केले जाते; परंतु ‘हिरोपन्ती’ या चित्रपटात टायगर श्रॉफ पदार्पण करतोय यापेक्षाही अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टी आहेत.
जॅकी श्रॉफ-मीनाक्षी शेषाद्री यांच्या सुपरहिट ठरलेल्या ‘हिरो’मध्ये जयकिशन ऊर्फ जॅकीदादा आणि राधा माथूर थोडक्यात किशन-राधा ही ठोकळेबाज नावे वापरली होती. किशन म्हटल्यावर तो गुंड असला तरी बासरी वाजविणारा होता. त्या चित्रपटातील बासरीवर वाजवली जाणारी धून त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता टायगर श्रॉफला रुपेरी पडद्यावर आणताना निर्माता साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शक सब्बीर खान यांनी लोकप्रिय झालेली ‘हिरो’मधील बासरीवरची धून ‘हिरोपन्ती’मध्ये वापरण्याची क्लृप्ती केली आहे. एक प्रकारे जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ या चित्रपटाद्वारे पदार्पण करतोय याचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.
सध्याच्या काळात छोटी शहरे, निमशहरे आणि महानगरे व तेथील संस्कृती, महानगरांतल्या माणसांचे जगणे, निमशहरे आणि महानगरांतील तरुणाई यांचे वागणे-बोलणे, त्यातील फरक, त्यांच्यातील स्पर्धा, महानगरीय तरुणाईकडून निमशहरातील तरुणाईला मिळणारी वागणूक, एकूणच दोन्ही तरुणाईंमधील भेद, मानसिकता याचा वापर करून बेतलेली कथा ‘हिरोपन्ती’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्या अर्थाने हा चित्रपट आजच्या काळातील आहे. जागतिकीकरणानंतर आणि खास करून इंटरनेट, मोबाइल आणि माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वापर महानगरांबरोबरच निमशहरांमध्येही सारख्याच प्रमाणात वाढला; परंतु एकीकडे आधुनिकीकरण, शिक्षणाचा वाढता प्रसार, त्यामुळे दोन्ही भागांतील तरुणाईचा जीवनाकडे बघण्याचा बदलत चाललेला दृष्टिकोन, नवी विचारसरणी, तर दुसरीकडे कालबाह्य़ झालेल्या, परंतु समाजात घट्ट रुजलेल्या परंपरा, त्याचे जोखड या पाश्र्वभूमीवर बब्लू आणि डिम्पी यांची प्रेमकथा ‘हिरोपन्ती’मधून उलगडणार आहे.
रूढार्थाने बॉलीवूडमधील आजच्या काळातील तद्दन कमर्शियल स्वरूपाचा हा चित्रपट असला तरी तो आजच्या तरुण प्रेक्षकांबरोबरच सर्व गटांतील प्रेक्षकांना आवडावा यासाठी जुन्या-नव्याचा संघर्ष दाखविण्याची गरज चित्रपटकर्त्यांना वाटली असावी. त्या अर्थाने हा सरळसरळ गल्लाभरू कमर्शियल बॉलीवूड प्रेमकथापट म्हणता येईल.
परंतु, दिग्दर्शक सब्बीर खान असल्यामुळे कथानकाची मांडणी आणि संवाद आजच्या काळाला अनुसरून, सूक्ष्मरीत्या काळानुरूप करण्याची किमया लेखक संजीव दत्ता आणि दिग्दर्शक सब्बीर खान यांनी केली असावी असा अंदाज बांधायला हरकत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संजीव दत्ता हे संवादलेखक म्हणून गाजले आहेत. ‘पेज थ्री’, ‘लाइफ इन ए मेट्रो’, ‘काइट्स’, ‘बर्फी’ यांसारख्या नेहमीपेक्षा वेगळ्या बॉलीवूडपटांचे संवादलेखन त्यांनी केले असून ‘रंगरसिया’ या चित्रपटाची पटकथाही लिहिलेली आहे. दिग्दर्शक सब्बीर खान यांच्याबद्दल सांगायचे तर २००९ साली झळकलेला ‘कम्बख्त इश्क’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. पहिल्याच चित्रपटात अक्षयकुमार, करिना कपूर ही जोडी आणि त्याशिवाय हॉलीवूडमधील सिल्व्हेस्टर स्टॅलोनसह गाजलेल्या हॉलीवूड कलावंतांना घेऊन हॉलीवूड, इटलीमध्ये चित्रित झालेला चित्रपट त्यांनी केला आहे. त्यामुळे ‘हिरोपन्ती’कडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
टायगर श्रॉफ आणि डिम्पीच्या भूमिकेतील कीर्ती सनोन, ‘दबंग २’मधील पाहुण्या कलाकाराची अंजली ही व्यक्तिरेखा साकारणारी संदीपा धर ही अभिनेत्री यांच्यासह तब्बल २१ नवीन कलावंत ‘हिरोपन्ती’मध्ये दिसणार आहेत. सब्बीर खान यांनी तरुणाईचा चित्रपट करायचा म्हणून सर्वच नवीन कलावंत घेण्याचा नवीन प्रयोग केला असून २१ पैकी बहुतांशी कलावंत नाटय़ क्षेत्रातील आहेत.
टायगर श्रॉफचीही जवळपास दररोज अभिनय कार्यशाळा सब्बीर खान यांनी घेतली असून बब्लू हा छोटय़ा शहरातील धाडसी तरुण साकारण्यासाठी टायगर श्रॉफनेही प्रचंड मेहनत घेतल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये केली जात आहे.