ऑलिम्पिक विशेष
नितीन मुजुमदार – response.lokprabha@expressindia.com
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय चमू प्रथमच पदकांच्या आजपर्यंतच्या सर्वाधिक अपेक्षा घेऊन सहभागी होत आहे. अपेक्षा आणि अंदाजांप्रमाणे घडले तर भारतीय पदक तालिकेवरील आकडे दुहेरी संख्येत अथवा त्याच्या जवळपास दिसू शकतील. भारतीय चमूला बॉक्सिंग, नेमबाजी, कुस्ती या क्रीडाप्रकारांमध्ये पदके मिळण्याच्या संधी तुलनात्मकदृष्टय़ा अधिक आहेत. करोनाच्या महासंकटामुळे एकंदरीतच ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीवर, खेळाडूंच्या कामगिरीवर आणि क्रीडारसिकांच्या उत्साहावर मोठय़ा प्रमाणावर नकारात्मक परिणाम झालेला असला तरी विशिष्ट मर्यादांसह का होईना, ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत, हेही महत्त्वाचे. ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वात जुन्या क्रीडा प्रकारांपैकी एक म्हणजे नेमबाजी. १९०४(सेंट लुइस0) व १९२८ (अ‍ॅमस्टरडॅम)वगळता प्रत्येक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा अंतर्भाव राहिलेला आहे. युरोपमध्ये सुरुवात झालेला हा क्रीडाप्रकार भारतामध्ये रुजला, तो गेल्या शतकाच्या अखेरीस. लीना लाड (पूर्वाश्रमीच्या लीना शिरोडकर) या त्याच सुमारास राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या नेमबाज. त्यांच्याशी याबाबत केलेल्या बातचितीवरून नेमबाजीचे भारतातील तत्कालीन चित्र व सद्य:स्थिती यातील फरकही स्पष्ट होतो. त्या म्हणतात, ‘‘नेमबाजीला १९८९ मध्ये सुरुवात केली. तेव्हा अंजली भागवत, दीपाली देशपांडे, सुमा शिरूर, अनुजा तेरे, राखी सामंत, विश्वजीत शिंदे असे आम्ही एकत्र सराव करायचो. भीष्मराज बाम, संजय चक्रवर्ती यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला तेव्हा लाभले. तेव्हा आमच्यापैकी अनेकांकडे स्वत:चे क्रीडा साहित्यसुद्धा नव्हते. नंतर नाना पाटेकरांनी क्रीडा साहित्य पुरस्कृत केले. बंदूक किंवा रायफलीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या खूप महाग असल्याने आम्ही फक्त ड्राय ट्रेनिंग करत होतो. रायफल्सदेखील क्लबच्या असल्याने त्या आम्ही वेळ ठरवून आलटून-पालटून वापरायचो. त्या काळात रायफल घेणे कोणालाच परवडणारे नव्हते. त्या तुलनेत परिस्थिती आता बरी आहे, आई-वडीलदेखील आता पूर्वीच्या तुलनेत अधिक पाठिंबा देतात, नेमबाजी केंद्रांचे प्रमाणही बऱ्याच प्रमाणात वाढले आहे.’’

टोक्योमध्ये भारतीय नेमबाजी संघाकडून काय अपेक्षा आहेत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘क्रोएशियामध्ये राही सरनोबत तसेच यशस्विनीने केलेल्या कामगिरीमुळे भारतीय अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. याखेरीज याच चमूतील ऐश्वर्य प्रताप सिंग, तेजस्विनी सावंत, अपूर्वी चंडेला, अंजुम मौदगिल, मनू भाकर हे नेमबाजदेखील चांगली कामगिरी करतील. सुमा शिरूर, दीपाली देशपांडे यांच्यासारखे अनुभवी व नामवंत माजी नेमबाज प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत, हीदेखील संघाची जमेची बाजू असेल.’’

‘‘हा खेळ खूप खर्चीक आहे. त्यामुळे सरकारने, संघटनांनी तसेच नावाजलेल्या ब्रँड्सनी प्रायोजकत्वासाठी पुढाकार घ्यायला हवा, खेळासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक रायफल्स-पिस्तूलसाठीचा आयात कर कमी करायला हवा,’’ अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लीना या १९९६-९७ च्या श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज असून आपल्या नेमबाजीच्या कारकीर्दीत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर २२ सुवर्णपदकांसह ६० हून अधिक पदके मिळविली आहेत. सध्या त्या रुईया-रुपारेल महाविद्यालयांत तसेच महाराष्ट्र रायफल संघटनेच्या वरळी नेमबाजी केंद्रात मार्गदर्शन करतात.

भारतीय नेमबाजी संघाकडून अपेक्षा

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अ‍ॅथेलेटिक्सनंतर भारताचा सर्वाधिक मोठा वैयक्तिक क्रीडा प्रकारांसाठीचा चमू हा नेमबाजीचा आहे. एकूण २२८ जणांच्या भारतीय पथकात वेगवेगळ्या खेळांतील ८५ पदकांसाठी ११९ खेळाडू भाग घेतील; त्यापैकी १५ खेळाडू हे नेमबाज आहेत. या १५ नेमबाजांपैकी चार पुरुष आणि पाच महिला नेमबाज हे जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या तीनमध्ये आहेत. भारताच्या विविध खेळांच्या पथकांमध्ये ‘क्रीडा रसिकांमध्ये सर्वाधिक उत्सुकता आणि सर्वाधिक पदके मिळविण्याची शक्यता अशा दोन्ही बाबींमध्ये भारतीय नेमबाजी चमू आघाडीवर आहे. ‘ग्रेसनोट’ या ग्लोबल स्पोर्ट्स डेटा कंपनीच्या अंदाजानुसार, भारत या स्पर्धेत तब्बल १७ पदके मिळवेल आणि त्यापैकी आठ पदके नेमबाज मिळवतील. एकंदरीत जागतिक क्रमवारी, गतवर्षांतील कामगिरी, अगदी अलीकडचा फॉर्म, अनुभव तसेच वय या साऱ्यांचा एकत्रित विचार केला तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, दिव्यांश सिंग (तिघेही १० मी. एअर पिस्तोल), ऐश्वर्य तोमर आणि अंजुम मुदगील (दोघेही अनुक्रमे पुरुष आणि महिला ५० मी. रायफल थ्री पोझिशन्स), मनू भाकर (महिला, १० मी. रायफल थ्री पोझिशन्स) सौरभ चौधरी व मनू भाकर (१० मी एअर पिस्तूल मिश्र सांघिक), राही सरनोबत (महिला,२५ मी. पिस्तूल) हे नेमबाज पदकापर्यंत पोहोचू शकतात. अर्थात गेल्या तीन वर्षांमधील भारतीय नेमबाजांची कामगिरी पाहिली तर या १५ जणांच्या चमूतील प्रत्येकाला यंदा खूप चांगली संधी आहे असे म्हणावे लागेल. २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धापासून भारतीय नेमबाजांच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे. २०१९ मध्ये रायफल/ पिस्तूल गटातील विश्वचषक स्पर्धात भारताने २१ सुवर्णासह एकूण ३० पदके मिळविली आणि प्रथम क्रमांक राखला. २०२०पासून मात्र करोनामुळे सरावात आणि स्पर्धामध्येही सातत्य नाही, ही चिंतेची आणि महत्त्वाची बाब आहे. कोरिया, चीन आणि जर्मनी यांनी अलीकडच्या विश्वचषक स्पर्धामध्ये सहभाग नोंदविलेला नाही, हेही येथे लक्षात घेणे जरुरी आहे.

भारतीय नेमबाजी पथकात तरुण खेळाडू भरपूर आहेत, पथकातील चार खेळाडू वगळता सर्वाचे हे पहिलेच ऑलिम्पिक. नेमबाजी पथकाचे सरासरी वय २८ वर्षे. चाळीशीत असलेले तीन नेमबाज संघात आहेत. राही सरनोबत, अपूर्वी चंदेला, संजीव राजपूत (दोन ऑलिम्पिक स्पर्धाचा अनुभव) आणि मैराज अहमद खान हे चार नेमबाज यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत.

मीरतच्या १९ वर्षीय सौरभ चौधरीचा समावेश जगप्रसिद्ध ‘टाइम’ मॅगझिनने ‘टोक्यो ऑलिम्पिकमध्ये लक्ष ठेवण्याजोगे ४८ खेळाडू’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या लेखात केला आहे. या यादीमधील तो एकमेव नेमबाज तसेच एकमेव भारतीय खेळाडूदेखील. ऐश्वर्य प्रताप सिंगची २०२१ मधील कामगिरी डोळ्यांत भरण्याजोगी आहे. २०२१ मध्ये त्याने जगज्जेत्याला पराभूत करून विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. राहीनेदेखील अलीकडच्या दोन विश्वचषक स्पर्धात एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी कमाई केली आहे. मिश्र सांघिक प्रकारचा समावेश नेमबाजीत अगदी अलीकडचा. या प्रकारात भारताने सुरुवातीपासूनच दबदबा प्रस्थापित केला आहे. सौरभ चौधरी-मनू भाकर या जोडीने गत सहा विश्वचषक स्पर्धात तब्बल पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी पदकांची लयलूट केली आहे, ते या प्रकारात पदक मिळविण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेले आहेत. याशिवाय अभिषेक वर्मा- यशस्विनी सिंग, दिव्यांश सिंग- एलवेनील वालारीवन या जोडय़ादेखील पदकासाठी दावेदार मानल्या जातात. अभिनव बिंद्राच्या मते तर तुम्ही टोक्योत सौरभ चौधरी व अभिषेक वर्मा यांना एकाच पदक मंचावर सुवर्ण तसेच रौप्यपदक घेतानादेखील पाहू शकता. अभिनव बिंद्राने २००८ साली बीजिंगमध्ये मिळविलेले सुवर्ण हे भारताचे नेमबाजीतील आजपर्यंतचे एकमेव सुवर्ण. राज्यवर्धन राठोड (अ‍ॅथेन्स, २००४), गगन नारंग, विजयकुमार (लंडन, २०१२) हे भारताचे नेमबाजीतील इतर पदक विजेते. मागील दोन ऑलिम्पिक स्पर्धाचा विचार केला तर कोरिया (२०१२, लंडन- तीन सुवर्ण, दोन रौप्य), अमेरिका (२०१२, लंडन- तीन सुवर्ण) आणि इटली (२०१६, रिओ-तीन सुवर्ण, तीन रौप्य) या देशांचा प्रभाव स्पष्ट दिसतो.

एकंदरीत यंदाचे वर्ष हे भारतीय नेमबाजीच्या इतिहासात खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते. हीच शक्यता काही प्रमाणात बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारांबाबत व्यक्त होत आहे. तसे झाले तर टोक्यो ऑलिम्पिकचे महत्त्व भारतीय क्रीडा इतिहासात आगळे ठरेल.

(लेखक मुक्त क्रीडा पत्रकार आणि विश्लेषक आहेत.)