तुमच्या आमच्यासारख्या घरातलीच एक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते- एकटीने..
अगदीच लहान म्हणजेच पाच-सहा महिन्यांची असल्यापासून आई-बाबांनी मला डोंगरदऱ्यांमध्ये भटकवलं. तेवढेच नाही तर सायकल चालवता येत नव्हती तेव्हा तर जुन्या घोडासायकलच्या मागे किंवा पुढच्या छोटय़ाशा सीटवर बसवून पनवेलच्या ३०-४० किमीच्या आसपास असलेल्या गावात किंवा ठिकाणी फिरवलं आणि याच सगळ्याबरोबर मला निसर्गात कसं वागावं, कसं राहावं हे सगळं शिकवलं. या सगळ्या गोष्टींमुळे मला निसर्ग समजला. मुळात फिरायला प्रत्येकाला आवडतं. तसंच आमचं एक कुटुंब. त्यामुळे मला आपल्या देशातल्या काही ठिकाणांबद्दल तर चांगलंच माहिती होतं. कारण ते फिरून झालं होतं.
या सगळ्या आवडींमुळेच माझे मग माउंटेनिअरिंगचे बेसिक व अ‍ॅडव्हान्स कोर्स पूर्ण झाले आणि मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन, पण या काळात माझं थोडंफार सायकलिंगसुद्धा चालू होतं. पनवेलच्या आसपासच्या ठिकाणी जाणं रोजचे ७०-८० किमी सायकलिंग करणे. सर्वात पहिलं मी मनाली ते खारदुंगला हा ६०० किमीचा प्रवास केला. वायएचएआयने (यूथ होस्टेल) २०११ मध्ये आयोजित केलेला. तेव्हा कळालं की आपण जास्त किमीचं सायकलिंगपण करू शकतो. मग २०१५ मध्ये आम्ही सहाजण, मी एकटी मुलगी ग्रुपमध्ये असे निघालो. पनवेल ते ओडिसा एकूण २२०० किमी झाले. त्यात सायकलवरून. या सगळ्या गोष्टी करताना माझा स्वत:वरचा विश्वास वाढत होता. माझ्यातल्या बारीकसारीक गोष्टी मला कळत होत्या आणि हे सगळं करताना मला समजलं की माझ्या ओळखीतल्या दोन जणांनी सोलो सायकलिंग केलंय. एकाने भारत परिक्रमा तर दुसऱ्याने पनवेल ते सियाचीन बेसकॅम्प. आणि काही परदेशी मुलींनीपण केलंय. मग सगळी चक्रं फिरायला लागली. आपण असा प्रवास करू शकतो का? कसा करायचा आणि का करायचा हे सगळं चालू असताना ठरलं, पनवेल ते कन्याकुमारी असा एकटीने प्रवास सायकलवर आणि कुठलीही मदतनीस गाडी न घेता हा प्रवास करायचा. नाव दिलं ‘आय प्राइड’.
आता हे नुसतं ठरवून चालत नाही. कारण एकटय़ाने बाहेर पडणं म्हणजे मागे बऱ्याच गोष्टी लागतात. ते म्हणजे नियोजन करणं. स्वत:ची मानसिक आणि शारीरिक तयारी करणं. त्यातूनपण सर्वात महत्त्वाचं घरच्यांची परवानगी मिळणं आणि हे सगळं करणारी मुलगी असेल तर अजून बऱ्याच गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी माझ्या प्रवासाची तयारी करत होते. पण घरातून सगळ्यांचा होकार मिळणं महत्त्वाचं होतं आणि तो पूर्ण होकार मला दिवस अगोदर मिळाला. मुळात प्रवासाची तयारी मी दोन महिने अगोदरच चालू केली होती. तयारीत महत्त्वाचा म्हणजे रस्ता. दिवसाचं गणित जुळवणं, एका दिवसात किती किमी जायचं ठरवणं, प्रॅक्टिस हे सगळंच. गोष्टींची जमवाजमव हे सगळंच आणि मग आला तो निघायचा दिवस. घरातून बरीच माणसं होती. मित्रमंडळी, सगळीच तयारी चालू होती, त्यामुळे आई-बाबांशी बोलायला मिळत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत सगळे होते आणि मग मिळाला तो वेळ बोलायला. नेहमी गप्पा मारणारे माझे आई-बाबा खूप शांत होते. पण शेवटी भावना व्यक्त करणं गरजेचं होतं. बोलणं चालू झालं आणि बाबांच्या डोळ्यांत पटकन अश्रू आले. मलाही राहवलं नाही. कारण हे सगळं करताना मला काही झालं तर याची भीती होती. पण मानसिक तयारी पूर्ण होती. झालेल्या प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडून परत आयुष्य जगायची! मुळात हा सगळा प्रवास कम्फर्ट झोन सोडून काहीतरी वेगळं करण्यासाठी होता. स्वत:ला शोधण्यासाठी होता. त्यामुळे निघणं भागच होतं. मनावर दगड ठेवून पहिल्या दिवशी पॅडलिंग करायला सुरुवात केली आणि मी जीवनाला नवीन अर्थ देत गेले. आता वाटेत येणाऱ्या गोष्टींवर मात करत मला पुढे जायचं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता प्रवास चालू झाला हाता. माझ्यासाठी महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे पनवेल ते गोवा घाट मार्ग आणि उतार. पूर्ण दिवसात मला माझ्या ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मार्गक्रमण करायचं होतं. सकाळी लवकर उठणं-आवरणं. बॅग भरणं, ती सायकलला लावणं, मध्येच नाष्टा आणि जेवणाच्या वेळा पाळणं आणि संध्याकाळचं राहायच्या जागा शोधणं आणि माझा ब्लॉग रोज अपडेट करणं. या ब्लॉगमुळे मी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत होते. यामुळेच लोक आता माझ्या नजरेतून जग पाहणार होते. आणि याच ब्लॉग आणि फेसबुक पेजमुळे मला काही राहायची ठिकाणं मिळत गेली.
मी सायकलवर होते. प्रवास आता माझा आणि सायकलचा होता. त्यामुळे आम्हा दोघींची काळजी घेणं मला गरजेचं होतं. सायकल हे असं माध्यम आहे की जे लोकांना जोडतं. मला आता माणसं मिळत चालली होती. मला लोकांमधले बदल जाणवत होते. माती बदललेली जाणवत होती. रस्ते, निसर्ग सगळंच. मी माझ्या रोजच्या वेळापत्रकाचे पालन करायचे. त्यामुळे वेळेत त्या ठिकाणी पोचायचे. रोजच्या प्रवासात मी खूप लोकांना भेटायचे. त्यांच्याशी गप्पा मारायचे. हे गप्पा मारणं महाराष्ट्रात असेपर्यंत ठीक होतं. कारण मराठी हे आमच्यातलं साम्य होतं. पण आता गोव्यापर्यंतचा कठीण टप्पा मी पार केला होता आणि एका नवीन राज्यात आले होते ते म्हणजे कर्नाटक. कर्नाटकातपण काही ठिकाणी कोकणी किंवा मराठी बोललं जातं. पण पुढे केरळात तर फक्त इंग्रजी, पण एकदम बेसिक. पण गप्पा असायच्याच. लोकांना मला बघून काय बोलावं हे सुचायचं नाही, पण माझा त्यांच्यावरचा विश्वास बघून मग ते बिनधास्त बोलायचे. मुळात आपल्याकडे कधी मुली एकटय़ा फार कमीच जातात; त्यामुळे मी कोणीतरी परदेशी मुलगी असावीअसं पहिलं मत. त्यात माझं नावही तसंच प्रिसिलिया. मग त्यांचे ते टिपिकल प्रश्न- एकटीच आहेस? एकटीच का? भीती नाही वाटत? कशाला करतेस वगैरे वगैरे. या सगळ्यांची समाधानकारक उत्तरं मिळाली की त्यांना कळायचं की मुलीपण एकटय़ाने फिरू शकतात. अशी ही भेटलेली माणसं. माझं हे सगळं ऐकल्यावर ज्यूस, जेवण अशा गोष्टी ऑफर करायचे. काहींना तर त्यांच्या घरी माझ्याबद्दल सांगावंसं वाटायचं. मग मला फोन देऊन बोलायला सांगायचं असं काहीही!
या पूर्ण प्रवासात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. वाईट म्हणजे मुलींना नेहमी कमी लेखणारे, सायकलला कमी लेखणारे अनुभव आले. पण चांगले अनुभव एवढे होते की मी ते वाईट अनुभव विसरूनपण गेले. प्रवासात रस्ता जसा बदलत गेला तशी माणसंही. पण मला वाईट एकच वाटे ते बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचं जे जोरदार वाहनांच्या धक्क्यांनी मेलेले आणि चिरडले गेलेले. मी राइडमध्ये काय चांगलं काम केलं तर त्या सगळ्या मृत प्राण्यांना रस्त्याच्या बाजूला काढलं.
मला या सगळ्या प्रवासात एक जाणवलं की, आपण जेवढे साधे राहतो तेवढेच लोक आपल्याला त्यांच्यातलाच एक मानतात आणि मी साध्या कपडय़ात असल्यामुळे मला बरेच जण स्वत:हून हात करायचे आणि बोलायचे.
या प्रवासात माझ्या सायकलचं मी एकही पंक्चर नाही काढलं किंवा तिचं इतर काही कामपण नाही. फक्त एकदा मागच्या ब्रेकचं काम करावं लागलं तेवढंच. बाकी तिचं आणि माझं छानच जुळलं होतं. मुळात मी उन्हात जास्त सायकल चालवायचे नाही. कारण दोन, एकतर मला जास्त उन्हात थोडा त्रास होतो आणि दुसरं आपल्याकडे एनएच १७ मार्गाचं खूप मोठय़ा प्रमाणावर काम चालू आहे. त्यामुळे दुपारच्या उन्हाच्या वेळी बसायला किंवा नुसतं थांबायला जागा नसायची म्हणून मग मी जिथे मिळेल तिथे थांबायचे. जास्त वेळ नाही, पण उन्हाच्या वेळी एक-एक तासानी ५-१० मिनिटांचा ब्रेक. त्यामुळेच आम्ही दोघी एकदम मजेत असायचो. (मी, सायकल)
आता बोलायचं निसर्गाबद्दल, तर केरळ म्हटल्यावर सगळ्यांच्याच डोळ्यासमोर सुंदर निसर्ग उभा राहतो. तेच मला जाणवलं. अप्रतिम निसर्ग आणि तशीच छान माणसं. केरळमध्ये तर मला खूप प्रसिद्धी मिळाली असं म्हणता येईल. कारण अगदी चार-पाच वर्तमानपत्रांनी माझ्याबद्दल लिहिलं होतं जे पत्रकार मला वाटेत भेटले होते त्यांनीच.
माझ्यासाठी केरळातला अनुभव काही औरच होता. ते म्हणजे या बातम्या बघून मला काही कॉलेजांत बोलावलं होतं, असंच त्यांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला. मग काय मला तर तेव्हा मी सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं भाषण ऐकायला जवळजवळ ५००-६०० मुलं-मुली हजर होती. हे झाल्यावर माझ्याबरोबर फोटो काढणं आणि सगळंच. मुळात त्यांच्यासाठी मी एक आयडॉल होते. एक २२ वर्षीय तरुणी आपला अभ्यास सांभाळून हे असं करते. मुळात त्यांच्या शिक्षकांनीच मला त्यांच्या या विषयावर बोलायला सांगितलं होतं आणि माझा कलच हा आहे की आपल्याला आवडेल त्या गोष्टी करा, तरच तुम्हाला अनुभव मिळतील आणि आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी माणूस कसा तरी वेळ काढतोच ना. कॉलेज लेक्चरनंतर माझ्यात जास्त आत्मविश्वास आला. आणि या सगळ्यातूनच फक्त माझी राइड वेगळं वळण घेत गेली. लोकांपुढे चांगलं उदाहरण देत गेली आणि लोक मला प्रचंडपणे पाठिंबा देत राहिले. यातूनच मी पूर्ण केरळात पोचले. प्रत्येक माणूस मला ओळखत होता. यातूनच माझ्या जीवनाला अजून नवनवीन दिशा मिळाल्या.
आता काहीच दिवस राहिले होते माझं स्वप्न पूर्ण व्हायला. हा पूर्ण प्रवास कसा पटकन झाला हे कळलंच नव्हतं. निघायच्या अगोदरची मी आणि प्रवासात आता असलेली मी यातील फरक मला जाणवत होता. उजाडला तो दिवस ज्या दिवशी मी कन्याकुमारीला पोचणार होते. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो आणि सोप्पा नसतो हे त्या दिवसात खूप जाणवलं. शेवटच्या दिवशी तर प्रचंड उलटा वारा जो माझ्या स्वप्नांना रोखत होता. त्यातच मी रस्त्याच्या कडेला पडणं सगळंच. पण त्यातूनपण पूर्ण क्षमता लावली व पोचले ते थेट त्रिवेणी संगमावर दुपारी चार वाजता. तो दिवस जीवनातला एक आनंदाचा दिवस. स्वत:च्या क्षमतेवर जेव्हा एखादं ठिकाण आणि धैर्य गाठतो त्याचा आनंद काही औरच आणि त्यात ते एकटय़ाने साजरं करणं अजूनच काही नवीन. मी तिकडे पोचल्यावर फोटो काढण्याच्या धडपडीत होते. अशी धडपड तिकडे पोचणारा प्रत्येक माणूस करत असतो. पण जो सायकलने तिथे पोचतो त्याला ते खूपच महत्त्वाचं असतं. माझी ही फोटो काढायची धडपड तिथले दुकानदार बघत होते. त्यांनीच शेवटी माझी सायकल त्या सगळ्या १७ किलोच्या सामानासकट अगदी समुद्राजवळ नेऊन दिली आणि काढले फोटो. आता माझ्याकडे सूर्यास्तासाठी बराच वेळ होता. त्यामुळे मी एक शांत जागा शोधत तिथे बसले. सूर्यास्त बघायला आणि त्याचबरोबर अथांग समुद्राकडे बघत.? हे मला नेहमी करायला आवडतं. आता समुद्राकडे बघत मी माझी नवीन स्वप्नं बघत होते. मला नेहमीच समुद्रासारखं मोठं व्हायला आवडेल. एवढा मोठा समुद्र सगळ्या व किती मोठय़ा दु:खाच्या गोष्टी पोटात घालतो आणि किनाऱ्याला माणसांना भेटतो तिथे अगदी नम्रपणे आणि शांत असतो. मी तिकडे किनाऱ्यावर बराच वेळ होते. नंतर तिथले काही पत्रकार मला भेटायला आले. त्यांनीपण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात माझ्याबद्दल लिहिलं. तिथेपण एका कॉलेजमध्ये बोलावलं होतं. तिकडे तीन दिवस गेले. नंतर दुसऱ्या दिवशी विवेकानंद स्मारक पाहणं आणि सगळं. असेच माझे तीन दिवस गेले. आता परतीचा प्रवास चालू होणार होता ट्रेनने. ट्रेनमध्ये सायकल लगेजमध्ये न्यावी लागते. त्यासाठी तिची पॅकिंग चालू झाली. मग पॅकिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी मला शोधाव्या लागल्या. पेपर, गोणपाट, वगैरे आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला तो कन्याकुमारी एक्स्प्रेसने.
ट्रेनच्या प्रवासातपण आजूबाजूच्या लोकांनी मला ओळखलं होतं, कारण त्यांनीही माझ्याबद्दल वाचलं होतं. या प्रवासात जवळजवळ तीन दिवस मला गाडीत काढायचे होते. मग तेव्हाच वेळ मिळाला मला माझ्याबद्दल पूर्ण विचार करायला.
या सगळ्या एकटीने केलेल्या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. आपण जर लोकांवर विश्वास ठेवला तर तेही आपल्यावर विश्वास ठेवतात आणि चांगलंच वागतात. काही प्रसंगांनंतर मी सगळ्यांशीच बोलायला आणि विश्वास ठेवायला लागले. मी आता खूप जास्त पॉझिटिव्ह झाले आहे. हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. ठामपणे नाही म्हणायला शिकवलं आणि नाही स्वीकारायलापण. ठिकाण कुठलंही असो, महत्त्वाचा असतो तो त्यासाठी केलेला प्रवास आणि लावलेली क्षमता. याच्यातूनच मी स्वत:ला गवसत गेले आणि मिळाले मी मला.

या एकूणच प्रवासात मला अनेक जणांनी मदत केली. मग ती राइडला निघायच्या अगोदर, प्रवासात व नंतरही त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. हीच सगळी लोकं महत्त्वाची होती. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आणि माझं एक स्वप्न पूर्ण झालं.

response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ट्रॅव्हलॉग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel girl cycles 1800 kilometers to kanyakumari alone in 19 days
First published on: 25-03-2016 at 01:02 IST