04 April 2020

News Flash

पर्यटन विशेष : भन्नाट भटकंती

शूटिंग, दौरे, कार्यक्रम यानिमित्ताने कलाकारांचं विविध ठिकाणी फिरणं होत असतं. काम झाल्यावर परतीचा प्रवास न करता कलाकार मंडळी त्या-त्या ठिकाणी फिरणं पसंत करतात.

| August 21, 2015 01:08 am

शूटिंग, दौरे, कार्यक्रम यानिमित्ताने कलाकारांचं विविध ठिकाणी फिरणं होत असतं. काम झाल्यावर परतीचा प्रवास न करता कलाकार मंडळी त्या-त्या ठिकाणी फिरणं पसंत करतात. मग यापैकीच एखादं ठिकाण त्यांच्या मनात घर करून असतं. अशा त्यांच्या आवडत्या ठिकाणांविषयी ते सांगताहेत.

lp47पुरेपूर सिंगापूर
माझा पहिलाच परदेश दौरा म्हणजे माझं सगळ्याच आवडतं ठिकाण, ते म्हणजे सिंगापूर. दोनेक वर्षांत मी किमान पाच ते सहा वेळा सिंगापूरला गेलो आहे. ‘लग्न पाहावं करून’ या माझ्या सिनेमाच्या प्रीमिअरसाठी मी गेलो होतो. नंतरही अशाच एकेक कारणांनी मला तिथे जाण्याचा योग आला. दौऱ्यांचे दिवस संपल्यानंतरही मी तिथे पुढचे काही दिवस राहायचो. इतक्यांदा जाऊन आणि जास्तीचे दिवस राहूनही माझं संपूर्ण सिंगापूर बघून झालंय असं म्हणता येणार नाही. कारण तिथे बऱ्याच गोष्टी बघण्या-अनुभवण्यासारख्या आहेत. मला तिकडचं जेवण फार आवडतं. सिंगापूर नूडल्स हा प्रकार आहे. तिथल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटय़ा-छोटय़ा हॉटेल्समध्येच खाण्यातच मजा आहे. तिथला युनिव्हर्सल स्टुडिओ बघणं म्हणजे सुख आहे. क्लार्क की हे सिंगापूरचं आणखी एक आकर्षण म्हणता येईल. या भागात अनेक पब्स, बार आहेत. खरं तर मी दारू पीत नाही पण तरी मला हे ठिकाणं खूपच आवडलं. याचं कारण म्हणजे इथला माहोल. प्रत्येक पबच्या बाहेर कोणीतरी एखादा व्हायोलिन वाजवत असतो. कोणी ड्रमसेटवर धमाल करत असतो तर कोणी गिटारवर रोमँटिक गाण्यांची धून ऐकवत असतो. या वातावरणाच्या मी मोहात पडलो. या भागात रिव्हर्स बंजी जम्पिंग आहे. जवळपास सहा मजले स्ट्रेच करून दोनशेच्या स्पीडने वर आकाशाच्या दिशेने सोडतात. वीसेक मजले आपण वर जातो, तेही प्रचंड वेगाने. हा अनुभव तर प्रत्येकाने घ्यायलाच हवा असा आहे. तिथल्या खाद्यपदार्थाचा अगदीच कंटाळा आला तर ‘लिटिल इंडिया’ या ठिकाणी जाण्याचा पर्याय आहे. इथे सगळे भारतीय पदार्थ खायला मिळतात. लिटिल इंडिया या नावाप्रमाणेच तिथे गेल्यावर खरंच भारतात शिरल्यासारखं वाटतं. सिंगापूरला गेलात आणि मरिना बे बिल्डिंगला भेट दिली नाही तर सिंगापूर दौरा पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. ७० मजल्यांच्या या बिल्डिंगमध्ये शेवटच्या मजल्यावर पब आणि इनफिटी स्विमिंग पूल आहे. या पुलाचं वैशिष्टय़ असं की त्याच्या बेसला आणि आजूबाजूला काचा आहेत. म्हणजे त्यात उडी मारल्यावर खाली बघितलं की गाडय़ा जाताना दिसतील, रस्ते दिसतील, माणसं चालताना दिसतील. आजूबाजूला भिंती म्हणून काचा असल्याने तिथे बघितलं की पडू की काय अशी भीती वाटते. पण, हाही अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. सिंगापूरची एक आठवण माझ्या आजही लक्षात आहे. आम्ही मध्यरात्री गाडीने जात होतो. एक माणूस मला रस्त्याच्या कोपऱ्यात उभा होता. रस्ता तसा मोकळाच होता. पण, तो का थांबला हे कळत नव्हतं. जरा वेळा थांबून मी त्याला बघत होतो. तर सिग्नल बदलण्याची तो वाट बघत होता. त्याला रस्ता ओलांडायचा होता. खरं तर रात्रीच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर त्याने कसाही रस्ता ओलांडला असता तरी चाललं असतं. पण, त्याने तसं केलं नाही. हे बघून मला कौतुकच वाटलं. परदेशात फक्त मजा, मस्ती करायला न जाता अशा चांगल्या गोष्टीही शिकल्या पाहिजेत असं त्यावेळी वाटून गेलं.
सिद्धार्थ चांदेकर

lp50जिवाची मुंबई
माझं अमेरिका, लवासा, गोवा अशा काही ठिकाणी कामानिमित्त फिरणं झालं. पण, माझ्या मते सगळ्यात उत्तम ‘आमची मुंबई’च. मी मुंबईत खूप फिरलोय आणि आजही तेवढंच फिरतो. पूर्वी माझ्याकडे बाइक होती. त्यामुळे मोकळा वेळ मिळाला की बाइक काढायचो आणि मुंबईची सैर करायचो. मला वाटतं, कितीही मुंबई फिरलो, तिथली सगळी ठिकाणं माहिती झाली तरी दरवेळी प्रत्येक ठिकाण हे नवीनच भासतं. मुंबई स्वत:च खूप वेगवेगळ्या रूपात दिसत असते. म्हणजे सकाळची घाई-गर्दीची मुंबई वेगळी, दुपारची थोडी स्थिर मुंबई वेगळी, संध्याकाळची थकलेली मुंबई वेगळी तर रात्रीची शांत मुंबई वेगळी..! रात्रीची मुंबई अनुभवण्याचा आनंद तर भन्नाटच असतो. मुंबई अनुभवताना ती वाचायला, जगायला यायला हवी. तरच त्यात गंमत आहे. इथे सगळंच आहे. झोपडपट्टय़ा, चाळ, सोसायटी, बिल्डिंग्स, टॉवर्स, बंगले असं सगळंच इथं वसलंय. म्हणजे ‘स्लम एरिया टू पॉश एरिया’ असं चित्र इथे बघायला मिळतं. मुंबईचा समुद्र तर अनेकांचा सखाच. विविध ठिकाणांप्रमाणे तिथल्या माणसांचीही वैशिष्टय़े असतात. बोलण्यात गोडवा असलेली माणसं कोकणात भेटतात, ठसकेबाज माणसं कोल्हापूरमध्ये दिसतात, थेट बोलणारा वर्ग पुण्यात आढळतो. अशी त्या त्या ठिकाणच्या माणसांची वैशिष्टय़ं आहेत. पण, मुंबईत ही सगळीच माणसं दिसून येतात. सगळ्यांशी तुमचा संपर्क येतो. मुंबईत राहून इतर ठिकाणच्या माणसांच्या गाठीभेटी होत असतात. इथे खाद्यभ्रंमतीसाठीही असंख्य पर्याय. कुठे काय चांगलं मिळतं हे शोधण्यासाठी फिरायला मला फार आवडतं. स्वप्न दाखवणारं शहर आहे हे. इथे गर्दी, घाई-गडबड, स्पर्धा असली तरी या स्पर्धेत राहायला अनेकांना आवडतं. त्यापैकी मी एक आहे. प्रचंड वेगात धावणाऱ्या या शहराला कोणीच कंटाळू शकत नाही. मी तरी कधीच कंटाळणार नाही. आताही कार घेऊन मुंबई फिरायला मी घराबाहेर पडतो. जिवाची मुंबई करणं काय ते तेव्हाच कळतं.
ललित प्रभाकर

lp49शांत ठिकाणं आवडीची…
मला हिवाळा प्रचंड आवडतो. थंड वातावरणात फिरायला तर खूप मजा येते. असं थंड वातावरण आणि शांतता म्हणजे महाबळेश्वरचाच विचार येतो. तिथे कितीही वेळा गेलं तरी या जागेविषयी दरवेळी एक नवी बाजू समोर येत असते. इथले अनेक पॉइंट्स वारंवार बघूनही त्याचा कंटाळा येत नाही. या जागेसारखंच त्यातही नव्याचा भास होत असतो. आता तिथे पर्यटकांची संख्या वाढली असली, गजबज असली तरीसुद्धा एक वेगळीच शांतता मनाला भिडते. हिवाळ्याच्या थंडीत पहाटेचं धुकं अनुभवत गरम चहाचा घोट घेण्यातला आनंद तिथे मिळतो. हा आनंद इतर कोणत्याही ठिकाणी मुंबईत मिळत असला तरी महाबळेश्वरची थंडी अनुभवण्याची मजा काही वेगळीच असते. सगळ्यात पहिल्यांदा मी तिथे गेलो होते, तेव्हा कुठे काय चांगलं खायला मिळतं हे माहीत नव्हतं. पण, तिथल्या एका जगतापकाकांनी घरगुती जेवण करून दिलं होतं. आजही महाबळेश्वरला मी माझ्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत गेले की तिथे एक फेरी असतेच आणि तिथलं घरगुती जेवण एकदा तरी जेवायला जातोच. तिथे गेल्याशिवाय महाबळेश्वरची सहल पूर्ण होत नाही असं वाटतं. कामानिमित्त विविध ठिकाणी फिरले असले तरी महाबळेश्वर, लोणावळा ही माझी आवडती ठिकाणं आहेत. लोणावळ्याचाही मला असाच अनुभव घ्यायला आवडतो. लोणावळ्याला विशेषत: पावसाळ्यात जायला आवडतं. पाऊस अंगावर झेलत थंड वातावरण अनुभवण्याची धमाल शब्दांपलीकडेच. खरं तर अशी अनेक ठिकाणं माझ्या ‘आवडती ठिकाणं’ या यादीत आहेत. त्यातलंच आणखी एक ठिकाण म्हणजे नगरकडील देवगड. दत्तमंदिर हे तिथलं आकर्षण. भक्त निवासात राहण्याची उत्तम सोय, स्वच्छता, व्यवस्थापन या सगळ्यामुळे या ठिकाणीही वारंवार जावंसं वाटतं. लहानपणापासून आजी-आजोबांसोबत फिरल्यामुळे बरीच तीर्थस्थळं बघून झाली आहेत. या ठिकाणी किनाऱ्यावर व्यवस्थित बसण्याची सोय केली आहे. जिथून सूर्योदय-सूर्यास्ताचा अनुभव घेता येतो. हीच शांतता मला आवडते. समुद्राची गाज ऐकत स्वत:च्याच विश्वात रममाण होण्यासाठी अशा शांत ठिकाणी जाण्याला मी प्राधान्य देते.
मृणाल दुसानीस

lp52मराठवाडय़ातला धबधबा
मी मूळची बीड जिल्ह्य़ातील. त्यामुळे तिथली सगळीच ठिकाणं माझ्या खूप जवळची आहेत. त्यापैकीच एक कपीलधर धबधबा. मराठवाडा आणि धबधबा हे समीकरण काहीसं न पटणारं वाटेल. पण, कपीलधर धबधबा बीड जिल्ह्य़ातलं आश्चर्य आहे. खरं तर मराठवाडय़ात दुष्काळ असतो. त्यामुळे तिथला धबधबा असं कोणाला सांगितलं की भुवया उंचावतात. सतत पाणी असणं ही भावना मराठवाडय़ातल्या लोकांना फारशी अनुभवता येत नाही. पण, या धबधब्यामुळे हा आनंद तिथल्या रहिवाशांना घेता येतो. माझ्या घरापासून जवळपास २०-२५ किमी इतक्या अंतरावर हा धबधबा आहे. पूर्वी मी कुटुंबासोबत अनेकदा तिथे जायचे. आता मुंबईत आल्यानंतर बीडला सारखं जाणं फारसं शक्य होत नाही. पण, जेव्हा जाते तेव्हा कपीलधर धबधब्याला जरूर भेट देते. तिथली हिरवळ, थंड वातावरण, प्रसन्नता मला खूप ऊर्जा देणारं वाटतं. मी कधीच तिथे कार घेऊन जात नाही. टमटम घेऊन जाणं मी पसंत करते. कारण टमटममधून जाण्यात जी मजा आहे ती कारमधून जाण्यात नाही. या धबधब्यावर जाताना एक मोठा ओढा लागतो. तो ओलांडून धबधब्यापर्यंत पोहोचता येतं. हा ओढा ओलांडणं म्हणजे एक कसोटी असते. पण, ही पूर्ण करतानाची मजाही अनुभवण्यासारखी असते. या धबधब्याच्या समोरच एक शंकराचं मंदिरही आहे. मोकळं, शांत, हिरवळीच्या या वातावरणात वेगळीच जादू असते. पूर्वी या धबधब्यावर जायचो तेव्हा खूप दंगामस्ती करायचे. पण, आता मालिकेत काम करत असल्यामुळे आणि लोक ओळखत असल्यामुळे मला पूर्वीसारखी मस्ती करता येत नाही. थोडी बंधनं आली आहेत. शूटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आता फारसं जाणं तिथे शक्य होत नसलं तरी जेव्हा जाते तेव्हा कपीलधरला काही वेळासाठी का होईना, पण भेट देतेच. त्याशिवाय माझी बीडची सहल अपूर्णच..!
पूजा ठोंबरे

lp51लंडन ठुमकदा
लंडन हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मी तिथे अनेकदा गेले आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी लंडनला गेले ते एका कार्यक्रमासाठी. तिथल्या स्थानिक मराठी माणसांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजकांपैकी पटवर्धन कुटुंब म्हणून एक होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं त्यांच्याशी खूप छान नातं निर्माण झालं. त्यानंतर दरवर्षी ते मला त्यांच्या कार्यक्रमांना बोलवू लागले. त्यांच्यासाठी मीही तिथे जाऊ लागले. तिथल्या लोकांशी मैत्री झाली. खूप लोक भेटले. दरवर्षी काही ना काही कारणांमुळे मला तिथे जाण्याचा योग येत असतो. तिथे भारतीय बरेच असल्यामुळे आपण भारतातच आहोत असं वाटतं राहतं.
तिथल्या लोकांमध्ये आपलेपणाची भावना माझ्या मनाला भिडली. खूप पॉझिटिव्ह वाटतं तिथे. लंडनमध्ये स्थायिक व्हायला मला आवडेल. प्रत्येक वेळी तिथले बरेच प्रसंग अविस्मरणीय ठरतात. पण, या वर्षीचा माझा एक भन्नाट अनुभव मला सांगायला आवडेल. या वर्षी मे महिन्यात मी लंडनला गेले होते. तिथे बीबीसी रेडिओवर माझी मुलाखत घेण्यात आली. ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न्‍स’ या दोन सिनेमांच्या निमित्ताने ती मुलाखत घेतली गेली. पण, मराठी सिनेसृष्टीबद्दलही आम्ही चर्चा केली. बीबीसीसारख्या मोठय़ा नेटवर्कमध्ये पहिल्या मराठी सेलिब्रेटीची मुलाखत येण्याचा मान मला मिळाला, याचा मला खूप आनंद झाला. बीबीसीचा स्टुडिओ बघण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. या मुलाखतीमुळे तिथले काही मराठी चाहते येऊन मला भेटले, गप्पा मारल्या. ही आपुलकी मनाला भिडणारी होती. लंडनमध्ये फिरण्या, बघण्याच्या, अनुभवण्याच्या अनेक गोष्टी आहेत. मुली आणि शॉपिंग हे समीकरण जगात सगळीकडे आहे. त्यामुळे मी लंडनमध्येही शॉपिंगसाठी खूप फिरले. त्यातली एक उत्तम जागा म्हणजे ऑक्सफर्ड स्ट्रीट. मी लंडनला गेले की या ठिकाणी जातेच. स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन हे शेक्सपिअरचं होम टाऊन बघण्यासारखं आहे. हे शहर एका म्युझियमसारखंच सजवलंय. तिथल्या एका थिएटरमध्ये नाटकांचे प्रयोग होतात. साहित्याची आवड असणाऱ्यांनी तर या ठिकाणी जायलाच हवं. बाथ ही आणखी एक लंडनमधली आकर्षक जागा. इथे नॅचरल हॉट वॉटर स्प्रिंग्स आहेत. मी मागे एकदा जानेवारीमध्ये गेलेले असताना या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तिथे बर्फ पडण्याचा ऋतू असतो. त्यामुळे बाथ या ठिकाणी जाण्याची ती योग्य वेळ ठरली. तिथल्या प्रत्येक ऋतूचा आनंद विलक्षण आहे. जुन्या, ऐतिहासिक, पारंपरिक, साहित्यिक गोष्टी खूप वर्षांपासून त्यांनी जपल्या आहेत. त्याचं जतन केल्यामुळेच लंडन माझ्या मनात घर करून आहे.
सोनाली कुलकर्णी

lp48निसर्गचित्र प्रत्यक्ष अनुभवलं
‘एकदा पाहावं न करून’ या माझ्या नाटकाचा कॅनडामध्ये प्रयोग होता. दहा वर्षांनंतर मी नाटकात काम करत होतो. त्यामुळे हे नाटक आणि त्याचा कॅनडाचा दौरा हे दोन्ही माझ्यासाठी खूप खास होतं. एकुणच माझा कॅनडाचा दौरा अविस्मरणीय ठरला. पण, त्यातही ठळकपणे लक्षात राहिला तो नायगरा धबधबा. एरव्ही फक्त फोटोत बघितलेल्या आणि पुस्तकात माहिती वाचलेल्या नायगरा धबधब्याला प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव स्वर्गीय होता. हा धबधबा अमेरिकेच्या बाजूने बघितलं तर त्याची भव्यता फारशी आकर्षित करत नाही. कॅनडाच्या बाजूने मात्र त्याचं सौंदर्य डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतं. यावेळचा एक किस्सा सांगतो. कॅनडाच्या महाराष्ट्र मंडळाने दौऱ्याची उत्तम व्यवस्था केली होती. मंडळाच्याच लीना देवधरे यांच्या घरी आम्ही दौऱ्यादरम्यान राहिलो होतो. नाटकाचे प्रयोग झाले की, त्या आम्हाला तिथली वेगवेगळी ठिकाणं दाखवायला न्यायच्या. नायगरा बघण्यासाठी आम्ही निघालो. धबधबा आणि पार्किंग यात बरंच अंतर होतं. त्यामुळे लीनाताईंनी आम्हाला एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि गाडी पार्क करून येते असं म्हणाल्या. पाऊण-एक तास झाल्या तरी त्या आल्याच नाहीत. शेवटी मी तिथल्या संपूर्ण परिसरात त्यांना शोधलं. पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येऊन मी थांबलो तर त्या तिथे आलेल्या होत्या आणि माझ्या नाटकातल्या सहकलाकार रीमाताई आणि ऋतुजा मस्त शॉपिंग करत होत्या. प्रचंड थंडीत कुडकुडत मी त्यांना शोधत फिरलो. पण, याचीही मला तेव्हा खूप गंमत वाटत होती. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे. त्यामुळे तिथेही मी खूप लवकर उठायचो. सकाळी साडेपाच-सहा उठून, आवरून घराबाहेर पडायचो. तिथली घरांची रचना, बांधकाम, लोक, पक्षी, प्राणी असं सगळं अनुभवायचो. मेपल लीव्ह्स फक्त यशराजच्या सिनेमांमध्येच दिसायच्या. पण, कॅनडात मी त्या प्रत्यक्ष बघत होतो. तिथले काही लोकप्रिय लेक बघितले. एखादं निसर्गचित्र प्रत्यक्षात अनुभवत होतो मी. तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचाही अनुभव खूप काही शिकवून गेला. कॅनडा दौरा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.
अभिजीत केळकर
शब्दांकन: चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2015 1:08 am

Web Title: travel and tourism special 13
Next Stories
1 पर्यटन विशेष : जंगल सफारी आवडीची..!
2 पर्यटन विशेष : सहलीला जाताय..?
3 पर्यटन विशेष : आम्ही पाहिलेला युरोप
Just Now!
X