सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणचा अर्क म्हणावा लागेल. इथली माणसे, इथली देवालये त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा-दंतकथा आणि इथल्या रूढी-परंपरांचा जनमानसावर असलेला भक्कम पगडा ही सारी वैशिष्टय़े सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पाहायला आणि अनुभवायला मिळतात. असेच एक रम्य गाव आणि त्या गावाशी जोडली गेलेली भन्नाट परंपरा म्हणजे आचरे गावची गावपळण. 

श्रीरामेश्वर कृपा ज्यावरी शतधारांनी झरे,
कलासक्त हे गुणीजनमंडित पुण्यग्राम आचरे
असे यथार्थ वर्णन केलेले हे आचरे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या मालवण तालुक्यात मालवणपासून फक्त २१ कि.मी.वर वसले आहे. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण प्रथा जोपासणारे हे गाव अत्यंत रमणीय आहे. कोकणात अनेक देवस्थाने आहेत, परंतु देवस्थानामधले संस्थान म्हणून जे ओळखले जाते ते फक्त आचरे गावचे रामेश्वर संस्थान. आणि या संस्थानचा महाराजा म्हणजे तेथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर. अत्यंत रम्य आणि प्रशस्त असे प्रांगण असलेले हे मंदिर आपल्याला खिळवून ठेवते. मालवणी मुलखातील सर्वात श्रीमंत देवस्थानसुद्धा हेच आहे. सर्व आचरे गावावर या रामेश्वराची कृपादृष्टी आहे आणि सारा गाव स्वत:ला या रामेश्वराचा सेवक समजतो. देवासाठी काहीही करायची इथल्या माणसांची तयारी असते आणि त्यातूनच एक अद्वितीय प्रकार, एक अनोखी प्रथा इथे पाळली जाते आणि ती म्हणजे दर तीन वर्षांनी येणारी गावपळण ही होय. काय असतो हा प्रकार आणि नक्की त्या वेळी काय केले जाते हे जाणून घेणे मोठे रंजक आहे. रामेश्वराला कौल लावून दिवस ठरवले जातात आणि ते तीन दिवस सर्वच्या सर्व गावकरी आपले चंबूगबाळे घेऊन गावातून बाहेर पडतात. सारा गाव हा रामेश्वरासाठी मोकळा करून दिला जातो. काही मंडळी आजूबाजूच्या गावांत असलेल्या नातेवाईकांकडे जातात, तर बाकीची मंडळी गावाच्या बाहेर रानात तात्पुरत्या झोपडय़ा बांधून तिथे जाऊन राहतात. तीन दिवस गावात कोणीही जात नाही. गावातले सर्व व्यवहार बंद असतात. आता गावात बँका, सरकारी कार्यालये आहेत, परंतु तिथेही शुकशुकाट असतो. गावात फक्त सुरक्षेसाठी पोलीस दिसतात, परंतु या गावात या तीन दिवसांत चोरी होत नाही. गावपळण ही प्रथा अंदाजे तीनशे- साडेतीनशे वर्षे जुनी असल्याचे गावकरी सांगतात. अशी आख्यायिका सांगितली जाते की, कधी काळी म्हणे भुतांनी या गावात उच्छाद मांडला होता, तेव्हा लोक देव रामेश्वराला शरण गेले. देव म्हणाला की, मला गाव तीन दिवस मोकळा करून द्या, मी त्या सर्व भुतांना वठणीवर आणतो आणि तेव्हापासून दर तीन वर्षांनी सगळा गाव देवासाठी मोकळा करून दिला जातो. पण सध्याच्या तरुण पिढीला हा युक्तिवाद पटत नाही. तरीसुद्धा ते मोठय़ा हिरिरीने या उपक्रमात सहभागी झालेले असतात. या गावात उच्चविद्याविभूषित आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा मोठय़ा संख्येने आहेत. ते सांगतात की, तीन दिवस गाव मोकळा राहिल्यामुळे प्रदूषण, रोगराई अशा काही गोष्टी गावात असतील तर त्यांचा नायनाट होतो. लोक मोकळ्यावर जाऊन राहतात, तिथे त्यांना वेगळे शेजारी लाभतात. त्यातून एकी निर्माण होते. एक इव्हेंट म्हणून आता हे साजरे केले जाते. निमित्त जरी गावपळण असले तरीसुद्धा जशी शहरांत माणसे आठवडय़ाचे शेवटचे दोन दिवस बाहेर जातात, तसेच इथली प्रजा बदल म्हणून गावाबाहेर जाऊन राहते. यात अंधश्रद्धा अजिबात नाही, तर एका पुरातन परंपरेचे काटेकोरपणे जतन केलेले दिसते. पूर्वीच्या लोकांचा उद्देश हाच असेल की रोगराई, प्रदूषण यापासून गाव तीन दिवस मुक्त व्हावा आणि नंतर परत नव्या उत्साहाने शुद्ध हवेत येऊन राहावे. आजही मोठय़ा उत्साहाने, सश्रद्धपणे ही गावपळण परंपरा जपली जाते. ग्रामदैवत श्रीरामेश्वरावर इथल्या लोकांची नितांत श्रद्धा आहे. त्यांच्या बोलण्यातून सतत हे जाणवत असते. २०१४ सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये ही गावपळण पाळली गेली. आता यापुढे २०१७ साली परत एकदा गावपळण होईल, परंतु तोपर्यंत हे निसर्गरम्य गाव जाऊन पाहिले पाहिजे. श्री देव रामेश्वराचे प्रशस्त मंदिर आणि आजूबाजूचा रमणीय परिसर याचे दर्शन घेतले पाहिजे. मालवणच्या अगदी जवळ असलेले हे श्रीमंत संस्थान एकदा तरी आवर्जून पाहावे असेच आहे.
केव्हा जावे? कसे जावे?
पुढील गावपळण आता २०१७ साली होणार आहे. साधारणत: दिवाळीच्या आसपास ही गावपळण होत असते. त्याकाळात आपण याचा अनुभव घेऊ शकतो. जवळच्याच चिंदर गावातदेखील गावपळण पाळली जाते.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा