मित्रांनो, आपले जगणे किती इंचांचे असावे बरे? काय विचारताय राव! याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेलही पण ते १६ इंचांपेक्षा जास्त नाही. कसे, म्हणजे बघा ना आपला दिवस सुरू होतो तो संगणक, मोबाइलच्या स्क्रीनवर आणि संपतोसुद्धा तिथेच! पण खरं सांगू आपलं आयुष्य अभेद्य, अत्युच्च अशा त्या साल्हेर किल्ल्यासारखे आहे. पण आपण आपल्या जीवनातली ती भव्यता हरवत चाललोय की काय असे आता वाटते. मला, ज्ञानूला विचाराल तर आम्ही या चौकटीच्या बाहेरची ती भव्यता अनुभवली, डोळ्यांत साठवली. या साल्हेरच्या सफरीत. सतत सतत फक्त गुगल मॅपवरून ही शिखरे पाहण्यात कसले आलेय कौतुक. दुधाची तहान ताकावरच भागवण्यासारखे झाले ना! बस्स मनाशी पक्के केले. आधी या १६ इंच चौकटीतून बाहेर पडू. जायचे कुठे?
महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आणि सर्वोच्च किल्ला, साल्हेर. मोहीम आखली, दिवस ठरला आणि निघालो या सफरीला. खरं तर शब्दात न वर्णविता येण्यासारखी झाली ही सफर. आम्ही साल्हेरच्या भव्यतेचा आणि त्या प्रवासातील अनोख्या अनुभवांचा जो असीम आनंद घेतला, तो ज्ञानूच्या फोटोग्राफीतून आणि माझ्या लिखाणातून द्विगुणित व्हावा म्हणून प्रयत्न. अर्थात हे फोटो म्हणजे साल्हेरची सफर का, तर अजिबात नाही. याहीपेक्षा खूप काही अनुभवले आहे आम्ही. जे प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभवावे असेच आहे .
आम्ही काही ‘हाडाचे’ ट्रेकर नाहीत पण फिरणे हा आमचा ‘शौक’ असल्यामुळे गाठीशी थोडासा अनुभव होता. मग त्याच अनुभवाच्या जोरावर अपेक्षित ती तयारी करून आम्ही निघालो. दोन ट्रेकिंग सॅक, एक एसएलआर कॅमेरा आणि आमची फेव्हरेट ‘हिरो प्लेजर’.
साल्हेरला पोहोचायला दोन मार्ग, एक सटाणा-साल्हेरवाडी-साल्हेर किंवा सटाणा-ताहिराबाद-वाघांबे या दोन मार्गानी आपल्याला साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. आमच्या प्रवासाचा मार्ग मालेगाव-नामपूर -ताहिराबाद-मुल्हेर व साल्हेरच्या पायथ्याशी असलेल्या वाघांबे गाव असा होता. साधारणपणे तीन तासांचा प्रवास आहे. साल्हेर ट्रेकसाठी साल्हेरच्या उत्तरेच्या वाघांबे किंवा दक्षिणेच्या साल्हेरवाडी गावात मुक्कामाला जाणे कधीही सोयीचे असते. वाघांबे मार्गे साल्हेर किल्ल्यावर पोहोचणे सोपे जाते म्हणून आम्ही वाघांबे गावचा पर्याय निवडला. वाघांबे गावातल्या सुनील महाले यांच्या सोबत आधीच संपर्क झाल्यामुळे मुक्कामाची सोय झालेली होती. सायंकाळी बरोबर साडेसहाच्या सुमारास कौलारू घरे असलेल्या, साल्हेरच्या पायथ्याच्या वाघांबे या मुक्कामाच्या गावी आम्ही पोहोचलो. पण प्रत्येक क्षणाला आमची नजर फक्त त्या साल्हेरच्या अत्युच्च टोकावर असलेल्या परशुराम मंदिरावर पडत होती. एव्हाना सूर्यास्त झाला होता आणि साल्हेरची छबी अंधारात अस्पष्ट होत होती. सुनील महाले यांनी आमचे छान स्वागत केले. त्यांच्या घरासमोरील हातपंपावर गार पाण्यात फ्रेश होऊन सारवलेल्या अंगणात निवांत बसलो. सुनील, चेतन या मित्रांसोबत छान गप्पा रंगल्या.
पहाटे अर्थातच कोंबडय़ांच्या आरवण्याने आपोआपच जाग आली. तासाभरात तयारी करून पहाटे सहा वाजता आमच्या लक्ष्याकडे अर्थातच साल्हेरच्या चढाईला सुरुवात केली. साल्हेर चढाई करण्याचे चॅलेंज आमचे आम्हालाच घ्यायचे होते म्हणून मुद्दामच वाटाडय़ा सोबत घेणे आम्ही टाळले. सुनीलभाऊंनी आम्हाला जाताना रस्त्यात वाट चुकण्याची शक्यता असल्याचे आधीच सांगून ठेवले होते. पण ‘मंजिल सामने हो तो रास्ते आपने आप मिल जाते है’ असं म्हणत आम्ही एकमेकांचा उत्साह वाढवला. वाघांबे गावाच्या जि. प. शाळेजवळून जाणारी वाट साल्हेरच्या दिशेने घेऊन जाते. ज्ञानूने प्रवासाला निघण्यापूर्वी या किल्ल्यासंदर्भात नेटवरून बऱ्यापैकी गृहपाठ केलेला होता. सोबत गडावर जाणारी वाट दर्शवणारा नकाशा, मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी, टोपी आणि या अवर्णनीय ट्रेक अनुभवाचे क्षण टिपण्यासाठी कॅमेरा असे मोजकेच साहित्य सोबत घेऊन चढाईला सुरुवात केली. वाघांबे ते साल्हेरचे सर्वोच्च टोक गाठायला साधारणत: तीन तास लागतात हे आम्हाला आधीच ठाऊक होते. खालून अत्यंत साधारण वाटणारा हा चढाईचा मार्ग तसा जरा दमछाक करणारा व खडतर आहे हे जाणवू लागले. वाघांबेपासून सालोटय़ाच्या डोंगर वाटेने प्रवास करत आम्हाला सालोटा-साल्हेरच्या खिंडीत पोहोचायचे हेच आमचे पहिले लक्ष्य होते, पण वाघांबे ते खिंड हा चढाईचा मार्ग आमच्या धैर्याची व संयमाची परीक्षा पाहणारा प्रवास होता. घामाघूम होत सालोटय़ाच्या त्या सुळक्याजवळ येऊन पोहोचलो तेव्हा क्षणभरासाठी आमच्या दोघांच्याही मनात इथूनच परत जावे असा विचार येऊन गेला हे एकमेकांचे चेहरे पाहून आम्हाला जाणवत होते. मग थांबून जरा विश्रांती घेत पाणी प्यायलो. नकाशा पाहिला आणि आम्हाला पुन्हा एकदा ती खिंड व ते टोकावर दिसणारे परशुरामाचे मंदिर खुणावू लागले. ज्ञानूने जरा धीर देत ‘दादा फक्त त्या खिंडीपर्यंत अवघड वाट आहे.’ असे म्हणत पुढच्या चढाईसाठी प्रवृत्त केले. अखेरीस ते सुळके पार करून सलोटय़ाला लागून असलेल्या पायवाटेने पुढे सरकू लागलो. ही पायवाट काहीशी उताराची व खिंडीकडे नेणारी असल्यामुळे आमच्या पावलांचा वेगही वाढला होता. सलोटय़ाच्या त्या अभेद्य कडय़ाच्या सावलीतून बरोबर एक तासाच्या चढाईनंतर आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो. दमछाक करणाऱ्या एक तासाच्या चढाईनंतर आमचा साल्हेर चढाईचा पहिला टप्पा आम्ही पार केल्याचा आनंद काही वेगळाच होता. कारण आम्ही माघारी परतलो नव्हतो. त्या खिंडीत पोहोचलो आणि आमचे चेहरेच बदलले. आजपर्यंत न पाहिलेली किल्ल्याची दक्षिण बाजू पाहताना आम्हाला समाधान वाटत होते. आतापर्यंत शांत असलेल्या ज्ञानूच्या कॅमेऱ्याची व माझ्या मोबाइल कॅमेऱ्याची क्लिक क्लिक सुरू झाली.
आता खऱ्या अर्थाने साल्हेरच्या चढाईला सुरुवात झाली होती. चढणीची वाट पार केल्यावर काही पायऱ्या आमच्या नजरेस पडल्या. पायवाटेपेक्षा इथल्या पायऱ्या जास्तच थकवणाऱ्या वाटल्या. आता नजरेस पहिला दरवाजा पडला. दरवाजा पार करून पुन्हा उंचच उंच पायऱ्या आणि घळईसारख्या आकार असलेल्या वर जाणाऱ्या वाटेवरून चढत जाऊन मग दुसरा दरवाजा लागतो. किल्ल्यावरच्या सर्व दरवाजांच्या तुलनेत हा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत आहे. आता मात्र सरळ सरळ जाणारी अशी पायवाट लागल्याने जरा बरे वाटले. साल्हेर किल्ल्याच्या अत्यंत काठावर असलेली ही खोबणीसारखी आकाराची वाट आहे. या वाटेने चालताना उजव्या बाजूला अत्यंत खोल अशी दरी असून डाव्या बाजूला वपर्यंत सरळ असलेला साल्हेरचा कडा आहे आणि मधे कोरलेल्या पाण्याच्या टाक्या व गुहा. हे सगळं पाहत पाहत आम्ही पडक्या अवस्थेतील तिसऱ्या दरवाजाजवळ येऊन पोहोचलो. हा दरवाजा ओलांडून साल्हेरच्या काहीशा सपाट असलेल्या घाटमाथ्यावर आपण पोहोचतो. साल्हेरच्या चढाईचा दुसरा टप्पा या ठिकाणी संपतो. नियोजित दोन तासांत आम्ही हे अंतर गाठल्याने आमचा उत्साह अधिकच वाढला होता. या ठिकाणी असलेला गंगासागर तलाव ही किल्ल्यावरील बऱ्यापैकी सुस्थितीत असलेली वास्तू म्हणावी लागेल. विशेष म्हणजे आजही येथे पाण्याची उपलब्धता आहे, परंतु हे पाणी पिण्यालायक नाही. या तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे व गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराजवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाकीजवळ घेऊन जाते, तर मंदिरापासून वर जाणारी वाट तीन गुहांजवळ घेऊन जाते. साल्हेर किल्ल्यावर अनेक ट्रेकर्स या ठिकाणी मुक्कामाला पसंती देतात हे गुहेसमोरील सपाट अंगणासारख्या असलेल्या भागावरून लक्षात येते. साल्हेरच्या अत्युच्च शिखराकडे जाण्यासाठीचा शेवटचा टप्पा सुरू होतो तो इथूनच. तत्पूर्वी या घाटमाथ्यावरून पश्चिमेकडे नजर टाकली तर स्पष्टपणे गुजरात राज्यातील ‘डांग’ जिल्ह्य़ाचा प्रदेश दिसतो. हेच गुजरात राज्यातील प्रसिद्ध ‘पूर्णा’ अभयारण्य होय. गुहांच्या शेजारून वर जाणारी वाट किल्ल्याच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते हे लक्षात आल्यावर आम्ही पुन्हा जोशात चढायला सुरुवात केली.
बराच चढावाचा भाग पार करून वर आल्यावर अचानक मला परशुरामाचे मंदिर दिसले आणि खूप मोठय़ाने मी ओरडलो ‘ज्ञानू येस वी कॅन डू इट’ लवकरच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू. बघता बघता ज्ञानूने मला मागे टाकत मंदिराचा चढ वेगाने चढायला सुरुवात केली. ज्या क्षणी आमच्या नजरेत मंदिर पडले, त्या क्षणी दोन-अडीच तासांपासून दमछाक करणाऱ्या चढाईमुळे पायांना आणि शरीराला जाणवणारा त्रास क्षणार्धात आम्ही विसरलो. आम्ही दोघेही महाराष्ट्रातील दुसऱ्या अत्युच्च शिखरावर काही क्षणात पोहोचतो आहोत हा विचारच आमच्या मध्ये ऊर्जेची एक लहर पसरवून गेला. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत तीन तासांच्या चढाईनंतर अखेरीस सकाळी नऊ वाजता आम्ही आमच्या अंतिम लक्ष्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो. श्री परशुरामच्या मंदिराच्या चौथऱ्यावर चढून परशुरामाचे दर्शन घेऊन घंटानाद करीत आम्ही आमच्या विजयाचा आनंद साजरा करीत होतो. सोसाटय़ाचा वारा आणि सावलीतला गारवा व नजर जाईल तिकडे फक्त निसर्गाचे अफाट अद्भुत रूप.. ज्ञानूसाठी तर त्याच्या फोटोग्राफीसाठीचा हा परमोच्च क्षण होता. त्याने पटापट फोटो क्लिक करायला सुरुवात केली. त्या टोकावरून ३६० कोनातून विहंगम दृश्य नजरेस पडत होते. येथून संपूर्ण बागलाण भाग दिसतो. समोर दक्षिण बाजूला अजिंठा-सातमाळ डोंगर रांगेतले धोडप-ईखारिया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मंगी-तुंगी, तंबोळ्या, न्हावी रतनगड, हनुमान टेकडी, मोरा-मुल्हेर, हरगड, हरणबारी धरण आणि सालोटा नजरेस पडतो. खालून चढाई करताना अत्यंत उंच वाटणारा सालोटा किल्लासुद्धा साल्हेरच्या टोकावरून नजरेच्या खालीच दिसतो. पश्चिमेला पायथ्याशी असलेले साल्हेरवाडी हे गाव व वळणावळणाचे रस्ते, दूरवर सटाण्याजवळील केळझर धरण स्पष्ट दिसते. मंदिराच्या मागच्या बाजूने आपण ज्या वाटेने येतो ती वाटही दिसते. साल्हेर, सालोटा व सातमाळ डोंगर रांगेच्या शिखरांचा भाग म्हणजे महाराष्ट्र तर विरुद्ध बाजूस खोलगट व काहीसा पठारी असलेला भाग म्हणजे गुजरात या निसर्गानेच निश्चित केलेल्या प्रादेशिक सीमा स्पष्ट जाणवतात. इ. स. १६७१मध्ये छत्रपती शिवरायांनी बागलाण मोहीम काढून साल्हेर जिंकून घेतला त्या काळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही राजांनी हा अभेद्य किल्ला जिंकून सुरतेवर जरब बसवून संपूर्ण बागलाणवर स्वराज्याचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. किल्ल्यावर हा इतिहासाची उजळणी करताना आणि सह्य़ाद्रीचे ते रांगडे रुप पाहताना आमचा एकदीड तास कसा गेला ते आम्हाला कळलेसुद्धा नव्हते. खाली परतूच नये असे वाटावे इतके हे ठिकाण विलक्षण आहे. पण उतरावे तर लागणारच होते. बराच वेळ तेथे रेंगाळल्यावर उताराचा आरंभ झाला. उतरताना मात्र नियोजित वाटेहून न परतता एका आडवाटेने आम्ही उतरू लागलो, पण ती उताराची वाट जीवघेणी वाटली. अत्यंत धीम्या गतीने आम्ही उतरलो. उतरताना साल्हेरवाडीकडून असलेल्या वाटेने उतरणे हादेखील छान अनुभव ठरला असता. उतरताना गुडघे व कंबरेला ताण जाणवत होता. उन्हाची दाहकता ही खाली येताना वाढत होती. पण ज्या पायवाटेवरून साल्हेरच्या चढाईला आम्ही सुरुवात केली होती त्या गावातल्या वाटेवर येऊन पोहोचल्यावर क्षणभर मागे वळून पाहिल्यावर स्वत:वरच विश्वास बसत नव्हता की आपण हे इतके उंचावर जाऊन आलो. परतीच्या मार्गावरून पुन:पुन्हा त्या साल्हेरच्या शिखराकडे वळून पाहताना मनोमन त्याला थँक्स म्हटले कारण आमच्यातील क्षमतांची जाणीव आम्हाला त्या साल्हेर किल्ल्यानेच करून दिली होती आणि रोजच्या जगण्यात स्वत:चा इगो, मान, पद, पैसा, प्रसिद्धी यांची मिरास सांभाळणारे आपण या साल्हेरच्या उंचीपुढे किती ठेंगणे आहोत याची जाणीवही त्यानेच आम्हाला करून दिली होती.