09 August 2020

News Flash

नि:शंक- निर्भय…

काही स्तोत्रं ऐकता क्षणी मनाला उभारी देणारी असतात.

स्वामी समर्थ

चैतन्यप्रेम – response.lokprabha@expressindia.com
शब्दार्त

काही स्तोत्रं ऐकता क्षणी मनाला उभारी देणारी असतात. ती ज्या महापुरुषांची आळवणी करीत असतात, त्यांचं कृपासामथ्र्य तर त्यात असतंच, पण त्यातील शब्दांचं सामथ्र्यही फार मोठं असतं. पण बरेचदा स्तोत्राचा मूळ कर्ता हा उपेक्षितच राहतो. तसंच काहीसं स्वामींच्या या अतिशय विख्यात स्तोत्राच्या कर्त्यांच्या बाबतीत घडलं आहे.

निशंक हो, निर्भय हो, मना रे।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे॥

या स्तोत्राला थेट स्वामी समर्थाच्या प्रभावी तारकमंत्राचा मान मिळाला. अनेक मोठमोठय़ा गायकांनी त्याचं गायन केलं, त्याच्या ध्वनिफितींचाही मोठा प्रसार झाला, पण कवीचं नाव कोणत्याही ध्वनिफितीवर छापलेलं दिसलं नाही. काही ठिकाणी तर संगीतकाराचंच नाव कवी म्हणून छापलं गेलंय. अखेर परिचयातील अनेक साधकांना आवाहन केलं तेव्हा एक नाव अधिक प्रमाणात ऐकू आलं, ते नागपूरचे विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे यांचं. सोलापूरचे प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांनी ‘स्वामी प्रबोध’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांनी हा उल्लेख केला असून वऱ्हाडपांडे यांनी १० मे १९८३ साली ‘कृपाप्रसाद’ नामक पुस्तिकेत हे स्तोत्र प्रथम प्रकाशित केल्याचं नमूद केलं आहे. नाशिकच्या प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांनी स्वामी समर्थावर पीएच.डी. केली आहे. या दोघांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी वऱ्हाडपांडे यांच्या नावालाच दुजोरा दिला. विशेष म्हणजे हे दोघेही वऱ्हाडपांडे यांना प्रत्यक्ष भेटलेही होते. ते थोर स्वामीभक्त होते आणि अखेरच्या काळात त्यांचं नाशिकलाच वास्तव्य होतं, एवढंच समजलं. असो. थोडं विषयांतर झालं, तरी ते महत्त्वाचं होतं कारण ज्यानं इतके अनमोल असे भावनेनं ओथंबलेले शब्द स्तोत्रात प्रकट केले त्यांचंही कृतज्ञ स्मरण केलं पाहिजे. आता स्तोत्राकडे वळू.. स्तोत्राचं पहिलं कडवं आहे –

निशंक हो, निर्भय हो, मना रे।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे॥
अतक्र्य अवधूत हे स्मर्तृगामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥

पहिले दोन शब्दच अगदी लाखमोलाचे आहेत. ‘निशंक हो’! अहो सगळा परमार्थच या निशंकतेवर अवलंबून आहे. शंकेखोरपणा असेल, तर परमार्थ कठीण. प्रपंचात ठायी ठायी ठेच लागूनही आपण तो प्रपंच निशंकतेनं करतो आणि परमार्थ मात्र शंकेखोर वृत्तीनं करू पाहतो, मग कसं साधणार? इथं शंका म्हणजे जिज्ञासा नव्हे बरं का! जिज्ञासा हा एका मर्यादेपर्यंत मोठा गुण आहे. जीवनाची उलथापालथ पाहून, जीवनाचा नेमका हेतू तरी काय असावा, आपल्याला जीवनात खरंच काय मिळवायचं आहे, ही जिज्ञासा जागी होऊ लागते. त्या जिज्ञासेमुळे पुढची वाटचालही होते. शंकेखोरपणा म्हणजे नुसता संशय. श्रीगुलाबराव महाराजांनी संशयाला बुद्धीचा दोष मानलं आहे. गणित सोडवताना ‘क्ष’ धरण्यात आपल्याला काही चुकीचं वाटत नाही, पण या चराचरावर ईश्वराचा ताबा आहे, त्याचा आधार घेतला तरच जीवनाचं गणित सुटेल, हे आपल्याला मान्य होत नाही. या वृत्तीमुळे सकारण किंवा अकारण, अशी स्तोत्रं म्हणताना तो भावच जागा होत नाही. प्लास्टिकच्या कृत्रिम वेलीला कितीही पाणी घातलं, तरी सुगंधित फुलं येतील का? तसं आहे हे! सद्गुरू एकदा म्हणाले की, ‘‘देवाची मूर्ती ही यंत्रच असतात. त्या मूर्तीसमोर किंवा सत्पुरुषाच्या तसबिरीसमोर प्रार्थना करताना, आपली प्रार्थना ऐकली जात आहे, हा विश्वास कुठे असतो? विश्वास नसेल, तर ती कशी ऐकली जाईल?’’ आणि खरंच आहे. लहानपणी परीक्षेआधी मुलं देवळातल्या किंवा घरातल्या देवाला प्रार्थना करतात की, ‘देवा मला यश दे,’ तेव्हा ती प्रार्थना पोहोचत आहे, हा क्षीणसा का होईना भाव असतो. वय वाढतं तेव्हा मात्र प्रार्थना करताना अनेकांच्या मनात असाही झंझावात सुरू असतो की, ‘इतक्या वेळा विनवणी करतोय, पण ती खरंच ऐकली जात आहे का, काय माहीत!’ तेव्हा मग या साशंकतेपायी त्या प्रार्थनेला आपल्याकडूनही सत्यत्व उरत नाही!

पण मग काय खरंच प्रार्थना परमात्मशक्तीपर्यंत पोहोचतच नाही? हे जाणण्याआधी या प्रार्थनेमागचं मधुर रहस्यही जाणून घ्यावं लागेल. काय आहे हे रहस्य? तर, संकटात सापडल्यावर आपण ज्याची आळवणी करीत आहोत तो परमात्मा खरंतर चराचरात सर्वत्र भरून असतो. मग जो समस्त चराचरात आहे तो माझ्याही अंतकरणात नाही का? तर अर्थात आहे. आता परमात्मा म्हटला की त्याची शक्तीही त्याच्याबरोबर आलीच. तो आणि त्याची शक्ती सदैव अभिन्न आहेत. त्यामुळे जसा परमात्मा माझ्या अंतकरणात आहे तशीच त्याची परमात्मशक्तीही माझ्या अंतकरणात सदैव आहे. त्यामुळे समोरच्या मूर्तीरूपाला मी जी प्रार्थना करतो तीदेखील माझ्याच अंतकरणातील परमात्म्यापर्यंत पोहोचून माझ्याच अंतरंगातील परमात्मशक्ती जागी होत असते! मनाचं बळ, सकारात्मकता आणि सहनशीलता या प्रार्थनेमुळे वाढत असते. पण ते आपल्याला पटत नाही. आपण उच्चार करताच ‘गुगल व्हॉइस सर्च’ त्या उच्चारलेल्या शब्दांनुसार शोध घेतं, हे अनुभवानं पटतं, पण देवाची मूर्ती काही प्रतिसाद देत नाही, असं आपण प्रार्थनेआधीपासूनच मानत असतो!

म्हणून हे स्तोत्रही सांगतं की, सर्वप्रथम निशंक व्हा! आणि एकदा निशंकता आली की निर्भयता येतेच. साशंकता असते तिथंच भीती असते. पण या निशंकतेचा आणि निर्भयतेचा आधार कोण आहे? काय आहे? तर, ‘प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!’ स्वामी समर्थाचं प्रचंड बळ, प्रचंड शक्ती पाठीशी आहे!

स्वामींचं आजानुबाहु रूप, भेदक दृष्टी आणि चेहऱ्यावर स्पष्ट झळकत असलेला अशाश्वताच्या ओढीचा तिटकारा; हे पाहूनच त्यांच्यातील असीम शक्तिप्रवाहाची कल्पना येते. कुठलाही ढोंगीपणा तिथं खपत नाही. मग ते भक्तीचं ढोंग असेल, तर बघायलाच नको! अक्कलकोट संस्थानचा राजा हत्तीवरून त्यांच्या दर्शनाला आला, तर स्वामींनी त्याच्या श्रीमुखात जोरदार थप्पड दिली! का तर माझ्यापाशी यायचं असेल, तर अहंकाराच्या हत्तीवरून झुलत येऊ नका! त्या अहंकाराला पहिली थप्पड पडेल! पण जो जसा आहे तसा त्यांच्यासमोर पेश होतो ना, त्याला कोणतंही भीतीचं कारण नाही. अगदी स्वतमधील दुर्गुणांची वा विकारांचीही भीती बाळगायची गरज नाही. हिमालयात समर्थ असताना शिकारी मागे लागलेलं एक पाडस घाबरून समर्थाजवळ आलं. तो शिकारीही पाठोपाठ धावत आला. इथून पुढे हा प्रसंग दोन प्रकारे सांगितला जातो. एके ठिकाणी म्हटलं आहे की शिकाऱ्यानं पाडसावर गोळीबार करण्यासाठी नेम लावला तोच तो पुतळ्याप्रमाणे थिजून गेला. अन्य ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, शिकाऱ्यानं गोळीबार केला, पण काही उपयोग झाला नाही. मग चिडून त्यानं स्वामी समर्थावरही गोळीबार केला, पण काही झालं नाही. अखेर तो शरण आला आणि पाडसाला जीवदान मिळालं. अगदी त्या पाडसाप्रमाणे माणूस समर्थ चरणी आला, त्याला खरा समर्थ आधार मिळाला, तर शिकारीरूपी संकटरूपी प्रारब्धभोग काही करू शकत नाहीत! अखेर प्रारब्धच हार मानतं. याच रूपकाची आणखी एक विलक्षण अर्थछटा आहे ती अशी की, पाडस म्हणजे आपल्यातलेच सद्गुण आणि शिकारी म्हणजे आपल्यातलेच दुर्गुण! या दुर्गुणांच्या, विकारांच्या ताकदीनं आपण भयकंपित होतो. पण त्यांना नष्ट करून मग सद्गुरू सेवा करू, असा विचार केला, तर त्यांचा प्रभाव कमी होण्याऐवजी आणखीनच वाढेल. तेव्हा सद्गुरू चरणी ते सदगुण अर्पण केले, तर दुर्गुणांना तेच काबूत आणतात! तेव्हा हे मना, बाह्य़ परिस्थितीबद्दल निर्भय होच, पण तुझ्यातील कथित दुर्गुण, विकार यांच्याबाबतीतही निर्भय हो! कारण.. प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!

स्वामींचं प्रचंड बळ पाठीशी आहे. या बळाची वैशिष्टय़ं काय आहेत? तर स्तोत्रात पुढे लगेच ही वैशिष्टय़ंही उलगडताना म्हटलंय, ‘अतक्र्य अवधूत हे स्मर्तृगामी। अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥’ स्वामी अतक्र्य आहेत, अवधूत आहेत, स्मर्तृगामी म्हणजे आठवण काढताच प्रकट होणारे आहेत. अशक्य भासणारी गोष्टही तेच केवळ शक्य करू शकतात!

स्वामी अतक्र्य आहेत म्हणजे त्यांची कोणतीही कृती आणि त्यांचं अवताररहस्य तर्काच्या पातळीवर आकळेल, असं नाही. ते अवधूत आहेत म्हणजे पूर्ण विरक्त फकीर आहेत. ते स्मर्तृगामी म्हणजे अन्य कशानंही नाही, तर केवळ त्यांच्या नुसत्या स्मरणानं गवसणारे आहेत. पण ते स्मरण मात्र हृदयाच्या तळापासून पाहिजे! त्या स्मरणात निशंकता पाहिजे. एकदा माझे सद्गुरू म्हणाले की, ‘मी मागे-पुढे उभा आहे!’ मी विचारलं की, ‘तुम्ही मागे-पुढे उभे आहात, हे बघण्याची दृष्टी कधी येईल?’ तर म्हणाले, ‘तसा भाव असेल, तर येईल!’ हा भाव नि:शंकतेशिवाय येणं अशक्य!

त्यानंतर हे स्तोत्र सांगतं की स्वामी अशक्य भासणारी गोष्टही घडवितात! आपण एखाद्या संकटात सापडलो ना की आपल्याला स्वामी समर्थासारख्या अवतारी पुरुषाचा हाच ‘गुण’ सर्वाधिक आवडतो तो म्हणजे ‘अशक्यही शक्य करतील स्वामी’! पण खरं पाहता अशक्य काय आहे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:01 am

Web Title: undoubted and fearless mind
Next Stories
1 भविष्य : दि. २४ ते ३० जानेवारी २०२०
2 डिजिटल लोकशाही
3 संकट-मोचक!
Just Now!
X