01-vachak-lekhakप्रत्येकाच्या लहानपणीच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींशी पुढच्या काळातले अनेक मनोव्यापारही जोडलेले असतात. सुबाभळीशी जोडलं गेलेलं असंच एक बालपण…

संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यास निघालो. जोराने वारा आल्यामुळे एक सुबाभूळ व वावळीची शेंग उडून आली होती. चप्पल घालताना अचानक त्या शेंगांकडे पाहिले व हळूच मनातच हसलो. लहानपणात गर्क झालो. ते पोलीस चाळीतील हुंदडणे, खान्देशी भाषेत डवरणे.

वडील पोलिसात असल्यामुळे त्यांची कुठे ना कुठे बदली होत असे. मी बालवाडीत होतो तेव्हा आम्ही एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) या ठिकाणी होतो. वडिलांची बदली तेथेच होती. भाऊ तर अगदीच लहान होता. पोलीस चाळीतील आम्ही सर्व चिल्लर पार्टी एकत्रच बालवाडीला जायचो, मस्ती करायचो. कधी-कधी तर दगडाने एकमेकांचे डोकेही फोडायचो.

संध्याकाळी घरातून बाहेर पडताना त्या शेंगांकडे पाहिले, तेव्हा त्या शेंगांच्या भिंगऱ्या/फिरक्या बनवून खेळतानाचे, ते धरून पळतानाचे आमचे बालपण आठवले. आम्ही सर्व चिल्लर पार्टी मिळून त्या शेंगा जमा करायचो व जाडसर किंवा बारीक काडय़ा जमा करून बाभळीचे मोठमोठे काटे जमा करून खान्देशी भाषेतील लेंडय़ा (बकरीची विष्ठा) जमा करत असे.

या लेंडय़ा जमा करून सुबाभूळ किंवा वावळीच्या शेंगांची भिंगरी/ फिरकी बनवत असे. आम्ही सर्वात अगोदर त्या शेंगांचे दोन भाग करत असू. त्यापैकी एक भाग घेऊन त्याला अगदी मधोमध छिद्र पाडू. ते छिद्र असे होते की एखाद्या काडीत ती शेंग अडकवून हवा आल्यावर फिरू शकेल असे सैल व मोठे छिद्रे असे. त्यात काटा घालून तो त्या शेंगांच्या भिंगरींसह जमा केलेल्या काडीत अडकवायचो. ती भिंगरी किंवा शेंग निघू नये म्हणून पुढे बकरीची लेंडी लावत असे व संपूर्ण पोलीस चाळीत ती भिंगरी वाऱ्याच्या दिशेने घेऊन/धरून पळत असे. माझा जवळचा मित्र पिंटू (प्रशांत भावसार) या भिंगऱ्या घेऊन माझ्यासोबत संपूर्ण चाळीत पळत असे.

ती भिंगरी जेव्हा वाऱ्याच्या वेगाने फिरायची, तेव्हा आमच्या त्या बालमनाला कोण आनंद व्हायचा! खूप मजा येत असे या भिंगऱ्या खेळताना. काही दिवसांनी वडिलांची बदली मुक्ताईनगरहून जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झाली आणि प्रशांतची व माझी ताटातूट झाली. तो मुक्ताईनगरला व मी नशिराबाद येथे आलो. तात्पुरता हा माझा खेळ बंद झाला. कारण नशिराबाद येथे आम्ही पोलीस चाळीत नाहीच राहिलो. तसे तेथेही शाळा नवीन होती व मित्रही.

नशिराबाद येथे सर्व नवाडं-नवाडं होते. तसं गाव मोठेच आहे. इथे मला जि.प. मुलांची शाळा नं-१ला नाव घातलं व नवीन मित्र बनले. एका महिन्यातच नव्हे, सहा दिवसातच रुळायला, मित्रांमध्ये मिसळू लागलो. पण तरीही मुक्ताईनगरची पोलीस चाळ, तिथले मित्र, एकमेकांचे डोके फोडणे, सुबाभूळ व वावळीच्या शेंगाच्या भिंगऱ्या घेऊन हिंदडणे, खिदळणे, तो प्रशांत सर्व कसं आठवतच असे. इथल्या मित्रांना हा भिंगरीचा खेळ माहीतही नव्हता. इथल्या मुलांना लपाछपी, गोटय़ा, भोवरे हे खेळ माहीत होते. मग मीच येथे हा भिंगऱ्यांचा/फिरक्यांचा खेळ सुरू केला. मुलांना थोडा हा खेळ नवखाच होता, पण मी त्यांना समजावून दिले व हा खेळ नशिराबादला सुरू ठेवला परत.

नशिराबाद येथे आम्ही भाडय़ाच्या घरात राहायचो. सहा-सात वर्षे आम्ही नशिराबाद येथे छानपैकी काढले. इथे मला अविनाश व ललित कावळे, मंदार मोहरीर, गौरव कुलकर्णी, वैभव खाचणे, भूषण ठोंबरे (िपटू) असे अनेक मित्र मिळाले. आम्ही संपूर्ण गाव, नशिराबाद हिंदडत असू. गणपती व नवरात्रीला तर संपूर्ण गावभरचे गणपती किंवा देवी पाहण्यासाठी आम्ही गँग करून जात असू. आम्ही सुनील कुलकर्णींच्या घरात भाडय़ाने राहायचो, अगोदर आम्ही चार-सहा महिने मंदारच्या घरात भाडय़ाने राहून काढले व नंतर सहा महिन्यांनी सुनीलकाकांच्या घरात राहायला आलो. येथेही आम्ही कुठूनही त्या शेंगा आणायचो, काटे, लेंडय़ा व काडय़ा जमा करून ही भिंगरी बनवायचो.

नशिराबादचा उरूस जळगाव जिल्ह्यात खूपच प्रसिद्ध आहे. येथेही भिंगऱ्या मिळायच्या. त्या कागदांच्या पट्टय़ा व बारीक तारांच्या रिंगांपासून बनलेल्या असायच्या. खूप वेगाने फिरायची ती भिंगरी. पण तिला स्वत:च्या हाताने बनवलेली वावळी किंवा सुबाभळीच्या शेंगापासून बनवलेली भिंगरीची मजा नव्हती व ती टिकावूही नव्हती. ही भिंगरी आता मोबाइल व्हिडीओ गेम तसेच कॉम्प्युटवरील व्हिडीओ किंवा ऑनलाइन गेमच्या जमान्यात लुप्त झाली आहे. हा खेळ सध्याच्या हायटेक जगात नाहीसा झाला आहे. यांच्या फक्त आठवणीच आता उरलेल्या आहेत. बरीचशी मुले मग ती खेडय़ातली असोत वा शहरातली असो. सर्व या खेळाला, या भिंगरीला विसरून व्हिडीओ गेम्समध्ये दंग/गर्क झालेले आहेत. या भिंगऱ्या आता कोणीच फिरवत नाही व खेळत/ बनवत नाही. प्रशांत कधी-कधी पाचोऱ्यात भेटतो, कारण तो पाचोऱ्यातच राहतो. त्याला या शेंगा दाखवून विचारले, ‘या शेंगेकडे बघून तुला काय आठवते?’ तर तो याचे उत्तर नेहमी हसूनच देत असतो. आम्ही एकमेकांशीच बोलतो- ‘मस्त होते रे ते दिवस; ते मुक्ताईनगर, ती सुबाभूळ आणि वावळीच्या शेंगेची भिंगरी. येतील का परत ते सोनेरी दिवस?