आसाममध्ये नुकतेच बोडो दहशतवाद्यांनी आदिवासी जमातीवर हल्ला करून ७८ जणांना ठार केले. या घटनेमुळे आसामातील आदिवासींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यापूर्वीही याच तऱ्हेने सन १९९९ मध्ये २५० आदिवासींचे हत्याकांड बोडो भागात झाले होते.

गेल्या दोन महिन्यांपासून नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) या दहशतवादी संघटनेच्या जहाल गटाने शांततेसाठी सुरू असलेल्या चर्चेला विरोध करीत घातपाती कारवाया सुरू केल्या, परंतु बोडो दहशतवाद्यांनी केलेला अतिरेकी हल्ला अनपेक्षित असा नाही, तर सुनियोजित असा होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण आसाममध्ये १९७८ पासून दहशतवादी हिंसाचार सुरू आहे. बोडो दहशतवाद्यांनी या वेळी इतर कोणत्याही जमातीतील लोकांना लक्ष्य न करता, केवळ आदिवासी जमातीला लक्ष्य केले. बोडो दहशतवादी आदिवासी जमातीवर हल्ला करणार याची माहिती राज्याच्या गुप्तचर खात्याला मिळू नये हे असंवेदनशील सरकार आणि गुप्तचर खात्याचे अपयश आहे.
बोडो दहशतवाद्यांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे गेल्या तीन-चार दशकांत आसाम राज्यात सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहशतवाद्यांना बोडोलँड हे स्वतंत्र राज्य हवे आहे. गेल्या २० वर्षांपासूनची त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी बोडो दहशतवाद्यांकडून सतत हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात निष्पाप लोकांचे जीव जातात. तसेच आसाम हे चीन, भूतान, बांगलादेश, म्यानमार देशाच्या सीमेवर आहे. त्यामुळे आसामला घुसखोरांकडूनसुद्धा धोका आहे. आसाम राज्याची सीमा जंगल आणि पहाडांनी युक्त असल्याने बांगलादेशी लोकांची मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी झाली आहे. त्यामुळे आसाम राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घुसखोरीला अटकाव करण्यासाठी कोणतीही यंत्रणा प्रभावीपणे अमलात आणली नाही. कारण आसामच्या २६३ पैकी १९७ कि.मी.पर्यंतच्या सीमेला कुंपण आहे. बाकीच्या उर्वरित सीमेला कुंपण का नाही? असा प्रश्न पडतो. आज देशात घुसखोरी करून स्थायिक झालेल्या बांगलादेशींची संख्या अंदाजे चार-पाच कोटींच्या घरात जाईल, त्यापैकी एक कोटी आसाम राज्यात आहेत. तेथे आपला पक्ष त्यांनी स्थापन केला आहे. बोडो जमात या घुसखोरांविरुद्ध सतत लढा देण्यात आघाडीवर असते.
बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात १९८० दशकात आसामातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ऑल आसाम स्टुडण्टस् युनियन (आसू)च्या नेतृत्वाखाली घुसखोरी विरोधात प्रखर आंदोलन केले होते. त्या वेळी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींनी आसाममधील नेत्यांशी चर्चा करून आसाम करार केला. या करारात १९७१ नंतर घुसखोरी केलेल्या बांगलादेशी यांना हाकलून द्यायचे ठरले. यासाठी लवाद नेमला गेला होता, मात्र केंद्राने करार पाळला नाही. वास्तविक ज्या वेळी पाककडून बांगलादेशातील लोकांची गळचेपी होत होती. त्या कारणामुळे बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर भारतात घुसखोरी झाली. तेव्हा स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगलादेश मुक्तीच्या लढय़ात सहभागी होऊन पाकचा भारतीय सैन्याकडून पराभव केला. त्याच वेळी बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना परत पाठवायला हवे होते, पण स्वार्थासाठी ते केले गेले नाही.
आताच्या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वानी निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली, परंतु ज्या लोकांना मारण्यात आलं त्याची भरपाई मदत देऊन होणार आहे का? आपण प्रत्येक वेळी फक्त निषेध व्यक्त करतो. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसामात रक्तपात घडवून आणणाऱ्या बोडो दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. आजपर्यंत केंद्रात सत्तेवर असणाऱ्या सरकारांनी बोडो दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे फक्त इशारे दिले. कारवाई कोणती केली? खरे तर इशारे न देता प्रश्नाच्या मुळाशी हात घातला पाहिजे. बोडो दहशतवादी तरुणांना बोडोलँड हे स्वतंत्र राज्य पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी. हे एक कारण असले तरी लोकांचा चरितार्थ प्रामुख्याने चहा मळ्यावर आहे. चहा मळ्याची मालकी परप्रांतीय धनाढय़ांच्या हातात आहे. शिवाय लोकांचे धर्मातरसुद्धा मोठय़ा प्रमाणावर होत गेले. हे बोडो तरुणांच्या वैफल्याचे कारण असू शकते.
आसाम हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. तरी येथे बोडोंचे वर्चस्व आहे. ते कोणालाच भीक घालत नाहीत. तेव्हा कोणतीही घटना घडल्यावर त्यातून काहीना काही शिकायचे असते. एखादे संकट आपल्या दारात उभे राहत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य लक्षात घ्यायचे नाही, अशी मानसिकता आढळून येत नाही. आसाममधील लोकांचे बोडो दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय असणे महत्त्वाचे आहे. नुसता समन्वय असणे महत्त्वाचे नाही, तर त्यातून काही पर्याय निघणे गरजेचे आहे. केंद्रात पूर्ण बहुमताचे भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या आशा वाढल्या आहेत. तेव्हा केंद्र सरकारने आसाममधील ताज्या घटनेचा गांभीर्याने विचार करावा आणि त्यादृष्टीने तातडीने काही पावले उचलण्याची गरज आहे, तरच बोडो दहशतवादाचा वाढता प्रभाव रोखला जाईल. तसेच आसाममधील लोक सुखाने जगू शकतील असे वातावरण निर्माण करावे अन्यथा आसामच्या विविध भागांत बोडो दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच राहतील आणि आसाममधील लोकांना जगणे कठीण होऊन जाईल.
सुनील कुवरे