ती सवय कधी लागली माहीत नाही. लागली खरी. मी आणि माझा छोटा भाऊ कोळकांडाच्या कट्टय़ावर वाकून खाली जाणाऱ्या लोकांवर थुंकायचो. लोक विचित्र नजरेने बघायचे. हाताने पुसून टाकायचे. शिव्या द्यायचे. पण वर येऊन कुणी आम्हाला मारले नाही. आम्ही लहान होतो.
एकदा काय झालं. चौघुले मिठाईवाला जात होता. दोन्ही हातात दुधाच्या बादल्या होत्या. माझा भाऊ पचकन थुंकला त्याच्या बादलीत आणि पळून गेला. मी तेथेच थांबलो. मी थुंकलो नव्हतो. मला घाबरण्याचं कारण नव्हतं.
तो मिठाईवाला गुपचूप वर आला आणि त्यानं माझं बकोटं धरलं. घेऊन गेला मला माझ्या आईकडे आणि फाडकन मुस्काटात मारली. मी कळवळलो.
‘‘मी नाही हो थुंकलो, माझा भाऊ थुंकला,’’ मी ओरडून सांगितलं. त्यानं ऐकलं नाही.
कोळकांडात टय़ूशनची मुलं सायकली लावायची. आम्हाला खेळायला जागा नसायची. मी सगळय़ा सायकलींची हवा काढून टाकायचो. हातगाडीचं वंगण सीटांना लावायचो. क्लास सुटला की सगळी मुलं गलका करायची. वंगण पाहून जाम चिडायची. मी कधी कुणाच्या हाती लागलो नाही.
मी खूप गमती केल्या लहानपणी. त्याची एक कहाणी झाली. दिवस भरभर जात होते. म्हणता म्हणता मी मोठा झालो. चाळीस वर्षे झाली त्या गोष्टीला. चौघुले मिठाईवाल्याचं दुकान तसंच होतं.
मी गेलो. गुलाबजाम खाल्ला. म्हातारा गल्ल्यावर बसला होता. मी म्हणालो, ‘‘आजोबा, का मारलंत माझ्या थोबाडीत. मी खरंच थुंकलो नव्हतो. तो माझा भाऊ होता.’’
म्हातारा चक्रावून गेला. पाहत राहिला. ‘‘कोणी मारलं थोबाडीत? मला तर काहीच आठवत नाही.’’
मी म्हणालो, ‘‘आजोबा, ज्याला जखम होते त्याला आठवतं, व्रण तिथे असतो. तुम्ही फक्त वार केलात. भाऊ सुटून गेला. अपमानाची जखम ताजी आहे इथे माझ्या मनात. आणि कायम राहील मरेपर्यंत.’’
म्हातारा म्हणाला, ‘‘पोरा विसरून जायचं अशा बारीकसारीक जखमा. नको कुरवाळत बसू. हा घे अजून एक गुलाबजाम माझ्याकडून आणि माफ कर मला झाल्या चुकीबद्दल.’’
माझ्या डोळय़ांत पाणी आलं. एक जखम धुतली गेली.